जी व्यक्ती आत्महत्या करते ती फक्त एकदाच मरते. पण तिच्यामागे जगणारे, तिचे अनेक आप्तस्वकीय आयुष्यभर मरत रहातात. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीने आत्महत्या का केली? आपलं काही चुकलं का? या अनुत्तरित प्रश्नाभोवती ते घुटमळत राहतात. आत्महत्या करू पाहणाऱ्या व्यक्तीने त्यांचा एकदा जरी विचार केला तरी अनेक आत्महत्या टळतील.

दैनंदिन जीवनात आत्महत्या हा विषय नियमित संवादाचा भाग नाही. वैयक्तिक व सामाजिकदृष्टय़ा या विषयावर भाष्य करण्याचे अनेक लोक टाळतात. अशा प्रकाराने आलेला मृत्यू अनेकदा समाजात टीकेचा विषय ठरतो. अनेक तर्कविर्तक केले जातात. हे तर्कवितर्क कधी कधी आत्महत्येच्या प्रकारापेक्षा हीन प्रवृत्तीचे असतात. बऱ्याच वेळा आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला या मतलबी तर्कवितर्काचा सामना करणं त्यांच्या मूळ समस्येपेक्षा कठीण जातं. दोन व्यक्तींमधल्या नात्यांचा विसंवाद हे आत्महत्येचं एक सर्वसाधारण कारण आहे. अशा नात्यांत प्रगल्भता तर नाहीच, पण बऱ्याच वेळा या व्यक्तींमध्ये स्वयंकेंद्रित प्रवृत्ती दिसून येते. त्यांच्यात परिस्थितीशी वा इतर व्यक्तींशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असते. माणसांच्या नात्यांमध्ये नाण्याची एकच बाजू जर सत्य मानली तर आपल्याला पूर्ण परिस्थितीची जाणीव कधीच होणार नाही. आत्महत्या करणाऱ्या अनेक व्यक्तींनी थोडीशी वाट पाहिली असती, थोडासा संयम ठेवला असता तर आत्महत्येची गरज नव्हतीच किंवा आत्महत्या ही तशी समर्थनीय नव्हतीच हे लक्षात येते.
स्मिताला तिच्या आईवडिलांनी बरेच दिवस मोबाइल घेऊन दिला नव्हता. कारण त्यांच्याकडे स्मार्ट मोबाइलसाठी लागणारे पसे नव्हते. त्या दिवशी मात्र बाबांनी वचन दिलं होतं की ते मोबाइल आणतीलच. काय कुणास ठाऊक, त्यांना रोजच्यापेक्षा घरी पोहोचायला वेळ लागला. स्मिता मात्र अस्वस्थ झाली. तिचा पक्का समज झाला होता की, तिच्या बाबांनी आज पुन्हा थाप मारली असणार. बाबा येतील आणि सगळे जेवायला बसतील म्हणून जेवणाची तयारी करत असलेल्या आईची नजर चुकवून स्मितानं विष प्राशन केले. दारात शिरल्या शिरल्या बाबा लाडक्या स्मिताला साथ घालत होते. स्मिता, आज तुझा मोबाइल आणला बरं! पण तरीही ती काही आनंदानं धावत आली नाही म्हणून बेडरूममध्ये जाऊन पाहतात, तर ती तडफडत होती. आईबाबांच्या धावपळीमुळे ती वाचली. अमितला बारावीच्या परीक्षेत चांगले ८६ टक्के मिळाले होते; पण रिझल्टच्या आदल्या दिवशी त्याला वाटलं की आपल्याला चांगले मार्क्‍स मिळणार नाहीत. मागचापुढचा विचार न करता त्यानं जीव दिला. आजही त्याचे मम्मीपपा वरकरणी जिवंत दिसतात. पण प्रत्यक्षात? अमितनं स्वत:ला तर मारलंच, पण आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मम्मीपपांनाही जिवंतपणी मारले. खरं पाहिले तर या दोघांमध्ये सहनशीलतेचा अभाव होता. काही क्षुल्लक गोष्टीने किंवा आततायी विचार करण्याच्या वृत्तीने अनेक व्यक्ती आत्महत्या करतात. खरे तर आयुष्यातील या घटना तशा काही काळापुरत्या मर्यादित असतात. थोडीशी वाट पाहिली तर हव्या असलेल्या गोष्टी आयुष्यात मिळूनही जातात. आत्महत्या आयुष्यच संपविते, पण सहनशीलता मात्र समस्या संपेपर्यंत साथ देते आणि माणसाला जगविते. कारण कालांतराने आपण त्या समस्येवर मात करायला लागतो. ती समस्या आपण त्या भावनेच्या भरात समजलो तितकी बिकट नव्हती हेही आपल्याला कळून चुकते. काही जखमा कालांतराने भरतात. म्हणून भावनेच्या भरात कुठलेच आततायी निर्णय घेऊ नये हे शहाणपणाचे लक्षण आहे. आत्महत्या केल्याने आयुष्यातील गुंतागुंत कमी होणार नाहीच; पण जिवंत राहून ही गुंतागुंत सुटण्याची संधीसुद्धा आपण गमावतो आणि आनंद उपभोगायची संधीही.
अनेकदा आपण पाहतो की, काहींना आपण आपल्या कुटुंबावर भार झाले आहोत असे वाटते. आपल्या नसण्यानं सगळ्या समस्याच उरणार नाहीत, आपले कुटुंब आनंदाने जगेल, सुखात राहील, असे त्यांना वाटते. बऱ्याच स्त्रियांना आपण आपल्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग आहोत असे वाटत नाही. आपल्या मित्रमत्रिणींशी बांधलेलो नाही, असे वाटते. कुठेतरी या दुनियेत असूनही या दुनियेपासून दूर असतात. आत्महत्येच्या कृतीपूर्वी बरेच जण असा एकाकीपणा अनुभवत असतात. आपल्या सामाजिक नात्यांपासून तुटलेले असतात. ज्यावेळी त्यांना कुणाच्या तरी मत्रीची आणि मदतीची गरज असते ती नेमकी त्यावेळी त्यांना मिळविता येत नाही. स्त्रियांच्या बाबतीत अनेकदा त्या मनातून कुढलेल्या, संकोचलेल्या असतात. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी मदतही घेत नाही. बऱ्याच विवाहित स्त्रियांना आपला संसार चालवताना होणारी घालमेल नेमकी जवळच्या व्यक्तींना सांगता येत नाही. कारण त्या बावरलेल्या असतात. आपल्या संसाराची लक्तरे वेशीवर टांगायची नाही म्हणून त्या होणाऱ्या मानसिक छळाची झलकही कुणाकडे व्यक्त करीत नाहीत. वैराण जीवन एकाकी जगायचं म्हणून जगत असतात. परंतु कित्येक आत्महत्या वेळीच मदत मिळाल्याने वा मिळवल्याने टाळता येतात. मनावरचा प्रचंड ताण, मानसिक हार आणि भावनिक कोलाहल यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येतात.
भावनिक अस्थिरतेमुळेच खरे तर व्यक्तीला योग्य निर्णय घेता येत नाहीत. म्हणून समस्या सोडवता येत नाहीत. त्यामुळेच माणूस संकटाच्या चक्रव्यूहात आणखी आणखी अडकत जातो. संकटाच्या या चक्रातून बाहेर यायचे असेल तर त्या क्षणी कुणाकडून तरी मदत घ्यावी.
जी व्यक्ती आत्महत्या करते ती फक्त एकदाच मरते. पण तिच्यामागे जगणारे, तिचे अनेक आप्तस्वकीय आयुष्यभर मात्र हजारदा मरतात. आपल्या जिवाभावाच्या व्यक्तीने आत्महत्या का केली? आपलं काही चुकलं का? तिची समस्या तिने आपल्याला का नाही सांगितली? या अनुत्तरित प्रश्नाभोवती हे नातेवाईक घुटमळत राहतात. एका व्यक्तीच्या अशा विध्वंसक निर्णयाने पूर्ण कुटुंब पूर्ण आयुष्यभर हृदयात भळभळणारी जखम कधी भरेल याची वाट पाहत राहते. तिला जेवढा विसरायचा प्रयत्न करतात तेवढी तिची आठवण मनाच्या पटलावर प्रकर्षांने येत राहते. या व्यक्ती कधी कुणाच्या वयोवृद्ध मातापिता असतात, ती अशी गेली पण आपण का जगलो आहोत हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करतो. तर कधी ते छोटंसं मूल असतं, ज्याला आपली आई अशा गूढ वातावरणात गमावल्यामुळे तिच्या प्रेमाला पारखं व्हावं तर लागतंच, पण त्याच्याशी कुणी आईच्या मृत्यूबद्दल काहीच बोलत नाहीत. आईच्या बाबतीत काहीतरी विचित्र घडलं आहे हा सल मनात घेऊन ते मूल जगत असतं. नोकरी गमावल्याने नवऱ्याने आत्महत्या केली तरी त्याच्या पत्नीला मात्र समाजाच्या अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागतं. तिच्या पतीचं तिच्याजवळ नसल्यामुळे तिचं जगणं आणखी गुंतागुंतीचं होतं. अचानक भावाने असाच जगाचा निरोप घेतला म्हणून विषण्ण मनानं हातात राखी घेऊन अश्रू ढाळणारी बहीण निशब्द असते. अशी कित्येक नाती पोरकी झालेली असतात.
प्रत्येक आत्महत्येच्या मागे उरलेली पाच-सहा माणसं आयुष्यभर अस्वस्थ असतात, तडफडत राहतात. ती असं कसं करू शकते, इतक्या टोकाची भूमिका का घेतली त्यानं, असा सर्वसामान्य क्रोधित सूर तर कधी आपणच कमी पडलो म्हणून ती अशी गेली हा अपराधी भाव आणि असहायता. कधी कधी कित्येक वर्षे या आपल्या प्रिय मुलीला भेटायला मिळेल, अशी वेडी इच्छा मनात बाळगून अश्रू गाळणारी आई दरवर्षी तिच्या मृत्यूच्या दिवशी मुलीला आवडणारी जिलेबी आणून तिची वाट पाहते.
२२-२३ वर्षांच्या एकुलत्या एका मुलीने प्रेमभंग झाला म्हणून जीव दिला. तिने आपल्या वेदनेतून व अपमानातून स्वत:ची सुटका केली. पण तिच्यावर जिवापाड प्रेम केलेल्या, तिच्या जगण्यात आपल्या जीवनाची धन्यता मानणाऱ्या आईला स्वतला कसे सावरावे हे कळलेच नाही. बरोबर एका वर्षांने त्याच दिवशी तिने आत्महत्या केली. अनेक नातेवाईकांना तर झोप येत नाही, उदासीनता जडते, त्यांचे मन आपल्या प्रिय व्यक्तीने आत्महत्या केली आहे हे स्वीकारायलाच तयार नसते. मग इतर नातेवाईकांपासून दूर जातात. सण साजरे करणे होत नाही. किंबहुना त्यांचे पूर्ण आयुष्य कुढण्यातच जाते. म्हणूनच आत्महत्या करू पाहणाऱ्या व्यक्तीने एकदा जरी या माणसांचा विचार करायला हवा.
मानसशास्त्रीयदृष्टय़ा बऱ्याच आत्महत्या केलेल्या रुग्णांना पहिल्यांदा मानसिक आजार होतो. मुख्यत्वेकरून उदासीनतेचा वा डिप्रेशनचा आजार, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता व व्यक्तिमत्त्व विकृती असणाऱ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक असते. पॅनिक किंवा तीव्र प्रमाणातल्या चिंतेच्या आजारातसुद्धा आत्महत्या अधिक प्रमाणात दिसून येते. पाश्चात्त्य देशात आत्महत्या केलेल्या दहापकी नऊ लोकांमध्ये मानसिक आजार दिसतो आणि चारांपकी तीन लोकांमध्ये शारीरिक व्याधी दिसून येते. क्षयरोग, एचआयव्ही, कर्करोग, असह्य़ वेदना असणारे हे आजार असू शकतात. यामुळेच मानसिक रोगाचे उपचार आत्महत्येला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे. आपल्या देशात मानसिक व्याधींचे उपचार सामाजिक अवहेलनेमुळे उशिरा सुरू होतात. आपल्याला मानसिक आजार झाला तर लोकं नावं ठेवतील, या विचारांमुळे मानसिक आजारांचे उपचार घेणे लोकं टाळतात.
बऱ्याच स्त्रिया घरगुती िहसेमुळे आत्महत्या करतात. दररोजच्या होणाऱ्या िहसेमुळे शारीरिक वेदना व मानसिक दुख यामुळे खचलेली स्त्री, क्रूर नवऱ्याच्या हातातून आपण सुटू असे तिला कधी वाटत नाही. हातात कुठली ताकद नाही व पाठीशी कुटुंबाचा आधार नाही. तर मानसिक दबावाच्या घुसमटीत जगण्यापेक्षा मृत्यूचा मार्ग स्वीकारायला ही स्त्री मागेपुढे पाहत नाही. कारण जगणे उद्ध्वस्त वाटते. आयुष्य बदलणार नाही असंही वाटतं. मग कशाला हा छळ सोसायचा, अशी बऱ्याच बायकांची भूमिका असते. आपण अलीकडेच वृत्तपत्रात वाचले की, एका विधवा स्त्रीने सासूबरोबर दररोजच्या होणाऱ्या भांडणामुळे आपल्या दोन मुलींना तर ठार मारलेच, पण स्वतही आत्महत्या केली. आपल्या संस्कृतीत सासूसुनांच्या भांडकुदळ वातावरणात सून तरी आत्महत्या करते किंवा कधी कधी सासूही आत्महत्या करते. अशावेळी नात्यांमधला समजूतदारपणा माणसाला वाचवू शकतो.
सुमतीताई रोजच्या ब्लडप्रेशर व डायबिटीसच्या गोळ्या घेऊन कंटाळल्या होत्या. त्यासाठी त्यांना मुलाकडेच पसे मागावे लागत होते. डॉक्टरांनी सांगितला तसा आहार मिळत नव्हता. सुनेला आणि मुलाला आपण जड झालो आहोत हे त्यांना जाणवत होतं. अशावेळी आपण मरून गेलो तर बरे, असे त्यांच्या मनात आले. त्यावेळी त्यांना वाटलं की, मरण्यापूर्वी आपल्या नातवाला पुरणपोळ्या करून घालाव्यात. मनापासून त्यांनी त्या नातवाला करून घातल्या. नातू खूश झाला आणि आजीला म्हणाला, ‘‘आजी, तुझ्या पुरणपोळ्या मला खूप आवडतात. तू नेहमी का करत नाहीस? बस्स!’’ त्याच्या या शब्दानं सुमतीताईंना जाणवलं की, आपण आपल्या नातवाला खूप आवडतो. आपण कुणाला तरी हवेहवेसे वाटतो, ही जाणीवच माणसाला जगण्याची शक्ती देते. म्हणूनच अशा व्यक्तींना त्या आपल्याला हव्या आहेत, आपल्याला त्यांची कदर आहे ही जाणीव करून दिली तर नात्यांची जपणूक तर होईलच, पण आयुष्यातला आनंदही वाढेल. जेव्हा एखादा पती त्याच्या पत्नीला ते असीम प्रेम देतो, तिचा सन्मान करतो तेव्हा तो कमी कमवत असेल तरीही त्याच्याबरोबर जगताना तिला केव्हाही आनंदच वाटेल. आपल्याकडील स्त्रिया खरे तर या असीम आनंदावरच जगतात.
ज्या कारणांसाठी एखादी व्यक्ती आत्महत्या करते, त्याच कारणांसह आनंदाने जगणाऱ्या अनेक व्यक्ती या विश्वात असतात. फक्त त्यांच्याकडे असते ते जीवनाबद्दलचे प्रेम आणि आत्मविश्वास! एकदा हृदयावर विश्वासाने हात ठेवला तर लक्षात येतं की, हृदयाची ती धडधड हृदयविणेच्या सुरांची लय आहे आणि ती ऐकत आपल्याला जगायचं आहे. आयुष्य सुंदर आहे म्हणून ते पूर्णपणे जगलं पाहिजे.
pshubhangi@gmail.com

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
lokrang article, book review, ekla chalo re, Autobiographical book, sanjeev sabnis, loksatta,
सकारात्मक आत्मकथन
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’