सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांच्या ‘द प्रिन्स अ‍ॅण्ड द पॉपर’ या कादंबरीचा ढोबळमानाने आधार घेऊन सूरज बडजात्या यांनी ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाची कथा बेतली आहे, असे समजते. एक राजा आहे आणि त्याला राजा म्हणून कोणतीही जबाबदारी नकोशी झाली आहे. त्याला एक सर्वसाधारण आयुष्य जगायचे आहे. या राजाचा सावत्र भाऊ राजाचे सिंहासन हिसकावून घेऊ पाहतोय. परिस्थिती बदलते आणि राजाला एक त्याच्यासारखाच हुबेहूब दिसणारा सर्वसामान्य माणूस आढळतो. मग राजा सावत्र भावाशी लढा देण्यासाठी त्याचा सामना करण्यासाठी तात्पुरता एक कट रचतो. आपल्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या माणसासोबत तो एक डाव खेळतो. अशी मध्यवर्ती संकल्पना असलेल्या गोष्टीवर सूरज बडजात्या यांनी ‘प्रेम रतन धन पायो’ हा चित्रपट बनविला आहे. अर्थातच या गोष्टीवरून काही अंदाज प्रेक्षकाला बांधता येतात. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असला तरी ट्रेलरवरून तरी सलमान खान साकारत असलेली ‘प्रेम’ ही भूमिका दुहेरी आहे किंवा नाही हे समजू शकत नाही. परंतु प्रेम हा राजघराण्यातील तरुण असावा आणि त्याच्यासारख्याच हुबेहूब दिसणाऱ्या परंतु अतिशय सर्वसामान्य असलेल्या विजय या तरुणाशी संधान साधून ते दोघे आपापली ओळख तात्पुरती बदलतात. विजय हा राजा बनतो आणि प्रेम हा सर्वसामान्य माणूस बनतो अशी काहीशी गोष्ट असावी इतकाच अंदाज ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाविषयी करता येतो.

तद्दन ‘फॅमिली एण्टरटेनर’ चित्रपट बनविणारे अशी ख्याती असलेल्या राजश्री प्रॉडक्शन्सच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा केली जात आहे. राजश्री प्रॉडक्शन्स आणि सूरज बडजात्या ही नावे घेतली की प्रेक्षकांना आधी ‘हम आपके है कौन’ आणि नंतर ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटांची सहजच आठवण होईल. त्याचप्रमाणे सूरज बडजात्या यांच्या चित्रपटांतील नायकाचे नाव नेहमीच प्रेम असे असते याचीही प्रेक्षकांना सवय आहेच असे मानायलाही हरकत नाही. त्याउपरही प्रेम या नावाची नायकाची व्यक्तिरेखा सूरज बडजात्या यांच्या सिनेमांमध्ये सलमान खाननेच सर्वाधिक वेळा साकारली आहे हेही प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच त्याच आधारे ट्रेलरमधून ‘प्रेम इज बॅक’ अशी टॅगलाइन देत सलमान खान म्हणतोय ‘मैं वापस आ रहा हूँ.’ सलमान खानची कारकीर्द ‘प्रेम’ या व्यक्तिरेखेद्वारेच ‘मैंने प्यार किया’मधून सुरू झाली असल्यामुळे ती त्याची पडद्यावरची पहिली प्रतिमा आता इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘कॅश’ करण्याचा व्यावसायिक विचार राजश्री प्रॉडक्शन्सने केला हेही सांगणे न लगे.

‘प्रेम रतन धन पायो’च्या ट्रेलरवरून सूरज बडजात्या यांच्या सिनेमांमध्ये असते तशी श्रीमंती, भरजरी कपडय़ांचे मॉल, प्रचंड मॉब, एकामागून एक गाणी हे सगळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘फॅमिली एण्टरटेनर’ आणि ‘हिंसाचार कमी’ असे दोन्ही विशेष याही चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.

ब्रॅण्ड सलमान खान रुपेरी पडद्यावर पुन्हा आपल्या पहिल्या प्रतिमेत शिरला असला तरी ‘जुडवा’ या चित्रपटानंतर पुन्हा एकदा तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे हेही सूरज बडजात्या यांच्या आतापर्यंतच्या सिनेमांपेक्षा निराळे वैशिष्टय़ आहे. सलमान खानची ‘प्रेम’ ही प्रतिमा आणि गेल्या काही वर्षांपासून त्याने साकारलेल्या ‘अ‍ॅक्शन हिरो’च्या भूमिका आणि ‘चुलबुल पांडे’ या व्यक्तिरेखेद्वारे तयार झालेली प्रतिमा अशा सर्व प्रतिमांचा विचार करून या चित्रपटात नायक दुहेरी भूमिकेत दाखविण्याचा सूज्ञ विचार बडजात्या यांनी केलेला दिसतो. त्या अर्थाने दिवाळी ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये हा ‘डबल धमाका’ ठरू शकेल असा कयास करायलाही वाव आहे.

गेल्या ८० वर्षांत बॉलीवूडमध्ये बनलेल्या सर्वाधिक सुपरडुपरहिट दहा चित्रपटांच्या यादीत बडजात्या यांचे चित्रपट आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत सलमान खान दुहेरी भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसणार असल्याने त्यायोगे गल्लापेटीवर कमाल करता येऊ शकेल अशी अटकळ चित्रपटकर्त्यांनी बांधली असेल तर  त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

संगीतमय, रोमॅण्टिक चित्रपटाची झालरही ट्रेलरवरून दिसत असली तरी या वेळी प्रथमच बडजात्या यांनी हिमेश रेशमिया यांना संगीतकार म्हणून घेतले आहे. राम लक्ष्मण आणि रवींद्र जैन आणि फक्त एकाच चित्रपटासाठी अनू मलिक यांना घेऊन बडजात्यांनी चित्रपट केले आहेत. त्यामुळे संगीताच्या दृष्टीनेही बडजात्या यांनी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज करायला हरकत नाही.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com suneel2020