मागच्या एका रशियाच्या फेरीदरम्यान एक रशियन गृहस्थ रुग्ण म्हणून भेटण्यास आले होते. त्यांना अनेक दिवसांपासून पोटात गोळा आल्यासारखे वाटत असे. अनेक एक्स रे, सोनोग्राफी तथा अन्य तपासण्या त्यांनी केलेल्या होत्या. काहीही ठोस निदान सापडत नव्हते. बरेच आधुनिक तसेच पारंपरिक उपचार झाले होते. रुग्ण अगदी हैराण होते. नाडी परीक्षण केल्यानंतर रुग्णास ‘वातज गुल्म’ असावा असे माझे निदान झाले. कारण वात हा दृष्य नसल्याने तो वरील कोणत्याही तपासण्यांमध्ये दिसत नाही आणि एखाद्या ठिकाणी अवरोध उत्पन्न झाला की, जसे निसर्गात चक्रीवादळ तयार होते तसेच हे वाताचे चक्र पोटात तयार झाले की त्यास वातज गुल्म असे म्हणतात. यामुळे क्वचित तीव्र उदरशूल, पोट गच्च गच्च वाटणे, पोटात सतत काहीतरी गोळा आहे असा भास होणे, शरीरात विविध ठिकाणी (हात, पाय इत्यादी) मुंग्या आल्यासारखे वाटणे, कधी पोटात गुडगुड आवाज तर कधी आध्मान झाल्यासारखे वाटणे, शौच विधीला जाऊनही पोट साफ न झाल्यासारखे वाटणे, फार कुंथावे लागणे अशी अनेक प्रकारची लक्षणे या आजारात दिसतात. गावाकडे अजूनही काही लोक यास वाट सरकणे, नळ फुगणे, पोटात गुबारा धरणे अथवा गोळा येणे अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतात. मग काही लोक दोन्ही पायाचे अंगठे बांधून ठेवतात. काही पोटाला एरंडेल तेल चोळतात तर काही जो जे सांगेल ते सर्व करून बघतात. आमचे आजोबा त्या काळी गावात असे नळ फुगलेले, पोटात गोळा आलेले रुग्ण आले की आम्हाला लगेच एका वाटीत तांदूळ घेऊन यायला सांगायचे. मग देव्हाऱ्याजवळ जाऊन पूजेचा तांब्या, कापूर व काडेपेटी घेऊन यायला सांगायचे. आम्ही सगळे आता काय जादूचा प्रयोग होणार असे म्हणून बघायला तिथे जमायचो. आम्हाला यातील छोटी मोठी मदतीची कामे सांगितली जायची. तेव्हा या सर्व गोष्टींचे जणू नवलच वाटायचे. पण रोजचंच असल्याने याची सवय झाली होती. मग रुग्णाला पाठीवर झोपायला सांगून त्याच्या पोटावर नाभी प्रदेशी भरलेल्या तांदळाची वाटी ठेवून त्यात कापराच्या दोन तीन गड्डय़ा टाकायचे व काडेपेटीने पेटवायचे. मग हळूच तांब्या त्यावर उपडा ठेवून दाबून धरायचे. मग तांब्या अगदी घट्ट बसायचा काही केल्या निघायचा नाही. आम्हाला याची फार गम्मत वाटायची. मग ते हळुवार त्या तांब्याला वेगवेगळ्या दिशेत फिरवायचे व एका बाजूला बोट ठेवून हळूच तांब्या काढून घ्यायचे. असे दोन-तीन वेळा झाले की, रुग्ण एकदम बरा व्हायचा. त्याला आजोबांनी काही घरगुती औषधे व पथ्य सांगितलेली असायची. रुग्ण पुढच्या वेळी त्यांच्या पायाच पडायचा. मला हे सगळं चांगलंच जमत होतं म्हणून त्या रशियन रुग्णाससुद्धा आम्ही त्यांची व तेथील डॉक्टरांची संमती घेऊन हा प्रयोग केला. गंमत म्हणजे कोठेही बरा न झालेला रुग्ण या प्रयोगाने बरा झाला.

पूर्वीच्या काळी काही लोक असे प्रयोग मंत्र, देवपूजा, तांत्रिक विद्या अशा नावाखाली करून रुग्णांना बरे करायचे तर काही फसवायचे. घरात पारंपरिक वैद्यकी असल्याने यात काही थोतांड नव्हते हे मला माहीत होते. म्हणून आयुर्वेदात आल्यावर शास्त्रोक्त काही माहिती मिळतेय का या प्रयोगाची ते पाहिले. तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की, हा एक ग्रंथोक्त प्रयोग आहे. यास ‘घटीयंत्र प्रयोग’ असे म्हणतात. मातीचा घट व गवत पेटविण्यासाठी वापरले जायचे. सध्या बोली भाषेत यास ‘दीपयंत्र प्रयोग’ असे म्हणतात. कफज गुल्माच्या शल्य चिकित्सेत याचा उल्लेख आहे. गुल्मातील तज्ज्ञ व्यक्तीनेच करावे असेही सांगून ठेवले आहे. वातज गुल्मात काहीही शल्यकर्म न करता फक्त वात दोषाला जागेवर आणण्यासाठी याचा उक्तीने वापर केला जातो. अनेक असाध्य समजल्या जाणाऱ्या कित्येक आजारांची शास्त्रोक्त चिकित्सा आपल्या परंपरेत व आजीबाईच्या बटव्यात दडली आहे. गरज आहे ती फक्त भोंदूबाबा, तांत्रिक-मांत्रिक यांच्या मागे न लागता त्यातील अंधश्रद्धा कोणती व शास्त्र कोणते हे समजून घेण्याची. सध्याच्या काळात अनेक व्हॅॅक्युम थेरपी, अक्युप्रेशर थेरपीची उपकरणे वेगळी असली तरी त्यामागचे शास्त्र व तत्त्व एकच आहे. उपलब्ध काळानुसार फक्त त्याच्या वापराची पद्धत व साधने बदलली. पोटाच्या सगळ्याच तक्रारीत पथ्य पाळून योग्य औषध उपचार केला की अनेक आजार बरेच होतात.

Stomach Gas
पोटात गॅस वाढवतात ‘हे’ ४ पदार्थ; पण ‘हा’ उपाय केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम
Congress should openly come forward and say that a farmers son should not become an MP says chandrahar patil
उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण… – चंद्रहार पाटील
marathi actress Supriya Pilgaonkar react on chinmay mandlekar getting trolled for his son name jehangir
“जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…
Devendra Fadnavis Has Shani Sadesati Effect
“फडणवीसांच्या मागे साडेसाती, घाईत शत्रूवर मात करताना..”, उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीवरून ज्योतिषांची भविष्यवाणी

 

वैद्य हरीश पाटणकर

harishpatankar@yahoo.co.in