गिर्यारोहण क्षेत्रात वावरणारी ‘गिरिप्रेमी’ संस्था सर्वाच्याच परिचयाची झाली आहे. यंदा या संस्थेतर्फे जगातील सर्वोच्च अशा पाचव्या क्रमांकाच्या ‘माउंट मकालू’ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी तसेच या जोडीने ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’, ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’, आयलंड शिखर मोहीम या अन्य मोहिमांनी देखील धाव घेतलेली आहे. गिरिप्रेमी’च्या या गिर्यारोहणास दरवर्षी एखाद्या सामाजिक उपक्रमाची देखील जोड असते. यंदा यासाठी संस्थेने हिमालयातील ‘पर्यावरण संवर्धन’ हा विषय निवडला आहे आणि त्या दिशेने कार्य सुरू केले आहे.

हिमालयातील ढासळते पर्यावरण, यात वाढत्या पर्यटन आणि गिर्यारोहणामुळे निर्माण होणारी गुंतागुंत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हिमालयातील या अवघड वाटांवर चढाई-उतराई करणाऱ्या गिर्यारोहक संघांकडून या पर्यावरण प्रश्नात दुर्दैवाने भर घातली जात आहे. मोहिमेसाठी आणले जाणारे साहित्य, यातही निरुपयोगी झालेले साहित्य त्या-त्या हिमप्रदेशातच सोडणे, कचरा तिथेच टाकून येणे यामुळे आमची अनेक हिमशिखरे मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाली आहेत. या साऱ्या प्रश्नाला आपल्या कार्यक्रमपत्रिकेवर घेत ‘गिरिप्रेमी’ने यंदाच्या मोहिमेपासून पर्यावरण निर्मूलनासाठी काही कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी यंदा संस्थेतर्फे एव्हरेस्ट आणि मकालू शिखरांच्या चढाई मार्गावर पर्यावरण संदेश देणारे फलक लावले आहेत. या फलकांवर हिमालयाचे महत्त्व, त्याची एकूण निसर्ग आणि पर्यावरणातील भूमिका, उपाययोजना, काय करावे-काय करू नये याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत. हे फलक पुण्याच्या ‘विद्या व्हॅली स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले असून ते ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांतर्फे या परिसरात लावले जात आहेत. या शाळेतर्फे ‘गिरिप्रेमी’च्या आनंद माळी या गिर्यारोहकाचा मकालू मोहिमेसाठी येणाऱ्या खर्चाचा भारही उचलला आहे. याशिवाय या मोहिमेत ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांकडून ते जाणाऱ्या प्रत्येक शिखर परिसरातून प्रत्येकी १० किलोपर्यंतचा कचरा खाली आणला जाणार आहे.
गिरिभ्रमण-गिर्यारोहण हे निसर्गाच्या ओढीने, त्याच्या सान्निध्यात, त्याच्या आश्रयानेच सुरू असते. अशावेळी त्याच्या जतन-संवर्धनाला सर्वाधिक महत्त्व असले पाहिजे. आमच्या निसर्ग-पर्यावरणाच्या शुद्धतेचा हाच विचार बाळगत ‘गिरिप्रेमी’ने एक नवा संस्कार रुजवला आहे.