माणसाचा मृत्यू झाला की आपल्याकडे तो पंचत्वात विलीन झाला असे म्हटले जाते. पंचत्वात म्हणजेच पंच तत्त्वात. म्हणजेच पंचमहाभूतात. आयुर्वेदसुद्धा ‘र्सव इदं पांचभौतिकम् अस्मिनार्थे!’ असे म्हणून या सृष्टीतील सर्व गोष्टी या पंचमहाभूतापासूनच बनलेल्या आहेत असे म्हणतो. ती पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पैकी आप महाभूत म्हणजेच पाणी. या पंचमहाभूतांपासूनच आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजे वात, पित्त व कफ बनलेले आहेत. ज्याप्रमाणे माती आणि पाणी एकत्र केले की चिखलाचा एक गोळा तयार होतो त्याचप्रमाणे पृथ्वी आणि आप महाभूत एकत्र आले की शरीरातील कफ तयार होतो. म्हणून तर कफाचे आजार असणाऱ्यांनी पाणी कमी प्यावे. तेजापासून पित्ताची निर्मिती होते तर वायू आणि आकाश महाभूतापासून वाताची निर्मिती होते. गंमत पाहा, आपल्या शरीरातील डोक्यापासून पायापर्यंत ही महाभूते आपल्याला क्रमाने पाहायला मिळतात. डोक्याच्या भागात कान, नाक, मुख इत्यादी ठिकाणी आकाश तत्त्व आपल्याला अधिक पाहायला मिळते. छातीच्या ठिकाणी आत फुप्फुसांमध्ये वायू तत्त्व अधिक पाहायला मिळते, त्याखाली पोटाच्या ठिकाणी जिथे पचन प्रक्रिया घडते त्या ठिकाणी अग्नी म्हणजेच तेज तत्त्व पाहायला मिळते. तर त्याखाली जिथे मूत्र साठते त्या ठिकाणी जल तत्त्व. आपले पाय ज्या पृथ्वीवर आपण ठेवतो तिथे काठिण्य अर्थात पृथ्वी तत्त्व अधिक प्रमाणात पाहायला मिळते. म्हणूनच या पंचमहाभूतांचे शरीरातील संतुलन बिघडले की आपल्याला अनेक आजार निर्माण होताना दिसतात. एका महाभूताच्या घरात दुसऱ्या महाभूताचे अतिक्रमण झाले की आजार निर्माण होणार. म्हणून शरीराच्या वरच्या भागात कफाचे, मधल्या भागात पित्ताचे व खालच्या भागात वाताचे आजार आपल्याला जास्त पाहायला मिळतात. उदाहरणार्थ सर्दी, खोकला हा कफज आजार वर सांगितलेल्या आकाश आणि वायू महाभूताच्या जागी पृथ्वी आणि आप महाभूत आल्याने होतोय. म्हणून पूर्वीच्या काळी सर्दी-खोकला झाला की फुटाणे खायचे. फुटाणे खाल्ल्याने वायू वाढतो. तसेच तो अधिक झालेल्या पाण्याला शोषून घेतो म्हणून सर्दी वाहणे थांबायचे. किडनी स्टोन म्हणजेच मूतखडा हा आप महाभूताच्या जागी पृथ्वी महाभूत वाढू लागल्याने होतोय. म्हणून जुने लोक मूतखडा झाला की बिया असलेली फळे अथवा तत्सम पृथ्वी महाभूत अधिक असलेल्या गोष्टी कमी खायला सांगायचे. तिखट, मसालेदार पदार्थानी पित्त वाढून मूळव्याध निर्माण झाल्यास त्या पित्ताला कमी करून त्याचा दाह कमी करण्यासाठी लोणी खायला द्यायचे. याचप्रमाणे छातीत पाणी साठणे, पित्ताशयात खडे होणे, पोटात वाताचा गोळा येणे, हे सर्व एकाच्या जागेत दुसऱ्याने केलेले अतिक्रमण आहे. असेच सगळ्या आजारांच्या बाबतीत जाणावे. त्यांच्या विरोधी तत्त्वे वापरून त्यांना त्यांच्या त्यांच्या जागी आणणे ही चिकित्सा. पाणी जास्त प्यायलात तर तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढून त्यावर असलेला अग्नी विझून जाईल व तुम्हाला अग्निमांद्य होईल. एकदा का अग्निमांद्य झाले की ‘रोग: सर्वेपि मंदाग्ने’ या न्यायाने तुम्हाला कोणताही आजार होऊ  शकतो. अर्थात या पंचमहाभूतांचे योग्य संतुलन आपण निरोगी राहण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. ‘अति सर्वत्र वर्जयेत’ या न्यायाने आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. मग ते पाणी का असेना. म्हणूनच भेळ, शेव, फरसाण असे सुके, कोरडे अन्न जास्त सेवन केल्यास वात वाढतो. बासुंदी, श्रीखंड, केळी, पाणी असे कफकारक पदार्थ जास्त खाल्ले की कफ वाढतो आणि मिरची, मिरे, तिखट, मसालेदार अन्न जास्त सेवन केले की पित्त वाढते. ही प्रत्येक गोष्ट त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त झाली की एकमेकांवर अतिक्रमण करते व आजार निर्माण करते.

कॅलरी, प्रोटिन, फॅट यांना एकाच भाषेत बसवून शरीराचे सर्व प्रश्न सुटत नाहीत. म्हणून ही पंचमहाभूतांची भाषा, त्रिदोषांची भाषा आपल्याला शिकलीच पाहिजे. लक्षात ठेवा एखाद्या गोष्टीला पाहण्याची शास्त्रे जरी वेगवेगळी असली तरी समजून घेण्याची गोष्ट मात्र तीच आहे. तिच्यातील मूलभूत तत्त्वे कधीच बदलणार नाहीत. मिरची फ्रिजमध्ये ठेवली म्हणून स्पर्शाने थंड झाली तरी गुणाने थंड होत नाही, ती खाल्ल्यावर शरीरातील उष्ण तत्त्वच वाढणार आहे. म्हणून आयुर्वेदातले शास्त्रीयत्व पाहणे जास्त गरजेचे आहे.

जाणून घ्या डोपिंग म्हणजे काय?
अनुवाद क्षेत्रातील संधी
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो

वैद्य हरीश पाटणकर

harishpatankar@yahoo.co.in