संध्याकाळ झाली होती, तरी अभंगावरची चर्चा आटोपली नव्हती. रात्री उशीर झाला तरी चालेल, पण चर्चा पूर्ण करू, असं हृदयेंद्र आणि योगेंद्रचं मत पडलं. आनन्दो आणि गायत्रीला मात्र समोरच्या उद्यानात खेळायला जायचं होतं. त्यांच्या सोबतीला म्हणून सिद्धी गेली. रात्रीच्या जेवणाच्या तयारीसाठी ख्याति चाकरांना सूचना द्यायला गेली. थोडा वेळ चर्चा करू, मग आपणही पाय मोकळे करून येऊ, असं कर्मेद्र म्हणाला आणि त्यावर होकार भरत योगेंद्र म्हणाला..
योगेंद्र – चरणातील ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या पूर्वार्धाचा अर्थ तर मनाला भिडला, आता ‘आनंदचि अंग आनंदाचें’ म्हणजे नेमकं काय असावं?
हृदयेंद्र – ही सृष्टी कशी आहे? द्वैतमय आहे ना?
कर्मेद्र – द्वैतमय म्हणजे?
योगेंद्र – द्वैतमय म्हणजे या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत, दोन अंगं आहेत, दोनपणा आहे..
हृदयेंद्र – जसं सुखाला दु:खाचं अंग आहे, लाभाला हानीचं अंग आहे, यशाला अपयशाचं अंग आहे..
योगेंद्र – आणि गंमत म्हणजे सुखाचा अभाव म्हणजे दु:ख आहे.. दु:खं नसणं म्हणजे सुख आहे!
ज्ञानेंद्र – निसर्गदत्त महाराजही सांगत की, तुम्हाला सुख हवं आहे, म्हणजे नेमकं काय? तर तुम्हाला दु:ख नको आहे!
योगेंद्र – आपली प्रत्येक गोष्टीची कल्पना अशीच ठिसूळ आहे.. त्यातही जे आज सुखाचं वाटतं ते उद्या दु:खाचंही वाटू लागतं! जे आज दु:खाचं वाटतं त्यातच उद्या सुखही दिसू लागतं!!
हृदयेंद्र – तर याप्रमाणे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला दोन अंगं आहेत.. सुखाला दु:खाचं अंग आहे, यशाला अपयशाचं अंग आहे.. पण आनंदाला मात्र आनंदाचंच अंग आहे!!
कर्मेद्र – पण आनंदाला दु:खाचं अंग का नसेल? आपण म्हणतोच ना, मी आनंदी आहे, मी दु:खी आहे..
हृदयेंद्र – आपण आनंदी हा शब्द इतक्या सपकपणे वापरतो! अमृततुल्य चहा!! अरे.. अमृत तुम्ही प्यायला आहात का? मग कोणत्या आधारावर त्याच्या तुलनेचा चहा आहे, हे सांगता? आनंद हा स्थायीभाव आहे.. ती स्थायी स्थिती आहे.. तेव्हा मी सुखी आहे, हे म्हणणं बरं.. कारण सुख आणि दु:ख या दोन्ही गोष्टींत सारखं परिवर्तन घडत असतं.. आनंदात परिवर्तन नाही.. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात? ‘‘आनंदचि अंग आनंदाचें!’’ माझं बाह्य़ जीवन जसं पूर्वी होतं तसंच आहे.. आंतरिक जीवन मात्र पूर्ण बदललं आहे.. अंत:करणाचा डोह आनंदानं भरून गेला आहे आणि त्यातला प्रत्येक तरंग हा आनंदाचाच आहे.. या आनंदाला दुसरं कसलं अंगच नाही.. आनंद हेच त्याचं अंग आहे.. सोन्याचा दागिना असतो ना? सोन्याचाच कशाला चांदीचं एखादं भांडंही पहा.. त्यातून त्या धातूचाच प्रकाश जणू फाकत असतो.. तसा आनंदाच्या या डोहातून आनंदच फाकत आहे.. एकदा गुरुजी म्हणाले, ‘‘तुमको सच्चा साक्षात्कारी सिद्ध महात्मा बनना है..’’ क्षणभर काहीच बोलले नाहीत.. मग एकदम म्हणाले, ‘‘लेकिन क्या तुम सोचके बन सकते हो? किसकी क्या औकात! लेकिन सद्गुरू चाहता है तो होगाही!!’’ अगदी तसं आहे हे.. हा परमानंद प्राप्त करण्याची आपली काय पात्रता आहे? अपात्राला ते पात्र बनवतात आणि त्यात आनंदाचा रस ओततात.. जो परमानंद सदोदित त्यांच्या अंत:करणात भरून आहे त्याची झलक माझ्या अंत:करणात उत्पन्न करतात.. ब्रह्मानंद बुवा एकदा पेढे हातानं दाबत होते.. बाजूला त्यांचे पुतणे भीमराव गाडगुळी बसले होते.. पेढा दाबताच त्यावर श्रीराम अशी अक्षरं उमटत आणि मग अदृश्य होत! भीमरावांना आश्चर्य वाटलं तेव्हा बुवांनी त्यांना नजरेनं दटावलं की, बोलू नकोस.. मग म्हणाले, ‘‘अरे महाराजांनी मला अगदी त्यांच्यासारखं केलंय!’’ ही माझी पात्रता नाही रे! त्यांनी त्यांचा अनुभव मला दिलाय! तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा! ठसा जसा ओतावा ना? तसा परमानंदाचा अनुभव सद्गुरूंनी माझ्या अंत:करणात ओतलाय, ठसवलाय!! त्या आनंदानं मी इतका बेभान झालोय.. की माझ्या मुखावाटेही तोच अनुभव बाहेर पडत आहे.. ‘‘तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा। अनुभव सरिसा मुखा आला.. आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचें।।’’
चैतन्य प्रेम