समोर प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस असली तरच भाजपच्या कामगिरीस धार येते..
आगामी वर्षांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत, गुजरातचा अपवादवगळता भाजपला आप, बसप-सप अशा पक्षांशी सामना करावा लागेल, हे आतापासूनच ओळखायला हवे.
यशासारखे दुसरे काहीच नसते. हे वैश्विक सत्य असल्यामुळे भाजपचा ताजा विधानसभा निवडणूक विजयोत्सव रास्त ठरतो. परंतु म्हणून भारत काँग्रेसमुक्त होत असल्याचा भाजपचा होत असलेला आणि त्यामुळे ते इतरांचा करून देत असलेला समज रास्त ठरू शकत नाही. काँग्रेसचे कंबरडे मोडले आहे आणि ते सरळ करण्याची क्षमता त्या पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाने दाखवलेली नाही, हे सत्य. राखेतून पुन्हा भरारी घेण्याइतकी सक्षमता आणि चातुर्य काँग्रेसमध्ये आहे असे त्या पक्षाकडे पाहून वाटत नाही, हेही सत्य. मध्यवर्ती घराण्याच्या पलीकडे तो पक्ष अद्याप तरी विचार करू शकत नाही हेदेखील सत्य. परंतु तरीही त्या पक्षाचे अस्तित्व पुसले जाण्यात भाजपला आनंद मानता येणार नाही, हेदेखील लक्षात घ्यायलाच हवे असे सत्य आहे. याचे कारण भाजपची प्रगती ही काँग्रेसच्या अधोगतीशी निगडित आहे. निवडणुकीच्या आखाडय़ात प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस नसेल तर भाजपचा विजयरथ चौखूर उधळणे सोडाच, पण साधा धावूदेखील शकणार नाही ही बाब नाकारता येणार नाही. सध्याच्या तकलादू विजयाच्या उन्मादात भाजपवासीय आणि नरेंद्र मोदी यांचे वावदूक भक्त यांचे या वास्तवाचे भान सुटले असण्याची दाट शक्यता असल्याने ते करून देण्याची गरज आहे. त्यासाठी भाजपचा ताजा विजय आणि काँग्रेसचा पराभव यांमागील अन्वयार्थ शोधावयास हवा.
प्रथम मुद्दा आसामचा. त्या राज्यातील भाजपचा विजय लक्षणीय आहे यात कोणाचेही दुमत असणार नाही. परंतु त्यामागील कारण काँग्रेसचे युवराज चि. राहुलबाबा गांधी यांचा मूर्खपणा हे आहे. तेथे काँग्रेसचा मूर्खपणा हा भाजपने दाखवलेल्या शहाणपणापेक्षा निर्णायक ठरला. या मूर्खपणामागे केवळ हेमंत सर्मा यांस पक्षातून जाऊ दिले हेच कारण नाही, तर गेल्या दशकभराचे बदलते वास्तव न पाहण्याचे काँग्रेसचे सातत्य हे कारण आहे. गेल्या दोन दशकांत आसामातील जनसमुदायात मोठय़ा प्रमाणावर बदल झाले. बांगला देशातून होत असलेल्या अर्निबध निर्वासित आयातीमुळे त्या राज्यातील लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण जवळपास ३५ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे राज्यातील अन्य म्हणजे मारवाडी, बंगाली आणि नेपाळी िहदू निर्वासित यांना अनाथ वाटणे साहजिक होते आणि आहे. परिणामी आपणच अल्पसंख्य होऊ अशी भीती बहुसंख्य आसामींच्या मनात तयार झाली. त्यात स्थानिक राजकारणात मुंबईतील अत्तर व्यापारी बद्रुद्दिन अजमल यांनी त्यांच्या ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंटच्या माध्यमातून घेतलेली उडी. याचमुळे २०११ सालातील विधानसभा निवडणुकांत आसामींनी तरुण गोगोई यांच्या पारडय़ात आपले मत टाकले. त्यामागील विचार हा की ते आणि काँग्रेसचे सरकार या बदलत्या वास्तवास अनुसरून आपले राजकारण बदलतील. परंतु तेवढेही राजकीय चातुर्य दाखवणे काँग्रेस नेतृत्वास, त्यातही विशेषत: राहुल गांधी यांना, झेपले नाही. परिणामी याच मुद्दय़ावर काँग्रेसचा त्याग करून भाजपत दाखल झालेल्या हेमंत सर्मा यांच्या बाजूने जनता उभी राहिली. आणि केवळ निर्वासित हाच महत्त्वाचा निवडणूक मुद्दा करणाऱ्या भाजपला मोठे यश मिळाले. तेव्हा आसामात काँग्रेसप्रमाणे काही वेडेपणा केला नाही हेच काय ते भाजपचे शहाणपण. भाजपने या विजयासाठी काँग्रेसचे ऋणी राहावयास हवे. केरळ, प. बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात ही संधी भाजपास मिळाली नाही. कारण या कोणत्याही राज्यांत काँग्रेस लक्षणीय नाही. त्यामुळे केरळमध्ये तर भाजपच्या मतांतदेखील वाढ झालेली नाही. त्या राज्यात श्रीशांतसारख्या उडाणटप्पू क्रिकेटपटूस भगवा शेंदूर लावून भाजपने उमेदवारी दिली खरी. परंतु मतदार त्यामुळे काही प्रभावित झाले नाहीत आणि मोदी यांचा बहुचíचत परीसस्पर्श नाकाम ठरला. तामिळनाडूत भाजपला ना काही स्थान होते ना असेल. तेथे भाजप आणि काँग्रेस हे तराजूच्या एकाच तागडीत मोजावेत इतके नगण्य आहेत. पश्चिम बंगालात नाही म्हणावयास भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. परंतु ती गांभीर्याने घ्यावी इतकी नाही. याचे कारण तेथे पहिल्याच फटक्यात ते राज्य तृणमूलमुक्त करण्याची हाक पक्षाध्यक्ष अमितभाई शहा यांनी दिली होती. मतदारांनी ती गांभीर्याने घेतली तर नाहीच, उलट ममताबाईंच्या मताधिक्यात प्रचंड वाढ केली. तेव्हा त्या राज्यातही भाजपने शड्ड ठोकावेत असे काहीही घडलेले नाही.
याचाच अर्थ असा की समोर प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस असली तरच भाजपच्या कामगिरीस धार येते. म्हणजेच अत्यंत समर्थ प्रादेशिक पक्ष समोर असेल तर भाजपची भंबेरी उडते. बिहार आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांत गेल्या वर्षी आणि तामिळनाडू, प. बंगाल निवडणुकांत आता हेच दिसून आले. भाजप समर्थकांना ही बाब अधिक समजावी यासाठी २०१७ साली होऊ घातलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांचा दाखला द्यावा लागेल. आगामी वर्षांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांत निवडणुका होणार आहेत. यातील गुजरात या एकमेव राज्यात भाजपला निवडणुकीत काँग्रेसशी दोन हात करावे लागतील. तेथे सलग चौथ्यांदा सत्ता राखणे हे भाजपसाठी आव्हान असणार असून आनंदीबाई पटेल यांच्या दिव्य कामगिरीने ते अधिकच कठीण ठरणार आहे. तेव्हा गुजरातचा एक अपवाद केल्यास पंजाबात भाजपला तोंड द्यावे लागणार आहे ते आम आदमी पक्षास आणि उत्तर प्रदेशात मायावती यांचा बसप आणि मुलायमसिंह यांचा सप या पक्षांना. पंजाबातील लढत चतुरंगी असेल, कारण सत्ताधारी आणि भाजपचा आघाडी भागीदार अकाली दल तसेच अमिरदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हेदेखील िरगणात असतील. परंतु तेथे खरा सामना असेल तो फक्त आप आणि काँग्रेस यांच्यात आणि आताची चिन्हे पाहता ते राज्यही ‘आप’ने खिशात टाकले तर आश्चर्य वाटणार नाही. उत्तर प्रदेशातील ८० पकी ७२ लोकसभा मतदारसंघात विक्रमी विजय मिळवल्यानंतर भाजपचा आगामी प्रवास हा अधोमुखीच असणार. अशा परिस्थितीत मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील साठमारीत भाजपला संधी मिळण्याची काहीही शक्यता नाही. असे होण्यामागील दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे या राज्यांत ना निर्वासितांचा धार्मिक प्रश्न असेल ना टीकेसाठी काँग्रेसचे वयोवृद्ध गोगोई असतील. याचाच अर्थ असा की या राज्यांत समोर काँग्रेस आणि त्या पक्षाचे भरकटत जाणारे राजकारण नसल्याने भाजपचे यश दुरापास्त आहे.
म्हणजेच काँग्रेसमुक्त भारत ही भाजपची दर्पोक्ती अतिशयोक्त आणि आत्मघातकी आहे. अजूनही कर्नाटक, शरद पवार यांना भाजपने आपल्याकडे वळवले नाही तर महाराष्ट्र, तसेच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेस या पक्षाचा जनाधार लक्षणीय आहे. या सर्व राज्यांत, कर्नाटकाचा अपवाद वगळता, भाजपची जरी सत्ता असली तरी काँग्रेस दुर्लक्ष करावी इतकी नगण्य नाही. तेव्हा काँग्रेसने शहाणपणाने पावले उचलली आणि कुटुंबापलीकडे पक्षाचा विचार केला तर तो पक्ष पुन्हा उभा राहू शकतो. तेव्हा देश काँग्रेसमुक्त कसा होईल याची चिंता आणि त्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा भाजपने राजकीयदृष्टय़ा समर्थ होण्याचा विचार करावा. चक्रमादित्यांचा आम आदमी पक्ष वा तितक्याच बेजबाबदारांचा बसपा, सपा आणि कदाचित शिवसेनाही यांना सामोरे जाण्यापेक्षा काँग्रेसशी दोन हात करण्यात अधिक शहाणपणा आहे, हे भाजपने ओळखावे. नपेक्षा भारताला काँग्रेसमुक्ती देण्याच्या नादात आपलीच शक्ती घालवून बसायची वेळ भाजपवर यायची.