भगवंतावरचं प्रेम हाच सद्गुरुचा खरा वारसा आहे, असं योगेंद्र म्हणाला तेव्हा हृदयेंद्रनं प्रसन्नतेनं त्याला दाद दिली..
कर्मेद्र – पण योगा तू ते काय म्हणालास? प्रेमात रमतो राम..
योगेंद्र – प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी। हाचि सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची..
कर्मेद्र – हं, तर हृदू, इथे माणसा-माणसांतलं प्रेम हासुद्धा अर्थ का नसेल? महाराजांच्या माणसांमध्ये किती प्रेम असतं, याचं तूही किती कौतुक करतोस..
हृदयेंद्र – पण मी काय म्हटलं? माणूस जोवर भगवंतावर म्हणजेच सद्गुरूंवर खरं प्रेम करीत नाही तोवर तो खरं म्हणजेच नि:स्वार्थ प्रेम करूच शकत नाही! माणसा-माणसांतलं प्रेम हे कोणत्या ना कोणत्या स्वार्थावर अवलंबून असतं. निदान स्वार्थाच्या आड येणाऱ्यावर आपलं प्रेम नसतं, इतकं तरी लक्षात घे.. आणि गंमत अशी की सद्गुरू हे नुसते माझ्या स्वार्थाच्या आडच येत नाहीत तर ते माझा स्वार्थ समूळ नष्ट करू इच्छितात तरीही त्यांचा सहवास हवासा वाटतो.. त्यांच्यावर प्रेम करावंसं वाटतं.. सद्गुरूंवरच्या प्रेमात भक्त रमला की त्या प्रेमात भगवंतही रमतो!! अशा प्रेमाला मोल नाही.. सद्गुरूंना अशा प्रेमाचीच तहान आहे..
कर्मेद्र – तुझं ते दिव्य अलौकिक प्रेम जरा बाजूला ठेव.. मला सांग या प्रेम आहे म्हणूनच जगण्याला अर्थ आहे ना? प्रेमच नसेल, तर जगावंसं तरी वाटेल का?
हृदयेंद्र – माणसाला प्रेमाची भूक असतेच आणि माणसाचं अवघं जीवन म्हणजे प्रेमाचाच शोध असतो.. तरी खरं प्रेम माणसाला लाभतं का? खरं प्रेम तो तरी करतो का?
ज्ञानेंद्र – माणूस प्रेम हा शब्द किती सपकपणे वापरतो, हे जे. कृष्णमूर्तीनीही छान सांगितलंय.. ते म्हणतात : माणूस म्हणतो, ‘‘माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे.’’ मग ती जर दुसऱ्याचा हात धरून पळून गेली, तर हे प्रेम उरतं का हो? त्या प्रेमाची जागा लगेच द्वेष, क्रोध घेतात.. मग माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, या वाक्याचा अर्थ तरी काय? जर बायको मनासारखं वागली नाही, खायला-प्यायला तिनं नीट घातलं नाही, तर ते प्रेम राहातं का? तेव्हा हृदू सांगतो त्याप्रमाणे आपलं प्रेम हे सोयीचं आणि सोयीसाठीचं असतं, हे उघडच आहे.. अशा स्थितीतून खऱ्या प्रेमापर्यंत पोहोचलं पाहिजे..
हृदयेंद्र – आणि खरं प्रेम जर नि:स्वार्थी असेल तर जो खरा नि:स्वार्थी आहे तोच ते मला शिकवू शकतो.. खरं प्रेम म्हणजे जर त्याग असेल तर जो खरा त्यागी आहे तोच ते मला शिकवू शकतो.. खरं प्रेम म्हणजे जर मीपणा विसरणं असेल तर ज्याचा मीपणा म्हणून काही नाहीच, तोच ते मला शिकवू शकतो.. आणि या जगात खरे नि:स्वार्थी, खरे त्यागी सद्गुरूंशिवाय दुसरं कुणी नाहीच! जेव्हा त्यांच्यावर प्रेम करावंसं वाटू लागेल तेव्हा तेच माझ्या मनात त्या प्रेमाचा अंकुर निर्माण करतील.. हा अंकुर एकदा का मनात उत्पन्न झाला की मग तोच माझी पुढची वाटचाल साधून देईल! गर्भाच्या आवडीनुसार मातेला खावं-प्यावंसं वाटतं ना? मग हाच सद्गुरू प्रेमतंतू मला साधनेचे डोहाळे लावेल! हाच प्रेमतंतू मला निर्भयतेचे डोहाळे लावेल.. हाच प्रेमतंतू मला नि:स्वार्थ, निरपेक्ष, निरलस, निरामय, निरहंकारी होण्याचे डोहाळे लावेल.. मग सद्गुरूंच्या कृपेचा खरा अर्थ, खरा हेतू, त्या कृपेची खरी व्याप्ती, खरी खोली हळूहळू जाणवू लागेल.. त्या कृपेचं महत्त्व उमगू लागेल.. त्या कृपेनं भौतिक पसाऱ्याची वाढ नाही तर आंतरिक पसाऱ्याची आवराआवर साधायची आहे, हे समजू लागेल.. त्यांचा खरा जिव्हाळा मनात बिंबू लागेल.. तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे!! सद्गुरू प्रेमाची आपल्याला खरंच कल्पना नाही.. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत ना? ‘माझ्यातलं प्रेम काढा, मग मी उरतच नाही!’ तर प्रेम हे त्याचं स्वरूप आहे..
एवढं बोलून हृदयेंद्र नि:शब्द झाला.. त्याचे डोळे भरून आले.. त्याच्या मनात कबीरसाहेबांचा दोहा तरळला.. यह दुनिया दुई रोज की, मत कर या से हेत। दोन दिवसांची ही दुनिया आहे, द्वैताची ही दुनिया आहे.. तिच्यावर प्रेम करण्यासाठी आणि तिच्याकडून प्रेम मिळविण्यासाठी धडपडण्यात वेळ घालवू नकोस.. दोनांवरच प्रेम करायचंय ना? मग.. गुरु चरनन से लागिये, जो पूरन सुख देत।। गुरुचरणांवर म्हणजे त्यांनी सांगितलेल्या वाटेनं चालण्यावर प्रेम कर, पूर्ण सुखप्राप्तीचा तोच एकमेव मार्ग आहे!!
चैतन्य प्रेम