जागतिक कीर्तीच्या कलावंताने बनवलेला गांधीजींचा पुतळा बेंगरूळ ठरवून तो हटवण्याचा प्रयत्न सुरू होणे, चिंतेचे आणि धोक्याचेही आहे..

आसाममधील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचारजी यांचे अभिनंदन. आसामच्याच कामरूपचे जिल्हाधिकारी एम. अंगमुथू यांचेही अभिनंदन. आणि याच राज्यातील गुवाहाटी येथील ‘गांधीमंडप ट्रस्ट’च्या एक सदस्य व माजी केंद्रीय मंत्री रेणुकादेवी बोरकटकी यांचेही अभिनंदन. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे हुबेहूब राष्ट्रपिता महात्मा गांधींसारखेच दिसावेत असाच कौल या तिघांच्याही बुद्धीने नुकताच दिलेला आहे, हे झाले अभिनंदन करण्याचे एक कारण. त्याला जोडलेले दुसरे कारण तितकेच महत्त्वाचे आहे. ते म्हणजे या तिघांनाही रामकिंकर बैज माहीत नाहीत. रामकिंकर बैज माहीत नसणे हे किती छान! बंगाल्यांना कदाचित रामकिंकर बैज माहीत असतील, पण पश्चिम बंगालात भाजपची सत्ता कधीच आलेली नसल्यामुळे बंगाली लोक सुसंस्कृत मानता येणार नाहीत. ज्या लाखो महाराष्ट्रीयांना किंवा कन्नडिगांना, गुजराती वा हिंदी भाषकांना रामकिंकर बैज माहीत नसतील, त्या सर्वाशी नाते जोडून आसाम हा भारताच्या मुख्य प्रवाहातच असल्याचे या तिघांनी दाखवून दिले, म्हणून त्यांचे अभिनंदन. जसे नोटाबंदीनंतर एक हजार व पाचशेच्या नेमक्या किती नोटा परत आल्या हे आपल्या रिझव्‍‌र्ह बँकेला माहीत नाही, तसेच त्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या दिल्लीतील प्रमुख इमारतीच्या प्रचंड प्रवेशद्वाराशी असलेले यक्ष आणि यक्षी हे महाकाय पुतळे घडविण्यासाठी ज्या अव्वल शिल्पकाराची निवड त्या वेळी झाली होती, ते म्हणजे रामकिंकर बैज हे आम्हां कुणालाही माहीत नाही. माहीत नसले म्हणून बिघडत नाही. अजिबात कोणतीही माहिती नसतानासुद्धा देशभक्ती करता येतेच. कशी, ते सिद्धार्थ भट्टाचारजी, एम. अंगमुथू किंवा रेणुकादेवी बोरकटकी यांनी दाखवून दिले आहे. नुसत्या जुमल्यातून नव्हे. प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. कसे ते यथावकाश सविस्तरच पाहू.

rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?
Hyderabad Inter-Faith Couple Attacked By Muslim
हैदराबादमध्ये आंतरधर्मीय जोडप्यावर हल्ला, VIDEO व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई, ४ जण गजाआड

त्याआधी थोडी माहिती घेऊ. गुवाहाटीतील सरनिया टेकडीवर गांधीमंडप नावाचे उद्यान आहे. तिथे गांधीजींचा २० फुटी पुतळा १९७० सालापासून आहे. काँग्रेस काळात या पुतळय़ाचे रीतसर अनावरण झाले होते. या पुतळय़ाबद्दलची अधिक माहिती सिल्चर येथील ‘आसाम विद्यापीठा’तून पीएच.डी. मिळविणारे कला-अभ्यासक गणेश नंदी यांनी यांच्या संशोधनाच्या ओघात सविस्तर आली आहे. शांतिनिकेतनातील शिल्पकारांच्या दोन पिढय़ा घडविणारे रामकिंकर बैज परंपरा व नवतेच्या पलीकडे जातात किंवा कसे, याबद्दल गणेश नंदी यांनी हे संशोधनकार्य सुरू केले २००९ साली, तर त्यांचा प्रबंध संमत झाला २०१२ मध्ये. शांतिनिकेतनात शिल्पकलेची नवपरंपराच निर्माण करणारे रामकिंकर महान कसे, याविषयीची सखोल चिकित्सा आसाम विद्यापीठाने मान्य केलेल्या या प्रबंधात आहे. त्यात गांधी-पुतळय़ाबद्दल म्हटले आहे की, गांधीजींचे शिल्प घडवण्याची परवानगी रामकिंकर यांनी १९६१ मध्येच शांतिनिकेतनकडे मागितली होती. पण शांतिनिकेतनच्या कलाभवनकडे निधी नाही, म्हणून थांबावे लागले. अखेर आसाम सरकारने गांधीपुतळय़ाची मागणी शांतिनिकेतनकडे केली, तेव्हा १९६८ पासून रामकिंकर यांनी आपल्या खास शैलीत, सिमेंट-काँक्रीट या आधुनिक लोकमाध्यमातच गांधी-शिल्पाचे काम सुरू केले. ते सिमेंटचे शिल्प आजही शांतिनिकेतनात आहे. आसामला पाठविले गेले, ते सिमेंटच्या या शिल्पावर साचा घालून, त्याबरहुकूम ब्राँझमध्ये घडविलेले शिल्प. ही सारी प्रक्रिया रामकिंकर एक तर स्वत:च्या हाताने करीत होते किंवा विद्यार्थ्यांकडून करवून घेत होते. कलावंत म्हणून रामकिंकर यांची महत्ता ही जगाच्या कला-इतिहासात अजरामर झालेल्या ऑगुस्त रोदँ किंवा आल्बेतरे जिआकोमेत्ती यांच्याइतकीच आहे, असे गणेश नंदी इतरांच्या हवाल्याने नमूद करतात. या प्रबंधाआधी- २००७ साली- शांतिनिकेतनात झालेल्या ‘रामकिंकर बैज इंटरनॅशनल सेमिनार’मधील भाषणांतून, तसेच दिल्लीस्थित ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालया’ने २०११ पर्यंत रामकिंकर यांच्याबद्दल प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांतून बळच मिळते. पण हे सारे काँग्रेस काळातील संदर्भ. काँग्रेसमुक्त भारतासाठी ते विसरायलाच हवेत. आजच्या नजरेने जगाकडे पाहायला हवे. तसे पाहिल्यावर काय दिसते? आपले आसामचे भाजप प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचारजी यांना सरनिया टेकडीवरला गांधीपुतळा हा गांधीजींसारखा दिसतच नाही, असे दिसले. त्या पुतळय़ाचे हात-पाय मोठे आहेत. चेहराही गांधीजींसारखा दिसत नाही. चष्माही गांधीजींसारखा नाही. हे सारे एका भाजप-प्रदेशाध्यक्षाला आता दिसू लागले. सरकारमध्ये या अध्यक्षांना अधिकारपद नसले तरी ते आमदार आहेत. त्यांनी त्यांना जे जे आक्षेपार्ह दिसले ते जिल्हाधिकारी अंगमुथू यांना सुनावले. जिल्हाधिकाऱ्यांनी लगोलग बैठक बोलावली. गांधीमंडप ट्रस्टच्या प्रतिनिधी म्हणून रेणुकादेवीही त्या बैठकीस होत्या. याच बैठकीत तो निर्णय झाला. हा बेंगरूळ गांधीपुतळा इथून हटवायचा. नवा कोणता तरी पुतळा आणू. तो बसवू इथे. हे सारे तुम्हा-आम्हाला कळले केव्हा? पुतळा हटविण्याच्या हालचाली गेल्या मंगळवारी सुरू झाल्यावर, ‘इंडियन एक्स्प्रेस’ने बातमी दिली तेव्हा. हा पुतळा रामकिंकर बैज यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या कलावंताने घडविला आहे हे माहीत आहे ना, असे विचारल्यावर तिघांकडूनही उत्तर आले : माहीत नाही.

राजकारणी आणि सरकार हे इतके असंवेदनशील असू शकतात. याची उदाहरणे अनेक आहेत. ज्याला ‘तेव्हा-कोठे-गेला-होता’ पद्धत म्हणता येईल त्या पद्धतीने वाद घालत बसण्यासाठी ती उपयोगी पडतील. रोदँ या शिल्पकाराने फ्रेंच लेखक बाल्झाक याचा घडवलेला पुतळा तयार झाल्यावर पुतळा-समितीने नामंजूर केला. फ्रान्समध्ये घडलेली ती गोष्ट १८९८ सालची. खुद्द रामकिंकर बैज यांनीच हंगेरीतील बलाटन सरोवराजवळ गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुरांच्या तेथील भेटीची स्मृती जपण्यासाठी घडविलेल्या शिल्पाचे अनावरण पश्चिम बंगालमधील एक मंत्री आणि राष्ट्रीय सोशालिस्ट पार्टीचे नेते जतिन चक्रवर्तीनी १९८४ मध्ये केले, तेव्हा ‘हे गुरुदेवांसारखे दिसत नाही, बदलून टाका पुतळा’ असा लकडा त्यांनी डाव्या सरकारकडे लावला होता. तेव्हा डावे झुकले, शिल्प बदलले. पण परत आलेले शिल्प कोलकात्यात, गुरुदेवांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाच्या खोलीत बसविण्यात आले. रोदँचे बाल्झाक-शिल्पदेखील १९३९ साली, म्हणजे शिल्पकाराच्या मृत्यूनंतर २२ वर्षांनी समारंभपूर्वक उभारण्यात आले होते. तसे गुवाहाटीच्या गांधीशिल्पाचे सन्मानपूर्वक पुनस्र्थापन- देशभरच्या कलावंतांनी विरोध केल्यानंतर तरी – होणार का, हे मात्र अनिश्चित आहे. कारण विरोधाचे सूर ऐकून घेतले जातच नाहीत. तो पुतळा म्हणजे एका थोर शिल्पकाराच्या शैलीवैशिष्टय़ांचे प्रतीक होता. भारतीय शिल्पकलेत उत्क्रांतीचा टप्पा ठरलेल्या एका कलावंताने अहिंसक क्रांतीच्या उद्गात्याला दिलेली ती दाद होती. हे मान्य करायचे नाही आणि गांधीजी हुबेहूब हवेत म्हणून पुतळा हटवायचा, असा हा प्रकार. गुवाहाटीतील त्या चबुतऱ्यावर दुसऱ्या कोणी तरी घडवलेले गांधीजींचेच शिल्प बसविले जाणार ना, याचीही माहिती दिली जात नाही. रामकिंकरांनी पुतळा घडवल्याची माहिती नाही, हे मात्र एका सुरात सांगितले जाते. ही एक तर लबाडी आहे किंवा कीव करण्याजोगे अज्ञान.

अज्ञान जर असेलच, तर तिचा फटका कलेला बसतच राहणार. कला काही लोकांच्या मागे धावत नाही. हुबेहूबपणा नसेल तर दुसरे काय आहे, हे शोधावे लागते. कलाकृतीला शरण जावे लागते. ते शरण जाणे सार्थक व्हावे, यासाठी पाहात / ऐकत/ वाचत राहण्याची तयारी असावी लागते. हे जर केले नाही, तर अशा कोणत्याही समाजाला सत्ताशरण होण्याशिवाय पर्याय नसतो. ही सत्ताशरणताच एकदा अंगी भिनल्यावर फक्त राज्यकर्त्यांकडेच ‘सकारात्मक’ दृष्टीने पाहणे हाती उरते. रामकिंकर बंगाली होते म्हणून आसामात नको आहेत का? ज्या गांधीशिल्पाचे वेगळेपण रामकिंकर यांच्या किमयेत आहे, ती किमया कोणाहीकडून समजून घ्यावीशी कशी काय वाटत नाही? कलेबद्दल लोकशिक्षण करायचे सोडून कलाच कसली हद्दपार करता? हे प्रश्न मग विचारलेच जात नाहीत. अशाने सत्ताशरणतेच्या हुबेहूब हव्यासाला मोकळे रान मिळते.