18 August 2017

News Flash

छद्मविज्ञानाचा कुटिरोद्योग

आपल्या पूर्वजांनी विमाने कशी उडविली, जनुकीय अभियांत्रिकी आणि क्लोनिंग कसे पहिल्यांदा शोधून काढले

मुंबई | Updated: December 19, 2015 2:29 AM

गेल्या वर्षी परिषदेतील एका चर्चासत्रात एका माजी वैज्ञानिकाने भारतात पूर्वी विमाने उडत असल्याचा दावा केला.

आपल्या पूर्वजांनी विमाने कशी उडविली, जनुकीय अभियांत्रिकी आणि क्लोनिंग कसे पहिल्यांदा शोधून काढले किंवा आपली मिथके म्हणजे कशा विज्ञानगाथाचा आहेत, अशा बढाया माराव्याशा कुणाला वाटल्यास जरूर माराव्यात. मात्र विज्ञानसंशोधकांच्या चर्चेत वैज्ञानिक तथ्यांचीच चर्चा व्हावी, ही साधी अपेक्षा आहे. तीही पूर्ण होत नसेल तर आपल्या विज्ञान-संशोधनाचे काय होणार, हा चिंतेचा विषय असायला हवा..

आपल्याकडे प्राचीन काळी दूरचित्रवाणी होते, दूरध्वनी होते, आकाशवाणीचे बहुधा मथुरा केंद्र होते, झालेच तर अणुबॉम्ब, क्षेपणास्त्रे, टेस्टटय़ूब बेबी, क्लोनिंग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमाने होती, अशा प्रकारचे दावे या वर्षी किमान भारतीय विज्ञान परिषदेच्या मंडपात तरी ऐकू येणार नाहीत, हे विज्ञान, त्याचा भारतीय इतिहास आणि वैज्ञानिक या सर्वावरील मोठे उपकारच मानावे लागतील. गेल्या वर्षी मुंबईत झालेली विज्ञान परिषद अशा प्रकारच्या अवैज्ञानिक दाव्यांनी भलतीच गाजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताभिषेकानंतर देशात सांस्कृतिक राष्ट्रवादाची जी नव-अतिरेकी पहाट अवतरली, तिचेच प्रतिबिंब त्या परिषदेत उमटले होते. ते अर्थात स्वाभाविकच होते. आपल्याकडे पूर्वी प्लास्टिक शल्यचिकित्सा आणि जनुकीय अभियांत्रिकी होती. गणपती आणि कर्णजन्म ही त्याची उदाहरणे, असे खुद्द पंतप्रधानांनीच मुंबईतील वैद्यकजगतासमोर घोषित केल्यानंतर अशा प्रकारच्या छद्मविज्ञानकथांना राजमान्यता असल्याचे गृहीत धरले जाणे साहजिकच होते. यंदा मात्र विज्ञान परिषदेत अशा प्रकारच्या पुराणांतल्या वानग्यांना स्थान न देण्याचा निर्णय परिषदेच्या कारभाऱ्यांनी घेतला आहे. गेल्या वर्षी अशा गोष्टींमुळे परिषदेची नाचक्की झाली होती. तेव्हा यंदा हे होणे अपेक्षितच होते. परंतु बहुधा भारतीय विज्ञान क्षेत्राचे झाले तेवढे हसे पुरेसे नसल्याचे काही अतिराष्ट्रवाद्यांना वाटले असावे. त्यामुळे यंदाही परिषदेत असे पुराणगौरवगानपर परिसंवाद भरवावेत याकरिता भारतीय विज्ञान परिषद संघटनेचे अध्यक्ष अशोककुमार सक्सेना यांच्यावर दबाव आणण्यात येत होता. त्यांनी तो झुगारला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करावयास हवे. त्यांच्या या निर्णयामुळे परिषदेस गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त होईल आणि भारतीय विज्ञानविश्व विज्ञानाचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे अधोरेखित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र त्याचबरोबर यानिमित्ताने एका बाबीची चर्चा झाली पाहिजे. ती म्हणजे, विज्ञान परिषदेने गतवर्षी आपली प्रतिष्ठा अशा प्रकारे का पणास लावली? याचे कारण वैज्ञानिकांच्या या शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास असलेल्या परिषदेचे अशा प्रकारच्या सांस्कृतिक-सामाजिक दबावांपुढे झुकणे याचा संबंध थेट भारतीय विज्ञान क्षेत्राच्या दुखण्याशी आहे. हे दुखणे एक देश म्हणून आपणांस परवडणारे नाही.
गेल्या वर्षी परिषदेतील एका चर्चासत्रात एका माजी वैज्ञानिकाने भारतात पूर्वी विमाने उडत असल्याचा दावा केला. तो काही आता केला जात आहे असे नाही आणि यापुढे तो करण्यावर बंदी असेल असेही नाही. जुन्या काळी आमच्याकडे सगळेच होते, अशी पुराणगीते गाणे हा आपला ऐतिहासिक नाकर्तेपणा झाकण्याचा उत्तम मार्ग आहे. आपले पूर्वज द्रष्टे होते, ज्ञानी होते यात अणुमात्र शंका नाही. सिंधू संस्कृतीसारखी तेव्हाची अत्यंत प्रगत संस्कृती निर्माण करणाऱ्या, रामायण-महाभारतासारखी उत्तमोत्तम काव्ये रचणाऱ्या, शून्याचा शोध लावणाऱ्या आणि आयुर्वेद, योग यांसारखी शास्त्रे रचणाऱ्या आपल्या पूर्वजांचा अभिमान बाळगलाच पाहिजे. पण आपल्या त्या पूर्वजांनी जे दिले ते आपण का आणि कसे गमावले याचाही विचार आपण विवेकी आणि तर्कशुद्ध पद्धतीने केला पाहिजे. अणुबॉम्ब तयार करणारा, विमाने उडविणारा, पृथ्वीपासून सूर्याचे योग्य अंतर मोजणारा असा आपला समाज होता असे मानले, तर आक्रमकांच्या तलवारींना तो आपले पाणी का दाखवू शकला नाही याचेही उत्तर आपणांस देणे भाग आहे. परंतु तसे न करता आमचे बापजादे कसे विश्वगुरू होते असे म्हणत मिशीचे आकडे पिळायचे आणि काल्पनिक कारणे सांगत आपले आजचे पराभव झाकायचे ही प्रवृत्ती न्यूनगंडातून येत असते. ते गंड कुरवाळण्यात ज्यांना सुख मिळते ती मंडळी पुराणकथा आणि मिथके यांच्यावर आधुनिक विज्ञानाचे मुखवटे चढवत राहणारच आहेत. मुद्दा त्या प्रवृत्तीपुढे झुकण्याचा आहे. विज्ञान परिषदेचे अधिवेशन म्हणजे काही महाविद्यालयीन वार्षिक स्नेहसंमेलन नसते, की जेथे हौशी कलाकारांचे मनोरंजनाचे कार्यक्रम व्हावेत. जगभरात विज्ञान क्षेत्रात काय सुरू आहे यावर संमेलनात चर्चा व्हावी, विज्ञानविचारांचे आदानप्रदान व्हावे हा या परिषदेचा मुख्य हेतू. त्या दृष्टीने या परिषदेस अनेक नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांनाही आमंत्रित केले जाते. पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत देशाचे प्रत्येक पंतप्रधान आजवर या परिषदेस उपस्थित राहिले आहेत. परिषदेचा संबंध विज्ञान मंत्रालयाशी असतो वा हा प्रतिष्ठित मंच आहे म्हणून ते उपस्थित राहत नसतात, तर देशाच्या आशा-आकांक्षा, अपेक्षा विज्ञान क्षेत्रापर्यंत पोचाव्यात हा त्यामागील हेतू असतो. अशा परिषदेत मांडला जाणारा प्रत्येक संशोधननिबंध हा आधी तपासूनच घेतला जातो. त्याचे सार आधी प्रसिद्ध केले जाते. असे असतानाही गतवर्षी चर्चासत्रात छद्मविज्ञान मांडणारा निबंध वाचला गेला, याचे दोनच अर्थ असू शकतात. एक तर परिषदेच्या धुरिणांनाही त्यात काही वावगे वाटले नाही किंवा त्या शोधनिबंधाचा समावेश करावा यासाठी परिषदेवर दबाव होता. ‘मी यंदाही तशा – म्हणजे वैज्ञानिक आधार नसलेल्या किंवा कथाकथनात्मक बाबींचा समावेश करण्यासाठीच्या – प्रयत्नांना जोरदार विरोध केला,’ असे सक्सेना सांगतात. त्यातील ‘यंदाही’ हा शब्द लक्षात घेण्यासारखा आहे. हा प्रयत्न कोणाकडून झाला किंवा होत आहे याबद्दल त्यांनीच मौन बाळगले असल्याने त्याबाबत केवळ अंदाज व्यक्त करणे एवढेच प्रत्येकाच्या हाती राहते. मात्र या घटनेतून विज्ञान क्षेत्राकडे पाहण्याचा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोन नेमका अधोरेखित होत आहे. विज्ञान हे आपल्या राजकीय, सामाजिक वा सांस्कृतिक कार्यक्रम पत्रिकेचे वहन करण्याचे साधन मानले जात असेल, तर ती गोष्ट अंतिमत: विज्ञानालाच घातक आहे. याचे भान येथील राजकीय क्षेत्राला नसणे हे समजण्यासारखे आहे. ते विज्ञान क्षेत्राने मात्र गमावता कामा नये. राहता राहिला मुद्दा विज्ञान आणि पुराणकथांचा. या पुराणकथा म्हणजे आपले राष्ट्रीय संचित आहे. समाजाला सांस्कृतिक ऊर्जा देण्याचे काम त्यातून होत असते. त्यातील मिथकांमध्ये इतिहास शोधू गेल्यास मात्र फसगत होण्याचीच शक्यता असते. याचे कारण सत्य आणि कल्पित यांचे ते बेमालूम मिश्रण असते. रामायणामध्ये विमानाचे किंवा महाभारतामध्ये अणुबॉम्ब स्फोटासारखे वर्णन येते याचा अर्थ त्या काळालाही याचे विज्ञान माहीत होते असा करायचा नसतो. त्याचा अर्थ एवढाच असतो की या कथा रचणाऱ्या कवींची कल्पनाशक्ती अफाट होती. भूस्थिर उपग्रह वा आजच्या आयपॅडची वर्णने ज्यूल्स व्हर्न यांच्या कादंबऱ्यांत वाचावयास मिळतात तेव्हा त्याचा अर्थ ते तेव्हाचे वास्तव होते असा घ्यायचा नसतो. तसेच हे. प्राचीन काळी भारताने मोठी वैज्ञानिक प्रगती केली होती हे खरेच आहे. पण त्यानंतर विज्ञान अनेक योजने पुढे आले आहे. आज प्लास्टिक शल्यचिकित्सेसाठी सुश्रुताकडे जाण्याची आवश्यकता नसते.
पण म्हणून कोणी भारतातील प्राचीन ज्ञान फेकून द्या असे म्हणणार नाही. त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यात अधिक भर कोणी घालत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. परंतु ते करण्याऐवजी केवळ पुराणकथांतून छद्मविज्ञान शोधण्याचे कुटिरोद्योग चालविले जातात आणि आधुनिक ज्ञानाबाबत मात्र तिरस्काराची भावना पसरवली जाताना दिसते. नागरिकांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याआड येणारी ही प्रवृत्ती बळावताना दिसत आहे. या दुखण्याचा सामना करणे हे शतकी परंपरेच्या विज्ञान परिषदेला जड जाता कामा नये. त्याचा श्रीगणेशा या अधिवेशनापासून नव्याने व्हावा हीच सर्वाची अपेक्षा असेल.

First Published on December 19, 2015 2:29 am

Web Title: 2015 indian science congress ancient aircraft controversy
 1. M
  MANGESH
  Dec 20, 2015 at 9:18 am
  आपल्या देशात विमाने उडत होती तर मग सीतेला आणण्यासाठी समुद्रावर पूल का बांधावा लागला? जर मंत्रातान्त्राणि आणि नवसांनी मुले जन्माला घालता येत होती तर मग जनुकीय अभियांत्रिकीचा प्रश्नच कोठे येतो. वैज्ञानिक हे कोणत्याही रीतीने पुर्व्ग्रदुशीत असता कामा नये. सिंधू संकृती हि जम्बुद्विपावर राहणाऱ्या स्थानिक लोन्कांची होती. आपण एखादी गोष्ट जशीच्या तशी पाहायला कधी शिकणार कोण जाने?
  Reply
 2. N
  nitin
  Dec 19, 2015 at 3:34 pm
  आपल्या भरतात काही लोकांच्या विचार सर्नीची कीव करविशी वाटते त्यांना असे वाटते य कि भारतात कधीच आणि काहीच नव्हते आणि कुठला हि शोधतर लागलाच नवता सगळे काही पाश्चात्य लोकांनीच शिकवले ज्यावेळेस आजच्या विद्यानाच्याही पलीकडे विचार करणाऱ्या तत्वज्ञानाचे चिंतन व चर्चा भारतात घडायच्या त्यावेळेस ह्या पाश्चात्यांना कपडे घालायची सुद्धा अक्कल नव्हती हे आपण भारतीय संस्कृती वर टीका करताना लक्षात ठेवायला हवे मग आजची अवस्था का यावी ती आपल्याच सारख्या पश्चात्याभिमानी लोकांमुळेच .....
  Reply
 3. V
  Vachak
  Dec 20, 2015 at 4:08 am
  पुराणातली वांगी पुराणात. आज भारत सायन्समध्ये झिरो आहे हे कटू वास्तव आहे. उगाच नाही गेल्या वीस वर्षात तरुण मुले सायन्सऐवजी कॉमर्स शाखेकडे प्रवेश घेत आहेत.
  Reply
 4. R
  Ramdas Bhamare
  Dec 19, 2015 at 4:12 am
  गतवर्षी चर्चासत्रात जो छद्मविज्ञान मांडणारा जो शोधनिबंध वाचला गेला त्यात जपानला बुलेट ट्रेन चे सर्व तंत्रज्ञान आणि आर्थिक मदत काही हजार वर्षांपूर्वी आपणच पुरविली होती हे सांगायचे राहून गेले होते . आपण केलेल्या उपकराला थोडेफार उतराई होण्याच्या उद्देशाने जपान आता आपल्याला बुलेट ट्रेन साठी मदत करीत आहे. इतर देशांच्या अर्थव्यवस्था सुरळीत चालू राहाव्या म्हणून आम्ही आमचे सारे ज्ञान झाकून ठेवले आहे आणि अविकसित राष्ट्र झालो आहोत हे तरी मागासलेल्या जगाला समजलेच पाहिजे .
  Reply
 5. V
  vijay
  Dec 19, 2015 at 7:44 am
  १.आधुनिक विज्ञान परिपूर्णतेचा दावा करत नाही,करूही शकत नाही.२.मुद्दा १ मुळेअशा विज्ञानाच्या सध्याच्या अभ्यासकांच्या ज्ञानाला पटणार नाही ते सगळे खोटे असे मानण्याची घोडचूक जग भर केली जात आहे.हे आताच नाही,इतिहासात झाल्याचे सुद्धा असंख्य दाखले आहेत.३. मुद्दा १ आणि २ मुळे असा प्रश्न उपस्थित होतो की एखादी घटना झाली किंवा नाही हे ठरवण्यास कोणता निकष उपयुक्त मानला जावा?विज्ञान का केवळ व्यवस्थित जपलेले दस्त?४. मौखिक परंपरा समाधानकारक मानल्याने भारतातील अनेक क्षेत्रांचे ज्ञान काळाच्या ओघात लुप्त झाले असावे
  Reply
 6. R
  Rohit Apurva
  Dec 20, 2015 at 8:19 am
  if it goes from East you people called its Supersion... but if it comes from West you called its Science
  Reply
 7. S
  SAM
  Dec 24, 2015 at 5:29 pm
  भुत काळात काय होत आता काय आहे हे स प्रमाण सिद्ध करता यायला पहिझ्जे हे बरोबर आहे पण अस्तित्व नाकारण्यासाठी देखील फक्त तर्काचा उपयोग नको तर योग्य उत्तर हवे आता नाही म्हणून पूर्वी देखील नव्हते असे कोणी म्हणू नये... तसे आल्या भारतीय चित्ता कधीच ईहास जमा झालाय पण वर्णने मात्र सुंदर आहेत...ti
  Reply
 8. S
  Sanjayb
  Dec 20, 2015 at 8:04 am
  पूर्वजांनी काही कल्पना केल्या असतील तर त्यांना नक्कीच पुढील मानवी अकाक्षांचा ईच्छांचा पाया म्हणता येईल.बाकीच्या संसकृती नूसत्याच हवेत असताना विमान नावाची कल्पना व संज्ञा भारतीयांनी प्रचलीत केले होती ही छोटी गोष्ट नाही.
  Reply
 9. S
  Shailesh
  Dec 19, 2015 at 6:01 am
  संपादकांचा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित असल्याचे स्पष्ट जाणवते. तुम्ही मूळ वादात हात घालावा. महाभारत आणि रामायण हे फक्त काव्य नसून तो इतिहास आहे. हा इतिहास मान्य करण्यास पाश्चात्य जग तयार नाही आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे तुम्हीही त्यांचीच री ओढता. जर इतिहास मान्य केलात तर त्यांनी लावलेले शोधही मान्य करावे लागतील. जर इतिहास न मानत त्यास फक्त काव्य मानले तर तुम्ही म्हणता ते योग्य असू शकते. आणि त्या इतिहासास मानणे म्हणजे आधुनिक विज्ञानाचा तिरस्कार करणे हे अगदीच न पटणारे विधान आहे.
  Reply
 10. N
  narendra
  Dec 20, 2015 at 5:28 am
  रामायण महाभारत ह्याला ५ ते ७ स्र वर्षे झाली त्या वेळेस विमान इत्यादी गोष्टी नव्हत्या हे देखील म्हणणे बरोबर नाही.आता दायानासोर इत्यादी गोष्टी होत्या पण कालाच्या ओघात काय काय घडले असेल हे आपल्याला माहित नाही त्यामुळे पूर्वी अस्तित्वात असलेल्या गोष्टी नैसर्गिक कोपामुळे होत्याच्या नव्हत्या झालेल्या असू शकतात.त्यावर विश्वास ठेवला म्हणजे आजच्या विज्ञानाला किंमत नाही असे कोणीच म्हणणार नाही.आणि वैद्न्यानिक दृष्टीकोन त्यामुळे दुषित होण्याचे कारण नाही.
  Reply
 11. M
  mahesh vichare
  Dec 19, 2015 at 6:39 am
  इतिहासात आणि भविष्यात रमणारा समाज व व्यक्ती कधी प्रगती करू शकत नाही कारण काळ परत येवू शकत नाही व भविष्यकाळ आपल्याला माहित नसतो.काळापासून प्रेरणा जरूर घेता येते आणि झालेल्या चुका समजून घेतल्या तर वर्तमानात त्या सुधारल्या जावू शकतात त्यातून सुंदर वा वाईट भविष्य घडवता येते ,हे समजायला काही शास्त्रज्ञ असण्याची गरज नाही परंतु जेव्हा या साध्या सोप्या गोष्टी वारंवार संपादकांना सांगाव्या लागतात त्यामधून समाज व व्यक्ती हल्लीच्या काळात किती चुकीच्या मार्गाने चालला आहे याचे विदारक चित्र दिसते,
  Reply
 12. S
  surekha
  Dec 19, 2015 at 1:59 am
  सटलेले विचार सोडून आधुनिक विज्ञानाची कास धरा पूर्वी काय दिवे लावले ते आता कशाला उगाळत बसत आहात मूर्ख लेकाचे
  Reply
 13. S
  sanjay telang
  Dec 19, 2015 at 8:12 am
  आम्ही भारतीय आमचा इतिहास विसरतो, पण अमेरिका आणि युरोपेने केलेला इतिहास आवर्जून वाचतो आणि पहायलाही जातो. विज्ञानाची कास सोडू नका पण जर काही गोष्टी आपल्याकडे होत्या असतील तर त्या शोधा व नाकारू तरी नका. स्टार वार्स वर पुस्तक आली म्हणून अवकाशयान अंतराळात गेली. ह्याचा चूक अर्थ लावू नका. अजून १०० वर्षांनी कोणी 'शिवाजी' होऊन गेला म्हटला तर असेच छद्मी पणे लोक हसतील. (?) असे वाद आमच्य्तच का असतात किंवा निर्माण केले जातात?? कदाचित दुषणे द्यायला मुद्दा हवा होता.
  Reply
 14. Load More Comments