सत्तेवर आल्यानंतर अवघ्या १६ महिन्यांत नरेंद्र मोदी यांच्या शिडातील वाऱ्यांचा जोर लक्षणीय कमी झालेला आहे. अशा वेळी समर्थ विरोधी पक्ष म्हणून उभी राहण्याची चांगलीच संधी कॉँग्रेसला आहे. त्यासाठी काही कटू निर्णय घेण्याची तयारी हवी. मात्र नेमकी ती न दाखवता थातुरमातुर उपाययोजना करण्यातच पक्ष धन्यता मानताना दिसतो.
परिस्थितीचे चार रट्टे खाल्ल्यानंतरही एखाद्यास शहाणपण येत नसेल तर तो केवळ कपाळकरंटाच. सांप्रत काली ही उपाधी प्राप्त करण्यास काँग्रेसइतका दुसरा योग्य पक्ष नाही. गत लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या भाजपकडून पुरते वस्त्रहरण ओढवल्यानंतर तरी त्या पक्षास काही शहाणपण येईल अशी अपेक्षा होती. ती अगदीच फोल ठरते. तसे मानावयाचे ताजे कारण म्हणजे महिला काँग्रेस म्हणून त्या पक्षाची जी काही उपशाखा आहे तीवर केल्या गेलेल्या ताज्या नेमणुका. बाकी कशापेक्षा चित्रपटातील पडद्यामुळे ओळखल्या गेलेल्या क दर्जाच्या अभिनेत्री नगमा यांना महिला काँग्रेसचे सरचिटणीस करण्यात आले आहे. प्रचाराच्या काळात मुख्य नेता येईपर्यंत गर्दी धरून ठेवण्यासाठी सर्वच पक्षांना काही ओळखीचे चेहरे लागतात. तसे करावे लागते. कारण निदान त्यांना पाहण्यासाठी म्हणून तरी गर्दी जमते आणि मग त्या जमलेल्या गर्दीसमोर या राजकीय नेत्यांना आपली थोरथोर पक्षधोरणे फेकता येतात. खरे तर राजकीय पक्षांना प्रचारासाठी ही असली कचकडय़ाची मंडळी लागावीत, हेच लोकशाहीच्या बाल्यावस्थेचे लक्षण. वर परत त्यांना कालांतराने राजकीय नेता म्हणून गणले जाणे, हे तर बाल्यावस्थेतून शिशू अवस्थेकडे उलटा प्रवास करण्यासारखे. काँग्रेसने तो करावयाचा निर्धार केल्याचे दिसते. नगमा यांना थेट सरचिटणीसपदच देणे हे त्याचे लक्षण. या नगमाबाईंच्या बरोबर महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रमुख म्हणून कोणी चारुलता टोकस यांची नेमणूक करण्यात आली आहे. या टोकसबाई काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांच्या सुकन्या. ही नेमणूक होईपर्यंत या टोकसबाई आपल्या पक्षात काही काम करतात याची सामान्य काँग्रेसजनांना माहिती असल्याची काही शक्यता नाही. हे नावदेखील या नियुक्तीच्या निमित्ताने कित्येक काँग्रेसजनांनी पहिल्यांदाच ऐकले. मुदलात अखेरच्या कालखंडात प्रभा राव या स्वत:च पक्षासाठी जड झाले ओझे बनल्या होत्या. ते ओझे पक्षाला पेलवेनासे झाल्यावर राजभवनात पाठवले गेले आणि सरकारी खर्चाने ते पेलण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसमध्ये असताना शरद पवारांना जमेल तितका खोडा घालणे, हीच काय ती प्रभा राव याची ओळख. तेव्हा पक्षासाठी प्रभा राव यांनी जे काही महान कार्य केले त्याची उतराई विविध नेमणुकांतून पक्षाने केली, हे एक वेळ ठीक. परंतु या चारुलता टोकसबाईंचे काय? पक्षासाठी त्यांनी असे कोणते दिवे लावले की ज्यामुळे पक्षाचे डोळे दिपले आणि त्यांना हे पद दिले गेले? खेरीज, कित्येक काँग्रेसजनांच्या मते या बाईंचे वास्तव्य म्हणे दिल्लीतच प्राधान्याने असते. तरीही महाराष्ट्र महिला काँग्रेसची धुरा त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. आधुनिक वैद्यकात टेलिमेडिसिन हा प्रकार आता रुळला आहे. म्हणजे जेथे प्रत्यक्ष डॉक्टर जाणे शक्य नसते अशा ठिकाणी दूरसंचार तंत्राच्या आधारे वैद्यकीय सेवा पुरवली जाते. या अशा नेमणुका हे काँग्रेसचे टेलिमेडिसिन म्हणता येईल.
परंतु तो अपवाद नाही. मुदलात या पक्षाची रचनाच ही घराण्यांसाठी झालेली असल्याने आता पुन्हा नव्याने घराणेशाहीची टीका करण्यात काही हशील नाही. आणि दुसरे म्हणजे काँग्रेसचा हा घराणेशाहीचा वाण भाजपसह सर्वच पक्षांना आता लागलेला असल्याने सर्वच समान गुणधर्मी झाले आहेत. तेव्हा मुद्दा घराणेशाही हा नाही. तर तो आहे या असल्या विसविशीत, सुस्त आणि आयतोबा मंडळींच्या अंगावर नेतृत्वपदाची झूल चढवून पक्षाच्या हाती काही लागते का? हा. याचे उत्तर अर्थातच नकारात्मक आहे. त्याचे अनेक दाखले देता येतील. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुखपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. ते माजी मुख्यमंत्री, गांधी घराण्याचे निष्ठावान दिवंगत शंकरराव चव्हाण याचे चिरंजीव. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची सूत्रे त्यांच्या हाती दिली गेली, त्यास बराच काळ लोटला. या काळात त्यांच्या नेमणुकीमुळे पक्षात चतन्याचे वारे खेळू लागले असे नाही. विधिमंडळात पक्षाची सूत्रे राधाकृष्ण विखे यांच्याकडे आहेत. ते काही काळ शिवसेनेत राहून मंत्रिपद चाखून स्वगृही आलेल्या बाळासाहेबांचे चिरंजीव. खुद्द राधाकृष्ण यांनीदेखील या द्विपक्षीय घरोब्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्याकडे नेतृत्व दिल्यामुळे काँग्रेसची सदनातील कामगिरी उजळली असे काही झालेले नाही. बाकीच्या राज्यांतही कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे त्यातल्या त्यात चाणक्य दिग्विजय सिंग हे आपल्या चिरंजीवांच्या राज्यारोहणासाठी आतुर आहेत तर तिकडे पंजाबात अमिरदर सिंग हे आपल्या सौभाग्यवतींसाठी. पायलट, प्रसाद, देवरा अशा अनेक नेत्यांची पुढची पिढी आपापल्या प्रदेशांत काँग्रेस घराण्याशी लागलेला पाट निभावत आहेत. त्यातल्या त्यात नाव घ्यावी अशी कामगिरी म्हणता येईल ती पायलट यांच्या चिरंजीवांची. बाकी देवरा वगरे तर सर्व आनंदी आनंद. ही मंडळी इतकी पक्षापासून हात झटकून असतात की मुंबईत तर काँग्रेसच्या एका धनाढय़ मुरलीपुत्राने निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निधी मागितला होता. तरीही काँग्रेस अशा अनेक देवराया अजूनही पोसत आहे.
पक्षाची अडचण आहे ती ही. वास्तविक सत्तेवर आल्यानंतर अवघ्या १६ महिन्यांत नरेंद्र मोदी यांच्या शिडातील वाऱ्यांचा जोर लक्षणीय कमी झालेला आहे. अशा वेळी समर्थ विरोधी पक्ष म्हणून उभे राहण्याची चांगलीच सुसंधी त्या पक्षाला आहे; परंतु ती साधण्याइतके नपुण्य त्या पक्षनेतृत्वात नाही. सोनियाआईंजवळच्या काहींनी मनाविरुद्ध काही केले म्हणून फुरंगटून जाऊन परदेश पर्यटनास जाणारे चि. राहुल आणि मायलेकांत आपण नक्की कोणाची तळी उचलावी हे न कळल्याने गोंधळलेले काँग्रेसजन असे त्या पक्षाचे सध्याचे चित्र आहे. पक्षाचे नेतृत्व ते समजून घेण्याएवढे पोक्त नाही. त्याचमुळे बिहारसारख्या महत्त्वाच्या राज्यात निवडणुका उंबरठय़ावर येऊन ठेपल्या तरी काँग्रेस त्या निवडणुकांत कोठेच नाही. याआधी सप्टेंबर महिन्यात पक्षाची सूत्रे अधिकृतपणे चि. राहुलबाबा यांच्याकडे दिली जाणार होती, म्हणे. बिहार निवडणुकांमुळे ते राज्यारोहण लांबणीवर पडले. चि. राहुलबाबांच्या हाती पक्षसूत्रे द्यावयाची आणि लगेच होऊ घातलेल्या बिहार निवडणुकांत पक्षाने दणकून मार खायचा असे झाले तर त्यांची नाचक्की नको, म्हणून हा निर्णय पक्षाने पुढे ढकलला. यावरून त्या पक्षाची अवस्था किती दयनीय आहे, हे समजून यावे.
परंतु पक्ष ते समजण्यास तयार नाही. कारण तशी तयारी दाखवली तर काही कटू सत्यास सामोरे जावे लागेल आणि ते सत्य मान्य केल्यास पक्षरचनेत आमूलाग्र बदल करावे लागतात. हे करणे वेळखाऊ आणि वाईटपणा वाढवणारे आहे. त्यास तोंड देण्याची पक्षाची तयारी नाही. त्यामुळे ही असली थातुरमातुर उपाययोजना करण्यातच काँग्रेस धन्यता मानताना दिसतो. परिणामी स्वत:चे असे काहीही धोरण इतकी वष्रे सत्ताधारी राहिलेल्या या पक्षाकडे नाही. सत्ताधाऱ्याच्या चुका हे विरोधी पक्षाचे धोरण असू शकत नाही. काँग्रेसकडे सध्या तेच फक्त आहे. सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकार चुकत राहील आणि त्यामुळे जनमताचा ओघ आपल्याकडे वळेल याकडे काँग्रेस आशा ठेवून आहे. दुसऱ्यास ठेच लागल्याने आपणास फार फार तर शहाणपण येऊ शकते. पण तो ठेचकळल्यामुळे आपली जखम बरी होत नाही. काँग्रेसला तसे वाटत असावे. ताज्या नेमणुकांवरून ते दिसते. ते दाखवणे हा यामागील उद्देश. अन्यथा या नेमणुका आणि त्यांतील व्यक्तींचे भुक्कडत्व लक्षात घेता त्या दखल घेण्याच्या लायकीच्या नाहीत. टाकाऊंचे टिकाऊपण फार काळ टिकत नाही हे काँग्रेसला लक्षात यायला हवे. कारण प्रश्न समर्थ विरोधी पक्षाचा आहे. काँग्रेसचे बरेवाईट ही बाब दुय्यम.