हिंदी चित्रपटांचे रिमेक किंवा सीक्वल करण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून फारच रूढ झाली आहे. चांगल्या कथा आणि पटकथांचा अभाव हे कारण आहे किंवा काय असेच वाटू लागले आहे. म्हणूनच की काय बॉलीवूडने आपला मोहरा चरित्रपटांकडे वळवला आहे असे म्हणता येईल.

खंडीभर मनोरंजन दूरचित्रवाहिन्यांचा सुळसुळाट झाल्यामुळेही आजच्या प्रेक्षकांची करमणूक करण्यासाठी चित्रपटांमध्ये बदल करावे लागत आहेत, हेही एक कारण यामागे असावे असे दिसते.

अनेक हिंदी चित्रपटांच्या रिमेक-सीक्वलप्रमाणेच आता सनी देओलच्या गाजलेल्या ‘घायल’ या चित्रपटाचा ‘घायल वन्स अगेन’ नावाचा सीक्वल १५ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. तर विजयता फिल्म्स या आपल्या बॅनरखाली धर्मेद्रने त्याची निर्मिती केली होती. ‘घायल वन्स अगेन’ची प्रस्तुती धर्मेद्रची असली तरी बॅनर दुसरा आहे. निर्माता म्हणून मात्र या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत धर्मेद्रचेच नाव देण्यात आले आहे. १९९० साली प्रदर्शित झालेल्या मूळ चित्रपटाने तिकीटबारीवर तुफान यश मिळविले होते. सनी देओलने साकारलेल्या अजय मेहरा या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पारितोषिकांमध्ये विशेष परीक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

या चित्रपटात सनी देओलने प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच लेखन-दिग्दर्शनाचीही जबाबदारी पेलली आहे. १९८३ साली ‘बेताब’ या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. नंतर ८० आणि ९० च्या दशकात ‘अर्जुन’, ‘त्रिदेव’, ‘अर्जुन पंडित’, ‘दामिनी’, ‘घायल’ हे त्याचे चित्रपट गाजले. दोन राष्ट्रीय पारितोषिकेही मिळवली आहेत.

तब्बल १६ वर्षांनंतर सनी देओलला ‘घायल’चा सीक्वल काढावासा वाटला. आपली प्रतिमा पुरेपूर ‘कॅश’ करण्याचा त्याचा प्रयत्न यातून दिसतो. ‘घायल वन्स अगेन’मध्ये मूळ चित्रपटातील अजय मेहरा हीच व्यक्तिरेखा सनी देओल साकारणार असून नेहमीच सत्याची बाजू घेऊन लढणारा हीच प्रतिमा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. हिंदी चित्रपटांच्या फॉम्र्यूलामध्ये नेहमीच सुष्ट विरुद्ध दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा एकमेकांशी संघर्ष असा मामला असतो तसा तो इथेही असेल. मात्र सीक्वल करताना सनी देओलने मूळ चित्रपटाप्रमाणे अजय मेहराच्या घरातील लोकांवर, स्वत:वर झालेला अन्याय दूर करण्यासाठी खलनायकी प्रवृत्तीशी संघर्ष केला होता. ‘घायल वन्स अगेन’मध्ये मात्र अजय मेहरा चार तरुण-तरुणींच्या गटाला निर्माण झालेला धोका, या चारही जणींनी पाहिलेले सत्य आणि त्यामुळे आलेले संकट यातून त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केलेला दिसेल.

सनी देओल म्हटले की ‘ढाई किलो का हाथ’, ‘तारीख पे तारीख’ या गोष्टी चटकन प्रेक्षकांना आठवतात.  तुफान हाणामारी करणारा नायक ही सनी देओलची पडद्यावरची प्रतिमा पुन्हा एकदा प्रेक्षकांना या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

‘नव्या बाटलीत जुनीच दारू’ असाच काहीसा प्रकार ‘घायल वन्स अगेन’मधून पाहायला मिळणार असला तरी सनी देओलच्या चाहतावर्गासाठी ही पर्वणी ठरू शकेल. मूळ चित्रपट जिथे संपला आहे तिथूनच पुढील कथानक ‘घायल वन्स अगेन’मध्ये घेण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे. मात्र हा अंदाज चुकूही शकतो.

या चित्रपटात काही नवीन गोष्टीही पाहायला मिळतील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ५९ वर्षांच्या सनी देओलने पडद्यावरती हाणामारीचे प्रसंग अधिक चांगले आणि अस्सल दिसावेत यासाठी ‘सुपरमॅन’ चित्रपट मालिका, ‘स्पायडरमॅन’ चित्रपट मालिका, ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘क्रिस्टल स्कल’, ‘क्वान्टम ऑफ सोलास’ यांसारख्या हॉलीवूडपटांचा अ‍ॅक्शन स्टंट डायरेक्टर डॅन ब्रॅडले यांना पाचारण केले आहे. त्यामुळे उत्तम अ‍ॅक्शनपट पाहायला मिळू शकतो.

त्याचबरोबर आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे नव्या दमाच्या दोन तरुण आणि दोन तरुणींना प्रमुख भूमिकेत घेण्यात आले आहे. या चार जणांपैकी शिवम पाटील आणि अंचल मुंजाल हे दोघेजण टीव्हीवरील कार्यक्रमांमध्ये गाजले आहेत. शिवम पाटील हा दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांचा मुलगा आहे. शिवमने ‘एमटीव्ही रश’, ‘एमटीव्ही वेब्ड्’ ‘ये है आशिकी’ अशा टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले असून ‘नशा’ या २०१३ साली आलेल्या हिंदी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्यातील साहील या प्रमुख भूमिकेच्या अभिनयासाठी शिवमचे कौतुकही झाले होते. अंचल मुंजाल ही ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेबरोबरच ‘आरक्षण’ या चित्रपटातून झळकली आहे. या दोघांव्यतिरिक्त ऋषभ अरोरा आणि डायना खान हे दोघेही नवीन कलावंत झळकणार आहेत. सनी देओल प्रमुख भूमिकेत असल्यामुळे अर्थातच सोहा अली खानच्या भूमिकेबाबत ट्रेलरमधून तरी काही स्पष्ट होत नाही. त्यामुळे १५ जानेवारीला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच तिची भूमिका पाहायला मिळणार आहे. एक मात्र मोठा फरक ‘घायल’ आणि ‘घायल वन्स अगेन’मध्ये दिसेल. तो म्हणजे मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. तर सीक्वलचे लेखन-दिग्दर्शन सनी देओलने केले आहे. त्यामुळे दिग्दर्शनात तो यशस्वी ठरतो का हे १५ जानेवारीलाच समजू शकेल.
सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com
twitter @suneel2020