चित्रपटगृहांबद्दलचे ‘सिंगल स्क्रीन’ आणि ‘मल्टिप्लेक्स’ हे शब्द आता मराठीच्या उंबरठय़ावर आले आहेत. त्यांना ‘एकपडदा’ आणि ‘बहुपडदा’ असे मराठीच प्रतिशब्द योजूनही काही उपयोग नाही. कारण ‘मल्टिप्लेक्स’ चित्रपटगृहाला ‘बहुपडदा’ असा शब्द वापरला तरी अशा चित्रपटगृहाच्या अनेक दालनांमध्ये प्रत्येकी एकेकच पडदा असल्यानं आपण एकाच पडद्यावर एका वेळी एक चित्रपट पाहू शकतो.
.. हा शब्दच्छल काहीजणांना कंटाळवाणा वाटेल, याचं कारण आपण ‘चित्रपट पाहणं’ म्हणजे एकाच पडद्यासमोर बसणं हे गृहीत धरलेलं असतं. त्यापेक्षा वेगळा- म्हणजे तीन पडद्यांवरून निरनिराळी दृश्यं दाखवून एकच कथा सांगणारा (किंवा एकच आशय मांडणारा) चित्रपट हा काही ‘सिनेमा’ नाही, असंच आपल्याला वाटणार. वाटू दे. दृश्यकलेच्या क्षेत्रात मात्र ही रीत गेल्या काही दशकांपासून रुळली आहे. ‘व्हीडिओ आर्ट’ प्रकारच्या काही कलाकृतींची आर्ट गॅलरीतली मांडणी अशी ‘एकाच वेळी अनेक पडद्यांवरून एकच आशय सांगणारी निरनिराळी दृश्यं’ या प्रकारे पहिल्यांदा होऊ लागली- त्याला म्हणे ४४ र्वष झाली आहेत. भारतातही नलिनी मलानी, नवजोत, अमर कन्वर अशा अनेकांनी हे तंत्र वापरलं आहे. ते केवळ मांडणीचं तंत्र नसून आशय सांगण्याची चित्रपटापेक्षा निराळी रीत त्यासाठी वापरावी लागते या अर्थानं आविष्काराचंही तंत्र आहे. या तंत्राचे आविष्कार हे ‘चित्रपट’ नसून त्यापेक्षा निराळी ‘दृश्यकलाकृती’ ठरतात, यावर जगभरात गेली किमान ४० र्वष एकमत आहे आणि वर्षांगणिक हे मत अधिकाधिक ठाम होतं आहे. तेव्हा ‘ही कलाकृती नाहिच्चाय.. तो सिनेमाच्चाय’ असा हुच्च वाद आपण घालण्यात अर्थ नाही.
त्यापेक्षा विषयाकडे वळू.
कोपर्डी, दादरी, मुजफ्फरनगर या आपल्याकडल्या गेल्या अडीच वर्षांतल्या उदाहरणांपेक्षाही भीषण सामाजिक भेदभाव-आधारित हिंसाचार ज्या दक्षिण आफ्रिकेत सन १९९४ पर्यंत सुरू होता, तिथंच पुढे काळ्या-गोऱ्यांमध्ये सलोखा, सहिष्णुता जपण्यासाठी नवी संस्थात्मक पद्धती उदयाला आली. ‘ट्रथ अँड रीकन्सिलिएशन कमिशन’ (किंवा मराठीत- ‘सत्य व रुजवात आयोग’) हे त्या संस्थात्मक व्यवस्थेचं नाव. वर्णद्वेषी राजवटीच्या काळात (१९४८ ते १९९४) जे जीवघेण्या हिंसेचे किंवा अमानुष छळाचे प्रकार घडले, त्यातल्या आरोपींनी या आयोगाकडे अर्ज केल्यास त्यांची थेट पीडितासमोरच फेरसुनावणी घेण्यासाठी या आयोगाची एक आगळीच कार्यपद्धती होती.. आरोपी (हिंसक) आणि पीडित (हिंसाग्रस्त) यांनी एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्यावं, आरोपीला जर गुन्हा कबूल असेल आणि तो (/ती) खुल्या मनानं क्षमेची याचना करत असेल, तर त्याला पीडितानंही थेट प्रश्न विचारावेत, त्या प्रश्नांना आरोपीकडून मिळणाऱ्या उत्तरांमधून आरोपीला क्षमा करायची की नाही ते तपासून घ्यावं आणि क्षमा करून या आरोपीला ‘वर्णद्वेषमुक्त दक्षिण आफ्रिके’त पुन्हा नव्यानं जगण्याची सुरुवात करू द्यायची का, की कटुता तशीच ठेवायची.. हेही ठरवण्यासाठी पीडिताचं म्हणणं महत्त्वाचं मानलं जावं, अशी ही पद्धती! या आयोगापुढली प्रश्नोत्तरं ‘उपलब्ध पुरावे तपासण्या’साठी नसून ‘आत्ता आरोपी कुठल्या स्थितीत आहे.. पश्चात्ताप झाला की नाही?’ या सत्याची चाचपणी करण्याच्या हेतूनं पुढे जात असत.
‘बलात्कार करणाऱ्यांचा लिंगविच्छेद करा’, ‘संसदेच्या आवारात घुसलेल्या बंदूकधाऱ्याला जाहीर फाशी द्या’ असं म्हणावंसं वाटणं, ही काही फक्त भारतीयांची विकृती नाही.. सूडभावना आणि जरब बसवण्याची इच्छा ही मानवी प्रवृत्तीच आहे, असं मानता येऊ शकतं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतही त्या प्रवृत्ती असणारच. या प्रवृत्तींवर त्या देशानं- अगदी आपल्यासारख्याच अल्पशिक्षितांच्या, दारिद्रय़ाचं प्रमाण जास्त आणि लोकसंख्यावाढीचा वेगही (विशेषत: काही समाजघटकांत) जास्त असणाऱ्या एका देशानं- मात केल्याचं या ‘सत्याधारित रुजवात’ प्रयोगातून जगाला दिसलं!
त्यालाही बरीच र्वष झाली. आताशा या आयोगाला फार काम नसतं. पण म्हणून त्या आयोगानं घडवलेला मानवी इतिहास कसा विसरता येईल? मानवी प्रवृत्ती हिंसक (म्हणजे खुनी किंवा दहशतवादीच नव्हे, तर ‘अज्जिबात सोडू नका’, ‘फटके द्या’ अशाही प्रकारची) असते, तिच्यावर मात करण्याचा जगातला एक महत्त्वाचा प्रयोग म्हणून याची आठवण ठेवायची की नाही?
ही आठवण ठेवण्यासाठी ‘अपार्थाइड म्युझियम’मधल्या (होय, जोहान्सबर्ग शहरात ‘वर्णविद्वेषाधारित गतकाळाचं संग्रहालय’ आहे!) मोठय़ा सभागृहासारख्या दालनात ठेवण्यासाठी एक खास व्हीडिओ कलाकृती बनवून घेण्यात आली. दक्षिण आफ्रिकेतले एक महत्त्वाचे लघुपटकार आणि ‘मंडेला’ या ११८ मिनिटांच्या चरित्रपटाचे दिग्दर्शक अँगस गिब्सन यांच्याकडे हे काम सोपवण्यात आलं. त्यांनी ते तिथं केलंच, पण २०१५ सालच्या ‘व्हेनिस बिएनाले’ या जागतिक महाप्रदर्शनातल्या दक्षिण आफ्रिकेच्या अधिकृत दालनासाठी गिब्सन यांची निवड झाल्यावर त्यांनी आणखी एक ३४ मिनिटांची कलाकृती तयार केली.
काय होतं त्यात?
२५ जुलै १९९३ रोजी मंडेलांच्या ‘आफ्रिकन नॅशनल काँग्रेस’शी फटकूनच वागणाऱ्या अन्य एका कृष्णवर्णीय संघटनेनं- ‘पॅन आफ्रिकन काँग्रेस ऑफ अझानिया’नं तिच्या ‘अझानियन पीपल्स लिबरेशन आर्मी’ या हिंसक संघटनेमार्फत केपटाऊनमधल्या सेंट जेम्स चर्चवर ऐन सायंप्रार्थनेच्या वेळीच हल्ला केला. हे चर्च सर्व-वर्णीयांसाठी खुलं होतं, तरीही या चर्चवर हल्ला करून ५८ जणांना जखमी केलं, ११ जणांना ठार मारलं. या चौघा हल्लेखोरांपैकी ग्सिनिखाया मोकामा हा (तेव्हा १७ वर्षांचा असणारा) तरुण मारिटा अ‍ॅकरमन या महिलेला अगदी जवळून मारल्याबद्दल पुराव्यानिशी दोषी ठरला आणि ‘२३ वर्षांच्या कैदे’ची शिक्षाही त्याला झाली. पण तुरुंगातून त्यानं या आयोगाकडे अर्ज केल्यामुळे- आणि मारिटाचे विधुर पती डेव्हिड अ‍ॅकरमन यांनी त्याला माफी दिल्यामुळे- तो साडेपाच वर्षांत सुटला. या फेरसुनावणीची मूळ ध्वनिचित्रफीत गिब्सन यांच्या या कलाकृतीत होतीच; शिवाय हल्ल्याची छायाचित्रंही अधूनमधून होती आणि लेखी माहितीसुद्धा होती. किंवा, कृष्णवर्णीयांसाठी काम करणाऱ्या एका कार्यकर्तीला ‘खबरी’ होण्यासाठी भाग पाडण्याच्या हेतूनं तिला विवस्त्र करून तिचा छळ करणारे पोलीस.. त्यांना त्या महिलेकडूनच माफी दिली जाते, याचीही मूळ दृश्यं इथं होती.
या २०१५ सालच्या कलाकृतीला ज्या घटनाक्रमाचा आधार आहे, त्यातला मोकामा हा कैदेतून सुटल्यावर- २००२ मध्ये- एका बँकेची रोकड-गाडी लुटण्याच्या प्रकरणात पकडला जाऊन दोषी ठरल्यामुळे २०१२ पासून पुन्हा जन्मठेपेत आहे. पण ‘त्या’वेळी- सत्य आणि रुजवात आयोगासमोर- तो कसा वागला होता, याचं चलचित्र सध्या आपल्यासमोर आहे.
या कलाकृतीत राजकीय आशय तर आहेच; पण मोकामाचं प्रकरण इथं प्रामुख्यानं दिसत असल्यामुळे ‘दोन अधिक दोन बरोबर चार’ असा सरळ भावनिक हिशेब प्रेक्षकाला करताच येत नाही.. तरीही या कलाकृतीतून काही दृश्यं लक्षात राहतात :
उदाहरणार्थ, ‘का मारलंस माझ्या बायकोला तू? का झाडलीस गोळी तिच्यावर?’ असं विचारताना डेव्हिड यांना अश्रू अनावर होतात. आशाळभूत, काहीसा शरमिंदा होऊन- पण थंड नजरेनं- मोकामा त्यांच्याकडे पाहत असतो..
पण हाच मोकामा लुटारूसुद्धा?
सत्याच्या हत्यारानं हिंसकपणाचं रूपांतर क्षमाशीलतेत करता येईल. येतंच. आलंय. पण सत्यासाठी किमान प्रामाणिकपणाची अपेक्षा असते. कोणीतरी कायदा धाब्यावर बसवून- न्यायालयाला फसवून- केलेल्या कृत्याबद्दल ‘होय, हे आम्ही केलं आणि मला त्याचा अभिमान आहे,’ असं म्हणत असेल तर प्रामाणिकपणाचा दुष्काळच दिसतो. अँगस गिब्सन यांच्या या कलाकृतीनं प्रत्येकाला अशी ‘माझ्या देशातली हिंसा आणि माझ्या देशातलं सत्य’ यांची तुलना करावीशी वाटत राहील तोवर ही कलाकृती ‘आजकालची’ असेल!
अभिजीत ताम्हणे – abhijit.tamhane@expressindia.com

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे