महाराष्ट्राचं शिल्पवैभव सर्वश्रुतच आहे. डोंगराच्या पोटातली लेणी, मंदिरे आणि इतरही अनेक कोरीव शिल्पे यांचा अनमोल वारसा आपल्याला आपसुकच मिळालाय. अनेक अज्ञात हातांनी हा स्वर्ग निर्माण केलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या लेणी, मंदिरे या सर्वानी मराठमोळ्या संस्कृतीला अतिशय समृद्ध केलंय. महाराष्ट्रात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात लेण्या आणि काळय़ा दगडातली हेमाडपंती बांधणीतली सुंदर मंदिरे आढळतात.
मराठवाडय़ात असंच एक शिल्पवैभव दडलंय, पण पूर्णपणे दुर्लक्षित आणि उपेक्षित. अंबाजोगाई आणि परळी-वैजनाथ या बीड जिल्ह्य़ातल्या तालुक्यांच्या ठिकाणापासून सारख्याच अंतरावर- साधारणत: ३० कि.मी. धर्मापुरी नावाचं छोटंसं गाव आहे. मराठवाडय़ातल्या इतर चार गावांसारखं. एक मुख्य रस्ता आणि त्याच्या दुतर्फा वस्ती. गाव ओलांडून पलीकडे गेल्यावर मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एक छोटं शेत पार केलं की सामोरं येतं एक सुंदर मंदिर- ‘केदारेश्वर’.
महाराष्ट्रात नांदलेल्या आणि विस्तारलेल्या काही आद्य राजवटींपैकी ‘चालुक्य’ राजवटीत सुमारे ११ ते १२ व्या शतकात याचं बांधकाम झाल्याचे सांगितले जाते. अतिशय शांत आणि रम्य परिसर असलेलं हे मंदिर मनाला वेड लावेल असंच आहे.
केदारेश्वर मंदिराची रचनासुद्धा अतिशय सुंदर आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा चार विभागात याचं बांधकाम आहे. मंदिराला पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशी तीन प्रवेशद्वारे आहेत.
आत प्रवेश केल्यावर समोरच लक्षात येतं ते लक्षणीय कोरीव काम केलेल्या खांबावर तोललेलं सभामंडपाचं बांधकाम, आता बरंच पडझड झालेलं पण जुना रूबाब राखून असलेलं. सभामंडपात दोन खांबांच्या मध्ये नंदीचे एक शिल्प ठेवलंय. त्याची मूळ जागा ती नसावी. त्याच्या पाठीमागे एक चौथरा आहे, त्यावर त्याचं मूळ स्थान असावं. पण कालौघात तो विस्थापित झाला असावा. बरीचशी विद्रुप झालेली नंदीची ही मूर्ती अजूनही छानच दिसते.
गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरती द्वारशाखा कोरली असून, त्यामध्ये पत्रशाखा, पुष्पशाखा, व्यालशाखा, स्तंभशाखा आणि इतरही अनेक प्रकारचं भौमितिक नक्षीकाम आहे. याच्या दोन्ही बाजूस द्वारपाल ज्याचं वैष्णव रचनेशी साम्य आहे ते कोरलेले आहेत. शंख, चक्र, गदा इत्यादी आयुधं स्पष्टपणे ओळखू येतात. गर्भगृहाच्या दरवाज्याच्या अलीकडे डाव्या हातास एका कोनाडय़ात गणेशाची एक प्रतिमा कोरलेली आहे. का कुणास ठाऊक, ही गणेशमूर्ती इतर सर्वासोबत विसंगत वाटते. कदाचित दरम्यानच्या कालखंडात तिची तेथे प्रतिष्ठापना झाली असावी. आत चौकोनी गर्भगृहामध्ये पुरातन शिवलिंग आहे. गर्भगृहाच्या छताकडे बघितल्यास हेमाडपंती रचना लक्षात येते. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभावरील कोरीव काम अगदी वाखाणण्यासारखं आहे. फार कमी ठिकाणी आढळणारं कीर्तिमुख प्रकारचं शिल्प इथं सभामंडपाच्या छतावर आढळतं. मंदिराचा गर्भगृहाचा भाग शाबूत असला तरी सभामंडप बऱ्याचअंशी मोडकळीला आला आहे. बाहेरच्या बाजूने तर दगडांनी केलेली सभामंडपाची डागडुजी विशेष करून लक्षात येते.
मंदिराच्या उत्तर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पूर्वी सिंहाकृती असाव्यात. त्यातील एक समोरच भग्नावस्थेत आढळते. मंदिराच्या बाह्य़ भागावर मानवी रूपातल्या अतिशय सुंदर आकृती कोरलेल्या आहेत. साधारणत: ३-४ फूट उंचीपर्यंत विशेष कोरीव काम नाही. परंतु, त्याच्या वरच्या बाजूला असलेलं कोरीव काम अगदी नजर लागण्याजोगं आहे. गजरथ, विष्णू, शिव, सुरसुंदरी इत्यादी मूर्ती मंदिराच्या अधिष्ठानावर सुंदररीत्या कोरलेल्या दिसतात. बाह्य़ भागावर असलेल्या कोनाडय़ांमध्ये उत्तरेला केशव, पूर्वेला शिव आणि दक्षिणेला हिरण्यकश्यपूचा वध करणारी नरसिंह मूर्ती कोरली आहे. याशिवाय पूर्वेच्या भिंतीवर शिव मूर्तीच्या बाजूला दाढी अन् तीन मुखे असलेली एक आकृती आहे. ती कदाचित ब्रह्माची असावी.
मंदिराच्या परिसरातही बरीच शिल्पे इतस्तत: विखुरलेली आढळतात. त्यात एक शिल्प द्वारपालाचं तर एक हिरण्यकश्यपूचा वध करणारा नरसिंह आणि त्याच्या बाजूला प्रल्हाद असं आहे.
दुर्लक्षित आणि निगाविरहित असं हे मंदिर काही प्रमाणात भग्नावस्थेत असलं तरीही उर्वरित भाग मात्र अत्यंत सुंदर आहे. पुरातत्त्व विभागाचा कुणी कर्मचारी  देखरेखीसाठी नसला तरी त्यांनी मंदिराची माहिती देणारा फलक येथे लावला आहे. या भागातील विशेषत: अंबाजोगाईच्या आसपास शिव मंदिरांचे एक वैशिष्टय़ आहे. केदारेश्वर, अमलेश्वर, अमृतेश्वर, कोपरनाथ, बारखांबी महादेव अशा सर्वच मंदिरांना कळस नाही.
धर्मापुरी गावात एक गढीवजा किल्लासुद्धा आहे. त्याबाबत काही विशेष माहिती मिळत नाही. परंतु, आतमध्ये एक सुंदर बांधीव विहीर आहे. सुमारे ३०-३५ पायऱ्या उतरून गेल्यावर आपण विहिरीजवळ पोहोचतो. काळय़ा दगडात संपूर्ण बांधून काढलेली ही विहीर अष्टकोनी आहे. सध्या वापरात नसल्याने पाणी खराब झालेले आहे. परंतु, एकंदरीत रचना बघण्यासारखी आहे. किल्ल्यात आत जाण्यासाठी दोन दरवाजे आहेत. परंतु, एक पूर्णत: तर दुसरा ३-साडेतीन फुटाची जागा सोडून दगडांनी बंद केलेला आहे.
असं हे दुर्लक्षित शिल्पवैभव आणि किल्ला. अशा बऱ्याच वास्तू अभ्यासकांच्या पर्यटकांच्या प्रतीक्षेत आपल्या आजूबाजूला आहेत. त्यांचं जतन आणि संवर्धन वैयक्तिकरीत्या शक्य नसलं तरी त्यांचा शोध घेऊन आणि इतरांना त्याबद्दल कळवून,
माहिती देऊन आपण त्या दिशेने प्रयत्न तर निश्चितच करू शकतो. बरोबर ना..?

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about Imbalance of development in vidarbha
मुद्दा महाराष्ट्राचा : विदर्भ- असमतोलाची अस्वस्थता…