सियाचेनच्या वादळातून अमर्त्य राहिलेल्या लान्स नाईक हणमंतप्पा यांचे कौतुकच. परंतु सियाचेनचा पहारा मर्त्यांसाठी किती जिकिरीचा आहे हेही विचारात घ्यावे..
दोन्ही देशांच्या राजकीय नेत्यांनी कधी ना कधी सियाचेनमधील पहाऱ्याच्या निर्थकतेला भिडण्यातून त्यावर काही उपाय निघू शकेल.. तो व्हावा, याचे कारण तेथील परिस्थिती..
लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड यांच्या विजिगीषु वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच पडेल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाशी प्रत्येक भारतीय सहमत होईल. सलग सहा दिवस बर्फाच्या डोंगराखाली राहूनही प्राण न सुटू देणे हे काळीज सिंहाचे असल्याखेरीज शक्य नाही. सियाचेन येथील अमानवी वातावरणात गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांच्या डोक्यावर त्या गौरीशंकराचाच घाला पडला आणि दहा जणांची तुकडी त्या बर्फाखाली जिवंत गाडली गेली. हे असे झाले की मरण हेच अंतिम सत्य असते. याचे कारण शून्याहून ५० अंशांपेक्षाही खाली जाणाऱ्या तपमानात माणसाचे अस्तित्व गोठून जात असते. या वातावरणात कोणतीही जीवसृष्टी नाही. ती असूच शकत नाही. या वातावरणात शरीराचा कोणताही अवयव नैसर्गिक वातावरणास सामोरा गेला तर तो प्राणहीन होतो आणि एखाद्या झाडाची वठलेली फांदी जशी तोडावी लागते तसा तो शरीरापासून तोडावा लागतो. त्यामुळे संपूर्ण शरीर सदासर्वकाळ विशिष्ट पद्धतीने आणि प्रकारच्या साधनसामग्रीने बनवण्यात आलेल्या वस्त्रांत झाकूनच ठेवावे लागते. त्यामुळे आपल्या देहाचेच ओझे वागवताना जगणे नकोसे होत असते. त्यात पुन्हा पहारा देण्याची जबाबदारी. वातावरणात पुरेसा प्राणवायू नाही. साधी पंधरा मिनिटे जरी शरीराची हालचाल झाली की श्वास राहतो की जातो, अशी परिस्थिती. त्यामुळे आराम करावा लागण्यास पर्याय नसतो. ऊन आल्यावर बरे वाटेल, असे म्हणावे तर तेही नाही. कारण त्या डोंगरावरील हिमाच्छादित शिखरांतला सूर्य हादेखील पेन्शनीत निघाल्यासारखा असतो. त्याच्या प्रकाशातली ऊर्जादेखील गोठलेलीच असते. शिवाय दुसरे असे की सगळीकडच्या बर्फाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे हिमबिंदूवर पडून अधिकच चकाकतात आणि उलट त्यामुळे नेत्रपटलास इजा होते. तेव्हा सूर्य तेथे नसला तरी खोळंबा नाही, पण असला तर मात्र अडचणच. खाणे-पिणे आदी जीवनावश्यक क्रियांचा तेथे विचारही करता येत नाही. त्यात पुन्हा पायाखाली जे काही आहे, त्याचाही भरवसा नाही. ही बर्फाची भूमी कधी खचेल याचा नेम नाही आणि मागे वा पुढे दिसतो तो बर्फाचा डोंगर स्थानभ्रष्ट होणारच नाही याची काहीही शाश्वती नाही. हे कमी म्हणून की काय मनाला येईल तेव्हा सुटणाऱ्या हिमवादळांचा धोका. अशा ठिकाणी केवळ जगणेच हेच आव्हान असते. पण तरीही लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड बर्फाच्या ढिगाऱ्याने गिळंकृत केल्यानंतरही सहा दिवस जिवंत राहिले हे केवळ त्यांची मनोवृत्ती अनादि मी अनंत मी, अवध्य मी खरा.. अशी असल्याखेरीज शक्य नाही. परंतु अशी वृत्ती आणि त्या अनुषंगाने शारीरिक क्षमता असणाऱ्या व्यक्ती या अपवादात्मक असतात. त्यांच्या अमर्त्य वृत्तीने इतरांचे मर्त्यपणच सिद्ध होत असते. त्यामुळे विचार करावयाचा तो सर्वसामान्य मर्त्यांच्या नजरेतून.
तो केल्यास प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर एक तरी बाब चमकून जाईल. ती म्हणजे सियाचेन परिसरात भारत आणि पाकिस्तान यांच्यातला निर्थक संघर्ष. १९४९ साली २७ जुलस भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू-काश्मीर संदर्भातील कराची करार झाला. युद्धबंदी करार म्हणून ओळखला जातो तो हाच. त्यानुसार या दोन देशांतील तज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांची समिती यांनी युद्धबंदी रेषा आखली. त्या वेळी जम्मूतील चंबा येथून सुरू होणारी ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आजही जवळपास ५०० मल उत्तरेला जात काराकोरम पर्वतराजीपर्यंत येऊन थांबते. परंतु येथून ते चीनपर्यंतचा प्रदेश हा अत्यंत खडतर आहे. इतका खडतर की मानवी गरजा आणि आशा-आकांक्षांचा स्पर्शदेखील त्यास होणार नाही, असे मानले जात होते. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैमनस्याने ते खोटे ठरवले. ही चिंचोळी साधारण पन्नासभर मलांची पट्टी सियाचेन प्रदेश म्हणून ओळखली जाते आणि तिच्यावरील कथित मालकी हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षबिंदू होऊन राहिलेला आहे. येथील अलीकडच्या काराकोरम पर्वतराजीपर्यंत येऊन थांबलेली नियंत्रण रेखा अशीच पुढे जाते असा भारताचा दावा आहे आणि ती तेथेच थांबते असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या दाव्या-प्रतिदाव्यांत कोणताही तोडगा काढण्यात उभय देशांना अद्यापही यश येत नसल्यामुळे या शापित हिमभूमीचे निष्कारण रक्षण करावयाची वेळ उभय देशांवर येते. परंतु तेथे सन्यनियुक्ती किती निर्थक आहे, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केलेले आहे. चार वर्षांपूर्वी याच परिसरात पाकिस्तानची जवळपास १५० जणांची संपूर्ण तुकडीच हिमवादळाने गिळंकृत केली. त्या वेळी हा अपघात इतका गंभीर होता की अमेरिकेला पाकिस्तानच्या मदतीसाठी सन्य आणि साधनसामग्री पाठवावी लागली. मुळात जगण्यालायक नसलेले येथील वातावरण हिवाळ्यात अधिकच जीवघेणे होते आणि परिस्थिती बऱ्याचदा हाताबाहेर जाते. आताही तेच झाले. हिमवादळात नक्की कोठे भारतीय जवान अडकलेले असू शकतील याचा अंदाज घेण्यात आधी बराच वेळ गेला आणि नंतर त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक ती यंत्रसामग्री सुटी करून पाठवावी लागली. असे करावे लागले कारण तेथे सोयीचा विमानतळ नाही. परिणामी हेलिकॉप्टर्सच्या साहय़ाने हा पुरवठा करावा लागला. अशा वेळी साधनसामग्री वाहन क्षमतेवरही मर्यादा येतात. तसेच झाले. अशा वेळी अशा वातावरणात काही नैसर्गिक आपत्ती आलीच तर तेथे असलेल्यांचा जीव वाचण्याची शक्यता सुतराम नसते.
त्याचमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आपल्या सियाचेन बंदोबस्ताचा आज ना उद्या फेरविचार करावाच लागेल. येथे सन्य ठेवणे नुसते अवघडच नाही तर प्रचंड खर्चीकदेखील आहे. याचाही विचार करणे गरजेचे आहे. भारत वर्षांला साधारण ३० कोटी डॉलर इतकी रक्कम फक्त सियाचीन येथील चौक्यांसाठी खर्च करतो. रुपयांत पाहू गेल्यास हा खर्च दिवसाला साधारण सहा कोटी इतका आहे. आपल्या तुलनेत पाकिस्तानला सियाचेनसाठी करावा लागणार खर्च कमी आहे. कारण अर्थातच भौगोलिक रचना. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता ही रक्कम फार काही भार वाटावा अशी नाही, हे मान्य. परंतु म्हणून ती निर्थक ठरत नाही, असे नाही. या संदर्भात एक दाखला देणे गरजेचे ठरते. राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना सियाचेनविषयी पाकिस्तानशी चर्चा झाली. त्या वेळी त्यानिमित्ताने काही वार्ताहरांनी सियाचेन परिसरात प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थिती समजावून घेतली असता त्या वेळी एक जवान म्हणाला: बेनझीर आणि राजीव गांधी यांनी एक दिवस जरी येथे व्यतीत केला तरी या प्रश्नावर आपोआप तोडगा निघेल. त्यांच्या या म्हणण्यातून अधोरेखित झाले ते सियाचेन परिसरातील अघोरी वास्तव.
हणमंतप्पा कोप्पड यांची जी काही अवस्था झाली आहे तीमुळे तेच पुन्हा समोर आले. काही वर्षांपूर्वी पाक सनिकांवर अशीच वेळ आली होती. आता आपल्यावर. अशा वेळी या दोन्ही देशांचे नेतृत्व या वास्तवाकडे किती काळ काणाडोळा करणार? आज ना उद्या सियाचेनच्या निर्थकतेस दोन्ही देशांना भिडावेच लागेल. हणमंतप्पा यांचे वाचणे आणि अन्य नऊ जवानांचे जाणे उभय देशांना याचीच आठवण करून देणारे आहे. हणमंतप्पा यांचे प्राण वाचावेत म्हणून प्रार्थना करणे ठीकच. परंतु हणमंतप्पा यांच्यावर आलेली वेळ पुन्हा अन्य कोणावर येऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तरच आपल्याला जे भोगावे लागले ते हकनाक नव्हते असे वाटून हणमंतप्पा यांच्या जखमा भरून येतील.