‘‘ती’ची झुंज’ किंवा ‘तिचा लढा’/ ‘तिचा संघर्ष’ अशी शीर्षकं असलेलं लिखाण आठ मार्चला दरवर्षीच कुठे ना कुठे छापलं जातं. यापैकी काहीजणींशी आपलं जणू नातं आहे असं आपल्याला वाटलं तर चांगलंच; पण कितीजणांवर हा अपेक्षित परिणाम होत असेल? त्यातही ‘यशस्वी झुंज’च वाचून बरं वाटणारे वाचक/प्रेक्षक असतातच. त्यांना ‘सक्सेस स्टोरी’च हवी असते. आणि अशा वाचक/प्रेक्षकांना ‘उदकाचिये आर्ती’ माहीत नसलं तरी ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा चित्रपट नक्की माहीत असतो. कॅप्टन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत कशा लढल्या, हेच उगाळलं जातं. आणि याच कॅप्टन लक्ष्मी ‘तत्त्वाचा प्रश्न’ म्हणून थेट डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासमोर राष्ट्रपतीपदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून उभ्या होत्या (आणि त्यावेळी कलाम यांचं छुपं दैवतीकरण झालेलं नसल्यामुळे त्यात कुणाला गैर वाटलं नव्हतं.) याचा गंधही नसतो. हरती लढाई लढणारी माणसं- मग ती स्त्री असो वा पुरुष- त्यांना फार कुणी विचारतच नसल्यानं ‘प्रत्येक झुंज महत्त्वाचीच असते.. केवळ लढणाऱ्यांनाच नव्हे, तर समाजालाही ती बळ देणारी असते’ हा सुविचार कुठल्यातरी तुळईवरच राहून जातो. त्यामुळे जेनिफर मेरेंडिनो हिनं कर्करोगाशी दिलेली वैयक्तिक झुंज पोहोचणार तरी किती जणांपर्यंत, हा प्रश्न रास्तच आहे. पण सोबतची छायाचित्रं ज्या छायाचित्रमालिकेचा भाग आहेत, त्या मालिकेमुळे जेनिफरनं तिच्या जिवानिशी केलेल्या संघर्षांची गोष्ट सर्वदूर पोहोचू शकली.

यापैकी निवडक छायाचित्रं जर्मनीच्या कासेल शहरातल्या ‘डॉक्युमेंटा’ या पंचवार्षिक महाप्रदर्शनात २०१३ साली पाहतेवेळी या महिलेचं नाव काय, फोटो कोणी काढले, वगैरे काहीही माहीत नव्हतं. (नंतर सोबतची माहितीपट्टिका वाचून समजलं ते!) छायाचित्रं मात्र समोरच होती. आणि त्यातून दिसत होती- पार खंगत जाणारी एक स्त्री. पस्तिशीच्या पुढली असेल. निदान केंद्रातल्या मोठमोठय़ा यंत्रांपुढे बसतानाच्या पहिल्या छायाचित्रात तिचे भाव ‘नसलं काही, तर बरंच’ अशा क्षीणवेडय़ा आशेचे होते. आणि पुढल्या काही छायाचित्रांमध्ये ‘संपलंय सगळं’ याची जाणीव असूनसुद्धा ती आनंदानंच जगण्याचा प्रयत्न करतेय. केमोथेरपीनं केस गेलेत. तरीही ती बागेत जाते, लोकांमध्ये मिसळते आहे. नंतरच्या काही छायाचित्रांत ती बिछान्यावरच आहे. खंगलीय पार. आता जगणं झेपणार नाही तिला. आता सहन करण्याच्या मानवी मर्यादांशी तिचा अंतिम सामना सुरू आहे. कर्करोगग्रस्तांच्या जीवनेच्छेच्या कहाण्या आपल्याला माहीत आहेत. ‘आनंद’ हा हिंदी सिनेमा, ‘अखेरचा सवाल’ हे नाटक यांमधूनच ही झुंज पहिल्यांदा भिडलेली पिढी आता पन्नाशीपार गेलीय. तरीसुद्धा फोटो धक्का देतात, हलवतात, तीन वर्षांनंतरही लक्षात राहतात.

असं का झालं?

एका वाक्यातलं उत्तर- फोटो संवादच साधतात, म्हणून.

त्यावर पुन्हा प्रश्न : पण हेच फोटो कसे काय संवाद साधतात?

हा दीघरेत्तरी प्रश्न आहे. संदर्भासह स्पष्टीकरण करू या.

जेनिफरचा नवरा अँजेलो मेरेंडिनो हा अमेरिकेच्या ओहायो राज्यातल्या क्लीव्हलँडला राहणारा. तो व्यवसायानंच छायापत्रकार (फोटोजर्नालिस्ट) आहे आणि अमेरिकी दैनिके-मासिकांसाठी काम करतो. भारतातले किंवा जगातले कुठलेही गुणी छायापत्रकार जसे स्वत:चा विषय स्वत: शोधून त्यावर दीर्घकाळ काम करतात, तसं यानंही केलंय.. करतोय. जेनिफरवर त्याचं अर्थातच प्रचंड प्रेम. त्यानंच हे फोटो टिपले आहेत. हे कळल्यानंतर सगळे फोटो पुन्हा पाहिलेत तर लक्षात येतं, की ती तिच्या नवऱ्याशी बोलतेय जणू. ‘काही नसलं तर बरंच’ हे आपल्याला ऐकू आलं, कारण ते ती खरंच म्हणत होती- त्याला सांगत होती! ‘जगीन रे मी, करेन सहन’ या आशयाची अनेक मूक भाष्यं पुढल्या फोटोंमध्ये विविध प्रकारे येतात. एकच वाक्य अनेक प्रकारे विनवून बोलल्यास त्याला आळवणी असं म्हणतात ना? तशी आळवणी दिसू लागते तिच्या डोळ्यांत.. त्याला विनवतेय ती.

मग ही फक्त कॅन्सरशी झुंजीची गोष्ट राहत नाही. प्रत्येक फोटो हा असाध्य रोगाशी झुंज देणारी स्त्री आणि तिला झुंजीसाठी बळ देणारं तिचं जणू अर्धाग बनलेला तिचा जोडीदार यांच्यातल्या विश्वासाची खूण ठरतो. फोटोंमध्ये झुंजीचे टप्पे दिसतात. पण विश्वासाच्या त्या खुणा भिडतात.

अँजेलो मेरेंडिनो हा एरवीही स्वत:साठी छायाचित्रमालिकांवर काम करतो तेव्हा जीवनसंघर्षांची चित्रं टिपण्याकडे त्याचा कल आहे. ‘अँजेलोमेरेंडिनो.कॉम’ या त्याच्या संकेतस्थळावर अलीकडेच त्यानं टिपलेली हॉली किचेन या कर्करोगातून बऱ्या झालेल्या महिलेची छायाचित्रं आहेत. (हॉलीलाही जेनिफरसारखा मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर होता. पण जेनिफरचं निदानच उशिरा झालं होतं.) क्लीव्हलँडमधल्या कृष्णवर्णीय कार्यकर्त्यांची, थाई निर्वासितांची, गॅरेट आल्सडॉर्फ या आईविना पोरका झाल्यानं १२ व्या वर्षीच पोक्त झालेल्या पोराची.. अशी छायाचित्रं सध्या इथं आहेत. ती वाढतील, बदलतील. कलेतून सामाजिक दस्तावेजीकरण (सोशल डॉक्युमेंटेशन) करताना तुम्ही ज्या व्यक्तीसमोर आहात, तिचं सारं काही ऐकून घेण्याची तुमची तयारी हवी आणि त्या व्यक्तीविषयी सहानुभावही जागा व्हायला हवा. हे गुण अँजेलोकडे असल्याची साक्ष त्याची छायाचित्रं कमी-अधिक प्रमाणात देतात. जेनिफरच्या फोटोंचं पुस्तकही झालंय. त्याला ‘आमची स्तनकर्करोगाशी झुंज’ असं नाव आहे. ती जवळीक किंवा ते ‘तादात्म्य’  इतरांमध्ये येणं अशक्यच. त्यामुळे जेनिफरचे फोटो अद्वितीय ठरतात.

आता आपला मराठी प्रश्न : ‘स्वत:च्या बायकोच्या रुग्णाईतपणाचं असं प्रदर्शन कशाला मांडायचं?’

याचं पहिलं उत्तर म्हणजे- हे सर्व फोटो जेनिफरच्या सहभागातून, तिच्या सहमतीनंच सिद्ध झाले आहेत. नकळत टिपून मग ते प्रदर्शित केलेले नाहीत. आणि महत्त्वाचं दुसरं उत्तर म्हणजे- ‘प्रदर्शन मांडणे’चा मराठीत जो एक हीनत्वदर्शक अर्थ आहे, तो इथं पूर्णपणे अनाठायी आहे. हे फोटो प्रदर्शनात आहेत- कबूल! पण दाखवेगिरी आहे का त्यांत?

abhicrit@gmail.com