17 August 2017

News Flash

कर्मदरिद्री

राज्यातील सत्ताधारी अनेक आघाडय़ांवर डळमळीत असताना विरोधी पक्षांनी ठाम राहायला हवे.

लोकसत्ता टीम | Updated: July 25, 2017 3:16 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्यातील सत्ताधारी अनेक आघाडय़ांवर डळमळीत असताना विरोधी पक्षांनी ठाम राहायला हवे. ते राहिले दूरच..

काही तरी असलेल्यांपेक्षा काही नसलेलेच भांडण, कज्जेदलाली आदींत अधिक वेळ घालवतात. याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. त्यामुळेच शहरांतील धनिकांच्या इमले वसाहतींपेक्षा गरिबांच्या वाडीवस्तीत अधिक कलहकल्लोळ दिसतो. याच न्यायाने सत्ताधाऱ्यांपेक्षा सत्तेपासून वंचित असलेले विरोधी पक्षीय हे नेहमीच मतभेदाने ग्रस्त असतात. महाराष्ट्र विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच जो काही दुभंग निर्माण झाला आहे, तो वरील नियमच सिद्ध करणारा आहे. राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आयोजित चहापानावर तर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातलाच परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे परस्परांच्या बैठकांनाही गैरहजर राहिले. यातील मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला यात काही नवे नाही. अलीकडच्या काळात तर या चहापानावर बहिष्काराची प्रथाच सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी निमंत्रणे धाडायची आणि विरोधकांनी ती अव्हेरायची हे इतके सर्रास आणि सरसकट होते की या दोघांतील हे लटके मतभेद प्रदर्शन लक्षात घेत सरकारने ही प्रथा तरी बंद करावी किंवा पेय तरी बदलून पाहावे. तेव्हा या बैठकीबाबत नवे असे काही नाही. प्रश्न आहे तो दुसऱ्या बैठकीचा. तीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख विरोधी पक्ष सहभागी होऊन सरकारविरोधात संयुक्त आघाडी उभारण्याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित होते. ते झालेच नाही. त्यामागील कारण हे वंचित कसे मतभेदग्रस्त असतात ते दर्शवणारे आहे.

वरकरणी या दोघांतील मतभेद आहेत ते एका क्षुद्र मुद्दय़ावर. महाराष्ट्र विधानसभेत गौरव करताना पहिला मान माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा की माजी संरक्षणमंत्री, राष्ट्रवादीकार शरद पवार यांचा. शिष्टाचाराप्रमाणे पहिला सन्मान इंदिरा गांधी यांचा व्हायला हवा असा काँग्रेसचा आग्रह तर पवार हे या राज्यातील दोन्ही सदनांचे सभासद होते तेव्हा पहिला मान त्यांचा असे राष्ट्रवादीचे म्हणणे. या दोहोंतील एकही पक्ष दुसऱ्याचे श्रेष्ठत्व मानण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे या दोघांनीही एकमेकांच्या बैठकांकडे पाठ फिरवली आणि वार्ताहर बैठकींसाठी दोन स्वतंत्र सवतेसुभे उभारले. परिणामी सत्ताधाऱ्यांच्या बहुमताच्या खडकावर आदळून फुटण्याऐवजी विरोधी पक्षांची नौका नांगरलेल्या अवस्थेत असतानाच एकमेकांवर आपटून जायबंदी झाली. पण हे जे काही झाले त्यामागील खरे कारण पाहू गेल्यास वेगळेच सत्य आढळेल. या सत्याची दोन टोके आहेत. एका बाजूला भाजपवासी होण्यासाठी टपून बसलेले काँग्रेसजन आणि दुसरीकडे तसे काही न करता भाजपला मदत व्हावी असे करण्यास उत्सुक असलेला राष्ट्रवादी. हे वास्तव लक्षात घेता दोन्हींचा समाचार घेणे आवश्यक ठरते.

पहिला मुद्दा काँग्रेसचा. आज महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वशून्य आहे. पक्षाध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे खरे, पण ते मनोमन धास्तावलेल्या अवस्थेत आहेत. सत्ताधारी भाजपविरोधात आपण फारच टीकास्त्र सोडीत राहिलो तर न जाणो आपला ‘छगन भुजबळ’ व्हायचा, ही ती मनोमन भीती. त्यामुळे ते भाजपविरोधात काहूर उठवण्यास काचकूच करताना दिसतात. नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुदलात काँग्रेसनिष्ठाच संशयास्पद. भाजप आधी कोणाला आपले म्हणणार ही या दोहोंतील स्पर्धा. तसा या दोहोंचाही बहुपक्षीय अनुभव तगडाच. राधाकृष्ण हे सेना-भाजपच्या काळात सत्ताकाळात मंत्रिपदी होते. तसेच एक वेळ मुख्यमंत्रिपद भोगल्यानंतर पुन्हा ते मिळण्याची शक्यता नसल्याने राणे यांनी काँग्रेसला जवळ केले. परंतु एकदा पक्षात आल्यानंतर काँग्रेसने राणे यांच्या हाती धत्तुरा दिला. त्यांना सेनेतही नव्याने काही मिळण्याची शक्यता नव्हती. आता ती काँग्रेसमध्येही नाही. त्यात परत जोडीला कर्तबगार चिरंजीवांची चिंता. यामुळे राणे भाजपचा दरवाजा किलकिला व्हावा यासाठी रवळनाथाक साकडे घालून आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांचे काँग्रेसकडे लक्ष नाही. राहता राहिले पृथ्वीराज चव्हाण. कार्यक्षमतेबाबत त्यांच्याशी स्पर्धा करेल असा नेता आज काँग्रेसकडे नाही. पण तीच त्यांची अडचण आहे. कार्यक्षमास पुढे करावे तर राजकारण मागे राहते आणि राजकारण बऱ्यापैकी जमू शकेल अशांच्या कार्यक्षमतेची बोंब ही काँग्रेसची अडचण. हे काँग्रेसचे वास्तव.

तर राष्ट्रवादीची दुसरीच तऱ्हा. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांच्या वैयक्तिक निष्ठांविषयी आणि भाजपप्रेमाविषयी संशय घ्यावा अशी परिस्थिती. तर राष्ट्रवादी हा संपूर्ण पक्षच संशयाच्या धुक्यात. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांच्यातील सख्य आणि सौहार्द हे राजकारणातील उघड गुपित. निवडणुकांच्या हंगामात शत्रुपक्ष म्हणून दाखवण्यासाठी असलेला राष्ट्रवादी हा सत्ता मिळाल्यावर भाजपसाठी स्नेहांकित होतो हेदेखील आपल्या राजकारणाचे निखळ सत्य. त्याचमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामती सतत खुणावते आणि त्याच प्रेमापोटी मग आपण राजकारणात पवार यांचे बोट धरून आल्याचे सत्यदेखील मोदी यांना गवसते. या मैत्रीपूर्ण विरोधामुळे भाजपला राष्ट्रवादी हा प्रतिस्पर्धी वाटतच नाही. किंबहुना २०१९ साली महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिक काही खच्चीकरण करावयाची वेळ आली तर हाताशी राष्ट्रवादी पर्याय असलेला बरा असाच विचार भाजपच्या केंद्रीय वर्तुळात केला जातो. हे प्रेम दुतर्फा आहे. ते विविध मार्गानी व्यक्त होत असते. ज्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर भाजपने २०१४ सालच्या निवडणुकांत रान माजवले त्या पाटबंधारे भ्रष्टाचाराच्या चौकशीत पवार अजित राहतील याची काळजी देवेंद्र फडणवीस घेतात ती या प्रेमापोटीच. याच्या जोडीला फडणवीस आणि भाजप नेत्यांना राष्ट्रवादीविषयी ममत्व वाटावे यामागे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे शिवसेना. हा पक्ष केंद्रात आणि दिल्लीत दोनही ठिकाणी सत्तेत आहे. परंतु तरीही तो असमाधानी आहे. कारण भाजपकडून त्यास मिळत असलेली दुय्यम वागणूक. वास्तविक राज्यात भाजपची सत्ता सेनेच्या टेकूवर आहे. पण तरी भाजपला सेनेची जराही फिकीर नाही. गर्जेल तो बरसेल काय, या वाक्प्रचारावर भाजपचा ठाम विश्वास असल्याने रोज नवनवी बडबडगीते गाणाऱ्या सेनेस तो हिंग लावून विचारत नाही. एक तर सेना आपला पाठिंबा काढण्याचा अविचार करणार नाही यावर भाजपचा ठाम विश्वास आहे आणि समजा तो खोटा ठरलाच तर अडीअडचणीला राष्ट्रवादी आहेच. त्यामुळेही भाजपला सेनेची फिकीर नाही. यातून एक विचित्र परिस्थिती आपल्याकडे उद्भवताना दिसते. समविचारी पक्षाशी आघाडी करायची पण मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे ते विरोधी पक्षाशी. परिणामी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांत आघाडी असूनही दोहोंतील संबंध तणावपूर्णच आहेत आणि दुसरीकडे भाजप आणि सेना हे युतीत असले तरी दोघांचाही परस्परांवर अविश्वासच आहे.

या अशा सार्वत्रिक अविश्वासाच्या वातावरणात नेहमी फावते ते सत्ताधाऱ्यांचेच. किंबहुना राजकीय वातावरणात असा अविश्वास भरलेलाच राहावा ही सत्ताधाऱ्यांचीच इच्छा असते. त्यामुळे महाराष्ट्रात सांप्रत काळात सत्ताधारी भाजपने चिंता करावी असे काही नाही. उलट घोर लागायला हवा तो विरोधी पक्षीयांना. डाळ खरेदी ते शेतकरी आत्महत्या ते झोपडपट्टी पुनर्वसन योजना अशा अनेक आघाडय़ांवर सत्ताधारी डळमळीत असताना विरोधी पक्षांनी ठाम राहायला हवे. ते राहिले दूरच. उलट तेच एकमेकांत डगमगताना दिसतात. ज्या काळात जोमाने काम करून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरायचे त्याच काळात विरोधकांचे हे असे होणार असेल तर त्याचे वर्णन एकाच शब्दांत करावे लागेल. कर्मदरिद्री.

First Published on July 25, 2017 3:16 am

Web Title: bjp congress party ncp shiv sena monsoon session 2017
 1. D
  Dnyaneshwar Reddy
  Jul 26, 2017 at 5:45 pm
  Virodhi party asane important ahe karan - aaj bahumatachya joravar ssudha curruption karayala sattadhari mage pude pahanar nahit...tyamule strong opposition party asayla havich .....
  Reply
 2. सदाशिव शाळिग्राम
  Jul 26, 2017 at 3:50 pm
  वास्तवात श्री. शरद पवारांनी फक्त बारामतीची प्रगती केली, पुण्याचा आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-बारामती रस्त्यावर नेण्यासाठी काय केले, किती उशीर करण्यात मदत केली आहे. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात कसा लवकर संपेल इत्यादि कार्य केली आहेत. भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधीनी पाकिस्तान ताेडून बांगला देशाची निर्मिती व खलिस्तान निर्माण होऊन दिले नाही, त्यामुळे. स्वताचे मरण आेढवून घेतले. यावरून कोण मोठा वाद निरर्थक आहे.
  Reply
 3. A
  AMIT
  Jul 26, 2017 at 2:23 pm
  उदय राव - ज्याचे तुम्हाला दुःख होते आहे , तोच भाजप इतके दिवस प्रादेशिक पक्षांचा पदर खाली राहिला आहे. बाकी प्रादेशिक पक्षांच्या उपद्रवाबद्दल थेट न बोलता सुद्धा बरेच काही लिहिले गेले आहे.पण स्टेट्स्मन लोकांनी अश्या पक्षाच्या मतांना धोरणात सामावून घेऊन त्यांना सोबत घेऊन चालावे लागते - कारण त्या पक्षाला मतदान करणारे सुद्धा भारतीय नागरिकच आहेत. जर भाजप आणि काँग्रेस ने स्थानिक लोकांना सोबत घेतले असते तर त्यांच्यावर अशी वेळ आली नसती.
  Reply
 4. U
  Uday
  Jul 26, 2017 at 10:38 am
  सक्षम विरोधी पक्ष नाही ही स्थिती बरी नाही हे म्हणणे समजू शकतो पण म्हणून भाजप चे फावले त्याचे दुःख होते आहे का?. जेव्हा काँग्रेसला सबळ विरोधी पक्ष नव्हता तेव्हा इतके वाईट वाटत होते का? खरे तर काँग्रेस च्या ऱ्हास बरोबर प्रादेशिक पक्ष बळकट होऊन राष्ट्रीय हित मागे पडत चालले आहे त्याची काहीही खंत संपादकांना वाटत नाही याचेच आश्चर्य वाटते आहे. आज काँग्रेस सगळ्या राज्यात प्रादेशिक पक्षा चा पदर धरून उभा आहे. प्रादेशिक पक्षांचे देशाच्या एकूण विकासा बद्दल धोरण उदासीन असते. किंबहुना बर्याच वेळी ते केंद्र सरकारच्या विरोधात असते. हा धोका तितकाच मोठा आहे. हे लोकांना जेवढे लवकर समजेल तेवढे बरे.कडबोळ्यांचे सरकार असले की केंद्रा चे धोरण कसे डळमळीत होते हे वारंवार दिसून आलेले आहे.
  Reply
 5. N
  narendra
  Jul 26, 2017 at 10:22 am
  यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे सत्ताधारींनी चहा ऐवजी दुसरे सर्वांना आकर्षित करेल असे पेय द्यावे म्हणजे ते या आधुनिक काळात समर्पक होईल दोन्ही बाजू एकमेकाला चियर्स म्हणून एकत्र पेयपान करतील त्यामुळे राज्याचे प्रश्न कीसरसे सुटतील.
  Reply
 6. S
  Salim
  Jul 25, 2017 at 11:17 pm
  अरे आज संपादक रस्ता चुकले कि काय ? :-)
  Reply
 7. P
  paresh
  Jul 25, 2017 at 7:41 pm
  भाजपचे गेल्या तीन वर्षात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीतील ४० टक्के आयाराम आहेत. बहुतांशी विरोधी पक्षातील. हे सगळे जरा भाजपचा उतारचालू झाला तर पहिले पळतील, भक्त बिचारे नुसत्तेच भोई.
  Reply
 8. U
  umesh
  Jul 25, 2017 at 7:06 pm
  कॉंग्रेसचा एकछत्री अं होता तेव्हा विरोधकांच्या ऐक्याची कुबेरांना कधी चिंता नव्हती आणिबाणीच्या काळात विरोधक एकत्र आले आणि संपादकांसाठी प्रात:स्मरणीय विश्ववंद्य वगैरे इंदिरा भुईसपाट झाल्या तेव्हा संपादक कुठे होते माहीत नाही तसा प्रयोग आता भाजपविरोधात होऊ शकणार नाही हे संपादकांचे खरे दु:ख जळजळ आहे मात्र कॉंग्रेस राष्ट्रवादीचे गणंग नेते पाहिल्यावर हे स्वप्नात तरी शक्य वाटते का?
  Reply
 9. U
  umesh
  Jul 25, 2017 at 6:59 pm
  व्हॉट्स अपी विनोद अग्रलेखात वापरून संपादकांनी आचरटपणात आपण शेंबड्या पोराला हार जाणार नाही हे सिद्घ केले अन्यथा पेय बदलून पहावे हा शिळा झालेला विनोद वापरला नसता बाकी संपादकांचे दु:ख समजू शकतो त्याला इलाज नाही कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या गणंग नेत्यांनी संपादकांवर रडण्याची वेळ आणली आहे
  Reply
 10. H
  harshad
  Jul 25, 2017 at 4:37 pm
  पेय बदलून पाहावे हे वाक्य आवडले.
  Reply
 11. M
  Mahesh Gauri
  Jul 25, 2017 at 2:34 pm
  लोकसत्ता तुम्हाला काँग्रेसचा ऱ्हास झाला आहे हे स्वीकार करायला जड जात आहे. तीच गोष्ट राष्ट्रवादीची आहे. तळ्यात मळ्यात करणाऱ्या आणि अखंड पैसे खाणाऱ्या बारामतीकरांना कधीतरी जनता लाथाडणाच. राजीव, सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या कडे काय शिक्षण अथवा हुशारी आहे कि देशाचे नेतृत्व त्याना मिळावे. विरोधी पक्षांनी त्या पेक्षा लोकशाहीने दिलेला कौल मान्य करून विधायक कर्तव्य अडा करावे.
  Reply
 12. K
  Kumar
  Jul 25, 2017 at 2:20 pm
  आज काहीही कारण नसताना वाचकांचा प्रतिक्रयांचा रोख उर्मिला जी कड़े वळलेला आहे...
  Reply
 13. A
  AMIT
  Jul 25, 2017 at 1:47 pm
  भाजप चे नाव न घेतल्याने भक्तांना हर्षवायू...तरीसुद्धा संपादकांबद्दल असलेली मळमळ घश्यात बोट घालून ते बाहेर काढतील यात शंका नाही. बाकी पवारानंतर राष्ट्रवादी चे अस्तित्व उरणार नाही आणि काँग्रेस चे अस्तित्व फक्त निवडणुकीपुरते उरेल. केजरीवाल स्वतःच्या हातानी आपल्या पक्षाचे सरण रचत आहेत. राहता राहिला शिवसेना - ते गड , मावळे आणि वफादार - गद्दार इत्यादी विशेषणांतच अडकून पडलेत. आणि भाजप आयाराम गयाराम लोकांचा पक्ष. सगळीकडे फक्त आनंदी आनंदआहे. आणि दिवस संबित पत्रा सारख्या वाचाळांचे आहेत.
  Reply
 14. R
  Rajesh
  Jul 25, 2017 at 1:08 pm
  प्रभू रामचंद्रांकडे एकच प्रार्थना .....चांगली स्वच्छ आणि कार्यक्षम नेतेमंडळी येऊ देत राजकारणात ....
  Reply
 15. J
  jit
  Jul 25, 2017 at 12:49 pm
  एक सकारात्मक लिहिला, निदान रोज बाजप ला व मोदींवर दुगाण्या झाडणाया पेक्षा, आपल्या आवडत्या पक्षाला उपदेशाचे दोन वळसे पाजले ते चांगले केले...त.
  Reply
 16. विनोद
  Jul 25, 2017 at 11:58 am
  उर्मिला ताईंचे जाज्वल्य देशप्रेम पाहून प्रेरणा मिळते. त्यांचे पुर्वज स्वातंत्र्य सेनानी असावेत आणी त्यांच्या घरातील बरेच जण सैन्यात असावेत. त्यांच्या देशप्रेमाने आेतप्राेत प्रतिक्रीयांनी आम्हालाही देशासाठी काहीतरी करावे वाटते.
  Reply
 17. R
  rmmishra
  Jul 25, 2017 at 11:48 am
  तुम्ही विरोधी पक्षान्चासुद्धा समाचार घेता हे उत्तम।
  Reply
 18. A
  abdul razzak
  Jul 25, 2017 at 11:45 am
  पेय तरी बदलून पाहावे.
  Reply
 19. R
  Rakesh
  Jul 25, 2017 at 11:15 am
  उर्मिला ताई, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देता आले तर पहा. ज्या नेत्याने भाजप ला २ खासदारावरून सत्ता मिळवून दिली तो जिवंत असताना त्याचे काय हाल तुमच्या पक्षाने केले? भारतीय मानवी संस्कृती मध्ये तरी अशी वागणूक बसत नाही. संजय जोशी सारख्या सज्जन माणसाची कारकीर्द संपविण्यासाठी किती खालची पातळी गाठली गेली हे सर्वश्रुत आहे. "शरद पवार सक्षम असताना" हे शब्द निर्लज्जपणे वापरण्याआधी आपण आपल्या इतर प्रतिक्रियांमध्ये किती खालच्या दर्जाची टीका केली होती हे आठवले नाही? बाकी निर्लज्ज हा शब्द लाजेल अशी तुमची वागणूक असते हे वेगळे. अजून एक प्रश्न पश्चिम बंगाल मध्ये महिलांची तस्करी करणारे तुमचे नेते यांचे महाराष्ट्रात पण लागेबांधे आहेत का ? कारण आता मुंबई चा दुसरा नंबर लागतोय. तुम्हाला या गोष्टीवर एक स्त्री म्हणून कधी टीका करावी नाही वाटली? प्रतिक्रिया - प्रयत्न दुसरा
  Reply
 20. संदेश केसरकर
  Jul 25, 2017 at 10:59 am
  उत्कृष्ट लेख, परखड विचार. वास्तवाचे विदारक पृथ:करण.
  Reply
 21. D
  Diwakar Godbole
  Jul 25, 2017 at 9:58 am
  मी लहानपणी प्रजा समाजवादी नावाचा एक राजकीय पक्ष होता यथावकाश त्याची शकले उडू लागली त्याकाळात एक विनोद ऐकला होता तो म्हणजे २ समाजवादी एकत्र आले तर ३ राजकीय पक्ष होतात कारण प्रत्येकाचा एकेक वेगळा पक्ष आणि दोघे मिळून तिसरा पक्ष.असेच काहीसे महाराष्ट्राचे राजकारण सध्या चाललेले दिसत आहे.
  Reply
 22. Load More Comments