ऑक्टोबरची काहिली हळूहळू जाणवू लागली होती. कर्मेद्रच्या घरातील वातानुकूलित खोलीतल्या थंडाव्यानं मात्र बाहेरची दग्धता जाणवत नव्हती. आज चार मित्रच जमले नव्हते, तर योगेंद्रसह सिद्धी आणि ज्ञानेंद्रसह प्रज्ञा या दोघी आल्यानं ख्यातिचीही लगबग सुरू होती. त्यात छोटय़ा आनन्दोच्या लोभस लुडबुडीचं अस्तरही होतं. योगेंद्रबरोबर लहानगी गायत्रीही आली होती आणि तिच्याबरोबर खेळण्यातही आनन्दो रमत होता. आईचं बंगाली आणि बाबाचं मराठी या दोन्ही भाषांचा मिलाफ साधत आनन्दोची बालभाषा बनली होती.. ख्यातिच्या घरचे आनन्दोला लाडानं ‘खोका’ म्हणून हाक मारायचे.. लहानग्या मुलासाठीचा हा शब्द मराठीत वेगळ्या अर्थाचा होतो.. त्यामुळे ‘ए खोक्या’ असं गायत्री चिडवत होती आणि आनन्दोही हसत-ओरडत तिला प्रत्युत्तर देत होता.. त्या दोघांकडे पाहताना प्रज्ञाच्या डोळ्यातलं मूक वात्सल्य हृदयेंद्रला जाणवल्यावाचून राहिलं नाही. उन्हात जाऊ नका, जोरात धावू नका, या सूचना कोरडय़ा कानांनी ऐकत मुलं खेळत बाहेर गेली.. ख्यातिही त्यांच्या पाठोपाठ गेली.. हृदयेंद्र काचकपाटाशी गेला. अनेक पुस्तकं होती.. ख्यातिची आवड! बरीचशी बंगाली होती.. कर्मेद्रच्या आजीनं बहुदा घेतलेली कधीकाळची थोडी मराठी पुस्तकंही होती.. त्यातलं ‘श्रीरामकृष्ण वचनामृत’ हृदयेंद्रनं बाहेर काढलं..
प्रज्ञा – एकटाच काय वाचतोस? थोडं मोठय़ानं वाच..
हृदयेंद्र – (सर्वाकडे नजर टाकतो, कुणी फारसं उत्सुक दिसत नाही म्हणून मनाशीच हसतो..) ही पुस्तकं आहेत ना, त्यातलं कुठलंही पान कधीही उघडून वाचा.. खूप काहीतरी मिळाल्याशिवाय राहात नाही.. बघा हं, श्रीरामकृष्ण आणि मणी यांच्यात संवाद सुरू आहे.. जग आणि मानवी जन्माबद्दलचं बोलणं वाटतंय हे.. ऐका.. मणी म्हणतात की शरीर हेच सर्व अनर्थाचं मूळ आहे, हे जाणून ज्ञानी लोकांना ही खोळ टाकून दिली की बरं, असं वाटतं.. त्यावर रामकृष्ण म्हणतात, ‘‘असं का बरं म्हणता? हा संसार जसा मयसभा तसाच आनंदनिवासही तर होऊ शकतो!’’ मणी त्यावर म्हणतात की, ‘‘खरा निरवच्छिन्न आनंद आहे कुठे?’’ श्रीरामकृष्णही त्यावर ‘‘हं, तेही खरंच!’’ असं उद्गारतात.. (पुढचा भाग मनातल्या मनात वाचू लागतो. कर्मू विचारतो, ‘‘संपलं का?’’ हृदयेंद्र हसून म्हणतो..) काय आहे, खरा अखंड आनंद आहे तरी कुठे, हा प्रश्न मणी विचारतात तेव्हा तो माझ्याचजवळ राहिलास तर आहे, असं श्रीरामकृष्ण कसं सांगतील? पण पुढे ते मोठय़ा खुबीनं ही गोष्ट सांगतात पहा.. मणी म्हणतात, जगताना अष्टपाश तर आहेत.. त्यावर श्रीरामकृष्ण म्हणतात, ‘‘म्हणून कुठं बिघडलं? त्याची..’’ (हृदयेंद्र वर पाहून, ‘‘म्हणजे सद्गुरुंची बरं का’’ असं म्हणतो आणि पुढे वाचू लागतो..) ‘‘त्याची कृपा झाल्यास एका क्षणात आठही पाश गळून पडू शकतात. हे कशासारखं सांगू? जसं, हजार वर्षांची एक अंधारकोठडी आहे, तिथं दिवा घेऊन गेल्यास क्षणार्धात अंधार पळून जातो.. अगदी एकदम.. थोडा थोडा नव्हे!’’ काय विलक्षण रूपक आहे पहा! आपलं अंत:करण म्हणजे ही अंधारकोठडी आहे.. हजारो जन्म त्यात अज्ञानाचा, भ्रमाचा, मोहाचा अंध:कार साचत आहे.. सद्गुरू बोधाचा सूर्य उगवताच ती प्रकाशमान होते.. हळूहळू नव्हे तात्काळ!
योगेंद्र – पण असं तात्काळ कुठे होतं? त्यांच्या सहवासात राहूनही आपल्यात कुठे तात्काळ पालट होतो?
हृदयेंद्र – याचाच अर्थ अंधारकोठडी घट्ट बंदच आहे! त्यांच्या जवळ जाऊनही मनाची कवाडं बंदच आहेत.. जर त्या बोधाचं ग्रहणच नाही, तो बोध नीट ऐकलाच नाही, जीवनात उतरवण्याचा अभ्यास सुरूच झाला नाही, याचाच अर्थ तो बोध अंत:करणात शिरलेलाच नाही.. मग उजेड पडणार कसा?
ज्ञानेंद्र – पण असा क्षणार्धात पडलेला भगभगता उजेडही कुठे पाहवतो? ‘टेल ऑफ टू सिटिज’मधले डॉक्टर मॅनेट असेच कित्येक र्वष अंधाऱ्या खोलीत लपून असतात.. बाहेरच्या जगाचा उजेड त्यांच्या डोळ्यांनी कित्येक वर्षांत पाहिलेलाच नाही.. जेव्हा प्रकाशाचा पहिला किरण पडतो तोही त्यांना सहन होत नाही.. अंधारकोठडीत अनंत जन्मं ज्याचे गेलेत असं तुम्ही म्हणता, तो जीव त्या प्रकाशानं तात्काळ तथाकथित स्वस्वरूपाचं दर्शन घेऊ लागेल की डॉक्टर मॅनेट यांच्याप्रमाणे मूच्र्छित पडेल?