अणुबॉम्बपेक्षाही संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याच्या उत्तर कोरियाच्या दाव्यानंतर, जगभरात चिंतेचे वातावरण पसरणे स्वाभाविकच..

अमेरिकी तज्ज्ञांनुसार उत्तर कोरियाने विकसित केलेला हा पूर्ण क्षमतेचा हायड्रोजन बॉम्ब नाही. नसेलही. परंतु यानिमित्ताने तो देश हायड्रोजन बॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचला आहे, हे मात्र निश्चित. त्याचमुळे त्याला आवरण्यासाठी जपान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रे यांनी तातडीने हालचाल सुरू केली आहे.

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग हे एक वेडपट गृहस्थ आहेत. पण ते नुसतेच वेडपट असते तर ते एक वेळ सुसहय़ ठरले असते. परंतु ते तितकेच दुष्टदेखील आहेत. त्यामुळे त्यांचा हायड्रोजन बॉम्बनिर्मितीचा दावा कितीही खोटा असला तरी त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. आज, शुक्रवारी या किम जोंग यांचा वाढदिवस आहे. वाढदिवशी मला इतरांच्या कानठळ्या बसतील अशी दणदणीत भेट हवी, असे किम म्हणाले होते. हायड्रोजन बॉम्ब ही ती भेट. या किम यांचे आजोबा किम सोंग हे उत्तर कोरियाचे पहिले प्रमुख. तेही तितकेच वेडपट होते. पुढे हा वारसा चिरंजीव किम जोंग यांच्याकडे आला. आता ती परंपरा विद्यमान किम जोंग पुढे नेत आहेत. संपूर्ण देशच्या देश एका कुटुंबाच्या दावणीला बांधला जाण्याचे हे काही एकमेव उदाहरण नाही. सौदी अरेबिया, कुवेत आदी अनेक देशांत हीच परिस्थिती आहे. परंतु उत्तर कोरिया या सगळ्यांना पुरून उरतो. एक तर असे अन्य देश या कोरियाइतके बंदिस्त नाहीत. आणि इतर देशांतली राजवट उत्तर कोरियाइतकी दुष्टबुद्धी नाही. आपल्या सख्ख्या काकास या किम याने अत्यंत िहस्रपणे ठार केले तर अन्य एका राजकीय विरोधकास शब्दश: तोफेच्या तोंडी दिले. या गृहस्थाने एक दिवसही लष्करी प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही तो स्वत:स सर्वोच्च लष्करप्रमुख असे बिरुद लावतो. खास महिला सुरक्षारक्षकांचा ताफा बाळगणाऱ्या या किम यांच्या अर्वाच्य कहाण्यांना अंत नाही. त्यामुळेच त्यांच्या हायड्रोजन बॉम्ब बनवल्याच्या दाव्याची व्हाइट हाऊस ते ७ रेसकोर्स रोडपर्यंत दखल घ्यावी लागली.

या हायड्रोजन बॉम्बचा प्रतिसाद आणि परिणाम पाहण्यासाठी चीन आणि जपान यांच्याकडे नजर ठेवावी लागेल. उत्तर कोरियाच्या सर्व वेडसर चाळ्यांना चीन आतापर्यंत पाठीशी घालत आला आहे. परंतु २०१४ साली पहिल्यांदा चीनने किम जोंग यास फटकारले. त्या वेळी किम याचा युद्धज्वराचा पारा जरा जास्तच वेगाने वर जात होता. चीनची डोकेदुखी त्यामुळे वाढत होती. यंदाच्या मे महिन्यात उत्तर कोरियात कम्युनिस्ट पक्षाचे महाधिवेशन आहे. या अधिवेशनास चीनचे अध्यक्ष क्षि जिनिपग यांनी यावे, असा किम यांचा प्रयत्न आहे. हायड्रोजन बॉम्बच्या या उद्योगामुळे जिनिपग या अधिवेशनास जातील अशी शक्यता नाही. परंतु याच अधिवेशनास डोळ्यापुढे ठेवून या हायड्रोजन बॉम्बचा घाट घातला गेला. या अधिवेशनात आपल्या नेतृत्वाखाली किती भव्यदिव्य प्रगती होत आहे, हे किम यांना दाखवावयाचे आहे. हा हायड्रोजन बॉम्ब आपल्या हयातीत तयार व्हावा यासाठी किम यांच्या वडिलांनी जंग जंग पछाडले. पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे तो बाप से सवाई होऊ पाहणाऱ्या बेटय़ासाठी महत्त्वाचा ठरतो. परंतु प्रश्न असणार आहे तो चीनचा. या बॉम्बमुळे तो परिसर अस्थिर झाला तर त्याची सर्वात मोठी डोकेदुखी चीनला असणार आहे. या बॉम्बसाठी उत्तर कोरियाने आपला सर्व खजिना रिकामा केला असे म्हणतात. ते शक्य आहे. कारण एकदा वेडपटपणाच करावयाचे असे कोणी ठरवले असेल तर त्याचे काही होऊ शकत नाही. परिणामी या बॉम्ब प्रकरणात आधीच डबघाईस आलेली उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडून पडली आहे. अशा वेळी या अर्थव्यवस्थेला मदत देण्याचे कर्तव्य चीनला पार पाडावे लागेल. ते न पाडावे तरी पंचाईत. कारण त्यामुळे भुकेकंगाल उत्तर कोरियन निर्वासितांचा लोंढा चीनच्या वेशीवरच धडकणार. खेरीज, हे कर्तव्य पार पाडले नाही तर दक्षिण कोरियात तळ ठोकून असणारी अमेरिका मानवतेच्या दृष्टिकोनातून हस्तक्षेप करणार हे नक्की. याच्या उलट बाजूस उत्तर कोरियाच्या मदतीस जावे तर आधीच ताण सहन करणारी चिनी अर्थव्यवस्था अधिकच दडपणाखाली येणार. तेव्हा उत्तर कोरिया हा सर्व बाजूंनी चीनसाठी डोकेदुखी ठरणार असे दिसते. त्याच वेळी उत्तर कोरियातील घटनांवर पलीकडचा जपानही कडवी नजर ठेवून असल्याने त्यामुळे चीनला अधिकच सजग राहावे लागणार.

मुदलात हा देश जपानच्याच साम्राज्याचा भाग होता. १९१० साली जपानने त्यास आपल्या साम्राज्यात जोडून घेतल्यापासून दुसऱ्या महायुद्धांतापर्यंत त्याचे नियंत्रण जपानकडेच होते. दुसऱ्या महायुद्धाची अखेर जपानच्या शरणागतीने झाली. त्यानंतर कोरियादेखील दुभंगला. दक्षिण कोरिया अमेरिकेच्या गोटात राहिला तर उत्तरेने कम्युनिस्ट गटात राहणे पसंत केले. ही वाटणी आजतागायत आहे. वास्तविक अशाच प्रकारची वाटणी युरोपात जर्मनीतही झाली होती. पूर्व जर्मनी कम्युनिस्टांच्या कळपात राहिला तर पश्चिम जर्मनीने अमेरिकेचे बोट धरणे पसंत केले. परंतु १९८९ साली बर्लिनची िभत कोसळली आणि या दोन्ही जर्मनींच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. या एकत्रीकरणाने अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा अंत झाला. परंतु असे काहीही उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात घडले नाही. अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या दक्षिण कोरियाने देदीप्यमान अशी कामगिरी आर्थिक प्रगती केली. उत्तर कोरियास मात्र हे काही साध्य झाले नाही. एरवी अन्य एखाद्या कर्मदरिद्री देशाकडे जसे दुर्लक्ष केले जाते तसे उत्तर कोरियाकडे करता आले असते. परंतु पंचाईत ही की खायला काही नाही अशी परिस्थिती असली तरी या देशाने शस्त्रास्त्रनिर्मितीत प्रचंड गुंतवणूक केली. त्यामुळे त्या देशाची शस्त्रसज्जता कमालीची वाढली. तशी ती वाढावी यासाठी चीन ते पाकिस्तान अशा अनेक देशांनी उत्तर कोरियास मदत केली. चीनकडून उत्तर कोरियाकडे हस्तांतरित झालेले अणुबॉम्ब तंत्रज्ञान ए क्यू खान यांच्यासारख्या चोरटय़ा शास्त्रज्ञामुळे पाकिस्तानात गेले. उत्तर कोरिया हा डोकेदुखी आहे तो अशा उद्योगांमुळे. तो जागतिक समुदायाचा भाग नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी त्यावर कितीही र्निबध घातले तर उत्तर कोरियास काही फरकच पडत नाही. आताही हायड्रोजन बॉम्बची बातमी आल्या आल्या अनेक देशांत धोक्याची घंटा घणघणली. आजमितीला उत्तर कोरियाच्या ताब्यात किमान १०० अणुबॉम्ब आहेत, असा अंदाज आहे. त्याच्या जोडीला हे बॉम्ब फेकण्यासाठीचे प्रक्षेपक त्या देशात आहेत. आणि आता अणुबॉम्बच्या हजार पट क्षमता असणारे हायड्रोजन बॉम्ब बनवल्याचा दावा तो देश करतो. अमेरिकी तज्ज्ञांनुसार उत्तर कोरियाने विकसित केलेला पूर्ण क्षमतेचा हायड्रोजन बॉम्ब नाही. नसेलही. परंतु यानिमित्ताने तो देश हायड्रोजन बॉम्बनिर्मितीच्या जवळ पोहोचला आहे, हे मात्र निश्चित. त्याचमुळे त्याला आवरण्यासाठी जपान, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रे यांनी तातडीने हालचाल सुरू केली आहे. जपानच्या शांतीचा तर यामुळे कडेलोट झाला असून आपण एकतर्फी कारवाई करू असे जपान म्हणू लागला आहे. तसे झाल्यास ते अधिकच वाईट.

त्यामुळे पुढील समर प्रसंग टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रास हातपाय हलवावेच लागतील आणि तसे ते हलावेत यासाठी अमेरिकेच्या बराक ओबामा यांना सक्रिय व्हावे लागेल. सीरिया, इराक, अफगाणिस्तान आदी देशांत अमेरिकेने बघ्याची भूमिका घेतली. त्यांचे काय झाले ते दिसतेच आहे. तेव्हा लष्कराच्या भाकऱ्या भाजायच्या नाहीत हे ओबामा यांचे तत्त्व विचार म्हणून उत्तम, आदर्श असले तरी ते शांतताकालीन आहे. युद्धकालात ते बाजूस ठेवावे लागेल. इतकी वष्रे जगाची उठाठेव केल्यानंतर अशी निवृत्ती अमेरिकेस घेताच येणार नाही. आपली पापे नष्ट करावीच लागतील. उत्तर कोरिया हे असेच शीतयुद्धाचे पाप आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन त्याची विल्हेवाट लावावयास हवी.