‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ ही संतश्रेष्ठ कवी तुकाराम यांची उक्ती (तुकारामगाथा, अभंग ६३, चरण पहिला) सर्वाना माहीत असते. दु:खाचा तो ‘पर्वत’ असतो कसा? वैराण असतो की मरणप्राय बर्फाच्छादित? त्या ‘पर्वता’त डोंगर किती? दऱ्या किती? नद्या किती? एकाकीपणाचे डोह किती? तुकाराम महाराज ‘सुख पाहता’ म्हणतात, तसं ‘दु:ख पाहता’ म्हणत नाहीत; असं कसं? दु:खाचं मोजमाप ‘पाहून’ करण्याऐवजी प्रत्येकजण आपापलं दु:ख पर्वताएवढंच मानणार, असा या ओळीचा अर्थ आहेच. पण दु:ख पाहण्याचा प्रसंगच नाही आला, तरी एकंदर दु:ख हे पर्वताएवढंच आहे, हेही तुकारामांच्या या ओळीतून समजतं. एरवी ‘आजकालच्या कलाकृती’मध्ये तुकारामांच्या एकाही ओळीची आठवण निघाली नसती; ती आज निघाली. याचं कारण तुकारामांच्या त्या ओळीतल्या ‘पर्वता’नं आधुनिकोत्तर काळात आधुनिकतावादाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आज आणखी एखादं रूप धारण केलं असेल का? केलंच, तर कशाचं रूप? या विचित्र भासणाऱ्या प्रश्नांना भिडण्याचा प्रसंग एका कलाकृतीमुळे आला.. त्या कलाकृतीतून जणू ‘दु:खाचं आजकालचं रूप’ दिसलं..  इतरांनाही ती कलाकृती पाहिल्यास (किंवा ती जाणून घेतल्यास) आजकालच्या काळात ‘दु:ख पाहता’ कसं दिसतं, याची एक शक्यता सापडू शकेल.

ही कलाकृती आन्सेल्म कीफरची आहे. कीफर हा मूळचा जर्मन (आणि ज्यू. जन्म- १९४५); पण गेली कैक दशकं फ्रान्समध्ये राहणारा. त्यानं कायदा आणि साहित्य या विषयांचं शिक्षण घेतलं. मग जोसेफ बॉइससारख्या १९६० च्या दशकारंभीच्या प्रयोगशील दृश्यकलावंतामुळे तो प्रभावित झाला आणि १९६५ पर्यंत स्वत: कीफरदेखील चित्रं काढू लागला. त्याच्या रंगलेपनाचे जाड थर, त्यासाठी त्यानं रंगांमध्ये मिसळलेली (किंवा रंगांऐवजी वापरलेली) विशिष्ट द्रव्यं, त्या जाड थरांतून पोताच्याही पुढला आशयाचा परिणाम साधण्यासाठी त्यानं रंगथरामध्येच केलेला गवत आदींचा वापर.. ही त्याची ‘शैली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. करडेपणा, खडबडीतपणा ही या शैलीची दृश्यं-वैशिष्टय़ं झाली. पण कीफरला मानवी इतिहासाबद्दल आणि त्यातून पुढे एकंदर मानवी जीवनसंघर्षांबद्दल, जगण्याला तत्त्वाधार देण्याच्या धडपडीबद्दल काही वाटतं आहे आणि ते तो इतरांना सांगू पाहतो आहे. म्हणजेच जी त्याची ‘अभिव्यक्ती’ (कुतूहल, अभ्यास व चिंतन यांच्या सातत्यातून जे व्यक्त होतं ते, हा इथे ‘अभिव्यक्ती’चा अर्थ!) आहे, ती अभिव्यक्ती त्याला त्याच्या पूर्वसुरींहून निराळं स्थान देणारी ठरली. ‘प्रत्येक नवी कलाकृती ही आधीच्या कलाकृतींना खोडून काढत असते, त्यांच्याशी द्रोह करत असते..’ असं मानणारा कीफर लोकांना खरोखरच नव्यानं पाहायला लावू शकला!

हे नव्यानं पाहायला लावण्याचं वैशिष्टय़ कीफरला ‘आजकालचा’ ठरवणारं आहे. कीफर वार्धक्याकडे झुकलेला (वय ७१) असला आणि त्यानं ही आपल्यासमोरची कलाकृती २००४ सालात प्रदर्शित केली असली, तरीही आपण त्याला ‘आजकालचा’ म्हणतो आहोत. असं काय आहे कीफरच्या अभिव्यक्तीत? तेच ही कलाकृती अधिक स्पष्टपणे सांगते. ही कलाकृती प्रचंड म्हणजे अफाटच मोठी (४५ फूट ते ५९ फूट एवढय़ा उंचीचे सात मनोरे!) आहे आणि विमानाचा हँगर असतो तेवढय़ा आकाराच्या कलादालनात ती ठेवली आहे. आणि हो.. इटलीच्या मिलान शहरातल्या ज्या कलादालनात ही कलाकृती २००४ पासून कायमस्वरूपी प्रदर्शित झाली आहे, त्याचं नावच ‘हँगर बिकोका’ असं आहे. ‘पिरेली’ या इटालियन वाहन उद्योगातल्या बडय़ा कंपनीनं बंद पडलेल्या एका जुन्या औद्योगिक कारखान्यात हे कलादालन सुरू केलं. त्याचं उद्घाटनच कीफरच्या या कलाकृतीच्या प्रदर्शनानं झालं होतं. पण आपल्यासाठी आत्ता महत्त्वाचं हे, की आजही आपल्याला तिथं जाता येतं. त्या दालनाच्या भव्यतेचा अनुभव घेता घेता कीफरनं उभारलेल्या त्या सातही मनोऱ्यांच्या अवतीभोवती फिरता येतं. या मनोऱ्यांची उंची, त्यांचं आपल्या नजरेच्या टप्प्यानुसार थोडं तिरकं कलल्यासारखं दिसणं, किंवा एकसारखेच दिसणाऱ्या त्या मनोऱ्यांमधले सूक्ष्म भेद अनुभवणं.. हे सारं कुणालाही करता येतं. त्यापुढला आपला प्रयत्न साहजिकच या मनोऱ्यांमागचा ‘अर्थ’ जाणून घेण्यासाठी असतो..

कबाला, माऊंट अरारात अशा ज्यू धर्मप्रतीकांची आठवण करून देणारी नावं यापैकी पाच मनोऱ्यांना आहेत. कीफर हा धार्मिक नाही. पण ज्यू धर्माच्या इतिहासातून त्याला आजकालच्याही काळात लागू ठरणारे प्रश्न पडतात. विश्वाशी नातं सांगण्याची किंवा देवत्वाशी तद्रूप होण्याची आणि ‘स्वर्ग’ मिळवण्याची धडपण कशासाठी आहे, हा प्रश्न तर कायमचाच आहे. तो प्रत्येक काळात नव्यानं पडता; नवी उत्तरंही देऊन जातो. ‘नासा’ या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं विश्वातल्या प्रत्येक घटकाचं वर्गीकरण करण्याचा सपाटा लावून प्रत्येक ताऱ्याला आणि उल्केला एकेक क्रमांक दिला आहे. एका मनोऱ्याखाली हेच क्रमांक लिहिलेल्या पट्टय़ा कचऱ्यासारख्या (?!)  टाकलेल्या दाखवून (खरं तर योजनापूर्वक मांडून) कीफर नासाच्या धडपडीचीही आठवण प्रेक्षकाला देतो. जीव वाचवण्याची धडपड ‘माऊंट अरारात’मध्ये दिसते. इस्रायलमधला हा डोंगर नोहाच्या नौकेसारखा दिसतो. तिथवर आधी समुद्रच होता आणि नोहाची ती नौका तिथंच बांधली होती अशा दंतकथा आहेतच.. पण इथं कीफरनं ‘अरारात’ नावाच्या मनोऱ्यावर नोहाच्या नौकेसारख्या आकाराची नौका ठेवून पुन्हा तिची आठवण दिली आहे. सर्व मनोरे आपल्याकडल्या झोपडय़ा वाटाव्यात असे- सिमेंटच्या खोक्यांपासून बनलेले आहेत. मुंबईतल्या वांद्रे आदी भागांतल्या बहुमजली झोपडय़ा जशा तकलादू भासतात, तसेच कधीही कोलमडतील असे हे मनोरे दिसतात. मग कीफरनं त्यांना ‘सात स्वर्गीय राजवाडे’ (सेव्हन हेवनली पॅलेसेस) असं शीर्षक का दिलं आहे?

आशा, प्रयत्न, निराशा आणि दुख यांच्या खेळाची ही प्रतीकं आहेत. जणू तो आदिम खेळ.. ती अलिखित ‘आज्ञावली’च मानवाला निव्वळ ‘मनोव्यापारां’च्या पायरीवर न थांबू देता त्याच्याकडून धर्मापासून विज्ञानापर्यंतचे सारे मानवी प्रयत्न घडवून आणते. या प्रयत्नांतून मानवाला जणू ‘स्वर्गा’सारखं काहीतरी मिळणार असतं.. पण शाश्वत काय राहतं? प्रगती सोडाच; उत्क्रांती तरी होते का आताशा?

खूप केलं.. खूप पाहिलं.. काय हो झालं त्याचं.. निव्वळ भकास, भग्न कलेवरं उरलीत, मनोऱ्यांची. किती उंची गाठली होती, याचे हे अवशेष. त्यात आशा आणि प्रयत्नवाद यांना स्थान होतंच.. ते तर आजही असणार कुठेतरी.. पण आजचा काळ असा की, या आशेचं आणि प्रयत्नवादाचं काय काय होऊ शकतं.. त्यांची उडी फार तर कुठवर जाऊ शकते, हे ठाऊक आहे!

मानवी प्रगती मानवी प्रयत्नांनी होऊ शकेल, ही आधुनिकतावादापर्यंतची ‘श्रद्धा’ होती. त्या आधुनिकतावादी विश्वासाला आता स्थान नाही, हे कीफरला माहीत आहे.. तसं तुम्हालाही माहीत आहे.

तुमचं खरं दु:ख असायला हवं ते हे, असं जणू कीफर तुम्हाला सांगतोय. हे पचवणं कठीण आहे. दु:खदही आहे.

पण त्या दु:खाचं मूर्त रूप इथं कीफरनं तुमच्यासमोर अवतरवलंय.. हे आजकालचे दु:ख आहे स्वर्गीय राजवाडय़ांएवढे!

अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com