ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग सोबती’ तर्फे २६ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.

दोडीताल दारवा ट्रेक
‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान उत्तराखंडातील ‘दोडीताल दारवा ट्रेक’चे आयोजन करण्यात आले आहे. दोडीताल हे हिमालयातील ११ हजार फूट उंचीवरील जंगल आहे. देवदार झाडांच्या या घनदाट जंगलात एक सुंदर तलाव आहे. या तलावात हिमालयीन ट्राईट जातीचे मासे दिसतात. या पदभ्रमण मार्गात विविध पशू-पक्षी दिसतात. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या ८ ते १२ ऑक्टोबर दरम्यान गोकाक, जोग, सातोडी आदी धबधब्यांच्या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
 ताडोबा अभ्यास सहल
‘एसपीआर’तर्फे येत्या ५ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अभ्यास सहलीचे  आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी राजेंद्र (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.

कास, तापोळा सहल
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या ४ -५ ऑक्टोबर रोजी कास, तापोळा, महाबळेश्वर भटकंतीचे आयोजन केले आहे. या भटकंतीमध्ये कोयनेच्या किनारी कोजगिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

‘एव्हरेस्ट’च्या साहसवाटेचे शब्द-चित्रपट दर्शन
‘गिरिप्रेमी’ संस्थेची २०१२ सालची ‘एव्हरेस्ट’ आणि २०१३ सालची ‘ल्होत्से -एव्हरेस्ट’ या सलग दोन मोहिमांमुळे ‘एव्हरेस्ट’ हा शब्द मराठी समाजात चांगलाच रूजला आहे. गिर्यारोहण विश्वाच्याही पलीकडे अगदी सर्वसामान्य समाजातून ही मोहीम रूजली-उभी राहिली. यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांत सर्वसामान्यांचे दोरही या एव्हरेस्टभोवती बांधले गेले आहेत. ही मोहीम कशी उभी राहिली, तिच्याशी हा समाज-त्यातील प्रत्येक घटक कसा जोडला गेला; मोहिमेसाठी निधीची उभारणी, प्रत्यक्ष मोहिमेतील थरार, चढाई दरम्यान घडलेले अनेक जीवघेणे प्रसंग आणि या साऱ्यांतून मिळवलेले यश या साऱ्या प्रवासाला या मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी शब्दबद्ध केले आहे. ‘एव्हरेस्ट – गोष्ट एका ध्यासाची’ या पुस्तकाद्वारे हा प्रवास मांडला जाणार असून या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. ४) होत आहे. या जोडीनेच २०१३ मध्ये गेलेल्या ‘ल्होत्से -एव्हरेस्ट’ मोहिमेतील थराराचे दर्शन घडवणाऱ्या चित्रफितीचे प्रदर्शनही या वेळी होणार आहे. या दोन्ही मोहिमांमधील गिर्यारोहक त्यांचे अनुभवदेखील या वेळी सांगणार आहेत. या कार्यक्रमाला प्रसिद्ध क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम, भारतीय पर्वतारोहण संस्थेचे अध्यक्ष कर्नल (निवृत्त) एच. एस. चोहान, एव्हरेस्ट समीटर्स असोसिएशनचे अध्यक्ष वांगचू शेर्पा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.