स्पर्धेच्या युगात भारतीय उद्योगांना टिकाव धरायचा असेल तर अभियांत्रिकी व अभिकाल्पिकी यांच्या सुयोग्य मेळाने जागतिक दर्जाची उत्पादनं बनविण्याचे शिवधनुष्य त्यांनी पेलणे गरजेचे आहे..

मागील प्रास्ताविक लेखामध्ये अभिकल्प (डिझाइन) म्हणजे काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. अभिकल्प या क्षेत्राची नेमकी व्याख्या किंवा अर्थ सांगणं जरी कठीण असलं, तरी विविध उदाहरणांवरून अभिकल्प म्हणजे काय, याची थोडीफार कल्पना वाचकांस आली असेलच. आपल्या लक्षात आलं असेल की अभिकल्प हे विविध उपकरणं, यंत्रं, घरं, वाहनं, पुस्तकं इत्यादी सर्व वापरात असलेल्या वस्तूंचं केलं जातं. म्हणजेच अभिकल्प हे सर्वाच्या जीवनाचा एक अविभाज्य व सर्वव्यापी घटक आहे. आजच्या लेखात कारखान्यांतून तयार होणाऱ्या मूर्त (टँजिबल) वस्तूंच्या अभिकल्पाबाबत जरा बारकाव्याने पाहू या.

Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
land reform
UPSC-MPSC : भारतामध्ये जमीन सुधारणांची गरज का पडली? त्यासाठी सरकारकडून कोणते प्रयत्न करण्यात आले?

अभिकल्पाचं महत्त्व पटवताना माझ्या विद्यार्थ्यांना मी एक उदाहरण नेहमी देत असतो : एकदा मी मेकॅनिककडे माझी स्कूटर दुरुस्त करायला घेऊन गेलो होतो. त्याने स्कूटरचं इंजिन उघडून काय झालं ते पाहायला सुरुवात केली तेव्हा ‘नट’च्या खाली असलेला एक छोटासा वॉशर त्याच्या हातातून निसटून खाली पडला. तो उचलण्याकरिता त्याने त्याच्या चुंबकीय स्क्रू-ड्रायव्हरचा उपयोग केला. त्यामुळे इवलासा वॉशर उचलणं सहज शक्य झालं. हे पाहून मला एक नवीन कल्पना सुचली. घरी आल्यावर मी एका दोरीच्या टोकाला एक चुंबक बांधलं व त्याने खाली पडलेल्या लोखंडाच्या वस्तू सहज उचलू शकलो. दोरी चुंबकाभोवती गुंडाळता येत असल्यामुळे, त्याची खिशातून ने-आण करणं सहज शक्य झालं. कल्पना चांगली वाटली.

काही दिवसांनी ही चुंबकाला गुंडाळलेली दोरी व त्याचं प्रात्यक्षिक मी विद्यार्थ्यांना वर्गात दाखवलं आणि विचारलं, ‘‘ही वस्तू तुम्ही किती रुपयात विकत घ्याल?’’ पाच रुपयांपेक्षा जास्त किंमत द्यायला कोणीही तयार होईना. सगळ्यांनाच वाटलं की, हे तर काय, कोणीही सहजरीत्या घरी बनवू शकेल.

त्यानंतर मी खिशातील पेनसारखी दिसणारी स्टेनलेस स्टीलने बनवलेली एक वस्तू काढली आणि ती रेडिओच्या अँटेनासारखी वाढवली. त्याच्या टोकाला जोडलेल्या चुंबकाने खाली पडलेली चावी उचलून दाखवली. सगळे आश्चर्याने पाहात होते. मी म्हटलं, ही वस्तू मी अमेरिकेत वृद्धांना उपयुक्त अशा वस्तूंच्या दुकानातून पाच डॉलरला विकत घेतली आहे. ती वस्तू पाहून सर्वाचं कुतूहल वाढलं. ‘‘वा! फार छान! उपयोगाची वस्तू आहे.’’ असे उद्गार निघाले. बऱ्याच जणांनी मान्य केलं की वस्तू उपयुक्त आहे व किंमतही योग्य आहे.

मग याचीच पुढील आवृत्ती मी दाखवली. या वस्तूत काठीच्या टोकाला एलईडी लाइट लावून, पडलेली चावी अंधारात शोधण्याची सोय केली होती; किंमत फक्त आठ डॉलर. याच्याही पुढची पायरी म्हणजे याच अँटेनाची जाडी वाढवून काठी थोडी मजबूत केली. आता ती स्वसंरक्षणाची काठी म्हणूनही वापरता येऊ लागली आणि त्या वस्तूचं मूल्य वाढून १५ डॉलर झालं.

या वस्तूंमध्ये एक मूलभूत फरक आहे. दोरीला बांधलेलं चुंबक हे एक घरगुती ढोबळ अवजार आहे. याउलट नावीन्यपूर्ण रूप असलेलं, पेनासारखं दिसणारं, हातात चपखल बसणारं, अँटेनासारखं वाढणारं, एलईडी असलेलं सफाईदार उत्पादन, ही एक अभिकाल्पित वस्तू आहे. डिझाइनची हीच तर कमाल आहे. या उदाहरणावरून आपल्याला असं लक्षात येतं की अभियांत्रिकीबरोबर अभिकल्पाची सुयोग्य सांगड लागल्याने वस्तूची गुणवत्ता, उपयोगिता व मूल्य वाढवता येतं.

जशा नाण्याला दोन बाजू असतात तशाच प्रत्येक वस्तूला अभियांत्रिकी व अभिकाल्पिकी अशा दोन बाजू असतात. अभियांत्रिकी बाजू वस्तूची मूळ कार्यक्षमता अधिकोत्तम करण्याकरिता प्रयत्नशील असते, तर अभिकाल्पिकी बाजू उपयोग करणाऱ्याच्या दृष्टीने वस्तू  सोयीस्कर, आकर्षक व उपयोगी करण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ बॉलपेनच्या बॉलचा व्यास, बॉल व बॅरलमधील अंतर, शाईची घनता आणि या सर्वामुळे ठरणारा शाईचा प्रवाह हे सर्व गणिती सूत्रांच्या साहाय्यानं ठरविलं जातं. बॉलपेनचे भाग कसे बनवायचे व एकत्र कसे जोडायचे याचा योग्य विचार करून बॉलपेनचं कार्य आणि कार्यक्षमता सुनिश्चित होते. ही झाली अभियांत्रिकी बाजू.

याच बॉलपेनचं रूप (फॉर्म), रंग, त्याचं वजन, वेगवेगळ्या हातांमध्ये त्याचं होणारं संतुलन, त्याची पकड या सर्व उपयोक्त्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बाजूंचा विचार अभिकल्प करत असतं. बॉलपेनची खिशात अडकवण्याची क्लिप सोयीची व आकर्षक करण्याची जबाबदारी अभिकल्पाचीच असते. बॉलपेनचं टोपण वेगळं करायचं की यंत्रणेने बॉलपॉइंट आतबाहेर करायचं हे ठरवणंदेखील अभिकल्पाचाच भाग आहे.

वरील उदाहरणात बॉलपेननिर्मितीत, अभियांत्रिकी व अभिकाल्पिकी या दोन्ही बाजूंचं साहाय्य आणि सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय चांगल्या, आकर्षक बॉलपेनची निर्मिती करता येत नाही. बॉलपेनप्रमाणेच प्रत्येक वस्तूच्या उत्पादनांत अभियांत्रिकी व अभिकाल्पिकी पलूंची सांगड घातल्याशिवाय सुंदर, कार्यक्षम व उपयोक्त्याच्या सोयीच्या वस्तू निर्माण करणं कठीण आहे. या दोन्ही अंगांचा समसमा संगम झाल्यामुळेच आय-फोन, फेरारी, टपरवेअर, स्विस घडय़ाळे इत्यादी अविस्मरणीय उत्पादनांची निर्मिती होऊ शकली.

आजच्या युगातील अभिकल्पाचे महत्त्व

औद्योगिक क्रांतीपूर्वी सर्वच वस्तू हस्तव्यवसायातून तयार होत असत आणि बहुतेककरून स्थानिक बाजारपेठेत विकल्या जात असत. त्यामुळे वस्तूंच्या किमती जास्त असत आणि गुणवत्तेमध्ये विषमता असे. सतराव्या शतकात युरोपीय देशांमधील औद्योगिक क्रांतीमुळे तेथील उत्पादनाचं स्वरूप बदललं. यंत्रांच्या साहाय्याने मोठय़ा प्रमाणामध्ये उत्पादन करणारे कारखाने स्थापले गेले. यंत्रनिर्मितीमुळे उत्पादनांच्या गुणवत्तेतील विषमता कमी झाली आणि त्यांच्या किमतीही कमी झाल्या. वाहतूक व्यवस्था सुधारल्यामुळे उत्पादने जगभर विकली जाऊ लागली. त्यामुळे लोकप्रियता वाढावी म्हणून उत्पादनांचा सर्वागीण विचार होऊ लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून उत्पादनांची गुणवत्ता जास्तीत जास्त वाढवण्याची स्पर्धाच निर्माण झाली. सर्वार्थाने चांगलं उत्पादन निर्माण करण्यासाठी वस्तूच्या अभिकल्पाकडे अधिकाधिक लक्ष दिलं गेलं. म्हणजेच गेल्या शंभर वर्षांपासून अभिकल्प विकसित देशांच्या उत्पादन प्रक्रियेत रुजलेलं आहे.

आजच्या युगात जागतिकीकरणामुळे देशादेशांतील अंतर नाहीसं होऊन जगातील सर्व देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. भारतात जागतिकीकरणाची सुरुवात १९९१ पासून झाली. त्यामुळे खुलं व्यापारी धोरण, माहिती तंत्रज्ञानाचा पूर, देशांतरण, सुखपर्यटन व आचारविचांरांची सततची देवाणघेवाण सुरू झाली. याचा लोकांच्या जीवनशैलीवर खूप परिणाम झाला. आजचा उपयोक्ता सुविद्य आणि जाणकार झाला आहे. तो खरेदीचे निर्णय सतर्कपणे व जाणीवपूर्वक घेऊ लागला आहे.

गेल्या २५ वर्षांतल्या भारताच्या आíथक विकासामुळे मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वाढ झाली. हे उपयोक्ते आपल्या विशेष आवडीनिवडी सहज जोपासू लागले. जागतिकीकरणानंतरच्या स्पध्रेमुळे विविध देशांची उत्पादने बाजारात उपलब्ध झाल्याने, त्यांच्या दर्जाची, गुणविशेषणांची व किमतीची तुलना ग्राहक उघडपणे करू लागले. याचा परिणाम उत्पादन निवडप्रक्रियेवर झाला. यामुळे या बदलत्या काळात शंभर टक्के स्वदेशीचा आग्रह धरणं अवघड झालं.

भारतासारख्या बहुसंख्य देशांतील मोठय़ा बाजारपेठा खुल्या झाल्याने येथील लोकांना विविध उत्पादनांचे पर्याय मिळाले. परदेशी अभिकल्पित वस्तूंच्या उपलब्धतेमुळे भारतीय उद्योगांसमोर मोठंच आव्हान उभं राहिलं आहे. विदेशी उत्पादनांची निर्मिती, कुशल तंत्रज्ञान, अद्ययावत यंत्रसामुग्री, योग्य कच्चा माल, वस्तूंच्या उपयोगाबद्दलचं सखोल संशोधन आणि उत्तम अभिकल्प वापरून केली असल्यामुळे, ही उत्पादनं गुणवत्ता व उपयोगितेच्या दृष्टीने सरस ठरतात. महत्त्वाचं म्हणजे बरेचदा त्यांच्या किमतीही फार जास्त नसतात. अर्थात कुठलाही उपयोक्ता अशा उत्पादनाकडे आकर्षति झाल्यास नवल ते काय? भारतीय उद्योगांना टिकाव धरायचा असेल तर अभियांत्रिकी व अभिकाल्पिकी यांच्या सुयोग्य मेळाने जागतिक दर्जाची उत्पादनं बनविण्याचं शिवधनुष्य पेलणं गरजेचं आहे. हे शिवधनुष्य भारतीय उद्योग पेलू शकले, तर याच जागतिकीकरणामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठादेखील उपलब्ध होऊ शकतील.

या परिस्थितीत भारतीय उद्योगांनी ‘आम्ही बनवू ते विकू’ असा पारंपरिक पवित्रा सोडून, ‘जे विकू शकू (ज्याला मागणी आहे) तेच बनवू,’ असं धोरण स्वीकारलं तरच त्यांचा आजच्या स्पर्धात्मक जगात निभाव लागेल.

तीनही लेखक आयआयटी- मुंबई येथील औद्योगिक अभिकल्प केंद्रात (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) प्राध्यापक या नात्याने कार्यरत आहेत.

ई-मेल  : anirudha@iitb.ac.in