बुवांच्या भावतन्मय मुद्रेकडे पाहताना हृदयेंद्र हरखून गेला. त्याचं लक्ष अचलानंद दादांकडे गेलं. त्यांचीही स्थिती वेगळी नव्हती. उलट एकमेकांकडे पाहताना बुवा आणि अचलदादांचे डोळे भरून येत होते. जणू दोघांचा मूक संवाद सुरू आहे.. दिव्य विचारांच्या स्पंदनांची आंतरिक देवघेव सुरू आहे! अचलानंद दादा मधुर स्वरांत पुटपुटले.. ‘‘मग तो म्हणे गा सव्यसाची। पैं इये संसारपाटणींची। वस्ती साविया टांची। दुपुरुषी।।.. आणिक तिजा पुरुष आहे। परी तो या दोहींचे नांव न साहे। जो उदेला गांवेंसी खाये। दोहींतें यया।।’’ दादांच्या मुखातून प्रकटलेल्या ‘ज्ञानेश्वरी’तल्या या ओव्यांशी सम साधत बुवांच्या मुखातूनही ‘चांगदेव पासष्ठी’तल्या ओव्या अवचित प्रकटल्या.. ‘‘ प्रगटे तंव तंव न दिसे। लपे तंव तंव आभासे। प्रगट वा लपाला असे। न खोयता जो।।’’.. अचानक बुवांचं लक्ष चौघा मित्रांकडे गेलं.. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते गोंधळलेले भाव पाहून ते ओशाळं हसले.. कीर्तनातला हा त्यांचा नित्याचा अनुभव होता.. एकतर आता कीर्तनाला पूर्वीसारखी गर्दी नसते की त्यात रंगतही नसते, असं त्यांना वाटत असे.. त्यात निरूपण करता करता मन आणि बुद्धी अचानक उंचावर झेपावे आणि समोरच्या श्रोत्यांकडे लक्ष जाताच वाटे.. यांना इतकं काही ऐकण्यात खरंच रस असेल का? कित्येकांचं चित्त तर स्वप्रपंच चिंतांच्या कीर्तनातच गुंतल्याचं चेहऱ्यावरूनही कळे.. या क्षणीही आपल्या मनात फडफडत असलेली अनेक ग्रंथांची पानं त्यांनी जणू बंद करून टाकली.. त्यांच्या मनाची ही अवस्था हृदयेंद्रनं काही प्रमाणात ताडली.. तो म्हणाला..
हृदयेंद्र – दोन ताकदीच्या गवयांची जुगलबंदी ऐकताना प्रथम कोण चांगलं गातंय, हे ठरवण्यात गुंतलेलं रसिकांचं मन नंतर त्यांच्या ताब्यातही राहात नाही ना, तसं झालंय आमचं.. खरंच बुवा तुम्ही दोघं आहात आणि तुमच्या माध्यमातून ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज’ची उकल होत जाणार आहे, ही मोठी भाग्याची गोष्ट वाटते मला..
बुवा – एखाद्या अभंगाचा त्या संताच्या चित्तचक्षूंपुढचा अर्थ आपण शोधूच, असं कुणीच ठामपणे म्हणू शकत नाही.. उलट अशा घमेंडीत गेलो ना तर दिशाभ्रम झालाच समजा! आई कसा प्रत्येक घास मुलाला पचेल इतका मऊसुत करून भरवते ना? तसं माउलींच्या चरणी माथा ठेवून त्यांनाच विनवू की आम्हा लेकरांना अर्थाचे घास भरव.. (बुवांचे डोळे पाणावतात.. दादांचाही उर भरून आला आहे.. या भावसंस्कारांने काही क्षण सर्वच मित्रही भारले आहेत)
अचलदादा – अगदी खरं.. इतक्या काकुळतीनं करुणा भाकली तर संताचं हृदयही का नाही उचंबळणार? आज कोण लक्ष देतो हो त्या बोधाकडे.. ज्याला त्याला भौतिक जगणं सुखाचं हवं आहे.. जन्मापासून देहाला रोग जडला आहे आणि मनाला तर अनंत जन्मांपासून भवरोग जडला आहे.. तरी त्याच देहमनाचा खेळ वाढवित राहण्याची ओढ आहे ज्याला त्याला.. त्यांचं सांगणं काय आहे, हे ऐकण्यात कुणाला रस आहे? त्यांनी आमचं ऐकावं, हीच ज्याची त्याची धडपड आहे.. निदान आपण काही क्षणांसाठी ती धडपड सोडून मनाचे कान देऊन ऐकू लागलो ना, तर त्यांचं सांगणं थोडं थोडं ऐकू येईल.. मग ऐकलेल्याचं चिंतन होईल तेव्हा थोडं थोडं समजूही लागेल.. (काही क्षण अगदी मौनात सरतात. मग बुवा घसा खाकरून जणू भावनेचा तोल सावरल्यागत म्हणतात..)
बुवा – ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायाच्या आरंभी माउली सद्गुरूंना वंदन करतात आणि सद्गुरू प्रेमाच्या प्रवाहात वाहण्यात धन्यता मानतात.. त्यांना ओढ नाही हो ज्ञानेश्वरी सांगायची! सद्गुरूंची आज्ञा म्हणून ते बळेच बोलत आहेत.. ‘‘म्हणोनि रिकामें तोंड। करूं गेले बडबड। कीं गीता ऐसें गोड। आतुडलें।।’’ निवृत्तिनाथ म्हणाले म्हणून मी रिकाम्या तोंडानं बडबड सुरू केली तर गीतेचा गोडवाच प्रकटला.. अगदी आतडय़ातून आलाय तो! मी अडाणी आहे हो.. पण ती माझी सद्गुरूमाय आहे ना? तिला काय हो अशक्य? ‘‘..श्रीनिवृत्तिराजें। अज्ञानपण हें माझें। आणिलें वोजे। ज्ञानाचिये।।’’ माझ्या अडाणीपणाला त्यांनी महाज्ञानाची योग्यता मिळवून दिली! माउलींच्या अंत:करणातला सद्गुरूंविषयीचा हा दिव्य भाव लक्षात येत नाही तोवर ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज’मधल्या सगुण, निर्गुण आणि कृष्णमूर्तिचा थांग लागूच शकणार नाही!
चैतन्य प्रेम