ताडोबाला जाताना तिथे कोणते प्राणी, पक्षी पाहायचे याची यादी करून
न गेलेलेच बरे. कारण जंगलात गेल्यानंतर जे दिसेल ते पाहावे. दिसणारा प्रत्येक प्राणी आणि पक्षी आपल्याला गुंतवत
असतो. त्यांच्या हालचाली, हावभाव पाहणे मनस्वी आनंद देणारे असते.
वाघांना नैसर्गिकरीत्या संरक्षण देण्याच्या हेतूतून आपल्याकडे व्याघ्र प्रकल्पांची योजना सुरू झाली. असाच एक व्याघ्र प्रकल्प, ‘ताडोबा’! चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे सर्वात जुने आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य. ताडोबा हे एका देवाचे नाव आहे. त्याचे दुसरे नाव ‘तारू’ असेही आहे. तारू हा या जंगलात फार पूर्वीपासून राहणाऱ्या आदिवासींच्या गावाचा नायक होता. एका पौराणिक कथेप्रमाणे एका वाघाशी झालेल्या लढाईमध्ये त्याला मरण आले आणि या जंगलालाच त्याचे नाव बहाल झाले. आजही त्याची स्मृतिशिला ताडोबा तलावाच्या काठी एका मोठय़ा झाडाखाली दाखविली जाते.
हे जंगल फार पूर्वी ‘गोंड’ राजाच्या अधिपत्याखाली होते. १९३५ मध्ये ब्रिटिशांनी येथे शिकारीसाठी सर्वप्रथम बंदी घातली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा भाग अभयारण्य म्हणून घोषित झाला. तेव्हा त्याचे क्षेत्रफळ होते फक्त ११५ चौरस किलोमीटर. पुढे १९८६ मध्ये ताडोबा शेजारील अंधारी हे प्राणी अभयारण्य म्हणून घोषित झाले. पुढे ही दोन्ही अभयारण्य एकत्र करत त्यातून ‘ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प’ आकारास आला. आज ताडोबा भारतातील एक महत्वाचे जंगल म्हणून गणले जाते, ते त्याच्या जैवविविधतेमुळे. या व्याघ्र प्रकल्पाचे संपूर्ण क्षेत्रफळ ६२५ चौरस किलोमीटर आहे.  ताडोबाला जाताना तिथे कोणते प्राणी, पक्षी पाहायचे याची यादी करून न गेलेलेच बरे. कारण जंगलात गेल्यानंतर जे दिसेल ते पाहावे. या वर्षी ताडोबामध्ये जाण्याचा योग आला. ताडोबामध्ये वाघ, बिबटय़ा, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, चौसिंगा, गवा, जंगली कुत्री, नीलगाय, पट्टेरी तरस, रानमांजर, ससा, भेकर असे अनेक प्राणी दिसतात. भारतात एके काळी सहज दिसणारी मगर इथे दिसते. त्याच बरोबर उन्हाळ्यात स्थलांतर करणारा अतिशय सुंदर पक्षी नवरंग (इंडियन पिट्टा), सिकंदर, स्वर्गीय नर्तक, काळा शराटी, कुदळ्या, बुरखा, हळद्या, सोनपाठी सुतार, कपाशी घार, हुदहुद्या, तांबट, गरुड, मोर, चीरक, नीलपंख, रानभाई, रानकस्तुर, करडी रानकोंबडी, हरोळी, तुरेवाला सर्प गरुड, टकाचोर असे अनेक सुंदर आणि दुर्मिळ पक्षीही इथे दिसतात. जंगलातील प्राणी-पक्षी पाहायचे असतील, तर हमखास उन्हाळ्यात जावे. पाण्याचे जवळपास दुर्भिक्ष असल्यामुळे त्यांचे दर्शन सहज घडते.  आम्ही असेच मे महिन्याच्या भर उन्हात या जंगलात गेलो. आत शिरताच आमचे स्वागत जंगलचे ‘आम आदमी’ म्हणजे चितळ आणि काळतोंडय़ा वानरांनी केले. त्यानंतर नवरंग पक्ष्याने दर्शन देऊन सर्वाना सुखावले. हा पक्षी उन्हाळ्यात ताडोबा जंगलात हमखास दिसतो. तसेच पुढे गेलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांवर दोन नीलपंख बसलेले दिसले. हा संपूर्ण निळ्या रंगाचा पक्षी उडताना फार सुंदर दिसतो. जंगलातल्या जमिनीवर त्याच रंगाचे प्राणी किंवा पक्षी ओळखणे खूप अवघड असते. ‘जंगल बुश क्विल’ म्हणजे लावरी किंवा जंगली दुर्लाव हा पक्षी वाळलेल्या झाडाझुडपात असेल तर त्याला ओळखण्यासाठी तरबेज नजरच हवी. लावरी वाळलेल्या बांबूच्या झाडाला फेरी मारून मागे जात नाही, तोच बांबूच्या झाडाखाली बसलेला एक छोटासा गोंडस ससा दिसला. नुसत्या डोळ्यांनी तो सहज दिसतच नव्हता. प्राण्यांच्या रंगाचा आणि आजूबाजूच्या परिसराचा निसर्गाने साधलेला एक सुंदर मिलाफ अनुभवास मिळाला. जंगलातल्या नीरव शांततेत फक्त एकच आवाज मिसळत होता. तो म्हणजे आमच्या जिप्सीच्या टायरचा जमिनीशी होत असलेल्या घर्षणाचा. दोन मिनिटे गाडी थांबवायला सांगून त्या नीरव शांततेचा अनुभव घ्यायलाच हवा.
जंगलात २-३ दिवस फिरत होतो. प्रत्येक वेळेस वेगळा अनुभव. पहिल्या दिवशी वाघाचे दर्शन झाले ते दुरूनच. एका झाडाखाली पाठ करून तो झोपलेला होता. संध्याकाळी सांबर-चितळांचे इशारे येत होते. वाटले की आता वाघोबा दिसेल. गाइडने हात करून तो दूरूनच दाखवला. मनाने तर कचच खाल्ली. आपल्याला वाघ दिसणार आहे की नाही. पण जंगलात वाघ ही एकच गोष्ट पाहायची नसते. अन्य सुंदर पक्षी, प्राण्यांचाही आनंद घेता येतो.
दुसऱ्या दिवशी एका सुंदर सूर्योदयाने आमचे स्वागत केले. जंगलाची दारे उघडल्यानंतर आज काय दिसणार याचीच उत्सुकता लागून राहिली होती. देवाकडे प्रार्थना केली, की आज वाघ दिसावा.
नेहमीप्रमाणे आमचे स्वागत जंगलच्या ‘आम आदमी’ने केले. थोडे पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी आमच्या गाइडला झाडीत हालचाल दिसली आणि काय नशिब, एक अस्वल आमच्याकडे बारकाईने पाहत होते. आमच्या हालचाली निरखत होते. हळूहळू  ते बाहेर आले आणि थोडय़ाच वेळात आम्हाला छायाचित्रांसाठी सुंदर ‘पोज’ देत पटकन रस्ता ओलांडून गेले. हा सगळा खेळ चालू असताना दुसऱ्या बाजुच्या काळतोंडय़ा वानरांमध्ये खूप असुरक्षितता जाणवत होती.
दुपारच्या सफारीला निघालो, तेव्हा आता वाघ दिसलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली होती. जंगलाच्या फाटकावर पोहोचलो आणि वाहनचालकाने बातमी आणली, की सकाळी काही जणांना वाघ चांगला ३०-४० मिनिटे दिसला होता. बस्स, आता फक्त वाघच बघायचा, बाकी काही नको. पांढरपौनी तलावावर जाऊन पोहोचलो तर तिथे आधीच ४-५ गाडय़ा येऊन उभ्या होत्या आणि त्यांचे गाइड्स एका झाडाकटे बोट दाखवत होते. मग काय सगळे तलावाकाठी येऊन उभे राहिले. वाघीण असल्याचे कळले. पण बराच वेळ झाला तरी ती काही बाहेर येईना. काही गाडय़ा कंटाळून तिथून निघून गेल्या. आम्ही मात्र थांबलो. थोडय़ावेळाने ती वाघीण तिथून उतरून तलावात जाऊन बसली. आम्हाला मोक्याची जागा मिळाली होती. यामुळे तिचे सुंदर दर्शन घडत होते. पाच मिनिटांत ती पाण्यातून उठली आणि सरळ आमच्या दिशेने यायला लागली. ती अगदी समोर येऊन उभी ठाकली, तर..! पण ती शांतपणे आमच्या गाडीच्या समोर ५ ते ६ फुटांवर येऊन बसली. तिचे ते दर्शन, ऐट पाहून आनंद गगनात मावत नव्हता. शांतपणे तिला पाहणे सुरू झाले. त्या वेळेस फक्त कॅमेऱ्याचे ‘क्लिक, क्लिक’  चेच आवाज येत होते. थोडय़ा वेळाने ती उठली आणि आम्हा सगळय़ांना वळसा घालत दुसऱ्या दिशेने निघून गेली. ..ती आली, तिला पाहिले आणि तिने आम्हाला जणू जिंकून घेतले. पुढच्या दिवशी सकाळी लवकर जंगलात गेलो, तेव्हा गाइडने पंचाधाराला जाऊ असे सुचवले. पंचधाराला पोहोचलो, तर आधी येऊन पोचलेल्या लोकांनी खुणा करून हळूहळू येण्यास सांगितले. रस्त्यात कालचीच वाघीण दबा धरून बसलेली होती. आजूबाजूला पाहिले तर पाण्यापाशी रानकुत्र्यांचा कळप होता. त्यात बच्चे मंडळीपण होती आणि वाघीण त्याच्यावरच दबा धरून बसली होती. थोडय़ा वेळाने ती आमच्या दिशेने थोडी चालत आली आणि आमच्या गाडीसमोर ठाण मांडून त्यांचे बारकाईने निरीक्षण करायला लागली. १०-१५ मिनिटे अशीच गेल्यावर ती उठली आणि पाण्याच्या दिशेने चालू लागली. आम्ही लगेच गाडी मागे घेतली. आम्हाला आता रानकुत्र्यांचा कळप आणि वाघिणीच्या हालचाली व्यवस्थित दिसत होत्या. रानकुत्र्यांचा कळप थोडा मागे झाडात गेला आणि तेवढय़ात त्यांचा म्होरक्या वाघिणीपासून सुरक्षित अंतरावर येऊन तार स्वरात ओरडायला लागला.
जणू तो वाघिणीला इशाराच होता. शेवटी तिने आपला मोर्चा पाण्याकडे वळवला. ..जंगलाच्या रंगमंचावर एक निराळेच नाटय़ पाहायला मिळाले. थरार अनुभवला. हे असे अनुभवच जंगलाशी, तिथल्या वनचरांशी आमचे नाते जोडत असतात. वाघांच्या या रानातून बाहेर पडताना ताडोबाशी जडलेले हे नातेच अनुभवत होतो.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?