दिवाळीचे भाऊबीजेपर्यंतचे गडबडीचे दिवस संपले आणि मग दुसऱ्या शनिवारची आणि रविवारची सुटी जोडून आली म्हणून ज्ञानेंद्रच्या प्रशस्त बंगल्यावर सर्व मित्र ‘सरप्राइज पार्टी’साठी म्हणून निघाले.. ख्याति आनन्दोसोबत माहेरी गेली होती. तिला विमानतळावर पोहोचवून कर्मेद्रनं गाडी ज्ञानेंद्रच्या बंगल्याकडे वळवली होती. योगेंद्र सिद्धीसह आला होता. गायत्रीला मामा आजोळी घेऊन गेला होता त्यामुळे पंधरवडाभर दोघांना उसंत होतीच.. पण दिवाळीच्या पार्टीचे ‘सरप्राइज’ नेमके काय आहे, याचा अंदाज येत नव्हता.. बंगल्याचं दार उघडलं आणि दिवाणखान्यात पाऊल टाकलं तेव्हा ते सुखदाश्चर्य उमगलं.. विठोबादादा अर्थात बुवा आणि अचलानंद दादा मोठय़ा कोचावर विसावले होते!

हृदयेंद्र – अरेच्चा! दादा गुरुबंधूला काही न कळवता ज्ञानेंद्रकडे आलात!!
अचलदादा – तुझ्याशी संपर्क साधायचा बराच प्रयत्न केला, पण अतिशय गडबडीत यावंच लागलं.. हिची प्रकृती इथल्या जाणकार डॉक्टरांना दाखवावी, असं सगळ्यांचं मत पडलं.. इथे आलो आणि योगायोग पहा, तुमच्या डॉक्टर नरेंद्रांशीच भेट झाली!
योगेंद्र – वा! मग ते पण येणारेत की काय?
अचलदादा – त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून कसा वेळ मिळेल, सांगता येत नाही.. उद्या रविवारी यायला काही हरकत नसावी.. पण जशी महाराजांची इच्छा!
हृदयेंद्र – माई पण आल्यात? कुठे आहेत?
ज्ञानेंद्र – इथेच.. वरच्या खोलीत विश्रांती घेताहेत.. आणि बुवांना, दादासाहेबांना आणि कुशाभाऊंना मीच पत्र पाठवलं होतं की दिवाळीत येऊन काही दिवस राहून जा.. बुवा आले.. इतरांना जमेलंसं वाटत नाही..
हृदयेंद्र – पण फार छान झालं.. बुवा ‘सगुणाची शेज’ हा अभंग योगानं म्हटला ना, तेव्हाच मला वाटलं की तुम्ही आणि दादा असलात तर काय रंगत येईल!
अचलदादा – (हसत) खरं सांगू का? हिची प्रकृती हे निमित्त झालं.. खरा लाभ तुम्हा सर्वाची भेट हाच आहे.. सध्या वयामुळे या भेटी कमी होतात ना, तेव्हा त्यांचं महत्त्व फार जाणवतं.. पुन्हा आपण सर्वजण एकत्र येऊ न येऊ.. आत्ता तर योग आलाय!
दादा असं हळवेपणानं बोलत नाहीत, उलट भावनिकदृष्टय़ा साधकानं अगदी सहसाधकावरही अवलंबून असू नये, असं ते बजावत. त्यामुळे यावेळी त्यांचा कातरलेला स्वर हृदयेंद्रहाही हळवं करून गेला..
बुवा – फार सुरेख अभंग निवडला आहेत तुम्ही.. सगुण आणि निर्गुण या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयांना तर यात स्पर्श आहेच, पण सगुण आणि निर्गुण असूनही सगुण आणि निर्गुणापलीकडेदेखील व्यापून असलेल्या ‘कृष्णा’चं जे महत्त्व हा अभंग गातो, ते पटकन उमगत नाही.. अहो या एका अभंगावर निरूपण करायचं ना, तर माउलींची ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ, नाथांचं भागवत इतकंच कशाला अगदी वेदांपासून गीतेपर्यंत कितीतरी ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल.. (डोळे पाणावतात जणू प्रत्येक ग्रंथातले दाखले दृष्टीसमोर प्रकटत आहेत..) फार सुंदर!! हृदयेंद्र तुम्ही एकदा वाचा बरं हा अभंग.. ती गाथा आहे बघा तुमच्या बाजूच्या घडवंचीवर..
हृदयेंद्र अलगद गाथा उघडतो.. शेवटच्या पानावरील अभंगसूचीतून शोध घेतो आणि मग धीरगंभीरपणे अभंग वाचतो.. अभंग असा असतो..
सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।
काही क्षण मौनात सरतात.. दूरवरून येणारा समुद्राच्या लाटांचा आवाजही प्रत्येकाचं मन कुठेतरी दूरवर ओढून नेत असतो जणू.. बुवांच्या मन:पटलांसमोर गीतेतलं कृष्णाचं विराट विश्वरूपदर्शन अवतरलं असतं.. अनंत आकार, अनंत तेज, अनंत दीप्ती.. अर्जुनाच्या हट्टावरूनच दाखवलेल्या या परमदिव्य रूपानं भारलेल्या आणि मग त्या विराटपणानं भांबावलेल्या अर्जुनानं सगुण रूपाचा आर्त धावा करताच पुन्हा आधीचेच कृष्णरूप.. शिष्याचिये प्रीती जाहालें। कृष्णत्व होतें तें विश्वरूप जालें। तें मना नयेचि मग आणिलें। कृष्णपण मागुतें।। सगुण आणि निर्गुण असूनही त्यापलीकडेही विराजमान असलेली आणि शिष्याच्या प्रेमाखातर प्रकटलेली सद्गुरूमूर्ती!!