मोठय़ा शहरांत परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेची सध्या चर्चा सुरू आहे.  यासाठी घरे बांधणाऱ्या संस्थांनी प्रायोगिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कारण चाळ ही संकल्पनाही अशाच प्रयोगातून आली होती..

मुंबईसारख्या शहरात सगळ्यांसाठी परवडणाऱ्या राहत्या घराचा प्रश्न जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो सोडवण्यास कठीण आहे. दाटीदाटीने राहणाऱ्या मुंबईकरांचे स्वत:चे घर असावे हे एक स्वप्न असते, पण अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. याचे कारण मुंबईची बदललेली परिस्थिती आहे. स्थलांतरित लोकांची संख्या खूप वाढली आहे व त्यांना परवडतील अशा घरांचा पुरवठा मात्र कमी झाला आहे. घरे बांधता येतील अशा जागांचा अभाव व त्यामुळे त्यांच्या अवाच्या सवा झालेल्या किमतीमुळे, स्थलांतरितांसाठी परवडणारी घरे बांधणे अशक्यच झाले आहे. त्यांच्या दृष्टीने घर; नोकरीच्या जवळ असणे महत्त्वाचे कारण लांबच्या उपनगरातून रोज प्रवास त्रासदायक असतो व परवडणाराही नसतो. नव्या स्थलांतरित कामगारांना आपल्या कामाच्या जागेजवळ झोपडपट्टीत राहण्याशिवाय दुसरा उपाय उरत नाही. मुंबईतील ५२ टक्के लोकांना नाइलाजाने बकाल वातावरणात झोपडपट्टीतच आपले घर मांडावे लागते ही एक लाजिरवाणी बाब आहे.

सरकारी नियोजक आणि त्यांच्या योजना आपल्या परीने उपाय शोधत आहेतच. एफ.एस.आय.चा लालूच म्हणून वापर करून गरिबांसाठी फुकट घरे देणे ही त्यातलीच एक योजना. ही योजना एक पक्के  छप्पर नक्कीच देते पण अतिशय दाटीदाटीने बनलेल्या वसाहतीत. शहराच्या दृष्टीने विचार केला तर, दर एकरी लोकसंख्या वाढतच राहते. याशिवाय, पन्नास वर्षांनंतर या वसाहती जुन्या झाल्या की काय होणार, हे सांगता येत नाही. पण सध्या बाजारात खासगी वसाहती सर्वाना वन बीएचकेचे, विदेशी नावे असलेल्या गगनचुंबी वसाहती, खूप हिरवळ, हसणारी कुटुंबे, बागडणारी मुले व क्लब-हौस असलेले एकच स्वप्न दाखवतात. पण सर्वच लोकांना अशा पद्धतीची बंद दरवाज्याचे अपार्टमेंट आवडतात का? याचा कोणीच गांभीर्याने विचार करत नाही.

जमिनीची किंमत हाताबाहेरची असताना, अशा कठीण समस्यांसाठी वेगवेगळे उपाय शोधून घराची किंमत कमी करण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. अभिकल्पक आपला दृष्टिकोन वापरून याबाबतीत काही नवीन मार्ग काढू शकतो का? अभिकल्पनेत प्रयोग करणे आलेच आणि अशा गंभीर समस्यांसाठी प्रयोगाच्या जोखमी तर स्वीकारल्या पाहिजेतच.

आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, अभिकाल्पक नेहमीच उपभोक्तांच्या गरजा जाणण्यासाठी प्रयत्नशील असतो. झोपडपट्टीत जाऊन लोक छोटय़ा घरात कसे राहतात आणि त्यांच्या गरजा काय आहेत हे जाणून घेणे आलेच. शहरातील निवासांच्या गरजा काय आहेत, हे शोधून काढणे वाटते तितके  सोपे नव्हे. कामात असलेल्या अनिच्छुक झोपडीवासीयांना बोलते करणे आणि त्यांना त्यांच्या राहणीविषयीचे स्वप्न सांगण्यास प्रोत्साहन देणे हे एक अवघड काम आहे.

झोपडीवासीयांना बोलते करण्याकरिता व त्यांच्या अप्रकट गरजा समजण्याकरिता आम्ही अनेक खेळ बनवले. हे खास खेळ खेळण्यास दिले तेव्हा सर्वच झोपडीवासी मनापासून बोलायला लागले आणि तेसुद्धा सलग दोन-अडीच तास! एकदा खेळण्यात मग्न झाले की लोक मनातल्या गोष्टी सांगतात आणि तेच तर आम्हाला हवे होते. एक-दोन गमतीदार उधारणे म्हणून देता येतील. सर्व कुटुंबांना घरचा आराखडा तयार करायला मर्यादित जागा दिली, त्यासोबत त्यांच्या घरगुती कार्याची आणि वस्तूंची चित्रे दिली. या सामग्रीने त्यांना आपल्या स्वप्नातल्या घराची मांडणी करायला सांगितली. प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या, पण बऱ्याच कुटुंबांनी सर्वप्रथम टीव्ही  कुठे ठेवायचा हे ठरवले. मग प्रत्येकाने आपापली कार्ये कुठे व कशी करायची याचे निर्णय घेतले. सर्वानीच घरातल्या भिंती काढून मोठय़ा खोल्या तयार केल्या. महत्त्वाचे म्हणजे मुलांना अभ्यास करण्याची छोटीशी खोली तयार केली, ही घरातली एकुलती एक खासगी खोली झाली.

बरेच निवासी आपल्या घरात लघू व्यवसाय चालवायचे, त्यांनी एवढय़ा लहान जागेतसुद्धा दिवसा खोलीचा पुढचा भाग या कार्यासाठी राखला. तेवढीच उत्पन्नात भर! छोटय़ा जागेत कसे राहावे हे शिकायचे तर त्यांच्याकडूनच. त्यांच्या राहणीबद्दल बरेच काही सांगण्यासारखे आहे, पण त्यावर नंतर कधी तरी बोलू. आम्ही पाहिले की, झोपडीवासीयांचे उत्पन्न जरी जवळजवळ सारखे असले तरी राहणीमान व पैसे खर्च करण्याच्या पद्धतीत खूप फरक असतो. साऱ्यांची स्वप्ने वेगळी, पद्धती व गरजा वेगळ्या; मग त्यांची घरे एकसारखी का असावीत? त्यात काय फरक असावेत? या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर नवीन घरांच्या अभिकल्पना मांडल्या गेल्या.

खेळांमुळे अभिकल्पना सुरू करण्यासाठी दोन नव्या दिशा मिळाल्या. पहिली दिशा, आपण क्षेत्रफळाऐवजी घनफळाचा आणि उंचीचा उपयोग करायचा. या दिशेला आम्ही 3ऊ छ्र५्रल्लॠ असे नाव दिले. दुसरी दिशा 4ऊ छ्र५्रल्लॠ ज्याच्याबद्दल आपण पुढच्या लेखात बोलू.

जेव्हा आपण स्वत:ला चाकोरीबाहेरचे प्रश्न विचारतो, तेव्हाच आपल्याला काही नावीन्यपूर्ण उत्तरे मिळवण्याची शक्यता असते. विचार करा, जर आपण घरातील जमीन क्षेत्रफळासारखी न वापरता, घराच्या उंचीचा सर्जनशील उपयोग केला तर अशा खोलीत कुठल्या सुविधा आणता येतील? उंची थोडी वाढवल्यामुळे, घरांची किंमत थोडी वाढेल, पण एफ.एस.आय. १०० चौरस फूटच राहील म्हणजेच कमी जागेत घरे उपलब्ध होऊ  शकतील. आपण १०़१०़१२.५ उंच अशा खोलीत, सहा लोकांच्या कुटुंबास राहायला सांगितले तर, ते आरामात राहू शकतील का? त्यासाठी लागणाऱ्या सुविधा, ते स्वत:च आपल्या श्रमांनी हळूहळू जसे पैसे जमतील तसे उभे करू शकतील का? या  प्रश्नांना चाकोरीबाहेरचीच उत्तरे शोधणे आवश्यक आहे.

छोटय़ा जागेत घरातील सर्व कार्ये मावणे तसे कठीण. जागेची बचत करण्यासाठी प्रत्येक भागात एकापेक्षा जास्त कार्याचे समायोजन करणे महत्त्वाचे. उदाहरणार्थ, वापरात नसताना न्हाणीघराची जागा खोलीत सामावून घेणे. घरात वेगवेगळ्या पातळीवर विविध कार्यासाठी छोटे छोटे माळे रचून त्यांचा खेळत्या हवेसाठी व फर्निचर म्हणून उपयोग करणे. अशा क्लृप्त्या वापरून जागेचा पुरेपूर वापर करता आला. अशा प्रकारचे नवीन घराचे प्रयोग केले तर लोकांना आवडतील का? हे समजण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष पूर्ण आकाराचा नमुना तयार केला व लोकांना दाखवून त्यांच्या प्रतिक्रिया समजून घेतल्या. हा नमुना स्टीलचे स्लॉटेड अँगल (खाचेचे कोन) वापरून बनवला होता. ही खोली राहण्यासाठी सोयीस्कर आहे का, हवा खेळती राहते का आणि काही नव्या सुधारणा करता येतील का, हे तपासून पाहिले. नंतर रीतसर बदल करून पक्की खोली बनवली व काही कुटुंबांना बोलावून त्यांच्या अभिप्राय घेतला.

खरे तर घरे बांधणाऱ्या संस्थांनी प्रायोगिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे व पूर्वी तो होताही. चाळ ही संकल्पना अशाच प्रयोगातून आली. गिरण्यांतील चाकरमान्यांसाठी ही एक सोय होती, आणि मध्यम वर्गीयांनीही ती आपलीशी केली व एक नावीन्यपूर्ण जीवनशैलीची सुरुवात झाली. मग आता आपल्याला घरांची तीव्र गरज असताना नवीन प्रयोग करणे का थांबले आहे? तसे पहिले तर आत्ताची धोरणेसुद्धा प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहनपूरक नाहीत. जर २ ते ३ टक्के जागेत बिल्डरांना किंवा गृहनिर्माण मंडळांना प्रयोग करण्याची परवानगी दिली तर खूप नव्या गोष्टी येऊ  शकतील.

 

उदय आठवणकर, गिरीश दळवी, विजय बापट
सर्व लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी- इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 
ई-मेल :    uday.athavankar@gmail.com