17 August 2017

News Flash

वेदनेचा सल..

खड्डय़ांमुळे जीव गमावलेल्या त्या किमान २० बळींची काय चूक होती?

लोकसत्ता टीम | Updated: August 5, 2017 2:23 AM

खड्डय़ांमुळे जीव गमावलेल्या त्या किमान २० बळींची काय चूक होती? पण मग चूक कोणाची होती?

नागपूरमधील एक महिला मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाते काय, रस्त्यातील खड्डय़ामुळे बसलेल्या धक्क्याने ते बारा वर्षांचे बालक खाली पडते काय आणि मागून येणारी बस त्याला चिरडते काय.. किंवा मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीवरील एक तरुणी खड्डा चुकविण्यासाठी वळण घेते काय आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या धडकेत मृत्युमुखी पडते काय.. हीच गोष्ट कल्याण-भिवंडी रस्त्यावरील भादवडची. हीच गोष्ट बारामती-जेजुरी रस्त्यावरील.. पण त्याचे काय? मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विचारतात, ‘यंदाच्या पावसाळ्यात वीसपेक्षा अधिक जणांना खड्डय़ांमुळे आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्तपत्रांतून समोर आले आहे. आता पुढील पावसाळ्यापर्यंत आणखी किती जणांचे बळी तुम्ही घेणार आहात?’ पण त्याचेही काय? पावसाळा नेमेचि येत असतो. दर पावसाळ्यात नेमेचि रस्त्यांवरील खड्डय़ांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने भरत असतात. वाचक त्या सवयीने वाचत असतात. वाचून पान उलटत असतात. ते तरी काय करणार म्हणा? कोणाकोणाच्या मरणाचा शोक करणार ते? कुठे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, कुठे शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थी मरताहेत, कुठे अंगावर झाड कोसळून एखादी महिला तडफडून मरते आहे, तर कुठे रस्त्यांवरील खड्डे येता-जाता कुणाचा बळी घेत आहेत. काय दोष असतो त्यांचा? ती मुंबईतील महिला आरोग्यदायी जगण्यासाठी म्हणून सकाळच्या शुद्ध हवेत फिरण्यासाठी बाहेर पडली होती. रस्त्याच्या कडेलाच तिचा मृत्यू दबा धरून बसलेला आहे हे तिला काय माहीत? बिचारी तिच्याच विचारांत चालली होती. अचानक बाजूचे नारळाचे झाड तिच्या अंगावर कोसळले. जीव गेला तिचा. तिची चूक काय होती? पण मग चूक कोणाची होती? आ वासून बसलेले रस्त्यांवरील खड्डे. त्यातील कोणता यमाचा दूत होऊन समोर उभा ठाकेल हे कोणालाही सांगता येणार नाही. कोणाची चूक आहे ती? बहुधा कोणाचीच नाही. असलीच तर ती त्या जीव गमावलेल्या लोकांचीच असेल. मुंबई-नाशिक मार्गावर कल्याणजवळच्या माणकोली परिसरात खड्डा चुकविताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या उल्हासनगरच्या रश्मी रोहेरा या वीस वर्षांच्या मुलीची असेल किंवा नागपूरमधील त्या बारा वर्षांच्या रितेशची किंवा दुचाकी चालवीत असलेल्या त्याच्या आईची. त्यांना नीट वाहने चालवता आली नाहीत. कदाचित रितेशच्या आईवर गुन्हाही दाखल झाला असेल, निष्काळजीपणे वाहन चालवून पोटच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल. खड्डय़ांत बळी गेलेल्यांवरही गुन्हे दाखल करावेत. पोलीस ते करणार नसतील, तर शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तसे आदेश द्यावेत. अखेर प्रश्न राज्यातील कायद्यांचा आणि नियमांचा आहे. ते पाळले जात नाहीत. नागरिक निष्काळजीपणे वागतात. म्हणून तर खड्डे बळी घेतात.

केवळ निष्काळजीपणाच नाही, तर तो भ्रष्टाचारही आहे. आणि तो नागरिकांचा आहे, तुमचा-आमचा आहे. आज रस्त्यांवरील खड्डय़ांबद्दल आरडाओरडा करणारे आपण, व्यवस्थेला शिव्याशाप देणारे आपण, सरकारला दोष देणारे आपण आणि तीन-चार वर्षांपूर्वी रस्त्यारस्त्यावर मेणबत्त्या घेऊन उतरलो होतो तेही आपणच.. तेव्हा मनामनांत पेटलेल्या भ्रष्टाचारविरोधाच्या मेणबत्त्या आज अचानक कशा विझल्या? की एका जोरदार फुंकरीत विझून जायला त्या कोणाच्या वाढदिवसाच्या केकवरील मेणबत्त्या होत्या? तेव्हा व्यवस्था बदलासाठी, भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी की तिसरी लढाई करीत होतो आपण? झाला का विजय त्यात? पण मग हे जीवघेणे खड्डे कोठून उगवले? कोणाच्या पापाची फळे आहेत ही? कंत्राटदारांच्या, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या? नेत्यांच्या? ते तर आहेच. खुद्द परिवहनमंत्री नितीन गडकरीच हे सांगत आहेत. डांबरी रस्ते बनावेत आणि त्यावर दरवर्षी खड्डे पडावेत ही तर नेत्यांचीच इच्छा असते, असे ते म्हणाले होते. टाळ्या पडल्या त्यांच्या त्या वाक्यावर. पण हे गोपनीय सत्य सर्वानाच ठाऊक आहे. यावर उतारा म्हणून परिवहनमंत्र्यांनी सीमेंट काँक्रीटचे रस्ते झाले पाहिजेत असे सांगितले. उत्तम पर्याय आहे तो. पण त्या रस्त्यांवरील काँक्रीटच्या दर्जाची हमी कोण देणार? आज जेथे तसे रस्ते तयार केले जात आहेत, त्यांच्या दर्जात गोलमाल होत असल्याचे बोलले जाते, त्याचे काय करणार? जेथे तेथे प्रश्न भ्रष्टाचाराचा आहे. टक्केवारीतून ओरबाडल्या जात असलेल्या समृद्धीचा आहे. नेते, अधिकारी, कंत्राटदार यांच्या मलिदाखोर साखळीचा आहे. कोठून तयार होते ही साखळी? राजकीय नेते ही भ्रष्टांची जमात म्हणून आपण सारेच त्यांना दूषणे देतो. ते समजा सुधारणेच्या पलीकडे आहेत. पण मग त्या बाकीच्या साखळीतले लोक कोण आहेत? ते तर तुमच्या-आमच्यातलेच आहेत. या देशाचे तेही नागरिकच आहेत. कदाचित यातील काही अधिकाऱ्यांची मुलेबाळेही तीन वर्षांपूर्वी मेणबत्त्या घेऊन रस्त्यावर उतरली असतील. त्या अधिकाऱ्यांचा, त्या कारकुनांचा भ्रष्टाचार विरोध गेला कुठे? मग मेणबत्त्या पेटवून आपण कोणता अंधार दूर केला? सारेच तर आपल्यातलेच आहेत. नेतेसुद्धा आपलेच लाडके आहेत. निवडणुकीच्या वेळी जेव्हा ते आपल्या दाढीला हात लावीत, तुमचा आमच्यावर भरोसा आहे काय असे विचारीत होते, तेव्हा आपणच जोरदार माना हलवीत त्यांच्यावर भरोसा ठेवला होता. आज तेच खड्डय़ांच्याच नव्हे, तर सर्वच भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर आपल्याला गोलगोल फिरवीत आहेत. आपला तेव्हाचा सात्त्विक संताप, तेव्हा व्यवस्थेवरचा राग याचे पद्धतशीरपणे कालवे काढून देण्यात आले आहेत, द्वेषाचे. आपण त्या द्वेषाची रक्तपंचमी खेळतो आहोत आणि भ्रष्टाचार सुखेनैव सुरू आहे. आणि हे भ्रष्टाचाराचे खड्डे साधे नाहीत. त्यावरून राजकीय कलगीतुरे सुरू आहेत. कोणी कोणाच्या कारभारात पारदर्शीपणे डोकावून पाहात आहे, तर कोणी खड्डे मोजणारे पहारेकरी झोपले काय म्हणून चिमटे काढत आहेत. हे पाहिले की वाटावे, हे राजकीय नेते की समाजमाध्यमी जल्पक? त्यांचे हे शिमगे आणि त्यासाठीची सोंगे हे नागरिकांना छान रमविणारे असते, हे खरे. पण यामुळेच मूलभूत मुद्दे बाजूला राहतात. अन्यथा, आतापर्यंत आपल्या सर्वाच्याच हे लक्षात यायला हवे होते, की हे भ्रष्टाचाराचे खड्डे आता तुमच्या-माझ्या जिवावर उठलेले आहेत. असे कदापि होऊ  नये, परंतु तुमच्या-माझ्या प्रियजनांपैकीच कोणी उद्या त्या खड्डय़ांचा बळी जाऊ  शकतो. कोणाच्या डोक्यावर रस्त्यावरचे झाड पडू शकते. कदाचित आपले राहते घरही आपले स्मशान बनू शकते. घाटकोपर दुर्घटनेने तेही दाखवून दिले आहे. त्यातही हीच स्वत:ला या राष्ट्राचे नागरिक म्हणविणाऱ्यांची बेपर्वाई, गुंडगिरी, खाबूगिरी.. सारे सारे दिसले.

खेद याचाच आहे की हे सारे माहीत असूनही कोणालाच काही माहीत नाही. सारे दिसत असूनही कोणालाही काहीही दिसत नाही. मग कोणी कोणाला दोषी धरायचे? नागपूरचा रितेश, भिवंडीतला धीरज, ती रश्मी.. ते किमान २० बळी.. त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? काँक्रीट आणि डांबरात भेसळ करणारे उत्पादक, रस्त्याच्या कामातील दर्जाबाबत तडजोड करणारे कंत्राटदार, त्यांवर नीट लक्ष न ठेवणारे अभियंते, पालिकेचे अधिकारी, नेते की त्या नेत्यांना निवडून देणारे आपण? हे सगळे आपल्यातलेच. ते अभियंते, ते अधिकारी हे तर आपल्याच वर्गातले. त्यांना जबाबदार मानायचे तर केवळ राज्ययंत्रणेलाच नव्हे, तर समाजव्यवस्थेकडेही बोट दाखवावे लागेल. ते कसे परवडायचे? मग त्या रितेशला कोणी मारले? की कोणीच मारले नाही? तसेच असेल. नो वन किल्ड रितेश. हे असेच जाहीर करायला हवे. नाही तर त्या वेदनेचा सल आपल्याला नीट जगू देणार नाही..

First Published on August 5, 2017 2:23 am

Web Title: bad roads killed people in maharashtra
 1. R
  rohan
  Aug 13, 2017 at 10:49 am
  वाचायचा होता खूप दिवसांपासून पण शेवटी वाचलाच आज... असे लेख लिहिणे वाचणे पण आता काही नवीन राहिले नाही.... रस्ता ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडणार आहे आपल्याकडे आता.... आणि त्याच्यावर उपाय कितीही केले तरी त्याचे परिणाम दिसायला अजून काही वर्षे जावी लागणार... तिकडे कार कंपन्या सुद्धा ग्राउंड क्लीअरन्स वाढवत आहे दरवर्षी... खरच इतके भ्रष्ट असू आपण असे वाटत नव्हते....एक वेळ गद्दार तरी परवडले...एकदाच नष्ट करता येते त्यांना... पण कर्तव्याशी गद्दारी करणारे हे महान लोक ह्या व्यवस्थेला संपवून टाकतील एक दिवस...
  Reply
 2. J
  JaiShriRam
  Aug 7, 2017 at 7:10 pm
  कमाल आहे या भक्तांची...किती विकृत झालेले आहेत...या टॉपिक वरही राजकारण करतात ......शासन कोणाचे हि असो सर्वांनी चुकीच्या गोष्टीविरुद्ध आवाज उठ्वलाच पाहिजे...
  Reply
 3. U
  Ulhas
  Aug 7, 2017 at 1:33 pm
  रस्त्यावर बेजाबदारपणे टाकलेल्या एखाद्या केळ्याच्या वरून पाय घसरून न पडण्याची काळजी जशी आपली आपणच घ्यायची तशीच रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे घसरून न पडण्याची काळजी आपली आपणच घ्यायची सवय करावी हे उत्तम. दुचाकी फटफटीचे अपघात हा व्यापक विषय आहे आणि त्याचा आभास करताना दुचाकी चालवताना चालकाला येणारे फेफरे हा मुद्दा अग्रणी ठरावा. पावसाळ्यातील खड्यांचे सोडा, एरवी दुचाक्या ह्या हत्यार चालवावे ताशा चालवल्या जातात. दुचाकी फटफटी हा रस्त्यावरील साक्षात उच्छाद आहे.
  Reply
 4. V
  vivek
  Aug 5, 2017 at 1:45 pm
  "चलता है" मानसिकता जो पर्यंत राहील तो पर्यंत खड्डेही राहतील जीवघेणे अपघातही होतील.
  Reply
 5. A
  Ajay Kotwal
  Aug 5, 2017 at 1:14 pm
  we are feeling pity about the govt employees who are corrupt and because of them everything is in mess, we really do not know when things will improve, because unless corruption stops noting will improve
  Reply
 6. P
  paresh
  Aug 5, 2017 at 1:03 pm
  आधीच नाटकी विधाने केली कि आपोआप मी नाही त्यातला म्हणता येते. ते लोक भ्रष्टाचार करतात , म्हणून डांबरी रस्ते आणि आता काँक्रेट चे रस्ते. म्हणजे माझे घड्याळ आता चालू. १९९५ पासून रस्त्यांशी नीफ ीत आहेत. उड्डाण चे क्रेडिट घेतात. मग इतकी वर्षाच्या रस्त्यांच्या दुर्दशेच्या पापात तुमचा पण वाटा आहे. तरी बरे pavour ब्लॉक रस्ते बंद झाले
  Reply
 7. U
  umesh
  Aug 5, 2017 at 11:57 am
  मेंदू न वापरता फक्त ह्रदय वापरुन लिहिलेले संपादकीय आहे नुसतीच भावनाप्रधानता समस्या मांडली तर वस्तुनिष्ठ विचार करुन उपाय सुचवायला हवेत संपादकांकडे अशा समस्येवर उपाय नसतो हे मी तरी मानायला तयार नाही त्याऐवजी जे सर्वांना माहीतच आहे ते पुन्हा सांगून काय फायदा हे म्हणजे प्रीचिंग द कन्व्हर्टेड झाले ही परिस्थिती लहान पोरालाही माहीत आहे नेक्सस माहीत आहे नुसतं उरबडवेगिरीचं लिहून फक्त दिवस भरल्याचं समाधान मिळेल बाकी या लेखाचा उपयोग शून्य आहे भाजप सरकारविरोधात लोकांना पेटवण्याचा प्रयत्नही वायाच जाणार मेणबत्ती संप्रदाय कुठे गेला विचारता नीतिशकुमारनी भाजपशी जवळीक केली तर पुरस्कारवापसीवाले साहित्यिक कुठे तोंडात कुणाचा घेऊन बसले हे का विचारावे वाटत नाही? तसेही हा अग्रलेख कुबेरांनी लिहिला नाहीच हे उघडच आहे
  Reply
 8. K
  KRISHNA
  Aug 5, 2017 at 11:37 am
  Here, what we need is new type of movement like chipko movement to save trees people hugged trees. Here, we should go and take one " KHADDA" occupy it until authority repares road completely.... And block roadd, highways as possible.... So occupy each "KHADDA"....
  Reply
 9. U
  uday
  Aug 5, 2017 at 10:55 am
  मराठी शाळेत असताना आम्हाला एक धडा होता. त्या मध्ये - वाल्या कोळी हा एक दरोडेखोर असतो. एकदा जंगलात दरोडा घालण्यासाठी लपला असताना त्याला नारदमुनी येताना दिसतात. तो त्यांच्या मार्गात आडवा होतो आणि त्यांना दरडावतो - ' ए तुझ्याजवळ असेल ते ताबडतोब ा दे,नाहीतर तुझा मुडदा पाडेन.' नारद म्हणतात,'अरे मी तर भिकारी,माझ्याजवळ काय असणार ? पण तू हे कोणासाठी करतोयस ?' वाल्या म्हणतो,' माझ्या बायको-मुलांसाठी.' त्यावर नारद म्हणतात,' पण या तुझ्या पापात बायको-मुले भागी होणार का ? जाऊन विचारून ये त्यांना.तोपर्यंत मी येथे थांबतो.' वाल्या घरी जाऊन बायको-मुलांना विचारतो, तर ते सांगतात - तुमचा असला पापाचा पैसा आम्हाला नको.आम्ही त्या पापात भागी होणार नाही. हे ऐकून वाल्याला पश्चाताप होतो आणि तो नारदमुनींकडे परत येऊन त्यांना सर्व सांगतो.नारद त्याला उपदेश करतात आणि वाल्या कोळ्याचा ' वाल्मिकी ' ऋषी होतो. सध्याच्या काळात कोणत्या बायका-मुले आपल्या बापाला हा प्रश्न विचारतात ? कोणीही नाही. सर्वजण ' पापाच्या पैशावर मजा मारत बसतात आणि आणखी पैसा कसा मिळेल याचे मार्ग शोधत बसतात. आणि शेवटी वाईट अवस्थेत मरण पावतात.
  Reply
 10. M
  Manish
  Aug 5, 2017 at 10:20 am
  After long time sensible editorial rather than targetting parties target the system which is constant without election
  Reply
 11. S
  sandeep
  Aug 5, 2017 at 10:01 am
  आता भक्त म्हणतील काँग्रेसच्या काळात नव्हते का खड्डे ?
  Reply
 12. S
  Shriram Bapat
  Aug 5, 2017 at 8:53 am
  एक बरे असते, हा भ्रष्टाचारी-तो भ्रष्टाचारी म्हणून स्वतः सोडून सर्वानाच शिव्या घातल्या की खरे भ्रष्टाचारी त्यात आपोआप येतात. पण असे केले तर ते फारच नजरेत भरेल म्हणून थोडेसे सांभाळत स्व-ताडन करायचे. वैफल्याने बोलत आहोत असे दाखवत "केवळ निष्काळजीपणाच नाही तर तो भ्रष्टाचारही आहे. आणि तो नागरिकांचा आहे, तुमचा आमचा आहे." असे म्हणायचे. पण हे नाटकीपणाचे बोलणे सत्य आहे हे लोक जाणतात. कोठे ते पोटाला चिमटा काढत, सत्याचा वसा घेत लेखणी चालवणारे निस्पृह संपादक, आणि कोठे हे एक ओळही मतलबाशिवाय न छापणारे संपादक. यांच्याकडे 'आपला तो बाळ्या-दुसऱ्याचे ते कार्टे' असाच बाणा असतो. कारण बाळ्याकडून घसघशीत मोत्याचा चारा मिळत असतो. अगदी वाचकांच्या पत्रातून सुद्धा अरुंधती रॉय सारख्या देशद्रोही गणंगांचे उदात्तीकरण करायचे चालू असते. एक साधे संख्याशास्त्रीय सत्य आहे ते म्हणजे अपघात हे अनादिकालापासून होतच आलेले आहेत. सरासरीच्या नियमाप्रमाणे अपघातात मरणाऱ्यांची संख्या अमुक टक्के ही कायम राहिलेली आहे. मग त्यातल्याच काही बळींची नावे घेत आकांडतांडव करायचे हा मात्र संपादकीय कुटीलपणाचा भाग झाला. ढोंगी कुठले.
  Reply
 13. शुभानन आजगांवकर
  Aug 5, 2017 at 8:05 am
  नेहेमी प्रमाणे मनापासून कळकळीने लिहिलेला लेख. निदान ह्या लेखा करीता तरी आपल्याला शिव्या शाप मिळणार नाही अशी आशा आहे. 😊
  Reply
 14. उर्मिला.अशोक.शहा
  Aug 5, 2017 at 6:01 am
  वंदे मातरम-शासन भाजप चे असो का सेने चे खड्ड्यामुळे होणारे मृत्यूंची जवाबदरी त्यांचीच या वेळी राज्यात बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तरी सुद्धा दूरचा विचार करून डांबरी ऐवजी काँक्रीट चे रस्ते उपकारक ठरतील आणि जनते चा जीव जाणार नाही, अपघातांचे प्रमाण कमी होईल. डांबरी रस्ते आणि त्यावर पडणारे वार्षिक खड्डे हे भ्रष्टाचार चे मूळ आहे. आणि जनतेला त्याचा त्रास भोगावा लागतो शासनाने सावध व्हावे आणि रस्ते दुरुस्ती चे अथवा नवीन काँक्रीट रस्त्यांचे नियोजन करावे जा ग ते र हो
  Reply
 15. Load More Comments