वाटेत आम्हाला खुणावित कधी एखाद्या वळणावर नाहीसा होत, कधी अचानक दर्शन देत लिंगाणा माथा साथ करीत होता. पण इथून तो फारच बुटका दिसत होता! अगदी सहज काबीज करता येईल असा! पण खरंच का इतका लहान होता तो. विचाराच्या तंद्रीत लाल मातीने माखलेली आमची चौकडी अखेर मोहरी गावात पोहोचली. सामानाची आवराआवर करुन पाणी घेत आम्ही रायलिंग पठाराच्या दिशेने निघालो. एव्हाना सूर्य बराच वर आला होता. उन्हाच्या झळांनी घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचबरोबर विचारधारा देखील.
मोहरी गाव हा आदिवासी पाडा. उत्पन्नाचं एकमेव साधन शेती. वीज नाही, गाडी रस्ता नुकताच झालेला, तो पण कच्चा. एस.टी. इथपर्यंत येत नाही. बाजार वेल्ह्य़ाला, दूर २० कि.मी.वर! नशीब चांगलं असल्यास एस.टी. मिळते, अथवा तंगडतोड. हॉस्पिटल सोडाच, अडीनडीला एखादा वैदूसुद्धा नाही. स्टेशनवरून भाजी घेऊन भर दुपारी १५ मिनिटे चालत आलो की आपण दमतो! पण वेल्ह्य़ातील बाजारातून महिन्याचं सामान ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता २० कि.मी. वाहून आणायचं हा इथल्या लोकांचा नित्यक्रमच. विचारांच्या ओघात चालता चालता रायलिंग पठारापाशी येउन पोहोचलो. पावसाळ्यात वाढलेले गवत आता सुकले होते. ते पिवळेजर्द गवत सूर्याच्या सुवर्ण किरणांनी चिंब न्हाऊन स्वत:च सोनेरी झाले होते! जणू कु बेराच्या कोषागारात आम्ही प्रवेश केला होता आणि या सुवर्ण गालिच्यातून डोकं वर काढून उन्हात तळपत होता, तो ह्य़ा सर्व खजिन्याचा शिरोमणी, लिंगाणा!
बोराटय़ाच्या नाळेकडे जाताना लिंगाण्याचे शिखर खुणावत असते, जवळ बोलवत असते आणि आपल्याला भुरळ पडते. लहान मुलाच्या उत्सुकतेने आपण पुढे झेपावतो अन रायलिंगाच्या पठारावर येताच एखाद्या नागाने फणा काढावा तसे लिंगाण्याचे रौद्ररुप अंगावर येते. ६५० फु टी शिवलिंगच जणू! समुद्रसपाटीपासून २९६९ फूट असलेला, गगनास भिडलेला, बुलंद, बेलाग, दुर्गम असा हा गड! मित्रांना मित्र अन शत्रूला शत्रू वाटणारा आणि प्रथमदर्शनी धडकी भरवणारा हा लिंगाणा! त्या सुळक्याच्या रौद्ररूपाने आमच्यावर मोहिनी केल्यासारखे आम्ही तिथेच रायलिंगच्या कातळावर बसून राहिलो. शतकानुशतके पाणी वाहून, दरड कोसळून तयार झालेला बोराटय़ाच्या नाळीचा मार्ग घाटावरून कोकणात उतरणारा मार्ग लिंगाण्याच्या पायथ्याला नेऊन सोडणार होता.
लिंगाणा खिंडीत पाऊल ठेवले तेव्हा दुपार झाली होती. कडकडीत ऊन भाजून काढत होते. चढाईपूर्वी त्वरित ऊर्जा म्हणून चिक्की व संत्री यांचा यथेच्छ फडशा पाडला. आरोहणाची साधनसामग्री चढवली. वळून लिंगाण्याकडे पाहिले. महाकाय, अजस्त्र असा तो दुर्गम पहाड माझ्यासमोर होता. त्याच्यापुढे एखाद्या मुंगीएवढे आम्ही भासत होतो, नगण्यच! आमच्याहून वयाने, आकाराने सहस्त्रपटीने मोठा असणारा तो महाकाय पर्वत आम्हाला आव्हान देत होता,‘हिम्मत असेल तर याच’! माझ्यासाठी लिंगाणा एक पर्वत नव्हता. एखादा सुळका, एखादा किल्लादेखील नव्हता. तो होता एक अत्यंत उग्र तपस्वी. सहस्त्र वर्षांपूर्वी ज्वालामुखीने त्याचे बळकट शरीर आगीतून साकारले होते. तेव्हापासून हा इथेच उभा आहे. आपल्या काळ्या छातीवर निसर्गाचे वार झेलीत,अढळ, अभेद्य! कैक साम्राज्यांचा उदय-अस्त झाला! शतके सरली तरी याची तपस्या अविरत चालूच आहे! आपोआप माझे हात जोडले गेले, डोळे मिटले व त्यांस वंदन केले आणि त्याला बिलगलो. (ही ब्लॉगपोस्ट संपूर्ण वाचण्यासाठी –  http://www.rational-mind.com)