रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारचे हिंदी चित्रपट हाच सध्या बॉलीवूडमध्ये ट्रेण्ड बनला आहे असे म्हणता येईल. छोटय़ा बजेटचे आणि मोठय़ा बजेटचे अशा दोन्ही बजेटमध्ये रोमॅण्टिक कॉमेडी चित्रपट अधूनमधून येतच असतात. परंतु, इम्तियाज अली दिग्दर्शित ‘तमाशा’ हा आगामी चित्रपट फक्त रोमॅण्टिक कॉमेडी असेल असे ट्रेलर पाहून तरी अंदाज करता येत नाहीये. इम्तियाज अलीचे चित्रपट म्हटले की प्रेक्षकांना लगेच ‘रॉकस्टार’, ‘लव्ह आज कल’ आणि अलीकडचा ‘हायवे’ हे चित्रपट आठवतील. त्यामुळे ‘तमाशा’मधील रणबीर कपूर-दीपिका पदुकोण या जोडीचे प्रेम यशस्वी होईल की नाही म्हणजेच चित्रपटाचा शेवट सुखद असेल की नाही, अशी शंका प्रेक्षकांच्या मनात येऊ शकते. परंतु इम्तियाज अलीने याबाबतचे स्पष्टीकरण केले असून चित्रपटाचा शेवट सुखद आहे असे सांगितले आहे.

या चित्रपटाची अनेक वैशिष्टय़े आहेत. एक म्हणजे रणबीर कपूर दीपिका पदुकोण यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या सुपरडुपर हिट चित्रपटानंतर पुन्हा एकदा ते दोघे एकत्र दिसणार आहेत. त्याचबरोबर दोघांची जमलेली जोडी आता तुटली असली तरी वेद आणि तारा या भूमिकांद्वारे प्रेमीयुगुल म्हणूनही ते पुन्हा दिसणार आहेत, हे आणखी एक विशेष आहे. रणबीर-दीपिका आणि रणवीर-दीपिका या जोडय़ांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय जोडी कोणती ठरणार याचीही एक प्रकारची चुरस ‘तमाशा’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या दोन चित्रपटांच्या यशस्वितेवर सिद्ध होणार आहे.

लेखक-दिग्दर्शक म्हणून इम्तियाज अलीचे चित्रपट यशस्वी ठरले आहेत. त्याने दीपिकाला ‘लव आज कल’ या चित्रपटात घेतले होते तर रणबीरला घेऊन त्याने ‘रॉकस्टार’ केला होता. ‘जब वुई मेट’चा लेखक-दिग्दर्शक ही इम्तियाज अलीची ओळख आहे. त्यामुळे रोमान्स आणि कॉमेडी अशा कथानकाचा यशस्वी दिग्दर्शक म्हणून बॉलीवूडमध्ये त्याचे नाव आघाडीवर असते. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ए. आर. रहमानचे संगीत हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. ए. आर. रहमानचा यापूर्वीचा हिंदी सिनेमा ‘हायवे’ आणि ‘लेकर हम दिवाना दिल’ हा आला होता. एक वर्षांच्या गॅपनंतर रहमानचे संगीत ऐकायला मिळणार आहे हेही ‘तमाशा’चे वैशिष्टय़ म्हणता येईल.

या सिनेमाच्या निमित्ताने फ्रान्समधील ‘कॉर्सिका’ हा परिसर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इम्तियाज अलीच्या सिनेमांचे वेगळेपण आणि निराळा कोन या सिनेमातूनही पाहायला मिळेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. सुपरहिट जोडी, बिग बजेट, परदेशी चित्रीकरण स्थळे असे सगळे चकाचक आहेच. त्यामुळे दिवाळीनंतरचा मोठा सिनेमा हा आहे. या चित्रपटाचे शीर्षक आधी ‘विंडो सीट’ असे होते नंतर ते ‘तमाशा’ असे करण्यात आले. ‘विंडो सीट’ या शीर्षकाबद्दल इम्तियाजने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘‘समजा आपण रेल्वेने कुठे तरी दूरवर निघालो आहोत आणि खिडकीत बसून पळणारी झाडे, बाहेरचे जग पाहत पाहत चाललो आहोत. असे असताना आपल्या ईप्सित ठिकाणी पोहोचण्याआधीच एखाद्या स्टेशनवर आपण उतरावे आणि एकदम अनोळखी जग पाहावे, आपली स्वत:ची ओळख विसरून तिथे जगावे असे आपल्या मनात आले तर काय.. अशाच पद्धतीच्या भावना मनात येतील, असे या चित्रपटाचे कथानक आहे’’, असे इम्तियाजने म्हटले होते. ‘हे जग एक रंगभूमी आहे आणि सर्व स्त्री-पुरुष आपण फक्त रंगमंचावरील खेळाडू आहोत’ अशा अर्थाचे शेक्सपिअरचे वाक्य आहे. त्या वाक्याला अनुसरून काही तरी या चित्रपटात पाहायला मिळेल असे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे कुतूहल २७ नोव्हेंबरलाच उलगडणार आहे.

तीजन बाई चित्रपटात

‘तमाशा’ चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा वेद आहे. या वेदची जडणघडण अनेकानेक कथा-दंतकथा ऐकत झालेली आहे असे दाखविले आहे. याच कथा तो आपल्या रंगमंचीय आविष्कारातून मांडतो. म्हणूनच दिग्दर्शकाने महाभारतातील पांडवांच्या कथा सांगणाऱ्या ‘पांडवानी’ या छत्तीसगढमधील लोककलेचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. सुप्रसिद्ध पांडवानी कलावती तीजन बाई यांनाच त्याने चित्रपटात पाचारण केले आहे. एका अर्थाने लोककलेचे दर्शन आजच्या रूपेरी पडद्यावर करून दिग्दर्शकाने भारतीय लोककलांचे महत्त्व आणि परंपरा अधोरेखित केली आहे, असे म्हणावे लागेल. पांडवानी म्हणजे पांडवांच्या कथा. पांडवांच्या कथा गाण्यातून कथन करण्याचा हा प्रकार आहे. तीजन बाई एकतारी किंवा तानपुरा हातात घेऊन संगीताच्या साथीने पांडवांच्या कथा सांगतात.

सुनील नांदगावकर – response.lokprabha@expressindia.com