कतारचा गळा घोटण्यासाठी पाच देश सरसावले असताना ट्रम्प यांनी त्यातील सौदी अरेबियाची तळी उचलण्यात शहाणपण नाही.

असंतुलन घडवून आणण्याची मोठी क्षमता असली तरी सत्तेची ताकद आणि मोठेपण संतुलन साधण्याच्या क्षमतेत असते. सत्तेच्या या महत्त्वाच्या गुणवैशिष्टय़ाची तसेच जबाबदारीची जाणीव सत्ताधाऱ्यांना नसेल तर काय होते हे कतार या अवघ्या तीन लाख लोकसंख्येच्या देशावर आसपासच्या पाच देशांनी घातलेल्या बहिष्कारावरून समजून घेता येईल. असा बहिष्कार घातला जावा यासाठी जसे कतार या देशाचे वागणे अवलंबून आहे तसेच या प्रदेशात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमेरिका नावाच्या देशाची कृतीही यास जबाबदार आहे. अमेरिकेकडून ही कृती घडली कारण अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या संतुलनाच्या जबाबदारीची जाणीव नाही, म्हणून. गेली जवळपास १४ वष्रे पश्चिम आशियाच्या रखरखत्या वाळवंटात खदखद असली तरी ती नियंत्रणात राहिली. २००३ साली इराकचा हुकूमशहा सत्ताधारी सद्दाम हुसेन याचा काटा काढला गेला त्या वेळी हा परिसर शेवटचा ढवळला गेला. त्यानंतर अमेरिकेच्या धुरिणांनी या परिसरातील देशांत सत्ताधाऱ्यांविरोधात पद्धतशीरपणे हवा तापवली आणि याच तापलेल्या हवेत २०११ साली पाकिस्तानातील अबोताबाद येथे घुसून अमेरिकेने अल कईदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन यास टिपले. ओसामाची हत्या सत्ताधाऱ्यांविरोधात हवा तापलेली नसताना झाली असती तर अमेरिकेविरोधात इस्लामी देशांत जनक्षोभ उसळला असता. तसे झाले नाही. ओसामासारख्या म्होरक्यास ठार केल्यानंतरही अमेरिकेविरोधात या परिसरात काहीही घडले नाही. याचे कारण त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांना असलेले हे संतुलनाचे भान. परंतु विद्यमान अध्यक्ष हे असले भान आदी संकेत काही मानावयास तयार नाहीत. दोन आठवडय़ांपूर्वी आपल्या पहिल्या पश्चिम आशिया दौऱ्यात ट्रम्प यांनी या भानशून्यतेची चुणूक दाखवली आणि सौदी अरेबियाच्या भूमीतून त्या देशाशी तब्बल ११,००० कोटी डॉलर्सचा शस्त्रास्त्र करार केला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी मुसलमानांना सरसकट शत्रू ठरवणाऱ्या ट्रम्प यांची ही कोलांटउडी त्यांच्या लौकिकास साजेशी जरी होती तरी तिच्यामुळे सौदीची या परिसरातील भीड चेपली आणि अन्य चार देशांच्या सहकार्याने या सर्वानी कतार या चिमुकल्या देशाची कोंडी करायचा निर्णय घेतला.

या मागे अर्थातच केवळ ट्रम्प यांचे वागणे जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु तरीही अमेरिकी अध्यक्षास सौदी अरेबियास किती ढील द्यावी याचे भान असणे गरजेचे होते. याचे कारण या परिसरात आपण म्हणू ती पूर्व दिशा असायला हवी असा सौदीचा आग्रह आहे. असा आग्रह सौदी करू शकतो याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे इस्लाम धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असलेली मक्का आणि मदिना ही दोन धर्मस्थळे सौदी अरेबियात आहेत. सौदीचा राजा या धर्मसंस्थांचा प्रमुख असतो. तेव्हा समस्त इस्लामी जगात आपला सर्वाधिकार असायला हवा, अशी एक सौदीची धारणा असते. आणि दुसरे कारण म्हणजे तेल. जगातील पहिल्या क्रमांकाचे तेलसाठे हे सौदी भूमीत आहेत आणि त्यातून आलेल्या अमाप पशाने या देशास नाही तरी त्या देशातील सत्ताधीशांस अमाप श्रीमंत केले आहे. अगदी अलीकडेपर्यंत अमेरिकेतील चूल ही सौदी तेल/वायूवर पेटत असे. त्यामुळेही अमेरिकेने या देशाचे वाटेल तसे चोचले पुरवले. या देशाच्या तेलक्षमतेस आव्हान देण्याची ताकद परिसरातील फक्त तीन देशांत होती. इराक, इराण आणि कतार. यातील इराक या देशावर अमेरिकेचाच कब्जा आहे. इराणचे काय करायचे हे अमेरिकेला अद्याप समजलेले नाही. आणि कतारला सौदीची गरज नाही कारण जगातील अव्वल आकाराचे नैसर्गिक वायूचे साठे या एकाच देशात आहेत. म्हणजे सौदीचे जे स्थान तेलाच्या व्यापारात आहे तेच स्थान नैसर्गिक वायू व्यापारात कतार या देशाचे आहे. त्यामुळे हा देश सौदी अरेबियास मोजत नाही. त्यास तसे करण्याची गरजही नाही. या नैसर्गिक वायूच्या जोरावर आज कतार हा टीचभर देश जगातील अत्यंत धनाढय़ देशांत गणला जातो. याच वायूच्या मुद्दय़ावर कतारने या परिसरातील आणखी एका देशाशी उत्तम संधान साधले असून हे संबंधदेखील सौदीच्या डोळ्यावर येणारे आहेत.

कारण तो देश म्हणजे इराण. वाळवंटातील सौदीच्या अग्रस्थानास आव्हान देण्याची क्षमता असलेला इराण हा प्रामुख्याने शियापंथीय आहे आणि सौदी हा सुन्नी. असे असूनही कतार हा देश इराण या देशाशी उत्तम संबंध राखून आहे, कारण या परिसरातील दुसऱ्या क्रमांकाचे ऊर्जासाठे हे इराणमध्ये आहेत. हे सौदी अरेबियास पाहवणारे नाही. त्याच वेळी कतार हा मुस्लीम ब्रदरहूड या जगातील आद्य इस्लामी दहशतवादी संघटनेचादेखील सक्रिय समर्थक आहे. तसेच हमास या संघटनेचा प्रमुख पाठिराखादेखील कतारच आहे. ही संघटना यासर अराफत यांच्या पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशन, पीएलओ, या अन्य दहशतवादी संघटनेची प्रतिस्पर्धी. गाझा परिसरात तिचा चांगला अंमल आहे. अराफत यांच्या विरोधात इस्रायलने वेळोवेळी छुपेपणाने हमासचा वापर केला. हे इतके सगळे एकाचवेळी करणाऱ्या कतारचे अस्तित्व सौदी अरेबियाच्या डोळ्यात खुपणे तसे साहजिकच. शिवाय हे कमी म्हणून की काय अमेरिकेचे दोन मोठे लष्करी तळ कतार या देशात आहेत. अमेरिकेचा या परिसरातला सगळ्यात मोठा हवाईतळ कतारमध्ये आहे आणि त्याशिवाय या परिसरातील लष्करी नियंत्रण कक्षदेखील अमेरिकेने कतार या देशातच ठेवलेला आहे. वर पुन्हा अल जझिरा ही उत्तम वृत्त वाहिनीदेखील कतार या देशाच्याच मालकीची. कतारची राजधानी दोहा येथे या वाहिनीचे मुख्यालय आहे. इस्लामी जगतातील असूनही अत्यंत व्यावसायिकरीत्या चालवल्या जाणाऱ्या या वाहिनीत बीबीसी, सीएनएन अशा आघाडीच्या वृत्तवाहिन्यांतील अनेक जण काम करतात. या परिसराचे व्यवच्छेदक लक्षण असणारा धर्म अल जझिराने आपल्या वृत्तप्रसारण व्यवसायात येऊ दिलेला नाही. त्यामुळे बघता बघता या वाहिनीचा प्रभाव वाढू लागला असून पश्चिम आशियाचा आवाज म्हणून याच वाहिनीकडे पाहिले जाते. हे सर्वच सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आदींची चिडचिड वाढवणारे आहे. अमिरातीतील तीन देशांच्या जोडीला कतारने ब्रदरहूडच्या मुद्दय़ावर इजिप्तलादेखील डिवचलेले आहे. मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेने अलीकडेच इजिप्तमधील सत्तेवर नियंत्रण मिळवले. या संघटनेची सत्ता उलथून पाडण्यास नंतर इजिप्तला बरेच कष्ट पडले. त्यामुळे या देशाचाही कतारवर राग. तेव्हा या सगळ्यांनी मिळून कतारचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. याही आधी साधारण २५ वर्षांपूर्वी या आणि अन्य देशांना खरे तर कतार गिळंकृतच करावयाचा होता. नव्वदच्या दशकात विद्यमान कतारी प्रमुखाच्या वडिलांविरोधात उठाव झाला असता त्या देशाचा ताबा घेण्याचा प्रयत्न या देशांचा होता. पण तो यशस्वी झाला नाही.

याचे कारण अमेरिका. असे काही होऊ देऊन अमेरिका आपल्या हितसंबंधांना बाधा आणू देत नाही. त्यामुळे तेव्हा ते टळले. ऐतिहासिकदृष्टय़ा अमेरिका नेहमीच या परिसरात संतुलन घटक राहिलेला आहे. ऐंशीच्या दशकात इराण आणि इराक हे दोन शेजारील देश एकमेकांशी लढत असता अमेरिकेने दोन्ही देशांना यथेच्छ शस्त्रपुरवठा करून हे संतुलन सांभाळले आणि त्यासाठीच पुढे सद्दाम हुसेन ते ओसामा बिन लादेन अशांचे पालनपोषण केले. हे दोघेही डोक्यावर बसू लागल्यावर अमेरिकेनेच त्यांना दूर केले. हा कोणताही इतिहास लक्षात न घेता ट्रम्प यांनी एकदम सौदी अरेबियाची तळी उचलणे हे या संतुलनास छेद देणारे आहे. या परिसरातील असहिष्णू आणि असंमजस देशांना हाताळताना अमेरिका नेहमीच दाखवत आलेल्या व्यावहारिक शहाणपणास ट्रम्प यांनी तिलांजली दिली आणि हे संकट उद्भवले. अमेरिकी अध्यक्षांची ही दीडशहाणी कृती अमेरिकेचीच डोकेदुखी वाढवणारी ठरेल.

  • सौदी अरेबियाचे जे स्थान तेलाच्या व्यापारात आहे तेच स्थान नैसर्गिक वायू व्यापारात कतार या देशाचे आहे. त्यामुळे हा देश सौदी अरेबियास मोजत नाही. त्यास तसे करण्याची गरजही नाही. या नैसर्गिक वायूच्या जोरावर आज कतार हा टीचभर देश जगातील अत्यंत धनाढय़ देशांत गणला जातो.