पावसाळा सुरू झाला, की भटक्यांची पावले नवनव्या वाटा शोधू लागतात. या अशा पावलांसाठी अलिबागजवळचा सागरगड हा एक चांगला पर्याय आहे.
पाऊस सुरू झाला, की भटक्यांच्या पायांना गती येते. जून ते ऑक्टोबर या पावसाळी ऋतूमधल्या कोणत्याही रविवारी हा ‘चुकला ट्रेकर किल्ल्यावरच सापडतो’! या अशाच भटक्यांसाठी वर्षांकाळी भटकण्याजोगा एक पर्याय म्हणजे अलिबागजवळचा सागरगड!
रायगड जिल्हय़ातील इतिहासप्रसिद्ध अलिबागच्या अलीकडे सुमारे ८ किलोमीटरवर कार्ले खिंड आहे. या खिंडीपासून उजवीकडचा रस्ता रेवस, थळ येथे तर सरळ रस्ता अलिबागला जातो. या सरळ जाणाऱ्या रस्त्यावरच खंडाळे गाव आहे. गावात पोहोचलो, की सिद्धेश्वर मंदिराचा मार्ग विचारायचा. सुमारे ३ किलोमीटर अंतर पार केले, की आपण सागरगडाच्या पायथ्याशी दाखल होतो. पायथ्याच्या शेवटच्या घरापासूनच सागरगडाची गर्द झाडीतली ठसठशीत मळलेली पायवाट सुरू होते. या वाटेवर थोडे अंतर चालून गेलो, की एक भला मोठा धबधबा नजरेस पडतो. खरेतर तो पायथ्याहून निघाल्यापासूनच साद घालत असतो. धोंडाणे असे या धबधब्याचे नाव.
हा धबधबा पाहात पुढे निघावे. वाटेत एक खळाळता ओढा पार केला, की दगडी पायऱ्या सुरू होतात. या पायऱ्यांच्या वाटेने अध्र्या-पाऊण तासाची चढाई पार केली की कौलारू बांधणीचे सिद्धेश्वराचे मंदिर येते. सिद्धेश्वर मंदिराशेजारीच विहीर असून ट्रेकर्सना मुक्कामासाठी हे मंदिर खूपच चांगले. सिद्धेश्वर आश्रमाच्या शेजारून आता सागरगडाची पायवाट सुरू होते. किल्ल्यावर ‘सागरगड माची’ किंवा ‘गवळीवाडा’ नावाची वस्ती आहे. यामुळे आश्रम ते ही वस्ती हा रस्ता गावकऱ्यांच्या रोजच्या वापरातला असल्याने चुकायचा कुठे प्रश्न येत नाही. तासाभरात आपण थेट वस्तीवर येऊन पोहोचतो. सागरगड माची हे ठिकाण म्हणजे खऱ्या अर्थाने ‘पोल्युशन फ्री’ जागा. गावातील काही तरुण अलिबाग येथे नोकरीसाठी जात असल्याने एवढाच काय तो त्यांचा शहराशी संबंध. बाकीचं सारं गाव मात्र आजही सह्याद्रीच्या कुशीतील निवांत शांतता अनुभवत आहे.
गावाच्या मध्यापासून एक पायवाट सागरगडाच्या दिशेने गेली आहे. सागरगडाचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे हा किल्ला अगदी जवळ गेले तरी दिसत नाही. पण चढाई अध्र्यावर आल्यावर त्याचे अचानकपणे घडणारे दर्शन नि:शब्द करते. किल्ल्याचा भव्य विस्तार आणि त्याच्या दक्षिण टोकाशेजारी खडय़ा पहारेकऱ्यासारखा उभा राहिलेला वानरिलगी सुळका हे दृश्य केवळ अप्रतिम!
सागरगड माचीपासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंतची पायवाट अगदी सरळसोट असून सुमारे तासाभराच्या पायपिटीनंतर आपण किल्ल्याच्या भल्यामोठय़ा पठारावर येऊन दाखल होतो. या पठाराच्या सुरुवातीलाच उजवीकडे सुस्थितीतला एक बुरूज दिसतो. या बुरुजापासून आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे जातानाच गडावरील अवशेष दिसू लागतात. सुरुवातीला एक पडका वाडा येतो. त्याच्याच पुढे भग्नावस्थेतील कोठार दिसते. किल्ल्यावरील या कोठाराकडे जाताना उजवीकडे झाडीत सागरेश्वराचे मंदिर आहे. मंदिराशेजारीच टाके असून संपूर्ण गडावर या पिण्याच्या पाण्यासाठी हा एकमेव स्रोत आहे.
या टाक्यापासून पुढे गेलो, की एका ठिकाणी किल्ल्याचा तुटलेला कडा येतो. याला तटबंदी बांधण्यात आलेली आहे. या तटबंदीच्या शेजारीच एक दीपमाळेसारखे बांधकाम पाहायला मिळते. या ठिकाणाहून सागरगडाच्या हिरव्यागार माचीचे आणि तिच्या सोबतीला असलेल्या वांदरिलगी सुळक्याचे दिसणारे दृश्य आत्तापर्यंत केलेल्या तंगडतोडीचे सार्थक करते. सागरगडाच्या विस्तारलेल्या पठारावर पाण्याचा एक तलाव असून, त्यासमोरच्या हिरवळीच्या गालिच्यावरून गडाचे दक्षिण टोक गाठता येते. सागरगडाच्या या ठिकाणाहून अलिबाग ते मुरूडच्या मखमली किनारपट्टीचे एकसंध दर्शन घडते. हे दृश्य खरोखरच अवर्णनीय आहे. ही संपूर्ण किनारपट्टी एका नजरेत पाहता येण्यासारखं संपूर्ण अलिबाग परिसरातील हे एकमेव ठिकाण. सिंधुसागराच्या या अप्रतिम नजाऱ्याशिवाय वांदरिलगीचे भेदक दर्शनसुद्धा विशेष लक्षात राहणारे ठरते. सागरगडावर या महत्त्वाच्या अवशेषांव्यतिरिक्त बांधकामाची काही जोती तसेच एक सुस्थितीतील दरवाजा व एक तोफही पाहायला मिळते. सागरगडाच्या इतिहासावर नजर टाकता शिवाजीमहाराजांनी मुघलांना पुरंदरच्या तहात दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये ‘खेडदुर्ग’ या नावाने सागरगडाचा उल्लेख सापडतो. शिवकाळानंतर सागरगडावर आंग्य्रांची सत्ता होती. अलिबाग परिसरातील अष्टागरांवर आपली नजर रोखून उभा असलेला सागरगड म्हणजे सरत्या पावसाळय़ाच्या एकदिवसीय भ्रमंतीसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.