काही मुठभर अतिरेकी संघटना आणि व्यक्ती यांमुळे सध्याचा संघर्ष निर्माण झालेला आहे, असे संघाच्या प्रवक्तयांनी म्हटले आहे. हिंदू असो वा मुसलमान वा ख्रिस्ती. अतिरेकी भूमिका नेहमीच या अशा शेपटाकडच्या संस्था वा व्यक्ती यांच्याकडूनच घेतल्या जात असतात. त्यामुळे जबाबदारी असते ती मध्यवर्ती नियंत्रकाची..

भारत हा देश दोन चेहऱ्यांचा आहे की काय अशी शंका यावी अशी सध्याची परिस्थिती आहे. त्याचा एक चेहरा हा मोठा गोड आहे. तो आधुनिक आहे. विकासाभिमुख आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या घोषणा ही त्याची ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जातात, आंतरराष्ट्रीय नेत्यांना भेटतात तेव्हा भारताचा जो चेहरा दाखविला जातो तो हा. दुसरा चेहरा मात्र भयाण आहे. भारत नावाच्या घटिताची बांधणी करण्यासाठी जे जे घटक आवश्यक होते आणि आहेत त्या त्या सर्व गोष्टींना नामशेष करू पाहण्याचा विडा जणू या चेहऱ्याने उचललेला आहे. तो जातीयवादी, कट्टर धर्मवादी आणि हिंस्र आहे. मोदी सरकारपुढे आव्हान आहे ते हा चेहरा उतरवून फेकून देण्याचे. परंतु मोदी यांची समस्या अशी आहे की त्यांना मुदलात ही अशी आव्हाने महत्त्वाची वाटत आहेत, असे वाटत नाही. वाटतात तेव्हा बराच वेळ गेलेला असतो. उत्तर प्रदेशातील दादरी येथील हत्या प्रकरणानंतरचे त्यांचे मौन हे त्याचेच उदाहरण. एरवी क्रिकेटपासून कोणाच्या वाढदिवसापर्यंत वरचेवर ट्विप्पण्या करणाऱ्या मोदी यांना दादरी प्रकरणावर साधी संवेदनाही व्यक्त करावीशी वाटू नये हे आश्चर्याचे आहे. आता मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या घटनेमुळे देशाची पुरती नाचक्की झाल्यानंतर मोदी सरकारच्या गृहखात्याने राज्य सरकारांना अशा घटनांबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना पाठविल्या आहेत. देशाच्या धर्मनिरपक्षतेची वीण उसविणारे आणि/किंवा धार्मिक भावना भडकावणारे यांची अजिबात गय करू नका, असे गृहमंत्रालयाने कळविले आहे. कायद्यानुसार कारवाई करताना समोर कोण आहे हेही पाहू नका, असेही त्यांनी सांगितले आहे. परंतु एकंदरच हा बैल गेल्यानंतर झोपा करण्याचा प्रकार आहे. येथील सर्वच धर्मातील कट्टरतावादी आता समोरासमोर आले आहेत. हिंदू कट्टरतावाद्यांना तर सरकार आपलेच असल्याचे वाटत असल्याने भलताच चेव आलेला आहे. मानसरोवरातील जल गोदावरीत टाकणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धर्मद्रोही असल्याचा आरडाओरडा करण्याइतपत हिंदूंचे सर्वोच्च धार्मिक नेते गणल्या जाणाऱ्या शंकराचार्याची मजल गेली आहे. दादरी येथील घटना ही तर या धार्मिक अतिरेकाचे टोकाचे उदाहरण. हे सर्व सुरू असताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारचे आता येथील धर्मनिरपेक्षतेबद्दलचे प्रेम उतू जाऊ लागले असेल, तर ते प्रेम पूतनामावशीचे आहे की काय ही शंका रास्त ठरते. गतवर्षी साधारणत: याच कालावधीमध्ये देशात ख्रिश्चनविरोधी वातावरण निर्माण करण्यात आले होते. संघ परिवारातील काही उटपटांग संस्थांच्या कार्यक्रम पत्रिकेवर तेव्हा घर-वापसी हा कार्यक्रम होता आणि त्याचे लक्ष्य जेवढा इस्लाम होता तेवढाच ख्रिश्चन धर्म होता. राजधानी दिल्लीत गिरिजाघरांवर हल्ले केले जात होते. अखेर त्यावरून, प्रजासत्ताक दिनी पाहुणे म्हणून बोलाविलेले अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कानपिचक्या दिल्यानंतर कुठे मोदी सरकारचे डोळे उघडले आणि मोदी यांनी त्या घटनांविरोधात तोंड उघडले. मोदी यांचा करिश्मा, त्यांच्या शब्दांस असलेले वजन पाहता त्यांच्या सूचनेनंतर त्यांचे भक्तगण आणि गणंग थंड व्हायला हवे होते. परंतु तसे झालेले नाही. बहुधा मोदी यांचे काय ऐकायचे आणि काय केवळ ऐकल्यासारखे करायचे याचेही आडाखे त्यांनी बांधून ठेवले असावेत. तेव्हा केंद्र सरकारने राज्यांना दिलेल्या या कडक सल्ला-सूचनांचा फार काही उपयोग होईल असे वाटत नाही.
मात्र धर्मनिरपेक्षतेला धोका केवळ अतिरेकी हिंदुत्ववाद्यांकडूनच आहे आणि बाकीचे सर्व अतिरेकी साव आहेत असे मानण्याचे कारण नाही. दादरी प्रकरणाचा आणि त्याही आधी गोमांस बंदीसारख्या संवेदनशील विषयाचा वापर हिंदू कट्टरतवाद्यांनी जेवढा धार्मिक ध्रुवीकरणासाठी चालविला आहे, तेवढाच तो मुस्लीम कट्टरतावाद्यांकडूनही केला जात आहे, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. धर्मनिरपेक्षतेची टाळी कधीही एका हाताने वाजत नसते हे येथे लक्षात घेतले पाहिजे. साध्वी प्राची किंवा तत्सम कोणी योगी वगैरे सनातनी मंडळींचा त्यांच्या भडक विधानांसाठी धिक्कार करताना हैदराबादी ओवैसी बंधू किंवा समाजवादी पक्षाचे आझम खान यांच्यासारख्या उल्लूमशालांना सेक्युलर पदराआड दडविण्याचे काहीही कारण नाही. या आझम खान यांनी आता संयुक्त राष्ट्राकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तक्रार केली आहे. संघाचे उद्दिष्ट भारताचे हिंदू राष्ट्र करणे हे आहे की नाही, हा वादाचा मुद्दा झाला. पण तो वाद संयुक्तराष्ट्रात नेणे हा तद्दन मूर्खपणा असून, तो समाजवादी पक्षाला शोभेल असाच आहे. या पुढाऱ्यांच्या अशा विधानांमुळे येथील धार्मिक ध्रुवीकरणाचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होत चालला असून, त्यांना आवर घालण्याचे काम येथील सुजाण, विचारी लोकांनाच करावे लागणार आहे. अशा समंजसांची संख्या आणि शक्ती कमी आहे. आवाज तोकडा आहे. त्यामुळे समाजमाध्यमांतील भडक जल्पकांचे डरावडरावही डरकाळीसारखे भासू लागले आहे. एकंदरच ही परिस्थिती कोणाही विचारी माणसाच्या छातीत धडकी भरेल अशी आहे. पण म्हणून सगळाच अंधार आहे असे नाही.
ठिकठिकाणी अजूनही काही समया तेवत आहेत. त्या मंद असतील. त्यांचा प्रकाश अवघे आसमंत उजळवणारा नसेल. परंतु आपल्या बाजूचा काळोख काही प्रमाणात का होईना कमी करण्याची ऐपत त्यांच्यात आहे. दुसऱ्या जातीचा वा धर्माचा घाऊक द्वेष न करणारे अनेक लोक आजही आपल्या आजूबाजूला आहेत. धर्मनिरपेक्षतेची उसवणारी वीण सांधण्याचे प्रयत्न ते वैयक्तिक पातळीवर करीत असतातच. काही धार्मिक मंडळीही त्यास आपला हातभार लावताना दिसतात. इस्लामिक स्टेटच्या जहरी तत्त्वज्ञानाला बळी पडून मुस्लीम तरुणाई वाया जाऊ नये यासाठी बंगळुरूमधील एका बडय़ा मशिदीचा इमाम उठतो आणि त्याविरोधात प्रचार करण्याचे आवाहन शहरातील सर्व मशिदींना करतो. अशा प्रकारच्या घटना खचितच आश्वासक आहेत. त्या अशासाठी की धार्मिक अतिरेकाच्या विरोधात लढणारे केवळ आपण एकटेच नाही, तेव्हा त्या अतिरेकाचा आवाज कितीही कानठळ्या बसविणारा असो त्याने घाबरून जायचे कारण नाही, असा दिलासा त्यांतून मिळतो. ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण अशा व्यक्ती आणि घटनांमुळेच अतिरेक हीच येथील एकमेव लोकमान्य विचारधारा नाही हे समाजाच्या लक्षात येत असते. त्याच वेळी रा स्व संघासदेखील दंगलखोरांना कानपिचक्या द्यावेसे वाटते हेदेखील महत्त्वाचे. परिवारातील शेपटाकडच्या.. फ्रिंज एलीमेंट.. काही मूठभर अतिरेकी संघटना आणि व्यक्ती यांमुळे सध्याचा संघर्ष निर्माण झालेला आहे, असे संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी काही वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखतीत नमूद केले. परंतु या आणि अशा संघटना आणि व्यक्तींना मुळात परिघावर तरी कोणी राहू दिले, हा प्रश्न आहे आणि त्याचेही उत्तर संघास द्यावे लागणार आहे.
यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे हिंदू असो वा मुसलमान वा ख्रिस्ती. अतिरेकी भूमिका नेहमीच या अशा शेपटाकडच्या संस्था वा व्यक्ती यांच्याकडूनच घेतल्या जात असतात. त्यामुळे जबाबदारी असते ती मध्यवर्ती नियंत्रकाची. शेपूट हे मुख्य देहाचा भाग असले तरी देहाचे नियंत्रण शेपटा हाती जाऊन चालत नाही. इंग्रजीत ‘टेल वॅगिंग द डॉग’ अशा अर्थाचा एक वाक्प्रचार म्हणजे कुत्र्याने शेपूट हलवायची असते, शेपटाने कुत्रा नव्हे. सध्या जे काही होत आहे ते दुसऱ्या प्रकारचे. मुख्य देहाने वेळीच याची दखल घेतलेली बरी.