पेरूसारख्या देशात परवडणाऱ्या व प्रसरणशील घरांच्या प्रयोगातून आपल्यालाही काही बोध घेता येईल. या देशामध्ये गृहरचनेच्या प्रयोगांतून नवीन व उपयुक्त व्यापार प्रतिमाने तयार केली गेली. मुंबईत इमारतीत राहणाऱ्यांना घराला लागून अधिक जागा कशी देणार? जर आपण भाडेकरू व मालकी हक्कांच्या अपार्टमेंटची कल्पना एकत्र केली तर..

मध्यमवर्गीयांच्या मुख्य गरजा, आपल्या समुदायात राहण्यास (चांगले शेजारी)  मिळावे  व मुलांना चांगली शाळा मिळावी या असतात. ढोबळमानाने, या गटाचे दोन भागांत वर्गीकरण करता येते. पहिला वर्ग, शहरात आधीच स्थायिक असलेल्यांचा; त्यांत गरजा वाढल्यामुळे मोठय़ा जागेची आवश्यकता असणारे हा एक उपगट. दुसरा वर्ग, नव्याने आलेले स्थलांतरितांचा. अभिकल्पक आपल्या दृष्टिकोनातून यांच्या घरांच्या समस्यांबद्दल वेगळे विचार मांडू शकेल का?

आधीच्या लेखात आपण पाहिले की घराची रचना लोकांच्या कल्पनांच्या आधारावर विकसित करणे महत्त्वाचे असते. या तत्त्वाच्या पलीकडे लोकांना नवीन काय देता येईल? आजच्या लेखात काही नवीन कल्पनांची मांडणी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यासाठी मार्गदर्शक तत्त्वे: १) प्रकल्पास फक्त घरांचे बांधकाम म्हणून न बघता, एका नव्या समुदायाची निर्मिती या दृष्टिकोनातून पाहावे. २) मध्यमवर्गीयांच्या वेगवेगळ्या गटांच्या गरजांमधील फरकांचा नव्या कल्पनांसाठी संधी म्हणून वापर करावा. ३) विशेषत: वेगवेगळ्या गटांच्या गरजांमधील फरकांचा फायदा घेऊन घरांसाठी नवीन सर्जनशील व्यापार प्रतिमान (बिझनेस मॉडेल्स) तयार करावीत ४) घराला फक्त वापरवस्तू म्हणून न पाहता, त्यास गुंतवणूक व भावनिक मुद्दा म्हणून पाहावे आणि व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबर या सर्वाचा मेळ घालावा. ५) सध्या प्रचलित असलेल्या ‘श्रीमंतांना विकलेल्या घरांचा नफा इतरांच्या घरांसाठी’ या तत्त्वाऐवजी इतर उत्पन्नांची साधने शोधावीत.

घरांच्या कल्पना व प्रयोग

कमी उत्पन्न असलेला मध्यमवर्गीय गट, जो शहरात स्थायिक आहे व ज्यांच्या जागेच्या गरजा वाढलेल्या आहेत. जसे कुटुंबाचे बस्तान बसते, मुले मोठी होतात तसे सर्वानाच मोठय़ा जागेची गरज भासते. यांना सध्या तरी लांबच्या उपनगरांत जाणे अथवा जवळपास खोली भाडय़ाने घेणे यापलीकडे दुसरे उपाय नाहीत.

पेरूसारख्या देशात परवडणाऱ्या व प्रसरणशील घरांच्या प्रयोगातून आपण काय शिकू शकतो. या देशामध्ये गृहरचनेच्या प्रयोगांतून नवीन व उपयुक्त व्यापार प्रतिमाने तयार केली गेली. मुंबईतल्या इमारतीत राहणाऱ्यांना घराला लागून अधिक जागा कशी देणार?

जर आपण भाडेकरू व मालकी हक्कांच्या अपार्टमेंटची कल्पना एकत्र केली तर? समजा, एका मोठय़ा इमारतीत १०० घरे आहेत. त्यातील ५० छोटेखानी घरे मालकीची व उरलेली ५० भाडेकरूंसाठी; जी घर-सेवेच्या (सव्‍‌र्हिस अपार्टमेंटच्या) तत्त्वांवर अभिकल्पित केलेली. नंतर ही ५० घरे घरसेवा संस्थेला (सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरला) १५ वर्षांसाठी महसूल विभाजनाच्या तत्त्वांवर द्यायची. त्या संस्थेने ही घरे हंगामी स्थायिकांसाठी सामुदायिक सेवेसकट भाडय़ाने द्यावीत व आपल्या नफ्यातील काही भाग मालकांच्या संस्थेला द्यावा. मालकसंघ हे उत्पन्न कर्जाची परतफेड व काही पसा भविष्यातील अधिक जागेसाठी आगाऊ भरणा करण्यासाठी वापरू शकतील. या अभिकल्पनेमध्ये १५ वर्षांनी थोडा बदल केल्यानंतर भाडेकरूंची घरे मालकाच्या घराबरोबर जोडली जातील व मालक मोठे घर वापरू शकतील. या योजनेत एक नावीन्यपूर्ण व्यापार प्रतिमान तयार होऊ शकते. रहिवाशांनासुद्धा आपल्या निकटवर्तीयांना सोडून लांबच्या उपनगरात जावे लागत नाही.

अशा इमारतीच्या योजना कागदावर उतरवणे सोपे नाही. काय बदल होऊ शकतील याचा आधीच अंदाज घेतला तर १५ वर्षांनंतरचे हे बदल कमीत कमी खर्चात करता येतील. अशीच एक कल्पना साकार करण्याचा प्रयत्न आम्ही केला. या योजनेत मालकास सुरुवातीस २७० व भाडेकरूला १३० चौरस फूट चटईक्षेत्र व १५ वर्षांनंतर सर्वच घर मालकाचे होईल. ही योजना चित्रात दर्शवली आहे. इमारती साधारणपणे ६०-७० वर्षे टिकतात. हीच कल्पना पुढे नेली तर आपण दर १५ वर्षांनी तिचे व्यापार प्रतिमान बदलले तर बऱ्याच नवीन कल्पना विकसित करता येतील.

आता राहिला कमी उत्पन्न असलेला दुसरा मध्यमवर्गीय गट. हा गट शहरात मिळणाऱ्या उत्पन्नांच्या संधी आजमावून पाहत असतो. जम बसला नाही तर तो दुसऱ्या शहराकडे आपला मोर्चा वळवतो. वाटतो त्यापेक्षा संख्येने बराच मोठा वर्ग आहे. यांना रेशनकार्ड, गॅस कनेक्शन यांच्या पाठी पडणे शक्यच नसते. कायमचा पत्ता व कागदपत्र मागतात, ते यांनी कुठून आणायचे? आíथक जम बसवण्याच्या आशेवर जगणारा तो राहणीमानात तडजोड करायला तयार असतो, यांना असते गरज ती भाडय़ाच्या घरांची.

या गटाचे लक्ष केंद्रित असते ते परवडणाऱ्या राहणीमानावर. घरावरील छप्पर हा त्यातला फक्त एक भाग असतो. बरेचदा दोघे काम करून पसे मिळवीत असतात. समजा, आपण त्यांच्यासाठी खास अभिकल्पित केलेली घरे, एक सेवा म्हणून दिली तर? या घरात घरसेवा संस्थेच्या (सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरच्या) देखरेखीखाली सार्वजनिक सुविधा असतील. संडास, स्नानगृह, गरम पाण्याच्या व स्वच्छतेसारख्या सर्व सुविधा या संस्थेने पुरवायच्या. दिवसा लागणाऱ्या सर्व गोष्टी हीच संस्था दरवाजात पोहोचवणार. मुलांसाठी पाळणा, स्त्रियांसाठी शिवणवर्ग इत्यादी सुविधा आल्याच. स्वयंपाकघर, गॅस, गरम पाणी या सुविधा वापरासाठी पसे देऊन (पे फॉर युज) घेतलेल्या सार्वजनिक सेवेचा भाग असू शकतील.

कल्पना तशी पटकन आकर्षक वाटत नाही, पण विचार करायला लावणारी आहे. हल्लीच्या संगणक उद्योगांमध्ये तरुण मुला-मुलींसाठी ही कल्पना नवीन नाही, हे लोक दर २-३ वर्षांनी नोकरी व शहर बदलत असतात. अशा उच्च मध्यमवर्गीयांसाठी घरसेवा संस्थेच्या देखरेखीखाली अशी घरे मिळतात. पण कमी उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय छोटय़ा कुटुंबांना या योजना आवडतील का?

अनुभवाने अशा सेवेचे फायदे कळतील व हळूहळू सुविधा आवडायला लागतील. जे काम शोधण्यात गर्क आहेत त्यांना पाणी, गॅस कनेक्शन व रोजच्या तरतुदी आपल्या दारात मिळतील. भाडेकरूने फक्त संस्थेची सदस्यता घ्यायची. घरातली जागा मोकळी झाल्याने स्ववापराचे चटईक्षेत्र वाढेल. घरसेवा संस्थेला दररोजच्या मोठय़ा खरेदीमुळे किमतीत सूट मिळू शकेल. ही पशाची वार्षकि उलाढाल इमारतीच्या किमतीच्या मानाने खूपच मोठी राहील आणि तीसुद्धा किमान ६०-७० वर्षांपर्यंत! या प्रकारात सुद्धा एक नावीन्यपूर्ण व्यापार प्रतिमान तयार होऊ शकेल.

लोक राहण्याच्या सुविधा भागीदारीच्या तत्त्वांवर घेतील का?

केलेल्या छोटय़ाशा सर्वेक्षणात असे लक्षात आले की जर लोकांच्या खर्चात सूट होणार असेल व त्यांना आपले शेजारी निवडण्याचा अधिकार असेल तर ते याविषयी विचार करण्यास उत्सुक आहेत. अपेक्षेपेक्षा प्रतिकार बराच कमी आढळला. अशा काही योजना इतर देशांत अमलात आल्या आहेत. मग इथे प्रयोग करायला काय हरकत आहे? अशा विचारातून बऱ्याच नव्या कल्पना व व्यापार प्रतिमाने येऊ शकतील. पण अशा कल्पना प्रथम प्रयोग म्हणून केल्या पाहिजेत. त्या यशस्वी झाल्या तरच त्यांचे फायदे मध्यमवर्गीयांना मिळतील.

अनायासे अशा संधी आता येऊ घातल्या आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत १० लाख परवडणाऱ्या घरांच्या योजना कार्यवाहीत होण्याची शक्यता आहे. इतर शहरांतसुद्धा अशा प्रकारच्या योजना येतीलच. सुरुवातीच्या एक टक्के घरांच्या अभिकल्पनेत प्रयोग केले तर कदाचित एक नावीन्यपूर्ण जीवनशैली त्यातून साकार होईल.

सर्व लेखक आयआयटी मुंबई येथील औद्योगिक अभिकल्प केंद्रात (आयडीसी- इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रकल्प गट : प्रसाद आणावकर, अमेय आठवणकर लेखकाचा ई-मेल                    uday.athavankar@gmail.com