पावसाळा सुरु झाला, की सह्यद्रीच्या मुख्य रांगेशिवाय अन्य भागातील गडदुर्गावर आपली नजर वळवावी. हिरवाईत नटलेले हे गडकोट वेगळय़ाच जगात घेऊन जातात. अकोले आणि सिन्नर तालुक्याच्या सीमेवरील पट्टा उर्फ विश्रामगडाची भ्रमंतीही अशीच.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या पश्चिमेला आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यावर निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगडापासून सुरु झालेली ही उधळण पाबर, रतनगड, भंडारदरा, कळसुबाई, बितींगा ते औंढा आणि पट्टय़ा गडावर विसावते. यातल्याच पट्टा उर्फ विश्रामगावर आज जाऊयात.
या गडावर जाण्यासाठी अकोले, सिन्नर आणि इगतपुरी अशा तीन ठिकाणाहून रस्ते आहेत. आम्ही सिन्नर तालुक्यातील ठाणगावमाग्रे निघालो होतो. ठाणगाव पार केल्यानंतर काही वेळातच सोमठाणे तीर्थक्षेत्राची गाठ पडते. वनराईत हरवलेल्या या सोमठाणे गावातील पुष्करणी पाहण्यासारखी. निरव शांततेतील या पुष्करणीमध्ये बाराही महिने पाणी वाहत असते. यानंतर वैतागवाडी (सध्याचे शिवाजीनगर) करत विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या पट्टेवाडीत पोहोचायचे.
पायथ्याशी नव्याने उभारलेली कमान आपले स्वागत करते. तिथे असलेला वनखात्याच्या कर्मचाऱ्याकडे नोंद केली, की गडावर निघायचे. थोडय़ा वेळातच आपण गडाच्या पोटाशी असलेल्या लक्ष्मणगिरी महाराजांच्या गुहेजवळ पोहोचतो. गुहेत लक्ष्मणगिरी महाराजांची समाधी आहे. शेजारी अजून काही गुहा आहेत. मात्र यातील एक पर्यटकांसाठी बंद केली आहे. यामध्ये काही कोरीव खांब असून ती पर्यटकांसाठी खुली करणे गरजेचे आहे. यानंतर रमतगमत आपण गडाच्या दिल्ली दरवाज्यात कधी येतो कळतही नाही. हा दरवाजा गडाचा शिवकालीन प्रमुख मार्ग. दरवाजाच्या जवळच खडकात कोरलेले पाण्याचे टाके असून याची चव सिंहगडाच्या देवटाक्याची आठवण करून देते. शेजारीच गडदेवता अंबा व िलबा यांचे मंदिर आहे. इथून पुढची चढण थोडीशी दमछाक करायला लावणारी आहे. ही चढली, की समोर गडावरची मुख्य अंबारखान्याची इमारत उभी ठाकते. स्थानिक लोक हिला कचेरी म्हणतात. दोन घुमट असलेली ही इमारत साडेतीनशे वष्रे उन वारा व पावसाला तोंड देत उभी आहे. या इमारतीची सध्या डागडुजी करण्यात येऊन तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळाही स्थापन केला आहे. कचेरीच्यामागे दक्षिण दिशेला काही अंतरावर गडाचा दुसरा कोकण दरवाजा उधवस्त अवस्थेत उभा आहे. या दरवाजाची रचना गोमुखी असून खाली उतरण्याचा मार्ग मात्र ढासळलेला आहे. परतीच्या वाटेवर दिसणारे शिवकालीन बंधारे अवश्य पाहावेत. अतिशय रेखीव बांधणीचे हे दोन बंधारे दोन टप्प्यात विभागले आहेत. याच्या दोन्ही बाजूला दोन ताशीव बुरुज आहेत.
गडाच्या माथ्याकडे जाताना वाटेत पाण्याची टाकी दिसतात. प्रचंड वाऱ्याचा झोत अंगावर घेत आणि  बाजूच्या खोल दरीचे भय अनुभवत आपण माथ्यावर पोहोचतो. या माथ्याच्या पोटात काही गुहा कोरलेल्या आहेत. पकी एका गुहेत काही महिन्यांपूर्वी स्वच्छता मोहीम करत असताना वनविभागाला शिवकालीन धान्य, पणती, जाते आदी वस्तू सापडल्या. माथ्यावर याशिवाय बुजलेली पाण्याची टाकी, उधवस्त चौथरे, एक पडलेला दरवाजा आणि शिवकालीन महादेवाचे मंदिर दिसते. गडमाथ्यावर बऱ्यापैकी झाडी आहे. या झाडीतच म्हाळुंगी नदीचे उगमस्थान आहे. गडाच्या सर्वोच्च माथ्यावरून बितींगा, औंढा, श्रीशैल्य कळसुबाई, अलंग, मदन, कुलंग, धोडप, पर्यंतचा मुलुख न्याहाळता येतो. पट्टागडाच्या परिक्रमा मार्गावर एक गणपती व एका ठिकाणी काही वीरगळ आहेत. ठाणगाव येथील काही तरुण मंडळींनी विश्रामगड विकास मंडळ नावाची संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गडावर नित्य स्वच्छता मोहीम सुरू असते.  या गडाला मोठा इतिहास आहे. पण विश्रामगडाच्या इतिहासातील सुवर्णक्षण नोंदवला गेला तो २२ नोव्हेंबर १६७९ या दिवशी. छत्रपती शिवाजीमहाराज या दिवशी या भागातून रायगडाकडे जात असताना रणमस्तखानाने त्यांचा पाठलाग सुरु केला. सततच्या युद्धामुळे महाराज थकलेले होते. अशावेळी मग गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईकांनी महाराजांना या पट्टागडावर आणले. राजांनी १५ दिवस या गडावर विश्रांती घेतली. यामुळे महाराजांनी गडाचे नामांतर करत ते विश्रामगड ठेवले. असा हा विश्रामगड पावसाळय़ात हिरवाईने नटून जातो. येथील धुके, जलप्रपात यांची आपल्यावर मोहिनी पडते. या वेळी घडलेले पट्टा गडाचे दर्शन मग पुन्हा पुन्हा बोलवत राहते.

buldhana bull died due to thunderstorm
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली
in Gadchiroli s sironcha taluka telangana border Rice Smuggling Racket Resurfaces
तेलंगणा सीमेवरील तांदूळ तस्कर पुन्हा सक्रिय! राजकीय नेत्यांचा सहभाग?
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

अंकुर काळे
ankurkale7@gmail.com