अमेरिकेने पठाणकोट प्रसंगावर पाकिस्तानला इशारा दिला; पण अफगाण शांतताप्रश्नी इस्लामाबादेतील चर्चेतून भारतास वगळलेच..
अमेरिकेस आपली जितकी गरज आहे तितकीच वा त्याहूनही कांकणभर अधिक पाकिस्तानची गरज आहे. तेव्हा पठाणकोट हल्ल्याचे विश्लेषण करावयाचे ते शुद्ध आपल्या आणि आपल्याच नजरेतून. ते केल्यानंतर या हल्ल्यासाठी आपण स्वत:खेरीज कोणासही दोषी ठरवू शकत नाही.

पठाणकोटच्या मुद्दय़ावर अमेरिकेने पाकिस्तानला कथित इशारा दिल्याबद्दल भाजप समर्थकांना धन्य धन्य वाटू लागले असताना एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चच्रेकडे या सगळ्यांचे लक्ष वेधणे गरजेचे ठरते. अमेरिकेने पठाणकोट हल्ल्यासाठी पाकिस्तानला खडसावले. यात अनेकांना भारताचा – आणि अर्थातच नरेंद्र मोदी सरकारचा –  नतिक विजय दिसला. हे नतिक विजय दर्शन अज्ञानमूलक ठरते. ते का हे समजून घेण्यासाठी अमेरिका, चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भारतास कसे खडय़ासारखे बाजूस केले आहे, हे समजून घ्यावे लागेल. हा महत्त्वाचा विषय म्हणजे अफगाणिस्तानातील शांतता. गेली जवळपास ३५ वष्रे वा अधिक अस्थिर राहिलेल्या अफगाणिस्तानात शांतता नांदावी यासाठी काय काय करता येईल याच्या उपायांची चर्चा या परिषदेत होईल. आपल्यासाठी यातील धक्कादायक बाब म्हणजे या चच्रेचे यजमानपद पाकिस्तानकडे असून इस्लामाबादेत सुरू झालेल्या या चच्रेत चीन आणि अमेरिका या दोन महत्त्वाच्या देशांस निमंत्रण आहे. वास्तविक या विषयावर पाकिस्तानने चर्चा करणे आणि चोराच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या देणे दोन्ही एकच. तरीही त्या अमेरिकेने दिल्या आणि चीनने त्यास मंजुरी दिली. या चच्रेसंदर्भात आपल्यासाठी आणखी एक आक्षेपार्ह बाब ती तालिबान संदर्भातील. अफगाणिस्तानातील यादवीमागे तालिबानचा हात आहे. किंबहुना तालिबान ही संघटनाच अफगाणिस्तानात कोणत्याही राजकीय व्यवस्थेपेक्षा अधिक सक्षम आहे. तालिबान म्हणजे इस्लामी धार्मिक दहशतवादाचे मूर्तिमंत स्वरूप. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी काही वर्षांपूर्वी चांगले आणि वाईट तालिबान अशी फारकत करावयाचा प्रयत्न केला. ते तितके जमले नाही. त्यामुळे सोमवारपासून इस्लामाबादेत सुरू झालेल्या चच्रेत तालिबानला अधिकृत निमंत्रण नाही. परंतु धक्कादायक बाब म्हणजे ही चर्चा झाल्यानंतर तालिबानचे दोन प्रतिनिधी चीनशी अधिकृत चर्चा करणार असून ती पाकिस्तानच्या साह्य़ाने आणि साक्षीने होणार आहे.
परंतु या चच्रेचे आपणास निमंत्रणदेखील नाही. ही बाब एरवी दखल घ्यावी, अशी अजिबात ठरली नसती. मात्र अफगाणिस्तानात आपलेही हितसंबंध मोठय़ा प्रमाणावर गुंतलेले आहेत आणि पठाणकोट हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या अफगाणिस्तानातील दूतावासास अतिरेकी हल्ल्यास सामोरे जावे लागले आहे. ख्रिस्त जन्मदिनाच्या सुमुहूर्तावर शांतता आणि सलोख्याचा संदेश घेऊन नवशांततावादी नरेंद्र मोदी ज्या वेळी लाहोरला गेले त्याच्या आधी दोन दिवस ते याच उद्देशाने अफगाणिस्तानात होते. तेथील लोकप्रतिनिधिगृहाची इमारत आपण बांधून दिली असून तिचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी अफगाणिस्तानात अशांतता माजवण्यात पुढाकार घेणाऱ्या पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. यानंतर पंतप्रधान मोदी तेथून निघाले आणि ज्या देशावर टीका केली त्याच देशाच्या प्रमुखांना भेटण्यासाठी वाकडी वाट करून गेले. वेगळी चाल म्हणून त्याचेही एक वेळ कौतुक करता येईल. परंतु इतके असूनही ज्या अफगाणिस्तानात शांततेसाठी अमेरिकेस भारताची भूमिका महत्त्वाची वाटते त्याच अमेरिकेच्या साक्षीने पाकिस्तानात चर्चा होत असून तीत आपल्याला बघ्याची भूमिकादेखील नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकेची आतापर्यंतची तिरकी चाल ज्यांनी निरखली आहे, त्यांना यात आश्चर्य वाटणार नाही. परंतु अमेरिका कशी पाकिस्तानला खडसावते याबद्दल हरखून जाणाऱ्यासाठी मात्र सोमवारपासून सुरू झालेली चर्चा डोळे उघडणारी ठरावी. अफगाणिस्तानचे विद्यमान अध्यक्ष अश्रफ घानी हे पाकिस्तानवादी आहेत. त्याचप्रमाणे तालिबानला अमेरिकेने वा अन्यांनी मान्यता द्यावी किंवा काय या मुद्दय़ावर त्यांची भूमिका नरो वा कुंजरो वा अशीच राहिलेली आहे. तेव्हा या सर्वानी संगनमताने तालिबान्यांतील एखाद्या गटास मान्यता देण्याचा विचार केल्यास आश्चर्य वाटावयास नको. हे सर्व अर्थातच भारताच्या हितसंबंधांना बाधा आणणारे ठरेल, यात शंका नाही.
म्हणूनच अमेरिकेने पठाणकोट प्रसंगावर पाकिस्तानला इशारा दिला यात हुरळून जाण्यासारखे काहीही नाही. परंतु सरकारशी संबंधित अनेक जण तसे हुरळून जाताना दिसतात. त्यांना इतिहासाची जाणीव नाही, असे म्हणावे लागेल. १९७९ साली अफगाणिस्तानात तत्कालीन सोविएत रशियाच्या फौजा घुसल्यानंतर अमेरिकेसाठी पाकिस्तान हा अत्यंत कळीचा देश बनून राहिलेला आहे. त्या वेळी अमेरिकेने सोविएत रशियन सनिकांविरोधात उचापती करण्यासाठी पाकिस्तानला जी मदत दिली तिचा मोठा वाटा जम्मू-काश्मिरात भारताविरोधात वापरला गेला याचीही पुरेशी जाण अमेरिकेस आहे. तशी ती यावी यासाठी भारताने आजतागायत अनेक पुरावे दिले आणि अमेरिकेच्या पाक धोरणाविरोधात जाहीर टीकाही केली. तरीही अमेरिकेकडून पाकिस्तानला होणाऱ्या शस्त्रपुरवठय़ात तिळमात्रही कपात झालेली नाही आणि पठाणकोटवर पाकिस्तानस्थित अतिरेक्यांनी हल्ला केला म्हणून भविष्यातही ती कमी होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरोधात अमेरिकेच्या मध्यस्थीस भारताने किती महत्त्व द्यावे याचे भान बाळगण्याची गरज आहे. ते भान यावे यासाठी २६/११ हल्ल्यातील महत्त्वाचा आरोपी हेडली यास भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिका का टाळाटाळ करते, हेदेखील समजून येईल. ते समजून घेतल्यावर समोर येणारे सत्य म्हणजे अमेरिकेस आपली जितकी गरज आहे तितकीच वा त्याहूनही कांकणभर अधिक पाकिस्तानची गरज आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कितीही जिगरी दोस्त असले तरी या सत्यात बदल होणे नाही हेदेखील आपणास जाणून घ्यावे लागेल.
तेव्हा पठाणकोट हल्ल्याचे विश्लेषण करावयाचे ते शुद्ध आपल्या आणि आपल्याच नजरेतून. ते केल्यानंतर या हल्ल्यासाठी आपण स्वत:खेरीज अन्य कोणासही दोषी ठरवू शकत नाही. तुटलेले कुंपण, बंद दिवे आणि ढिसाळ सुरक्षा हेच जर आपले वास्तव असेल तर राष्ट्रवाद आणि राष्ट्राभिमानाचे उमाळे केवळ फुकाच्या गप्पा ठरतात. या हल्ल्यासंदर्भात ढळढळीतपणे समोर आलेली बाब म्हणजे त्याच्या नियंत्रणासाठी एनएसजीचे कमांडो पाठवण्याचा निर्णय. एखाद्या इमारतीवर दहशतवादी हल्ला, विमान आदींचे अपहरण किंवा ओलीस नाटय़ात एनएसजीचा वापर केला जातो. किंवा तसा केला जावा असा संकेत आहे. याचे कारण ते त्यासाठीच प्रशिक्षित केले जातात. उघडय़ा माळावरील दहशतवादी शोधमोहिमा हे त्यांचे काम नव्हे. परंतु पठाणकोट येथे एनएसजी कमांडोंना त्याच कामास जुंपले गेले आणि आपण त्यातून एका तरुण कमांडोस हकनाक मुकलो. या कमांडोंना शोधमोहिमेस पाठवण्यापेक्षाही अधिक गंभीर बाब म्हणजे पठाणकोट हवाई केंद्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लष्करास आपण पाचारण केले नाही. मोकळ्या माळावर, झाडीझुडपांत, सीमेवर शोधमोहिमा राबवणे यात लष्कर पारंगत असते. परंतु आपण पठाणकोट कारवाईत सुरुवातीस लष्करास गुंतवून घेतले नाही ही बाब समोर आली आहे.
या पाश्र्वभूमीवर आपले संरक्षणमंत्री मनोहर पíरकर यांच्या ताज्या उद्गारांची दखल घेणे आवश्यक ठरते. पठाणकोट हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांना वेदना सहन कराव्या लागतील, असे पíरकर म्हणाले. त्यांच्या या विधानाने अनेकांच्या छात्या अभिमानाने फुलून येण्याची शक्यता आहे. त्या खाली जाण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानांचा दाखला द्यावा लागेल. ‘पाकिस्तानने आगळीक केली तर अमेरिकेकडे काय पाहता, आपल्या शेजाऱ्यास जशास तसा धडा शिकवा,’ असे उद्गार मोदी यांनी खासगी चित्रवाणी वाहिनीस दिलेल्या मुलाखतीत काढले होते. वाट वाकडी करून शरीफ यांना भेटणे हा त्याच धडा शिकवण्याच्या प्रयत्नांचा भाग असावा बहुधा. तेव्हा आपल्या स्थानासंदर्भातील वास्तव आपण स्वीकारायला हवे. अमेरिकेने पाकला दिलेला इशारा आणि त्यानंतर लगेच पाकिस्तानशीच सुरू केलेली चर्चा याच पोकळ वास्तवाची जाणीव करून देतात.