उद्या नागपंचमी. या नावाशी साधम्र्य असणारा आजार म्हणजे ‘नागीण’. जसे या सणाबद्दल काही गैरसमज समाजात प्रचलित आहेत, त्याचप्रमाणे या आजाराबद्दलही आहेत. नागिणीचा पूर्ण वेढा पडला, उतरलेली नागीण पूर्ण गोल झाली, तिची दोन्ही टोके जुळली की, माणूस मरतो इत्यादी अनेक गैरसमज ऐकायला मिळतात. नागाला जसे दूध, अंडे दिले जाते तसेच नागीण या आजारावर लेपासाठी अंडय़ाचा व गेरूचा वापर केला जातो, काही ठिकाणी तर वारुळाची माती लेपासाठी वापरली जाते. खरंच या नागाचा आणि नागीण या आजाराचा काही संबंध आहे का?

आयुर्वेदात नागीण या आजारालाच ‘विसर्प’ असे म्हटले आहे. विसर्प म्हणजे सापाप्रमाणे ज्याची गती आहे असा आजार. हा एक प्रकारचा त्वचारोग आहे, मात्र पित्त वृद्धी झाल्याने हा होतो असे आयुर्वेदीय मत. आधुनिक मतानुसार यास ‘हर्पिझ झोस्टर’ असे म्हणतात. हे एक वायरल इन्फेक्शन आहे. मज्जातंतूंच्या मार्गाप्रमाणे हा आजार पसरत जातो. थोडक्यात आजार वाढला म्हणजे जास्तीतजास्त ‘नर्व रूट’ या आजाराने व्यापली जाते व नर्वचा मार्ग पूर्ण झाला म्हणजे गोल विळखा पडला तर आजार अधिकच वाढल्याने माणूस दगावण्याची शक्यता वाढते म्हणून हा गैरसमज पसरला आहे. हा संपूर्ण शरीरावर कोठेही होऊ  शकतो. तरीही चेहरा, छाती, पोट, हात या ठिकाणी हा अधिक प्रमाणात पाहायला मिळतो. आपल्या शरीराची खालावलेली व्याधीप्रतिकारक शक्ती व वाढलेल्या पित्ताचे द्योतक म्हणजेच जणू काही नागीण. रात्री सतत जागरण करणे, पित्तवर्धक आहार सेवन करणे, वेळी अवेळी जेवण करणे या सर्व कारणांनी आपली रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली व पित्त वाढले की व्यवहारात नागीण झालेले रुग्ण पाहायला मिळतात. प्रचंड दाह व खाज असते. रुग्ण अगदी हैराण झालेला असतो. काहीही केल्या ही खाज कमी होत नाही. आधुनिक शास्त्रात यावर ‘असायक्लोवीर’ नावाच्या औषधाची फार उपयोगी उपाययोजना आहे, याने आजार तत्काळ बरा होतो मात्र कित्येक जणांना पुढे कित्येक वर्ष नागीण बरी होऊनसुद्धा त्या ठिकाणी आग व खाज जाणवत राहते. म्हणून हा आजार

Hanuman Jayanti 2024
हनुमान जयंती २०२४: मारुतीची जन्मकथाच निराळी!
ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

बरा करताना आपण आयुर्वेदीय मतसुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

जोपर्यंत शरीरातील वाढलेले पित्त व दूषित रक्त बाहेर पडत नाही तोपर्यंत हा आजार खऱ्या अर्थाने बरा झालाय असे म्हणता येत नाही. म्हणून आयुर्वेदात यावर जलौकावचरण, रक्तमोक्षण इत्यादी रक्त व पित्ताच्या शुद्धीचे उपचार सांगितले आहेत. यानेसुद्धा रुग्णाचा दाह व खाज तात्काळ कमी होते. काही पित्तशामक लेप व विरेचनासारखे पंचकर्मातील उपचारसुद्धा या आजारापासून कायमची मुक्ती देतात. आज्जीबाईच्या बटव्यातील तांदळाच्या पिठाचा लेप दुर्वामध्ये खलून केल्यास नागीण पसरत नाही व दाहसुद्धा शांत होतो. मात्र काही घरगुती लेप जरी उपयुक्त असले तरी सध्याच्या काळी प्रकारानुसार डॉक्टरांच्या व वैद्याच्या सल्ल्याने औषधोपचार करणेच योग्य ठरेल.

लक्षात ठेवा काही आजारांची नावे ही त्यांच्या गतीनुसार, स्थानानुसार अथवा लक्षणानुसार दिली जातात. त्यामुळे प्रत्येक वेळी त्याचा थेट एखाद्या प्राण्याशी संबंध असेलच असे नाही. म्हणून नागीण झाली म्हणजे तुम्ही एखादा नाग मारला असेल, नागिणीने डाव धरला असेल अथवा आता नागाची पूजा केली तरच हा आजार बरा होईल या सर्वच अंधश्रद्धा आहेत.

वैद्य हरीश पाटणकर

harishpatankar@yahoo.co.in