वसंत बापट यांची एक कविता आहे.. तिचं नाव ‘साजरी’! फार पूर्वी ‘किशोर’ मासिकात ती छापून आली होती. तिची सुरुवात अशी :

‘अवकाशातुन जाता जाता

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?
gondwana supercontinent overview interesting facts about gondwana supercontinent
भूगोलाचा इतिहास : गोंडवाना के भुईया मा..

सहज पाहिले मागे वळुनी

मिसळुन गेले साती सागर

पाची खंडे गेली जुळुनी!’

ही मराठीत १९७० च्या दशकातच झालेली पाच कडव्यांची कविता. तिच्यात कल्पनेची भरारी कुणाला आढळेलही; पण त्यापेक्षा तिला बापटांना पटणाऱ्या समाजवादी विचारधारेचा आधार अधिक होता. अंतराळातून पृथ्वी छानच दिसते, पण जवळ येऊन पाहावे तर काय? ‘खंड खंड उपखंड होउनी, वसुंधरेची छकले झाली’ अशी मानवनिर्मित स्थिती.

‘पर्वत कसले, भयाण भिंती

नदीनदीचा खंदक होतो

काळे.. पिवळे.. गव्हाळ.. गोरे..

त्यांतहि अपुल्यापुरता जो तो!’

ही कवी बापटांची खरी खंत! म्हणून ते शेवटी म्हणतात-

‘अमुच्या ऐसे कुणी बिचारे

असतिल जे ग्रहगोलांवरती

कधी न यावे त्यांनी इकडे

दुरुन साजरी अमुची धरती’

विज्ञानाच्या आधारे ‘वरच्या अवकाशा’त गेलेला माणूस वसुंधरेचं एकात्म सौंदर्य टिपू शकतो; पण प्रत्यक्षात- जमिनीवर- मात्र त्याला असुंदराचा प्रत्यय पदोपदी येतो, असा आशय लक्षात आल्यास ही कविता चांगली वाटणारच. काहीशी सोपी असल्यामुळे ती लक्षात राहणारीही आहे. तरीही बापटांचा समाजवाद हा पलायनवादाकडे कसा झुकतो, किंवा अनेक समाजवाद्यांची मुलं-नातवंडं अमेरिकेतच का राहतात, हे या कवितेआधारे कुणी सिद्ध करू गेल्यास त्यांना यश चिंतून आपण कवितेबद्दलचा मजकूर इथेच थांबवून मूळ विषयाकडे वळू. सोबत जी छायाचित्रं दिसताहेत, ती ‘वी आर ऑल अ‍ॅस्ट्रोनॉट्स’ या शीर्षकाच्या मांडणशिल्पाची आहेत.

हे मांडणशिल्प २०१४ च्या कोची-मुझिरिस द्वैवार्षिक प्रदर्शनात ज्युलिआन शारिएर (स्पेलिंगनुसार, पण चुकीचा उच्चार : चार्रिएरे) या दृश्यकलावंताने मांडलं होतं. ज्युलिआन तेव्हा २७ वर्षांचा होता. त्याहीआधी त्यानं ज्या कलाकृती केल्या, त्यातून त्याचा सातत्यपूर्ण विचार दिसल्यामुळेच तो कोची इथल्या द्वैवार्षिकीसाठी निमंत्रित कलावंत ठरला. त्यानं ही कलाकृती करण्यासाठी सन १८९० ते सन २०११ या काळात तयार झालेले १३ पृथ्वी-गोल (ग्लोब) वापरले. हे पृथ्वी-गोल अर्थातच निरनिराळ्या साधनांनी बनलेले होते.. म्हणजे जुने गोल तांब्या-पितळेचे होते, त्याहीनंतरचा एखादा अ‍ॅल्युमिनियमचा होता, एक कागदी लगद्यापासून बनवलेला होता आणि आणखी एक तर पारदर्शक प्लास्टिकपासून बनलेला होता. ज्युलिआनचं कामच या सर्वच्या सर्व गोलांना खरकागदानं (म्हणजे सँडपेपरनं) घासून त्यावरली छपाई आणि रंग पूर्णपणे घालवून टाकणं, या क्रियेवर आधारलेलं होतं! घासल्यामुळे उतरलेले रंग मात्र त्यानं त्या- त्या गोलाच्या खाली तसेच ठेवलेले होते. सर्व गोलांची रंगधूळ पांढऱ्या कॅनव्हासपासून बनलेल्या टेबलावर साचेल असं पाहून आणि हे सारेच्या सारे गोल एका पांढऱ्याच खोलीत टांगून ज्युलिआननं अवकाशाचा अनुभव प्रेक्षकालाही दिला होता.

अनुभवातूनच प्रेक्षकाला अर्थ काढू देण्याच्या ‘आजकालच्या’ कलारीतीशी हे काम सुसंगतच होतं. खरवडले गेलेले हे निरंगी गोल म्हणजे जणू काही निरनिराळे ग्रह असावेत अशी कल्पना समजा मनात आणली, तरीही प्रेक्षक म्हणून त्या मांडणशिल्पाकडे पाहताना ‘हे सगळे पृथ्वीचेच गोल आहेत’ ही जाणीव मात्र काही केल्या हटत नव्हती. कोणीतरी पृथ्वी २१ किंवा तत्सम वेळा ‘निक्षत्रिय’ केल्याची जी कथा काहीजण अद्यापही आठवतात, तद्वत या ज्युलिआननं पृथ्वी १३ वेळा कशी ‘निरंगी’ करून मांडली आहे, हे इथं डोळ्यासमोर दिसत होतं. यातून पुढे आठवू शकत होते, ते वसुंधरेवरले अत्याचार! अग्नीच्या शोधानंतर मानव झाडं तोडून सरपण बनवू लागला, या गतकाळापासून ते ‘कार्बन फूटप्रिंट’ म्हणजे वामनाचं पाऊलच ठरतंय, इथवरच्या सद्य:काळापर्यंत अनेक कालखंडांत झालेले अत्याचार, त्यातून रंगाचा बेरंग झालेली पृथ्वी.

किंवा कदाचित असंही असेल की, वसंत बापटांच्या ‘ मिसळुन गेले साती सागर, पाची खंडे गेली जुळुनी!’ या दृश्य-कल्पनेप्रमाणे ज्युलिआनलाही देशादेशांमधले, खंडा-खंडांमधले, इतकंच काय- जमीन आणि पाणी यांमधले भेद मिटवायचे असतील. वरवर पाहता संहारक वाटणारी ही कल्पना; पण तिच्याकडे अतिशुद्धतावादी दृष्टीनं पाहिल्यास ती न्याय्यसुद्धा वाटेल.. त्यासाठी फक्त ‘पृथ्वी हाच एक जीव आहे’ असं आधीच मानायला हवं!

नेमकं यातलं काय खरं? याचा अंदाज येण्यासाठी ज्युलिआनची बाकीची कामं काय आहेत, याहीकडे पाहायला हवं. अखेर चित्रकार कधी एका कलाकृतीतून कळत नसतोच!

ज्युलिआन हा पृथ्वीचा द्वेष करत नाही, तो तिच्यावर प्रेमच करतो.. पण त्याला पृथ्वीच्या मानवानंच चालवलेल्या संहाराची शक्यता पुरेपूर पटलेली आहे. त्याच्याच ‘मॉन्युमेंट’ या (लेखकानं प्रत्यक्ष न पाहिलेल्या) कामाचं उदाहरण त्यासाठी महत्त्वाचं ठरेल : पृथ्वीचा गोल आणि एक साधासाच वाटणारा चौकोनी स्तंभ- असं हे मांडणशिल्प आहे. पण ज्युलिआननं या स्तंभासाठी माती/रेती ‘संयुक्त राष्ट्रांच्या यादीत असलेल्या सर्व १९५ देशांमधून’ आणलेली आहे! माती आणि पृथ्वी या दोन्हीसाठी इंग्रजीत एकच शब्द आहे, त्यामुळे हे मॉन्युमेंट (स्मारक) निव्वळ मातीचं नव्हे, तर पृथ्वीचंच आहे. ज्युलिआनही दृश्यातून (खांबाप्रमाणे पृथ्वी-गोलही ठेवून) हेच सांगतो आहे.

बापटांची ‘पाची खंडे गेली जुळुनी!’ ही दृश्यकल्पना स्वप्नवत् असली तरी आधुनिक काळाचा लाभ मिळवून पृथ्वीपासून दूर जाणं, ग्रहगोलांवरून पृथ्वीवर येणं, हे या कवितेत शक्य झालं आहे.. कवी ग्रहगोलांवरल्या लोकांना ‘बिचारे’ म्हणतो, ते पृथ्वीवर यायलाच नको अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून! पण पृथ्वीचं ‘स्मारक’ उभारणारा आजचा (आणि या कवितेपेक्षाही कमी वयाचा) ज्युलिआन संहारातच सौंदर्य शोधण्याचा समजूतदार उत्तराधुनिक खेळ खेळतो आहे. हा ‘कालच्या’ आणि ‘आजच्या’ कलाकृतींतला फरक, असं म्हणू हवं तर!

abhicrit@gmail.com