राष्ट्रभक्तीचा अंगार, ऐतिहासिक घटना असे शाईफेकीचे समर्थन शिवसेना करीत असली, तरी त्या प्रकाराने शिवसेनेचे प्रतिमासंवर्धन न होता उलट या पक्षाचे राजकारण उघडे पडले..

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजक आणि ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकून कथित शिवसनिकांनी आपल्या पक्षभूत संस्कृतीचे जे दर्शन घडविले ते त्या शाईहून अधिक काळे आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना यामध्ये राष्ट्रभक्तीचा अंगार दिसतो आहे. याआधी ख्यातकीर्त गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमास विरोध करून शिवसेनेने आपला अंगार उधळला होता. तो प्रकार जितका निषेधार्ह होता तितकीच ही घटनाही आहे. अर्थात हे समजणे अनेक शिवसनिकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. धाकदपटशा आणि राडेबाजी हेच ज्यांच्यासाठी विचारांचे सोने असते त्यांना या अशा धांगडिधग्यात कोणतीही राष्ट्रभक्ती नसते हे कळणे अवघडच. मुळात अवघड प्रश्नांची सोपी उत्तरे हेच शिवसेनेचे प्रारंभीपासूनचे राजकारण राहिले आहे. कोणत्याही राजकीय- सामाजिक- आíथक विचारांचा अभाव असल्याने शिवसेनेचे राजकारण नेहमीच हे असे प्रतीकात्मकतेच्या आडोशाने वाढत आले आहे. पाकिस्तानी कलाकारांना, क्रिकेटपटूंना आणि आता राजकीय नेत्यांना, मुंबई वा महाराष्ट्रात विरोध हा त्याचाच एक आविष्कार. यावर अनेकांना प्रश्न पडेल, की सीमेवर पाकिस्तानी गोळ्या आपल्या जवानांचे बळी घेत असताना आपण त्यांच्या कलाकारांची गाणी ऐकत बसायचे का? त्यांच्या नेत्यांचे येथे आगत-स्वागत करायचे का?

प्रश्न अगदी बिनतोड वाटतो. शत्रुराष्ट्रातील नागरिकांना आपण का डोक्यावर घ्यायचे, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. ते समजून घ्यायचे तर पहिल्यांदा एक बाब नीट लक्षात घ्यावी लागेल, की पाकिस्तान हे काही आपले अधिकृत शत्रुराष्ट्र नाही. पाकिस्तानशी आपण व्यापार करतो. लासलगावचा कांदा पाकिस्तानात विकतो आणि येथे भाव वाढले की तेथील कांदा आपल्या स्वयंपाकघरात येतो. हा व्यापार केवळ कांद्याचाच नाही. तिकडे आपण अनेक गोष्टींची आयात-निर्यात करीत असतो. पाकिस्तानशी आपले राजनतिक संबंधही कायम आहेत. त्या राष्ट्राशी आपण विविध व्यासपीठांवरून चर्चा करतो. त्यांच्या पंतप्रधानांना आपले पंतप्रधान आपल्या शपथविधी समारंभाला मानाने बोलावतात. ती साडीचोळीची मुत्सद्देगिरी आपल्या देशातील सर्व राष्ट्रभक्तांनी डोळे भरून पाहिली आहे. पाकिस्तानातील शिष्टमंडळांचेही येथे जाणे-येणे असते. हे सर्व होत असतानाच ते राष्ट्र आपल्या विरोधात दहशतवादी कारवायाही करीत असते. सीमेवरील गोळीबार ही तर अधूनमधून नेमाने होत असलेली बाब आहे आणि पाकिस्तानच्या अशा सर्व कारवायांना आपणही नेहमीच जशास तसे प्रत्युत्तर देत असतो. आज आपल्याकडे ५६ इंचाची छाती आहे. पूर्वी नव्हती. तेव्हाही पाकिस्तानला आपण नमवले आहे. त्याची फाळणी केली आहे आणि सिंधपासून बलुचिस्तानपर्यंत त्याच्या नाकीनऊ आणलेले आहेत. ज्या ज्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून शक्य झाले तेथे तेथे पाकिस्तानच्या दहशतवादी प्रवृत्तीचे आपण वस्त्रहरण केले आहे. पण हे सर्व सुरू असताना आपण पाकिस्तानबरोबरचे संबंध तोडलेले नाहीत. याचा अर्थ आपले केंद्रातील नेते आणि मुत्सद्दी ही मंडळी शिवसेनेच्या राष्ट्रवाद्यांहून कमी राष्ट्रवादी आहेत असा लावायचा का? तीनच महिन्यांपूर्वी, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग केला जात असताना, धमक्या दिल्या जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली, तेव्हा मोदी यांना सीमेवर सांडलेल्या जवानांच्या रक्ताचा विसर पडला असे मानायचे का? ते तसे असेल तर राष्ट्रभक्त शिवसेना मंत्रिमंडळातून बाहेर का पडली नाही? आणि आज समाजमाध्यमांतून सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर आणि त्यांना सहानुभूती दर्शविणाऱ्या नागरिकांवर अश्लाघ्य टीका करणाऱ्यांची तोंडे तेव्हा मोदींवर का सुटली नव्हती?

आणखी एक मुद्दा. तो सुधींद्र कुलकर्णी यांच्याबद्दल. त्यांचे तोंड काळे करण्याचा निर्बुद्धपणा करून सेनेने उलट त्यांना प्रकाशझोतात आणले आहे. कुलकर्णी हे कोणी गांधीवादी वा विचारवंत नव्हेत. भडक लाल ते भगवा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे आणि सध्या ते धनाढय़ मुकेश अंबानी यांच्या छत्रछायेखालील संस्थेच्या उबदार वातावरणातून आपले विचारधन उजळू पाहात आहेत. कुलकर्णी यांची दुसरी ओळख म्हणजे ते वाजपेयी मंत्रिमंडळात लालकृष्ण अडवाणी यांचे सल्लागार होते. अडवाणी हे पाकिस्तान भेटीनंतरच्या ज्या मोहम्मद अली जीना यांच्या संदर्भातील ज्या शब्दसालीवरून घसरले ती कुलकर्णी यांनीच त्यांच्या समोर टाकलेली होती. तेव्हा कुलकर्णी यांचे पाकिस्तान प्रेम तसे जुनेच. खेरीज, उच्चभ्रू वर्तुळात आणि चॅनेलीय चर्चात विचारवंत म्हणून गणना व्हावी यासाठी आपल्याकडे भारत-पाक संबंधांबाबत पाकिस्तानचा, तेथील व्यक्तींचा उदोउदो करणे ही प्राथमिक अट आहे. सर्व रंगांचे कुडते घालून झाल्यावर कुलकर्णी यांना हे उमगल्याने त्यांनी आपले बुद्धिकौशल्य या दिशेने वळवले. त्याचाच एक भाग म्हणून आपापल्या प्रदेशातील समाजजीवनात काडीचेही स्थान नसलेले भारत आणि पाकिस्तानातील बोलघेवडे एकमेकांचा पाहुणचार झोडत आपल्या आपल्यातच एकमेकांना चार उपदेशाचे डोस पाजत असतात. त्यांचे ना कोणी ऐकते ना त्यांना कोणी विचारते. कसुरी यांचा ताजा कार्यक्रम हा त्याचाच भाग होता. त्यामुळेच त्याची दखल घ्यावी इतकाही तो महत्त्वाचा नव्हता. तो घडल्याने भारत आणि पाकिस्तान संबंध संदर्भातील वास्तवात तसूभरही फरक पडणार नाही. परंतु तो उधळला गेल्याने मात्र निश्चित फरक पडला असता. भारतातही किती असहिष्णू प्रवृत्ती आहेत, ते दाखवून देण्याची संधी यामुळे पाकिस्तानला हकनाक मिळाली असती.

जे झाले, त्यामुळे शिवसेनेचेही नाक कापले गेले. यजमानाच्या तोंडावर काळे फेकण्याखेरीज सेनेचे मर्दमराठे काहीही करू शकत नाहीत, हेही त्यातून दिसले आणि या पक्षाच्या धमक्यांना कवडीचीही किंमत स्थानिक पातळीवर नाही, हेही जगास कळले. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला. या कथित बालेकिल्ल्यात सेनेच्या डरकाळीने अनेकांचा थरकाप व्हायला हवा. तसे काहीही झाले नाही. कार्यक्रम बिनविरोध पार पडला. जे काही झाले त्यामुळे उलट कुलकर्णी यांचे प्रतिमासंवर्धन झाले आणि सेनेचा प्रतिमासंकोच. तेव्हा विचार केला असता तर आपल्या आंदोलनाची निरुपयोगिता सेना नेत्यांना स्वत:लाच समजली असती. कुलकर्णी यांच्या तोंडास काळे फासणे ही ऐतिहासिक घटना होती, असे सेनेची तिसरी पिढी कु. आदित्य यांचे मत आहे. आता हीच त्यांच्या विचारांची झेप असेल तर सगळाच आनंद.

शिवसेना महाराष्ट्रात प्रत्यक्षपणे सत्तेवर आहे आणि अप्रत्यक्षपणे केंद्रातील सत्तेचा भाग आहे. पण ही सत्ता असून नसल्यासारखीच. कारण या दोन्ही ठिकाणी सत्तेचे म्हणून जे काही फायदे असतात ते सेना नेत्यांच्या पदरात पडत नाहीत. दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र यांची व्यवस्थाच अशी आहे. तेव्हा अशा वेळी आपल्याकडे लक्ष वेधण्याचा मार्ग यापेक्षा सेनेने जे काही केले त्यास महत्त्व देता येणार नाही. ते त्यास करावेसे वाटले कारण सेनेतील चूल पेटण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई इलाख्यात सध्या निवडणुकांचा हंगाम आहे. मुंबई पट्टय़ातील कोणत्याही शहरातील निवडणूक म्हणजे शिवसेनेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असतो. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक ही त्यातील एक. ती निवडणूक जिंकायचीच असा चंग सेनेने बांधला आहे. कारण ती हातून गेली आणि भाजप बळकट झाला, तर त्या शहरातील तूपही गेले आणि राज्यातील सत्तेचे तेलही गेले अशी आपली अवस्था होणार असल्याचे शिवसेना जाणून आहे.

त्यामुळेच ही ताजी मर्दुमकी दाखवण्याचा मोह सेना नेत्यांना झाला. सीमेवरील जवानांच्या रक्ताचा राजकीय वापर करीत इकडे मुंबईत सेनेकडून शाईहल्ला होतो आणि सेना आपल्या मुखपत्रातूनही शाई नासवते, ती त्यामुळेच. त्यामुळे या उटपटांग कृतीकडे राष्ट्रवादाच्या चष्म्यातून पाहणे ही राष्ट्रवादाशीच केलेली प्रतारणा ठरेल. त्याला फार तर शिव-शाईचा स्वार्थवाद म्हणता येईल!