मोदी यांचा विकासाचा मुद्दा कोठच्या कोठे मागे राहिला आणि असहिष्णुता वगरे आभासी कारणांनी राजकीय पस व्यापला गेला. सहिष्णुतेचे सर्व फायदे उकळत उच्चभ्रू बनल्यानंतर चॅनेलीय चर्चातून देशात किती भयंकर असहिष्णुता माजली आहे, असे म्हणणे फॅशनेबल झाले. आमिर खान त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. तरीही, त्याचे देशत्यागासंदर्भातील विधान पूर्ण वाचले तर त्याच्या नावाने इतके खडे फोडावे असे काही नाही..

अभिनेता आमिर खान याच्या विधानाचे दोन स्वतंत्र भाग आहेत आणि ते जोडलेले आहेत. त्यातील पहिला, देश सोडावा असे वाटण्याच्या भावनेशी संबंधित आहे आणि देशातील कथित वाढती असहिष्णुता देशत्यागाच्या भावनेशी जोडली गेलेली आहे. हा दुसरा भाग. भारतात राहून आपले काही भले होणारे नाही किंवा जे काही होईल त्यापेक्षा अधिक भले करून घ्यायचे असेल तर देश सोडायला हवा, अशी भावना असणारा आमिर खान पहिला नाही. देश स्वतंत्रदेखील झाला नव्हता तेव्हापासून अनेक भारतीयांनी मायभूमी सोडून विकसित देशांत स्थलांतर केलेले आहे. आजमितीला अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून ते नासापर्यंत अनेक ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी भारतीय आहेत. अमेरिकेतील अत्यंत धनाढय़ व्यापारी, बँकिंग क्षेत्रातही अनेक भारतीय आहेत. जगाच्या पाठीवर एकही देश असा आढळणार नाही, जेथे भारतीय नाहीत. नायजेरियासारख्या तेलसंपन्न देशांतील बरेच मोठे आíथक क्षेत्र भारतीयांच्या.. त्यातही गुजराती आणि बंगाली यांच्या.. हाती आहे. लंडनमधला साउथ हॉलसारखा भाग तर भारतातलाच वाटतो. युरोपात मोठय़ा प्रमाणावर भारतीय आहेत. खेरीज, चीन, कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांपासून टिकलीएवढय़ा सिंगापुरापर्यंत सर्वत्र भारतीयांचा भरणा आहे. पश्चिम आशियाचा तेलकट वाळवंटी प्रदेश हा गेल्या चार दशकांत भारतीयांनीच व्यापलेला आहे. याचा अर्थ प्रगतीसाठी परदेशात स्थायिक व्हावे असे वाटणारी आमिर खान ही पहिलीच व्यक्ती नव्हे. आणि तसे वाटणारी शेवटचीही असणार नाही. इतकेच काय राष्ट्रवादावर दावा सांगणाऱ्या भाजपची सर्वात समर्थ पाठिराखी फळी परदेशांतील आहे. म्हणजे आमिर यांच्यासारखी देशत्यागाची भावना व्यक्त करणारे आणि प्राधान्याने खान हे आडनाव नसलेले भाजपसमर्थक परदेशातच गेले नसते तर त्या पक्षाला इतका सीमापार पािठबा मिळाला नसता. इतक्या सर्वानी देश सोडला तो अधिक उन्नती साधता यावी म्हणून. भारतातील व्यवस्था.. खरे तर तिचा अभाव.. ही मने खच्ची करणारी बाब आहे. देश सोडून गेले तर बरे वाटावे अशी अनेक कारणे आपल्या देशवासीयांना उपलब्ध आहेत. फक्त कागदोपत्रीच असलेले कायद्याचे राज्य, त्यामुळे व्यवस्थेला आलेले अपंगत्व, आíथक प्रगतीची नसलेली हमी, महिलांविषयीचा अत्यंत आक्षेपार्ह दृष्टिकोन, निखळ गुणवत्तेचा आदर नसणे, त्यामुळे यशाबाबतची अनिश्चितता, गुंडापुंडांना व्यवस्थेत असलेले आदराचे स्थान, भ्रष्टाचाराविषयीचा केवळ बोलघेवडेपणा आदी अनेक कारणांमुळे देशाबाहेर गेलेले बरे असे अनेकांना वाटलेले असते. परंतु यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इतकाच की या अनेक कारणांत भारतातील असुरक्षितता हे कारण नाही. देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे देशत्याग केल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. तेव्हा आमिर खान यांचा पहिला मुद्दा निकालात निघतो.
आता मुद्दा उरतो असहिष्णुतेचा. ती वाढली आहे, असे आमिर म्हणाला. हे कालसुसंगतच झाले. कालसुसंगत अशा अर्थाने की सध्या स्वत:ला पुरोगामी मानणाऱ्या, विचारी भासवणाऱ्या, सामाजिक बांधीलकी मिरवणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ांचे पेव फुटलेले आहे. पुरस्कारवापसीत असे अनेक हौशे, गवसे आणि पुरस्कारासाठी आधी केलेले नवसेही पाहावयास मिळाले. त्यापैकी अनेकांना पुरस्काराने मिळाली नसेल इतकी प्रसिद्धी त्याच्या वापसीने मिळाली. हे वास्तव आहे. तेव्हा अशांच्या कंपूत एकदा का सामील झाले की प्रसिद्धी मिळते आणि आपली वैचारिक निष्ठाही दिसून येते असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. सहिष्णु व्यवस्थेचे सर्व फायदे उकळत उच्चभ्रू बनल्यानंतर चॅनेलीय चर्चातून देशात किती भयंकर असहिष्णुता माजली आहे, असे म्हणणे हल्ली फॅशनेबल झालेले आहे. आमिर खान त्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतो. तेव्हा या असहिष्णुतावाल्यांच्या पालखीचे भोई आपणही व्हावे असे त्यास वाटले असल्यास नवल नाही. खेरीज, त्याची दुसरी पंचाईत म्हणजे गांभीर्याच्या बाबतीत त्याच्या जवळपासही नसलेल्या, पसे फेकले की कोठेही नाचावयास तयार असलेल्या बाजारू शाहरूख खान याने या प्रश्नावर आमिरच्या आधीच भूमिका घेतली. सामाजिक भान वगरे मुद्दय़ांशी दूरदूरहूनदेखील काहीही संबंध नसलेल्या शाहरूख खान याने इतक्या गंभीर विषयावर भाष्य केले ही बाबदेखील आमिरला डाचत नसेल असे म्हणता येणार नाही. याचे कारण अशा गंभीर विषयांवर त्याचा मक्ता असतो. तो पुन्हा मिळवण्यासाठी अधिक काही करणे आवश्यक होते. शाहरूख केवळ असहिष्णुतेचा मुद्दा मांडून थांबला. त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जावयाचे असल्याने आमिरने तो देशत्यागापर्यंत ताणला. त्यात त्याचे आडनाव खान असल्याने त्या विधानाची परिणामकारकता अधिक वाढली. ती वाढली कारण नविहदुत्ववाद्यांनी आपल्या मतदारसंघांवर डोळा ठेवत खान याच्या नावे शिमगा साजरा केला. वास्तविक आमिर खान याचे या संदर्भातील विधान पूर्ण वाचले तर त्याच्या नावाने इतके खडे फोडावे असे काही नाही, असे अनेकांना जाणवेल. ‘‘पत्नी किरण हिने मला देशत्याग करावा असे वाटते का असे विचारले.. ही कल्पना (मांडणे) सत्यानाशी (डिझास्ट्रस) आहे,’’ असे आमिर म्हणाला. म्हणजे देशत्यागाचा विचार मनात आणणे हे शहाणपणाचे नाही, असेच त्याचे विधान सुचवते. तरीही त्याच्या विधानावर गदारोळ माजला.
हे सर्व टाळता येण्यासारखे होते. परंतु ते टाळायची इच्छा ना आमिरसारख्यांना आहे ना बोलघेवडय़ा नविहदुत्ववाद्यांना. असहिष्णुतेचा वादभोवरा तयार करण्यात बरेचसे डावे वा त्याकडे झुकणारे आहेत. त्यातील खऱ्या डाव्यांबाबत बोलणे आणि पालथ्या घडय़ावर पाणी ओतणे एकच. देशाच्या इतिहासात अटलबिहारी वाजपेयी यांची आणि आता नरेंद्र मोदी यांची राजवट वगळता खरे आणि भुरटे डावे हे नेहमीच व्यवस्थेचा भाग होते. मोदी यांची सत्ता आल्यापासून अशा सर्वाना अनाथ आणि पोरके झाल्यासारखे वाटत असल्यास त्यात काही गर नाही. या सर्वानी हा असहिष्णुतेचा वादंग माजवला. त्यात मोदी यांच्या कळपातील अर्धवट नविहदुत्ववाद्यांनी, पक्षातील वा सरकारातील भगवे वस्त्रांकित साधू वा साध्वी, सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांच्यासारख्या सल जिभांच्या अनेकांनी विरोधकांच्या हाती कोलीत दिले. वास्तविक हे साधू-साध्वी, महेश शर्मा आदी गणंगांकडून शहाणपणाची अपेक्षा नव्हती. पण ती निश्चित होती पंतप्रधान मोदी यांच्याकडून. आपल्या आसपासच्या या टवाळांना त्यांनी वेळीच वाजवले आणि नंतर आवरले असते तर हे पुढचे रामायण घडतेच ना. ते मोदी यांनी केले नाही. परिणामी त्यांचीच या सगळ्यास फूस आहे असा समज तयार झाला आणि अजूनही तो दूर झालेला नाही. आपण विकासाच्या मुद्दय़ावर सत्तेवर आलो, याचे भान ना त्यांनी राखले ना त्यांच्या जवळपासांनी त्यांना ते आणून दिले. तसे ते असते तर या सर्व वाचाळवीरांच्या जिभांना लगाम लागला असता. ते न झाल्यामुळे मोदी यांचा विकासाचा मुद्दा कोठच्या कोठे मागे राहिला आणि असहिष्णुता वगरे आभासी कारणांनी राजकीय पस व्यापला गेला. बिहारमधील पराभव ही एका अर्थाने याच चुकीची शिक्षा होती. तीपासून धडा घेऊन तरी मोदी यांनी शहाणे व्हावे आणि आपल्या सरकारची भरकटलेली गाडी रुळांवर आणावी.
यात दोन्ही बाजूंचा हुच्चपणा असा की ज्याने इतके वादळ निर्माण झाले ते विधान आमिर याचे नाही. ते केले किरण या त्याच्या पत्नीने. (तसे ते खरोखरच केले की पत्नीच्या खांद्यावरून आमिरने नेम साधला हे कळावयास मार्ग नाही.) परंतु कोणालाच सध्या शांत डोक्याने विचार करण्याची आवश्यकता वाटत नसल्याने आमिरचा ‘किरणो’त्सर्ग उगा वातावरण तापवून गेला.