वस्तूंच्या अभिकल्पनेत वस्तूचा उपयोग, वापरणाऱ्याच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, वय त्या वस्तूविषयीच्या रूढावलेल्या प्रथा, या सर्वाचा बारकाईने अभ्यास करतात आणि या अभ्यासाच्या आधारावर अनुकूल संदेश सांकेतिक स्वरूपात वस्तूच्या रूपात अंतर्भूत करतात.

आपल्याला गरज असते म्हणून आपण वस्तू विकत घेतो हे खरे. या वस्तू अभिकल्पित करताना गरजा भागवणे हे महत्त्वाचे असते हे अर्थात आलेच. समजा, तुम्ही बाजारात महाग पेन विकत घेण्यासाठी गेला आहात. साधारणत: बाजारातील एकाच मूल्य श्रेणीतील सर्व पेनांची कार्यक्षमता सारखीच असते. मग नमुने निवडताना तुम्ही पेनाच्या कार्यक्षमतेपलीकडच्या कुठल्या अन्य गुणांवर भर देता?

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
parental anxiety parents concern about drug addict children
अधोविश्व : अमली पदार्थांमुळे पालकांमध्ये चिंता
Benefits of cuddling for health
हृदयाच्या आरोग्यापासून ते उत्तम झोपेपर्यंत ‘Cuddling’, ‘मिठी मारणे’ ठरते फायदेशीर! काय सांगतात डॉक्टर पाहा…
10 Habits of Successful People
यशस्वी लोकांच्या फक्त ‘या’ १० सवयींमुळे बदलू शकते तुमचे आयुष्य; त्या सवयी कोणत्या आहेत, जाणून घ्या….

एकदा मी दुकानात गेलो असताना, माझ्यानंतर तीन तरुण मित्र एकत्र दुकानात आले. त्यातल्या एकाला आपल्या मैत्रिणीसाठी महाग पेन घ्यायचे होते. तिघांनीही आपापली निवड सांगितली. त्यातील कुठले पेन जास्त योग्य आहे यावर त्यांच्यात बराच ऊहापोह झाला व मग निर्णय घेण्यात आला. मूळ गरज एकच असली तरी प्रत्येक ग्राहक त्या वस्तूत अन्य सुविधांचीही अपेक्षा करत असतो. त्याबद्दल प्रत्येक ग्राहकाची विशिष्ट मतेपण असतात. जर आपल्याला सगळ्या ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा भागवायच्या असतील तर बाजारातील वस्तूंमध्ये विविधता असणे गरजेचे आहे. या विविधतेमुळे दुकानदारालाही विकण्याच्या प्रक्रियेत मदत होते. आपण वस्तू विकत घ्यायला गेलो की, दुकानदार त्याच्याकडील पर्यायी नमुने दाखवू शकतात. मग नमुन्यांच्या गुणांची तुलना करून आपल्या अपेक्षांच्या जवळपास येणाऱ्या वस्तूची निवड आपण करतो.

बाजारातील काही वस्तू आपल्याला पाहता क्षणी आकर्षित (तत्क्षणिक प्रलोभन) करतात आणि काही आपल्या सोबत्यांना. वस्तूंचे निर्माते, उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये आकर्षित करणाऱ्या इतर गुणांचा समावेश करून विविधता आणण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक निर्माता बाजारातील आपल्या प्रतिस्पर्धकांशी या गुणांच्या जोरावर स्पर्धा करत असतो. या सर्व प्रक्रियेशी अभिकल्पकांचा काय संबंध?

अनेक वेळा वस्तूंची निवड ही दृश्य माध्यमातून मिळालेल्या माहितीवर अवलंबून असते. सगळ्या कंपन्यांतील अभिकल्पक आपापल्या प्रतिस्पर्धी कंपनीतील पर्यायी वस्तूंच्या अभिकल्पनांचा व त्यांच्या व्याप्तीचा अभ्यास करतात. या अभ्यासातून, आपल्या प्रतिस्पध्र्याच्या उत्पादनांना आव्हान देईल अशी विविधता आपल्या वस्तूत आणण्याचा प्रयत्न करतात. अशी विविधता आपल्या अभिकल्पनेत कशी आणता येईल? कोणते दृश्य संदेश क्षणात ग्राहकास आकर्षित करू शकतील? अशा वस्तू विकल्या गेल्या नाहीत तर? आकर्षणाला महत्त्वाचे असणारे दृश्यगुण समजून उमजून घेणे हा अभिकल्पकाच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग असतो. वस्तूंची नवीन रूपे संकल्पित करताना असा बुद्धिनिष्ठ दृष्टिकोन असणे गरजेचे असते.

आधी दिलेल्या पेनाच्या उदाहरणाकडे वळू या. पेन कोणासाठी घेत आहोत यावरही आपली निवड अवलंबून असते. पेन स्वत:साठी घेत असाल तर त्यातील दृश्यसंकेत इतरांना आपल्याबद्दल काय सांगतील याचा आपण विचार करतो. आपल्या वस्तूंच्या निवडीद्वारे आपण कोण व कसे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. उदा. मी विद्यार्थी आहे, मी अधिकारी आहे, मी राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ता आहे, मी खेळाडू आहे, मी गायक आहे, चित्रकार आहे वगैरे. थोडक्यात, घेतलेल्या वस्तू आपले व्यक्तिमत्त्व व्यक्त करू शकतील का, याचा विचार करत असतो. तसेच लोकांनी आपल्या वस्तूंची निवड बघूनच ओळखावे, की मी आधुनिक (किंवा पारंपरिक) विचारधारेचा आहे, मी नव्या पिढीचा आहे, मी तरुण आहे, मी अभ्यासक, विद्वान आहे अशी प्रतिमा प्रसारित करू इच्छितो. एवढेच नाही तर आपण वस्तू निवडताना सुप्त संदेशही पाठवत असतो. उदा. या वस्तूतून आपले सामाजिक स्थान कळत आहे का, असे विचारसुद्धा येऊन जातात. निवडलेल्या वस्तू व त्यातील संदेश व्यक्तीच्या वैशिष्टय़ांबद्दल बरेच काही सांगतात. पोशाख व त्याबरोबर घेतलेल्या वस्तूंच्या दृश्य रूपांवरून हे संदेश इतरांना समजतील अशी सुप्त इच्छा असतेच, म्हणूनच लोक आपल्या निवडी काळजीपूर्वक करत असतात.

वस्तू प्रथा : असा दृष्टिकोन फक्त स्वत:साठी घेतलेल्या वस्तूंच्या निवडीशी निगडित नाही. समजा, आपण या वस्तू इतरांसाठी घेत असू तर? जर आपण हे पेन वडीलधाऱ्या व्यक्तीसाठी घेत असू, तर ते त्यांच्या वयोमानास योग्य दिसेल का याचा प्रामुख्याने विचार करतो. हे पेन नक्कीच भपकेदार व रंगीबेरंगी नसणार. आता असे पेन आपल्या महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींसाठी घ्यायचे असेल, तर अशा पेनाचे रंग-रूप वेगळे असेल. असे कोणते इतर संकेत व प्रथा आहेत जे आपल्याला सांगतात, की ही वस्तू भेट घेणाऱ्या व्यक्तीसाठी योग्य आहे की नाही?

वस्तूंच्या वापराबद्दल समाजात काही प्रथा रूढ झालेल्या असतात. अशा प्रथा संस्कृती-विशिष्ट  असतात व त्या आपण अप्रत्यक्षपणे शिकत असतो. उदाहरणार्थ कोणास कुठली वस्तू देणे योग्य आहे हे आपण पालकाकडून अथवा मित्रांकडून शिकतो. काही प्रथा आपल्याला जाणीवपूर्वक शिकवल्या जातात. आपण लग्नासारख्या सोहळ्यात कुठले कपडे घालायचे, कुठले घालायचे नाहीत, कार्यालयात कुठले व संध्याकाळी फिरायला जाताना कुठले कपडे योग्य या प्रथा संस्कृतीशी जोडलेल्या असतात व त्यात आपल्या सांस्कृतिक ओळखीचे घटक दडलेले असतात. म्हणूनच अशा प्रश्नांची उत्तरे प्रत्येक संस्कृतीत वेगळी असतात.

थोडक्यात सांगायचे तर वस्तूंच्या अभिकल्पनेत वस्तूचा उपयोग, वापरणाऱ्याच्या आवडीनिवडी, व्यक्तिमत्त्व, वय व त्या वस्तूविषयीच्या रूढावलेल्या प्रथा, या सर्वाचा बारकाईने अभ्यास करतात आणि या अभ्यासाच्या आधारावर अनुकूल संदेश सांकेतिक स्वरूपात वस्तूच्या रूपात अंतर्भूत करतात. या प्रक्रियेत काही व्यक्तिनिष्ठ  निर्णयही घ्यावे लागतात. असे निर्णय घेणे कठीण असतेच आणि इतरांना पटवून देणे तर त्याहून कठीण.

दुकानातील वरील उदाहरणात आणखी एक मुद्दा प्रामुख्याने आढळला. तिघेही मित्र दुकानदारास खोदूनखोदून विचारत होते, ‘नवीन काही आले आहे का?’ वस्तू घेताना नावीन्याची ओढ सर्वानाच असते, किमान बघण्यापुरती तरी. ग्राहक खरेदी करताना नेहमीच वस्तूंबाबत अद्ययावत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात; पण स्वत: वापरताना नावीन्याचा किती स्वीकार करायचा हा निर्णय प्रासंगिक घटकांवरही अवलंबून असतो.

अभिकल्पकाची आव्हने : वस्तूला रूप देणे म्हणजे अभिकल्पक नक्की काय करतात?

अभिकल्पकास या सर्वाचा अभ्यास करण्यासाठी पुढील पायऱ्या गाठायच्या असतात. नव्या जबाबदाऱ्या व नवी आव्हाने पेलायची असतात. त्यांची पहिली जबाबदारी वस्तूंच्या रूपात विविधता आणणे. या सर्व संदेशांचे दृश्य माध्यमांतील संकेतांमध्ये रूपांतर करणे. ज्या लोकांसाठी वस्तू अभिकल्पित केली आहे त्यांना हे संकेत कळतील का, याची खात्री करणे. वस्तूत हेतूपूर्वक अंतर्भूत केलेल्या संकेतांत विविधता आणली, की वस्तूंच्या रूपात विविधता आणणे सोपे होते; पण फक्त संकेतांवर भर देऊन चालत नाही, त्याची पुढची जबाबदारी म्हणजे, ज्या लोकांसाठी वस्तू अभिकल्पित करणार त्यांच्या आवडीनिवडी अभ्यासून अभिकल्पक संकेत, प्रथा व नावीन्य याचे असे मिश्रण निवडण्याचा प्रयत्न करतो ज्याने की ग्राहकाला पहिल्या क्षणातच त्या वस्तूबद्दल आकर्षण वाटावे.

तिसरी जबाबदारी संकेतांना दृश्यरूप देताना त्या वस्तूच्या उपयुक्ततेवर व सौंदर्यावर परिणाम होऊ  नये यासाठी प्रयत्नशील राहणे. ही सगळ्यात कठीण जबाबदारी, कारण यासाठी वस्तुनिष्ठ  प्रमाणे नसतात. रूप संकल्पित करणे म्हणजेच वस्तूंच्या घटकांची रचना, त्यांची आकारबद्धता, रंगसंगती या घटकांचे विशेष अन्वेषण करणे व सौंदर्यशास्त्राच्या आधारावर त्या घटकांची मांडणी करणे. वस्तूस रूप देताना आपल्या अभ्यासाचा, ज्ञानाचा व कलाकौशल्याचा वापर करून आकर्षक रूप व संदेश यांचा समतोल साधणे यात या कामाचे कौशल्य दडलेले असते.

एका अभ्यासक अभिकल्पकाचे आता एका कलाकारात रूपांतर होते. तो आपल्या कार्यालयात विचारमग्न राहतो. मनातले विचार व कल्पना कागदावर कच्च्या रूपरेषात उतरवितो व त्या बघण्यात रमून जातो. कधी तो त्रिमितीय आराखडापण बनवितो (डावीकडे दिलेल्या चित्रात कामात मग्न असलेला अभिकल्पक दर्शविला आहे.). संकेतांबरोबर नावीन्य व सौंदर्याचा शोध घेणे हा एक संघर्षच असतो. गंमत अशी की, अभिकल्पकांना व कलाकारांना या संघर्षांत भाग घेणे आवडते व संघर्ष नसला तर चुकल्या- चुकल्यासारखे वाटते.

(लेखनसीमा)

लेखकद्वय आयआयटी मुंबई येथील औद्य्ोगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसीइंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे  प्राध्यापक आहेत.                                                              

uday.athavankar@gmail.com