पारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे. प्रत्येक नवीन पिढी आपली ओळख शोधण्यासाठी नवलाईच्या मागे धावत असते. जोपर्यंत आपण त्यांना आवडतील असे भारतीय पर्याय विकसित करत नाही तोपर्यंत त्यांना दोष देणे चुकीचे आहे.

आमच्या विद्यालयात दरवर्षी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयात (म्युझियम) नेतो. विद्यार्थी तेथील वस्तू पाहतात, त्यांची चित्रे काढतात व त्यांचा अभ्यास करतात. वस्तुसंग्रहालयात ढाली, तलवारी, चिलखते अशा विशेष वापराच्या गोष्टींबरोबरच; दागिने, भांडी-कुंडी, प्रसाधनांची साधने अशा रोजच्या वापरातील वस्तू पण प्रदर्शित केलेल्या असतात. अशा वस्तू निवडण्यामागे संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचा काय हेतू असतो? या वस्तू त्या काळांचे प्रतीक मानल्या जातात व त्या काळाची झलक लोकांना दाखवतात. अशा वस्तूंचे बारकाईने निरीक्षण केल्याने त्या काळाचे व संस्कृतीचे अंदाज बांधता येतात. त्या काळातील लोकांचे राहणीमान कसे होते, उत्पादनासाठी कोणती तंत्रे उपलब्ध होती इत्यादी गोष्टी उलगडतात व ती संस्कृती किती प्रगत होती याची कल्पना करता येते. यावरून काय सिद्ध होते? वस्तूंच्या अभिकल्पनेत संस्कृती हा एक महत्त्वाचा पैलू आहे. वस्तूंचे अभिकल्प व संस्कृती यांच्यात दृढ संबंध असतात व काही वस्तू अभिकल्पामुळे त्या संस्कृतीचे प्रतीक मानल्या जातात, उदा. सिंधू संस्कृतीच्या मुद्रा हे त्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून वापरल्या जातात.

आता कल्पना करा, दोनशे वर्षांनंतर भारतीय वस्तुसंग्रहालयात, आपले वंशज आजच्या कोणत्या वस्तू अभिमानाने प्रदर्शित करतील? आजच्या दैनंदिन जीवनातल्या कुठल्या वस्तू आपल्या काळाचे, आपल्या संस्कृतीचे प्रतीक बनतील? आजच्या वस्तूंवरून भविष्यातील पुरातत्त्वज्ञ कोणते निकष काढतील? या प्रश्नांच्या उत्तरांचा अंदाज घेणे सोपे आहे. आज वापरात असलेल्या अनेक वस्तू परकीय संस्कृतीत अभिकल्पित आहेत. त्यांच्यात त्या त्या संस्कृतीचा प्रभाव आपल्याला सापडतो, उदा. थंड जमिनीवर चालण्यासाठी बनलेले चामडय़ाचे घट्ट बंद बूट हे आपल्या (घाम येणाऱ्या) हवामानात सोयीचे नाहीत, तरीही आज आपण त्यांना औपचारिक वेशभूषेचा भाग मानतो.

परदेशातल्या कल्पना वाईट असतात असे आम्ही मुळीच म्हणत नाही. त्या चांगल्या असतात, पण त्या वेगळ्या लोकांसाठी, वेगळ्या संदर्भात अभिकल्पित केल्या असतात. त्यांचा वापर करताना आपण नकळत तडजोड करतो व अनेक गैरसोयी हळूहळू अंगवळणी पडतात. हे करत असताना काही तरी चुकत आहे असे जाणवतही नाही. उलट आपण अशा गैरसोयीच्या वस्तूंना आधुनिकतेची प्रतीके मानतो. काळजीची गोष्ट ही आहे की, जागतिकीकरणाच्या युगात आपल्या संस्कृतीचा भारतातल्या उत्पादनांवर प्रभाव कमी होत चालला आहे. मग आपल्या वापरातल्या वस्तू आपल्या संस्कृतीची प्रतीके कशा बनू शकतील?

एक सोपे उदाहरण पाहू. दिवाळीत घरात कंदील लावणे ही महाराष्ट्रातील परंपरा. आधीच्या काळी घरात काडय़ांनी बनवलेला चौकोनी सांगाडा असायचा. दर दिवाळीला त्यावर पारदर्शक कागद, चांदीच्या पट्टय़ा व शेपटय़ा लावून तो सजवायचा, अशी प्रथा असायची. लहान व मोठे मिळून आकाशकंदील बनवायचे. हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोक आकाशकंदील बाजारातून विकत घेऊ  लागले आहेत. पण आज बाजारात काय मिळते? चीनमध्ये (चिनी नववर्षांसाठी) बनलेले दिवे व एकाच साच्यातल्या चांदणीच्या आकाराचे कंदील. पारंपरिक कंदिलाचे उत्पादन कठीण व थोडे महाग आहे हे खरे, पण त्यासाठी आपण आपल्या प्रथा का सोडाव्या? नीट निरीक्षण केले तर अशी अनेक उदाहरणे सापडतात.

आज सगळ्यांच्या घरी शीतकपाट (फ्रीज) असते. ही कपाटे कोरियाई, जपानी व भारतीय बनावटीची असतात. खरे तर तंत्रज्ञानाच्या नावाखाली विदेशी वस्तूच आणल्या जातात. कल्पना करा, हे तंत्रज्ञान भारतात विकसित झाले असते तर? शीतकपाटाची रचना कशी असती? आज बाजारात मिळणारे शीतकपाट आपल्या खाण्याच्या पदार्थाशी, पाकक्रियांशी आणि भांडय़ांशी सुसंगत आहे का? कुठल्याही भारतीय घरातील शीतकपाट उघडून पाहावे, बहुतांश घरात त्यातली सामग्री अव्यवस्थित व अस्ताव्यस्त दिसते; यात वापरकर्त्यांचा दोष नसून अभिकल्पाचा दोष आहे. दुधाचे उदाहरण घेऊ. परदेशात दूध हे चौकोनी खोक्यात (कारटनमध्ये) मिळते व आधी दुधाच्या बाटल्या मिळायच्या, यांच्यासाठी नेमलेली जागा कपाटाच्या दारात होती. आपल्याकडे दूध पिशवीत येते व हे दूध आपण गोल आकाराच्या पातेल्यात ठेवतो. शीतकपाटात आपल्याला हे भांडं चौकोनी कपाटाच्या एकदम मध्यभागी ठेवावे लागते. ही जागा गैरसोयीची असते व दूध सांडेल किंवा त्यात काही तरी पडेल याची भीती नेहमीच असते. दारात जिथे दुधाची जागा नेमली आहे, तिथे आपण लोणच्याच्या बाटल्या वगैरे ठेवतो. त्यांचा आकार छोटा असल्यामुळे दार उघडल्यावर त्या पडतात किंवा हलतात. त्या हलू नये म्हणून आपण त्यांच्याभोवती चटणीची व इतर पदार्थाची पाकिटं खोचतो. ही तडजोड नाही तर काय? अशा तडजोडीमुळेच कपाट अस्ताव्यस्त दिसते. जर आपण आपल्या पदार्थाशी, भांडय़ांशी, पाकक्रियांशी सुसंगत, संदर्भयोग्य, म्हणजेच संस्कृतिसापेक्ष शीतकपाट बनविले असते तर या सगळ्यांचा प्रभाव त्याच्या रचनेवर पडला असता व त्याचे स्वरूप आज बाजारात उपलब्ध असलेल्या शीतकपाटांपेक्षा नक्कीच खूप वेगळी असते. पारंपरिक स्वयंपाकघरात सुसंगतीचे एक उदाहरण पोळीची भांडी आहेत. पिठाचा डबा, त्यातली वाटी, परात, पोळपाट, तवा, पोळीचा डबा आणि ताट; या भांडय़ाचे आकार जरी वेगळे असले तरी त्यांच्यात एकोपा आढळतो, ते एका समूहातले, एका कार्यासाठी बनलेले वाटतात. हा एकोपा योगायोगाने आलेला नसून, सहेतुक अभिकल्पित आहे हे जाणले पाहिजे. आपल्या संस्कृतीचा प्रभाव पारंपरिक वस्तूंवर दिसतो, आधुनिक यंत्रांवर आणि साधनांवर फारसा दिसत नाही.

केवळ संस्कृतीचाच प्रभाव वस्तूंवर पडतो असे नाही, वस्तूही संस्कृतीत हळूहळू बदल घडवत असतात, तिचा विकास करत असतात. संस्कृतीचा विकास तिच्या स्वीकरणक्षमतेवरही अवलंबून असतो. नवीन कल्पना या दोन संस्कृतींच्या मीलनातूनही घडतात. इतिहास साक्ष आहे, जगातील सगळ्या संस्कृतींमध्ये देवाण-घेवाण झाल्यामुळे नवीन रचना अस्तित्वात आल्या. आपण नेहमीच इतर संस्कृतींकडून शिकत असतो, त्यांच्या कल्पनांचा आपल्या संस्कृतीत समावेश करत असतो. हे करत असताना त्या कल्पनांचा अभ्यास करून त्यात आवश्यक ते बदल घडवून आगळे अभिकल्प उभारणे गरजेचे असते. आपण अनेक वेळा इतर संस्कृतींतून कल्पना उचलतो, पण ती कल्पना आपल्या संस्कृतीला अनुकूल व्हावी यासाठी हवे ते बदल करत नाही (उदा. शीतकपाट).

इंग्रजांनी त्यांच्या शैलीच्या इमारती आपल्या देशात बांधल्या व आजही त्या इंग्रज साम्राज्याचे प्रतीक म्हणून ओळखता येतात. काही इंग्रजी वास्तुशिल्पकारांनी भारतीय वास्तुशिल्पकलेचा अभ्यास करून आणि भारतीय व इंग्रजी शैलींचे मीलन करून एक नवीन शैली उभी केली, ज्याला इंडो-सारसेनिक असे म्हणतात. अकबराची फतेहपूर-सिक्रीतली शैलीसुद्धा अशाच मिश्रणातून तयार झाली आहे. दिग्गज संगीतकारांनी पण अशा प्रकारचे स्वरमिश्रणाचे किती तरी यशस्वी प्रयोग केले आहेत. चित्रात दाखवलेली खुर्चीसुद्धा अशाच विचारांनी अभिकल्पित केली आहे. सवय नसली तरी त्यावर मांडी घालून बसता येते. सुसंगत मिश्रण करणे ही एक कला आहे व त्यातून संस्कृतीचा विकास होतो. ही कला शिकण्यासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे, कारण अशाच प्रयत्नातून एक नवी भारतीय अभिव्यक्ती निर्माण होऊ  शकेल. मग अशा वस्तू आपल्या काळाची झलक लोकांना दाखवतील व संस्कृतीचे प्रतीक मानल्या जातील.

पारंपरिक वस्तू त्याच स्वरूपात याव्यात व वापरल्या जाव्यात असा आग्रह धरणे कठीण आहे. प्रत्येक नवीन पिढी आपली ओळख शोधण्यासाठी नवलाईच्या मागे धावत असते. त्यांचा कल जागतिक अभिरुचीचा अवलंब करण्याकडे असतो. यात काही चूक नाही. जोपर्यंत आपण त्यांना आवडतील असे भारतीय पर्याय विकसित करत नाही तोपर्यंत त्यांना दोष देणे चुकीचे आहे. अभिकल्पकाने त्यांना आवडेल अशी समकालीन भारतीय अभिरुची विकसित करण्याची संधी दिली नाही तर तो दोष त्या पिढीचा नाही. भारतीय अभिकल्पकास हे एक महत्त्वाचे आवाहन आहे व संधीसुद्धा.

 

– उदय आठवणकर, गिरीश दळवी
uday.athavankar@gmail.com
लेखकद्वय आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्र’ (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) येथे  प्राध्यापक आहेत.