गुरुत्व तरंगांच्या अस्तित्वाचा पुरावा सापडल्याचे जाहीर होणे आणि यात भारतीय शास्त्रज्ञांचा महत्त्वाचा वाटा असणे, हे दोन्ही अभिमानास्पदच..
चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओने आकाशावर दुर्बीण रोखली त्या घटनेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या घटनेला आहे. कारण विश्वाकडे पाहण्याची गुरुत्वीय खगोलशास्त्राची नवी खिडकी त्यामुळे उघडली गेली आहे. यातून प्रसवसमयी हे विश्व कसे होते, तेव्हा काय घडले याचा अभ्यास करता येणे शक्य होणार आहे.
हे विश्व, ही सृष्टी कशी उत्पन्न झाली? कशातून उत्पन्न झाली? या आकाशगंगा कोठून आल्या? त्या कोठे चालल्या आहेत? विश्व प्रसरण पावते असे म्हणतात. तर ते विश्व ज्यात आहे ते काय आहे? ते कशात प्रसरण पावते आहे? एक ना दोन, अनेक यक्षप्रश्न. हे प्रश्न आजचे नाहीत. माणूस या विश्वा कडे डोळे उघडे ठेवून कुतूहलाने पाहू लागला, त्याबद्दल विचार करू लागला, त्याची रहस्ये समजून घेण्याचे प्रयत्न करू लागला तेव्हापासूनचे हे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधण्याची तळमळही तेव्हापासूनची आहे. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ‘नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत्..’ या नासदीय सूक्तात त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न दिसतो. या जगाच्या उत्पत्तीच्या आधी काहीही अस्तित्वात नव्हते आणि अनासित्वातही नव्हते. सत् नव्हते आणि असत्ही नव्हते. म्हणजे या विश्वाचा प्रारंभ झाला तो शून्यातून, असा गहन तत्त्वविचार मांडणाऱ्या त्या ऋषींचा वारसा आजचे वा कालचे वैज्ञानिक चालवतात असे कदाचित कोणी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या शोधप्रज्ञेचा वारसा मात्र ते खचितच चालवीत आहेत. अमेरिकेतील ‘लायगो’ अर्थात ‘लेजर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल-वेव्ह ऑब्झव्‍‌र्हेटरी’मधील वैज्ञानिकांच्या गटाने गुरुत्व तरंगांच्या अस्तित्वाचा पुरावा शोधून हाच वारसा पुढे नेला आहे. या कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार वगैरे मिळेल की काय हा भाग पुढचा. एरवीही अशा कार्याच्या मोजमापाकरिता पुरस्कारांची तागडी अपुरीच असते. आज मात्र त्यांचे भरभरून कौतुक करायलाच हवे. याचे कारण त्यांनी लावलेला हा शोध साधासुधा नाही. कदाचित विश्व जन्माच्या रहस्याच्या उकलीपर्यंत तो आपणांस घेऊन जाणारा आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने कदाचित त्याला फारशी किंमतही नसेल. ते मोल पारखण्याची कसोटी सर्वाकडेच असते असे नाही. तशी अपेक्षाही करण्याचे कारण नाही. मुळात जेथे जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे असतात तेथे विश्व जन्माच्या समस्येत कोणास रस असणार आणि त्यामुळे अशा शोधांचे, प्रयोगांचे कोणास अप्रूप असणार? ही पायानजीक पाहण्याची लघुदृष्टी काही आजच्याच काळाची देणगी नाही. ती नेहमीच होती. परंतु त्याची पर्वा न करता काही झपाटलेली माणसे विश्व रहस्याच्या शोधपर्वात रमत असतात. त्यांच्या या झपाटलेपणातूनच मानवजातीच्या प्रगतीच्या वाटा विस्तारत असतात. मूलभूत विज्ञान संशोधनातूनच उपयोजित तंत्र आणि शास्त्र प्रगत होत असते. म्हणून असे शोध आणि संशोधन महत्त्वाचे असते. लायगोच्या वैज्ञानिकांनी लावलेला हा शोधही असाच महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे या शोधाने गेले शतकभर विज्ञानाला हुलकावणी देत असलेल्या आणि विश्वोत्पत्ती आणि त्याची जडणघडण यांच्यासंबंधी मानवी आकलनात महत्त्वाची भर घालू शकणाऱ्या गुरुत्वतरंगांच्या अस्तित्वाचा पुरावाच सादर केला आहे. ऋग्वेदकालीन ऋषींप्रमाणेच आपल्या प्रज्ञेने विश्वाबद्दलची प्रमेये मांडणारे थोर विज्ञानऋषी अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी व्यापक सापेक्षतावादाचा जो सिद्धांत तब्बल शंभर वर्षांपूर्वी मांडला होता, त्याच्या खरेपणावर या शोधाने शिक्कामोर्तब केले आहे. ज्याप्रमाणे पीटर हिग्ज यांना त्यांच्या हयातीतच हिग्ज बोसॉन अर्थात देवकण गवसल्याचे पाहता आले, त्याचप्रमाणे या शोधाने, स्टीफन हॉकिंग या सवाई आइन्स्टाइनलाही त्यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी मांडलेला कृष्णविवरांबाबतचा सिद्धांत खरा ठरल्याचे पाहण्याचे समाधान लाभले.
आइन्स्टाइन यांचा व्यापक सापेक्षतावादाचा सिद्धांत म्हणजे आधुनिक भौतिकशास्त्रातील क्रांतिकारी विचारधारा. सुमारे शंभर वर्षांपूर्वी या अफाट प्रज्ञापुरुषाने मांडलेल्या या सिद्धांताने आपली तोवरची अवकाश आणि काळाबद्दलची समजच बदलून टाकली. अवकाश त्रिमितीय नाही आणि काळाला वेगळे अस्तित्व नाही हे सांगणारा हा सिद्धांत मांडतानाच आइन्स्टाइनने गुरुत्वतरंगांची संकल्पना मांडली होती. कुठलाही पदार्थ विश्वातून पुढे जातो तेव्हा संथ पाण्यात खडा टाकल्यानंतर जशा लहरी उठतात तसे गुरुत्वतरंग निर्माण होत असतात. ते कमी शक्तिशाली असल्याने त्यांना शोधणे कठीणच होते. आता ते साध्य झाले आहे. चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओने आकाशावर दुर्बीण रोखली त्या घटनेला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व या घटनेला आहे. कारण विश्वाकडे पाहण्याची गुरुत्वीय खगोलशास्त्राची नवी खिडकी त्यामुळे उघडली गेली आहे. यातून प्रसवसमयी हे विश्व कसे होते, तेव्हा काय घडले याचा अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. एखाद्या कालयंत्रातून प्रवास करत भूतकाळात डोकवावे तसाच काहीसा हा प्रकार. इतके दिवस आपण विद्युतचुंबकीय लहरींच्या माध्यमातून विश्व पाहात होतो. आता श्रवणाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास करता येणार आहे. लायगो प्रकल्पाचे कार्यकारी संचालक प्रो. डेव्हिड रेईट्झ या शोधाबद्दल बोलताना म्हणाले होते, की ‘आजवर आम्ही बहिरे होतो. आता प्रथमच गुरुत्वतरंगांच्या माध्यमातून हे विश्व आमच्याशी बोलले आहे.’ या विश्वाचे, त्यातील एकमेकांपासून दूर पळत असलेल्या आकाशगंगांचे आर्त, ग्रह-ताऱ्यांचे गूज आता आपल्या प्रयोगशाळांत प्रकाशणार आहे. विश्वातील कृष्णविवरे म्हणजे अशी अंधारस्थळे की जी प्रकाशही गिळंकृत करते. त्यामुळे त्यांचे अस्तित्व समजणेही कठीण. आता मात्र तेही शक्य होणार आहे. हा शोध शतकातील सर्वात मोठा असला, तरी एका अर्थी ते मानवाने सत्याच्या दिशेने टाकलेले एक छोटेसे पाऊल एवढाच त्याचा अर्थ आहे. विज्ञानात तसेही अंतिम सत्य नावाची गोष्टच नसते. ती मक्तेदारी छद्मविज्ञानाच्या गोशात वावरणाऱ्या तत्त्वज्ञांची. तेव्हा विश्वरहस्याचा हा धांडोळा येथेच थांबणार नाही. युरोपिय समुदायाचे लिसा पाथफाइंडर हे यान गतवर्षी अवकाशात झेपावले आहे. त्यातून गुरुत्वतरंगांची आणखी माहिती मिळेल. शोधाच्या नव्या दिशा हाती येतील. हे विश्व, ही सृष्टी कशी उत्पन्न झाली, याच्या उत्तरानजीक आणखी एक पाऊल पडेल.
हे पाऊल एकटय़ा अमेरिकेचे वा त्या प्रकल्पात सहभागी झालेल्या अन्य राष्ट्रांचे नसते. ते अखेर आंतरराष्ट्रीय समुदायाचे असते, मानवजातीचे असते. असे असले तरी भारताच्या दृष्टीने या उपक्रमास एक वेगळेच महत्त्व आहे. तमाम भारतीयांसाठी ते अभिमानास्पद आहे. गुरुत्वतरंग शोधण्याच्या प्रयत्नांना नव्वदच्या दशकात जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्यात अमेरिकेबरोबर इटली, ऑस्ट्रेलिया व अन्य काही देशांचाही सहभाग होता. संयुक्तरीत्या लायगो प्रकल्प राबविण्यात येणार होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यातून माघार घेतली आणि भारताला आयती संधी मिळाली. भारतीय वैज्ञानिकांनीही त्या संधीचे सोनेच केले. या यशात पुण्यातील ‘आयुका’सह अनेक वैज्ञानिक संस्थांमधील वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे. आता भारतामध्येही लायगो उपकरण बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेव्हा भारतीय वैज्ञानिकांना आधीच मिळालेल्या या अनुभवाचा फायदा त्यात नक्कीच होईल.
पौर्वात्य दर्शने आणि तत्त्वविचारांनी विश्वाची उत्पत्ती, त्याची जडणघडण यांबद्दल सखोल विचार केला आहे. तो विचार तपासून पाहण्याची, पुढे नेण्याची संधी या नव्या शोधामुळे प्राप्त होणार आहे. अर्थात त्यासाठी आपल्या लोकप्रिय गंडांचा त्याग करावा लागेल. आइन्स्टाइन यांच्यासारख्या थोर वैज्ञानिकाने मांडलेला सिद्धांत म्हणजे काळ्या दगडावरची रेष असे न मानता तो तपासण्याची नियत विज्ञानाकडे असते. विश्वाचे आर्त समजून घ्यायचे तर हा मोकळेपणा आवश्यकच असतो. अर्थात हा काही नवा विचार नाही. परंतु या नव्या शोधानिमित्ताने तोही उजळून घ्यायला हवा.

indian model of secularism
संविधानभान : धर्मनिरपेक्षता : समज व गैरसमज
Marathi Bhasha Din 2024 Oldest Inscription at Akshi Alibaug in Marathi
मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तो कुठे आहे? काय लिहिले आहे त्यात?
Loksatta kutuhal What would perfect intelligence be like
कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्ता कशी असेल?
पूर्व आकाशात अपूर्व अनुभुती, गुरुपुष्यामृत दिनी आकाशातही अमृत योग; नेमके काय घडणार? वाचा…