आंतरजालावरील ट्विटरसारखे समाजमाध्यम ९७.५ टक्के भारतीय वापरत नाहीत. परंतु जे वापरतात त्यांपैकी अनेक जण अद्यापही २०१४ च्या लाटेवरच स्वार आहेत आणि जे-जे कुणी आपल्याविरुद्ध उच्चार करील त्या सर्वाना या लाटेचे तडाखे देण्याची सवय समाजमाध्यमांतील या भक्तांमध्ये अद्याप कायम आहे. इतकी की, अलीकडेच भाजपच्या दोघा नेत्यांना त्याचा फटका बसला..

आपल्याकडे भस्मासुर, तसा पाश्चात्त्यांकडे फ्रँकेन्स्टाईन आहे. दोन्हींमध्ये एक साम्य आहे. ती दोन्ही राक्षसी रूपे आहेत आणि ती ज्याने आपणांस जन्म दिला त्याचाच विनाश करणारी आहेत. गेल्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे प्रमुख अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार चंदन मित्रा यांना या भस्मासुराची कथा नक्कीच आठवली असेल. या भस्मासुराचे नाव जल्पक, अर्थात समाजमाध्यमांतील ‘ट्रोल’. आजवर भाजपच्या विरोधकांवर तुटून पडणाऱ्या या जल्पकांच्या फौजा गेल्या आठवडय़ात ठाकूर आणि मित्रा या आपल्याच नेत्यांवरच तुटून पडल्या. त्याआधी त्यांनी अशाच प्रकारे भाजपचे जुनेजाणते नेते आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांच्यावर हल्ले केले होते. शौरी हे मोदीविरोधी गटातील. त्यांनी मोदींवर टीका करण्याचे महत्पाप केले. त्यामुळे जल्पक बिथरले आणि त्यांनी शौरींच्या नावाने माध्यमव्यापी शिमगा केला. त्या वेळी कदाचित ठाकूर आणि मित्रा यांना आतून गुदगुल्याही झाल्या असतील, की बरी खोड मोडली. परंतु तेव्हा त्यांना याचा अंदाजही आला नसेल की, जल्पक हे दुधारी शस्त्र आहे. ते उलटूही शकते. तसे ते काही दिवसांपूर्वीच ठाकूर आणि मित्रा यांच्यावर उलटले. त्याला कारणीभूत ठरले ते भारत-पाक क्रिकेट सामन्यांचे राजकारण.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे अलीकडे दोनच पद्धतींचे असतात. एक तर ते सुधारून बिघडून सुधारलेले असतात किंवा बिघडून सुधारून बिघडलेले असतात. सध्या ते सुधारण्याच्या स्थितीत दिसतात. ही बिघडण्यापूर्वीची अवस्था. या काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने खेळले जावेत अशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची हार्दकि सदिच्छा होती. अनुराग ठाकूर हे जसे भाजपचे नेते आहेत तसेच ते मंडळाचे सचिवही आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध क्रिकेटच्या माध्यमातून सुरळीत व्हावेत असे त्यांनाही वाटल्यास नवल नाही. त्याबाबतचा त्यांचा युक्तिवादही तर्कसंगत होता. आपण पाकिस्तानबरोबर विश्वचषक स्पध्रेत खेळतो. पुढच्या वर्षी त्यांच्याशी आपण आशिया चषक स्पध्रेत खेळणार आहोत. मार्चमध्ये जागतिक टी-ट्वेंटी स्पध्रेत खेळणार आहोत. अशा बहुराष्ट्रीय स्पर्धामध्ये पाकिस्तानबरोबर खेळण्यास आपणांस काही हरकत नसेल, तर मग द्विराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात काय समस्या आहे? आपणांस या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे, असे आवाहन ठाकूर यांनी केले होते. परंतु पाकिस्तानच्या द्वेषावरच ज्यांचा राष्ट्रवाद पोसला गेला आहे अशा अनेकांना हे पटणे शक्य नव्हते. स्वत:स राष्ट्रभक्त म्हणवणारा आणि बाकीच्यांना देशद्रोहीच ठरवू पाहणारा असा मोठा वर्ग आज वाढतो आहे. त्यापैकी काही जण मोदींच्या जल्पकसेनेत आहेत आणि पाकिस्तानशी काही खेळायचे असेल तर ते युद्धच असे त्यांचे मत आहे. असे असताना क्रिकेट नियामक मंडळाने पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळण्याची तयारी सुरू केली, तेव्हा स्वाभाविकच ही जल्पकसेना बिथरली. त्यांनी ट्विटर आणि फेसबुकवरून या क्रिकेटी मुत्सद्देगिरीस विरोध सुरू केला. त्यामुळे देशात प्रथमच असे वातावरण निर्माण झाले, की सरकारच्या पाकविषयक धोरणाला देशवासीयांचा कडवा विरोध आहे. अशी भावना निर्माण होणे भाजपला परवडण्यासारखे नव्हते. समाजमाध्यमे जनमताचे प्रतिनिधित्व करीत नसतात हे अनुराग ठाकूर यांचे मत आले ते त्यातून. ते योग्यच होते. बहुविधता हे ज्याचे रूप त्या भारतासारख्या देशात अशी मोजक्यांची एकसुरी, एकरंगी आणि म्हणून अतरंगी मते सगळ्या समाजाची असल्याचे मानणे हा भाबडेपणाच. तो यापूर्वी केला म्हणून यापुढेही तसेच केले पाहिजे असे नव्हे. ठाकूर यांच्या विधानामागे ही शहाणीव होती. पण ती जल्पकसेनेला खुपली आणि त्यांनी ठाकूर यांच्याच डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपनेते चंदन मित्रा यांचा प्रवेश झाला तो या वळणावर. दूरचित्रवाणीवरील एका चच्रेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या बिथरलेल्या जल्पकसेनेच्या पाटलुणीलाच हात घातला. ‘ज्यांच्याकडे फार काही करण्यासारखे नसते अशी मंडळी ट्विटरवर येऊन विविध विषयांवर आपली मते मांडत असतात,’ अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवरील जल्पकांची खिल्ली उडवताच एकच आगडोंब उसळला. चंदन मित्रा हे ‘सनातन मूर्ख’ ठरले. शक्य असते तर अनेकांनी त्यांच्या हातात पाकिस्तानचा व्हिसाही ठेवला असता. यातून एक गोष्ट प्रकर्षांने पुढे आली, ती म्हणजे २०१४ च्या निवडणुकीच्या काळात निर्माण करण्यात आलेले ट्विटरी भक्तगण आता सरकारच्या धोरणांवर प्रभाव पाडू इच्छित आहेत. चंदन मित्रा हे भले नाकारत असले तरी जल्पकसेनेच्या महत्त्वाकांक्षांना भलतेच पंख फुटलेले आहेत.
आजमितीला या १२७ कोटी लोकसंख्येच्या देशात अवघे १४.३ कोटी लोक समाजमाध्यमांचा वापर करत आहेत. त्यातील सगळ्यांनाच जल्पक म्हणता येणार नाही. जे आहेत त्यांचे मुख्य हत्यार आहे ट्विटर. त्याचे सदस्य आहेत अवघे सव्वा दोन कोटी. पुन्हा त्यातही सगळेच जल्पक नाहीत. म्हणजे अवघी मिळून ही जमात अंदाजे तीन-साडेतीन टक्क्यांहून जास्त नसेल. पण या साडेतीन टक्क्यांची मते हाच बुलंद भारताचा बुलंद आवाज मानला जात आहे. २०१४च्या निवडणुकीत हे प्रकर्षांने दिसून आले. तेव्हा जणू ट्विटर हा राष्ट्राचा भावनाक्षेपक बनला होता. त्यातून निर्माण होणारे समज हेच वास्तव मानले जात होते. २०१४ मध्ये काँग्रेसविरोधात लढली गेली ती जशी राजकीय लढाई होती, तशीच किंबहुना त्याहून अधिक ती समजभानाची लढाई होती. त्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षही आपापल्या परीने लढत होते. परंतु या दोन्ही पक्षांहून भाजप किती तरी योजने आघाडीवर होता. ती लढाई भाजपने जिंकली, त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. अनेक समज वाळूच्या किल्ल्यांसारखे कोसळले आहेत. मात्र त्या वेळी जल्पकांना चढलेला उन्माद काही कमी झालेला नाही. मध्यंतरी झडलेल्या सहिष्णुता-असहिष्णुतेच्या वादाला ज्या अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या त्यातील जल्पकांचा उन्माद ही एक महत्त्वाची गोष्ट होती. समाजात असहिष्णुता वाढत आहे असे म्हटल्यावर अनेकांचे म्हणणे असते की तसे तर काही दिसत नाही आणि हे सगळे मोदींना बदनाम करण्याचे राजकारण आहे. त्यांना तसे वाटते कारण ते समाजमाध्यमांपासून दूर असतात. त्यामुळे तेथील जल्पकांची झळ त्यांना लागत नसते. मित्रांसारख्या भाजपच्या नेत्यांना त्याचे चटके बसू लागल्यामुळे ते आता ट्विटरवरील जल्पकांची निरुद्योगी अशी संभावना करू लागले आहेत. ठाकूर यांना हे जल्पक म्हणजे जनमताचे प्रतिनिधी नव्हेत असा साक्षात्कार झाला आहे. पण आता वेळ निघून गेली आहे. या जल्पकांचे राजकीय व्यवस्थेतील स्थान पक्के झाले आहे. कालपर्यंत क्रिकेटी मुत्सद्देगिरीच्या बाजूने असलेल्या ठाकूर यांना आता सीमेवर जवानांचे बळी जात असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यात काय अर्थ आहे असा सवाल पडू लागला आहे याचे कारण हेच आहे. समाजमाध्यमांतील साडेतीन टक्के जल्पकांच्या झुंडी सरकारची धोरणे प्रभावित करू लागली आहेत हेच या मतांतरातून दिसत आहे. भाजपच्या भाषेत सांगायचे, तर ही तर फक्त झाँकी आहे..