संध्याकाळचं गार वारं आणि या उपवनातलं निसर्गसौंदर्य मनाला सुखावणारं होतं.. आनन्दोच्या बाललीला आणि गायत्रीची त्याला मिळणारी खटय़ाळ साथ यात वेळ कसा गेला, कळलंच नाही.. सगळेजण कर्मेद्रच्या प्रशस्त निवासस्थानी परतले. रात्रीच्या भोजनाची तयारी अखेरच्या टप्प्यात होती. पानांची मांडामांड सुरू होती.. पदार्थाचा सुगंध पोटातली भूक वाढवत होता.. अखेर स्वादिष्ट खाद्यपदार्थानी ताटं वाफाळली आणि ‘पूर्णब्रह्मा’च्या आस्वादात बोलणं आपोआप ओसरलं.. सोबतीला स्वरपेटीतून अभंगाचे सूर उमटत होतेच.. कर्मेद्रनं एक उसासा टाकला.. हसून योगेंद्रनं विचारलं.. काय झालं?

कर्मेद्र – वर्षभरातल्या माझ्या सगळ्या सुट्टय़ा एकतर अभंगात गेल्या नाहीतर ख्यातिच्या बंगभंगात गेल्या.. गाडीत बसा, खोलीत बसा, मोबाइल असो की टेपरेकॉर्डर असो, सीडी प्लेअर असो.. एकतर मध्ययुगीन अभंग वाजणार नाहीतर ख्यातिची बंगाली गाणी.. पुढचं वर्ष मात्र मी एकटाच माझ्या आवडीची गाणी ऐकत बसणार..
ख्याति – बंगाली गाण्यात काय वाईट आहे? तुझी इंग्लिश गाणी तर ऐकूच नाहीसं वाटतं..
कर्मेद्र – किती व्हरायटी आहे.. नुसते बीटल्स घ्या.. ‘ऑल यू नीड इज लव्ह’मध्ये काय प्रेमाची आदिम गरज मांडलेली नाही? ‘हे ज्युड’ असो, ‘हिअर कम्स द सन’ असो, ‘इमॅजिन’असो.. ‘लेट इट बी’ असो.. त्यात काय तत्त्वज्ञान नाही? भावना नाहीत? या गाण्यांतसुद्धा किती खोली आहे..
हृदयेंद्र – पुढच्या वर्षी मीपण ऐकीन तुझ्याबरोबर..
कर्मेद्र – नको! नको!! ‘आय फिल फाइन’पाठोपाठ तू काहीतरी ‘निर्गुणाची शेज सगुणाची बाज’ वगैरे अगम्य लावशील..
योगेंद्र – ‘निर्गुणाची शेज’ नाही कम्र्या ‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज।’.. ओहो!! हृदू, खरंच हा अभंगही वेगळाच आहे रे..
कर्मेद्र – (कपाळावर हात मारून घेत) खरंच प्रारब्धाचा सिद्धांत मलाही पटायला लागलाय.. काय मी गेल्या जन्मी पाप केलं म्हणून तुमच्यासारखे धर्ममरतड, ज्ञानमरतड, योगमरतड मित्र वाटय़ाला आले.. काय मी पाप केलं म्हणून सुचून सुचून मला एक अभंगाची ओळच सुचली आणि तुम्ही तर सुतावरून स्वर्ग गाठणारी माणसं.. ती शेज सगुणाची असो की निर्गुणाची असो.. त्यावर झोपायचं सोडून चर्चा कसली करता? तुमच्या या गप्पांनीच मला निद्रानाशाचा विकार जडेल की काय, अशी भीती वाटते.. अलीकडे झोपेतही मला स्वप्न पडतं.. एक सुंदर तरुणी भेटते आणि मला अवखळपणे विचारते.. ‘‘सकलसंतगाथा कुठे मिळेल हो?’’ (सगळे खळाळून हसतात) हसता काय? झोप उडते माझी!
योगेंद्र – पण कर्मू तुझे अनंत उपकार.. हृदू मला खरंच ना या अभंगाचा अर्थ हवाच होता.. माझ्या मोबाइलवर सेव्हही आहे..
हृदयेंद्र – गाणं आहे की टेक्स्ट आहे?
योगेंद्र – दोन्ही आहे.. पण थांब आधी छापील प्रतीचं छायाचित्र शोधतो..
कर्मेद्र – जगा आणि जगू द्या रे बाबांनो.. खा आणि मलाही खाऊ द्या.. अन्न गोड लागणार नाही..
योगेंद्र – (हसत) आता पुरे हं.. निदान वाचू तर दे.. अगदी आजच काही चर्चा करणार नाही आम्ही.. घाबरू नकोस.. (योगेंद्र मोबाइलवर शोध घेतो आणि मग म्हणतो..) सगुणाची शेज निर्गुणाची बाज। सांवळी विराजे कृष्णमूर्ति।। मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं। नित्यता पर्वणी कृष्णसुख।। हृदयपरिवारीं कृष्ण मनोमंदिरीं। आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे।। निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट। नित्यता वैकुंठ कृष्णसुखें।।.. बघ सगळे शब्द कळताहेत, पण अर्थ काही नेमकेपणानं कळत नाही..
कर्मेद्र – पण काही बिघडतं का? भटजी लग्न लावतात त्यातलं ‘मम’ म्हणा एवढं कळतं.. बाकी एकही शब्द कळत नाही, पण आपलं लग्न लागतंय एवढं तरी कळतं ना? आणि तेवढं काही कमी आहे का? बसं आहे की तेवढं.. जीवनात प्रत्येक शब्दाचा अर्थ कळलाच पाहिजे, असा आटापिटा कशाला?
हृदयेंद्र – (हसत) कम्र्या तुझं प्रारब्ध बळकट आहे.. बघ, हा शेवटचाच अभंग.. मग आपण अभंगावर बोलणारच नाही.. तुझी गाणीच ऐकू! मग तर झालं?