मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय गाडय़ांमधून दररोज सुमारे ७५ लाख लोक प्रवास करतात. मुंबई परिसरातील तसेच नवख्या प्रवाशांसाठीही रेल्वे नकाशाचा प्रकल्प खूपच उपयुक्त ठरला .
विकसनशील देशांमध्ये शहरात रेल्वे प्रवाशांसाठी नकाशा बनविण्याचा विचार केल्याचे आपणास दिसून येत नाही. नकाशाची गरज असते, पण याबाबत मुंबईकरांचे वेगळे मत आहे. ते म्हणतात की मुंबईमध्ये नकाशे वापरण्याऐवजी आजूबाजूच्या लोकांना विचारून माहिती मिळविणे जास्त सोपे असते. एका प्रकारे हे सत्य आहे, कारण आपण त्यांना नकाशा दिलेलाच नाही. इतकी वष्रे नकाशे तयार केले नाहीत असे नाही. राष्ट्रीय डिझाइन संस्थान हे भारतात १९६१ साली स्थापन झालेले पहिले अभिकल्प विद्यालय. त्यानंतर मुंबईमध्ये औद्योगिक अभिकल्प केंद्रही १९६९ साली स्थापित झाले. हे विद्यालय आणि अशा इतर संस्थांनी लोकांच्या उपयोगासाठी नकाशे, सांकेतिक खुणा या संबंधात बरीच कामे केली. दुर्दैवाने त्यातील फार थोडी अमलात आणली गेली आणि मुंबईत तर जवळजवळ नाहीच.
मुख्यत: दोन कारणांमुळे हे घडते. पहिले असे की, मुंबईसारख्या गर्दीच्या शहरांत लोकांना वाटते की हे अगदी सोपे आहे. जवळच्या प्रवाशाला विचारून आवश्यक ती माहिती आपण मिळवू शकतो हे ते गृहीत धरतात. दुसरे असे की आता त्यांना याची सवय पडली आहे. सार्वजनिक माहितीप्रणालीच्या आवश्यकतेबद्दल जाणीव नाही व त्याची कोणालाही खंत वाटत नाही. परंतु हीच माणसे जेव्हा विकसित देशांना भेट देतात तेव्हा तिथल्या व्यवस्था पाहून आपल्याकडेसुद्धा अशी व्यवस्था हवी असे त्यांना वाटू लागते.
नवख्या प्रवाशांच्या मनातील प्रतिमा स्पष्ट करण्यास नकाशे अत्यंत चांगले असतात. एकदा का मनातील प्रतिमा स्पष्ट झाली की, नवीन माहितीची गरज निर्माण होईपर्यंत नकाशाचा वापर कमी होतो. याच संदर्भात आम्ही एका मुख्याध्यापकाची भेट घेतली व त्यांना रेल्वेच्या नकाशाची प्रत दिली. तर ते म्हणाले की बरीच वर्षे प्रवास करीत असल्याने त्यांना नकाशाची गरज नाही. त्यानंतर पुनभ्रेटीत त्यांनी नकाशाचा वापर केल्याचे सांगितले. कुतूहलाने विचारल्यास ते म्हणाले की त्यांना एका लग्नास जायचे होते आणि ते स्थळ हार्बर लाइनवर होते. त्यांचा नेहमीचा प्रवास हार्बर लाइनवर नसल्यामुळे त्यांना नकाशाचा उपयोग झाला. नकाशा हे क्वचितच वापराचे उत्पादन आहे, म्हणूनच या संदर्भामध्ये त्याची समर्पकता आणि गरज निश्चित करणे फार कठीण होते.
दर दिवशी मुंबईमध्ये २३४२ रेल्वे गाडय़ा धावतात आणि त्यामधून ७५ लाख लोक प्रवास करतात. या रेल्वेसाठी नकाशाचा आराखडा तयार करताना महत्त्वाच्या बाबी आम्ही कशा सोडविल्या आणि अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या व्यूहरचना केल्या याची माहिती येथे देत आहोत.
मुंबई रेल्वे नकाशाची कथा
हा प्रकल्प विद्यार्थी प्रकल्प म्हणून डिसेंबर २०१३ मध्ये सुरू झाला. मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वे नकाशा लावणे हे त्यांचे लक्ष्य होते. त्या प्रकल्पातून या नकाशाची पहिली आवृत्ती तयार झाली. आम्हांस मिळालेल्या प्रतिक्रिया ध्यानात घेऊन नंतर नकाशामध्ये तसतसे बदल करीत गेलो.
दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की, नकाशामधील रेल्वे मार्गाना रंग नेमून ते निश्चित करणे. नकाशाच्या मूळ आवृत्तीमध्ये जगातील बऱ्याच मेट्रो नकाशांप्रमाणे वेगवेगळ्या रेल्वे लाइन ओळखण्यासाठी प्रथम आम्ही लाल, हिरव्या, निळ्या छटांचा वापर केला. परंतु लाल व हिरवा रंग आंधळेपणा हा जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आहे. आपल्या लोकसंख्येच्या सुमारे ८% लोकांमध्ये आढळणारा आहे. लाइन ओळखण्यासाठी लाल आणि हिरव्या रंगाचा वापर करून आपण रंगआंधळे असलेल्या लोकांस वगळत आहोत असा विचार मनात आला. अनेक प्रतिकृती तयार करून व त्या अभ्यासून आम्ही या विचारापर्यंत पोहोचलो की, नािरगी, निळसर हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग असलेल्या रंगपट्टीचा वापर करावा त्यामुळे रंगआंधळे असलेल्या व्यक्तीची उपयोगिता वाढेल आणि तीसुद्धा सामान्य दृष्टी असलेल्या व्यक्तींची उपयोगिता कमी न करता.
रंग नेमून तो निश्चित करणे ही बाब मुंबईच्या संदर्भात एवढी महत्त्वाची का आहे? पहिली गोष्ट ही की, मुंबईच्या रेल्वे-गाडय़ा पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे, मुंबई मेट्रो व मोनो रेल या स्वतंत्रपणे काम करणाऱ्या अशा चार संस्था चालवीत आहेत. सतत विस्तारित होणाऱ्या या मुख्य शहराचे रेल्वे जाळे, त्यात नवनवीन रेल्वे मार्गाची भविष्यात वाढ होणे अपरिहार्य आहे. रेल्वे लाइनींना पद्धतशीरपणे सांकेतिक रंग दिल्यामुळे, या रेल्वे जाळ्यात वाढ करण्याची व्यवस्था करणे सोपे होईल. परिणामी पूर्ण जाळ्याचा सुसंगत आणि स्वाभाविक नमुना मनात प्रस्थापित करण्यास मदत होईल. एकदा ही रंगफळी योजली, की ती सगळ्या स्वतंत्र व्यवस्थापनांनी स्वीकारून सातत्याने वापरणे महत्त्वाचे आहे. तरच नकाशाची सर्वसमावेशकता राखणे शक्य होईल. अशा प्रकारे सुधारणा करत करत, शेवटी मुंबई रेल्वे नकाशाची पाचवी आवृत्ती दादर (पश्चिम) आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस (पश्चिम) स्थानकांवर ८ मे २०१४ ला लावली.
बऱ्याच प्रवाशांनी असे मत व्यक्त केले की, मोबाइलवर घेण्यास सुलभ असलेला असा नकाशा असणे अतिशय गरजेचे आहे. मुंबई रेल्वे नकाशा-टीमने १४ फेब्रुवारी २०१५ ला अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयओएससाठी उपलब्ध असलेले, प्रवासाचे प्लािनग करणारे स्मार्ट फोन अ‍ॅप्लिकेशन मुंबई रेल्वे जाळ्यासाठी सादर केले.
हा नकाशा लोकापर्यंत पोहोचणे हे एक सर्वात मोठे आव्हान आहे. तरुण विद्यार्थ्यांसाठी आम्ही शाळा, महाविद्यालये आणि सायन्स सेंटर या ठिकाणी नकाशे व तक्ते लावले, ज्यामुळे नकाशा हे एक संदर्भाचे ठिकाण होईल व पुन्हा पुन्हा समोर येण्यामुळे विद्यार्थी ते कसे पहावे हे शिकतील. पुनरावृत्तीमध्ये आरेखन विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक सत्रात चर्चा होण्यासाठी आम्ही फेसबुकचा परिणामकारक माध्यम म्हणून उपयोग केला आणि मुंबई रेल्वे नकाशा टिपण वही व तक्ते या सारख्या समांतर विकसित उत्पादनांचा जनतेच्या कल्पनेत या नकाशाचा शिरकाव करण्यासाठी वापर केला. लोकांना या नकाशाच्या जवळ जाण्यास अँड्रॉइड आण आयओएस साठी मोफत उपलब्ध असलेले मोबाइल अ‍ॅप हे सर्वात परिणामकारक माध्यम व साधन आहे. पण त्यामुळे स्थानकांवर छापील नकाशाची आवश्यकता कमी होऊ शकत नाही.
मुंबईच्या लोकांपर्यंत हा नकाशा पोहोचविण्यासाठी आम्ही दुहेरी मार्ग सुचविले :
१. नकाशा हा पायाभूत मांडणीतील एक भाग आणि त्याचे प्रस्थापन हे धोरण आहे असे माना. भारतातील मेट्रो स्थानकांवर याचे उदाहरण आपणास दिसून येते, जेथे नकाशा आणि चिन्हे उभारणीच्या वेळीच निश्चित जागी लावल्या जातात. नकाशा लावणे अत्यावश्यक बनविणे हे अधिकाऱ्यांनी धोरण स्तरावरील घेतलेल्या निर्णयाद्वारे व लिखित स्वरूपातील नियमावलीद्वारेच शक्य आहे.
२. नकाशाचे पुन:पुन्हा समोर येणे वाढवून, तुमच्या पद्धतीमध्ये त्याचा शिरकाव होऊ द्या. लोकांना त्याच्या गरजेची जाणीव होऊ द्या. शक्य असेल तितक्या दळणवळण मार्गाद्वारे अशा काही गोष्टींची निर्मिती आणि प्रसार करा, की ज्या नकाशाचे नसणे, गरज व रचना यामागे असणारे विचार व्यक्त करतील. या व्यूहरचनेचा भाग म्हणून, मूलभूत सार्वजनिक माहिती पद्धतीची गरज आणि त्याचा भविष्याशी असलेला संबंध स्पष्ट करण्यासाठी मुंबई रेल्वे नकाशा विचार पुस्तके, रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी बनवली गेली. आरेखन विद्यार्थी आणि धंदेवाईकांमध्येसुद्धा अंमलबजावणी स्तरावर, गरजेवर आधारित रचनेत, प्राधान्याने करावयाच्या गोष्टी पुढे सारण्याचे महत्त्व याविषयीची जाणीव ही पुस्तके करून देतात.
सध्या मुंबई रेल्वे नकाशाची सहावी आवृत्ती दादर (पश्चिम) आणि वांद्रे (पूर्व आणि पश्चिम) या स्थानकांवर मार्गदर्शक प्रकल्प म्हणून लावलेली आहे. गोंधळ कमी करण्याकरिता आणि उपयुक्तता वाढविण्यासाठी नकाशाच्या सहाव्या आवृत्तीची रचना केली आहे. आम्ही योग्य मार्गावर आहोत अशी आशा करतो.

मंदार राणे
लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी – इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर) सहयोगी प्राध्यापक
आहेत. mrane@iitb.ac.in

two ac local trains canceled due to technical glitches on central railway
मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलचा खोळंबा; दोन वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांच्या पासचे पैसे वाया
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
रेल्वे सुसाट…! गेल्या वर्षभरात साडेपाच कोटी प्रवासी अन् फुकट्या प्रवाशांना २७ कोटींचा दंड
Central Railway, 8 percent Increase, 7 thousand crores, Passengers, Becomes Top, Passenger Transporting, Indian Railway, marathi news,
प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची ७,३११ कोटींची कमाई