विनी द पूह या काल्पनिक बालभालूने असे काय केले की जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सत्ताप्रमुखास त्याची दहशत वाटावी?

मिकी माऊस आणि डोनाल्ड डक या वॉल्ट डिस्ने यांच्या पात्रांखेरीज जगभरात अजरामर झालेले पात्र म्हणजे विनी द पूह हे लडिवाळ अस्वल. भारतीय आणि त्यातही मराठी बालिकांचे लहानपण एके काळी ठकीनामक बाहुलीच्या सान्निध्यात जात असे. गेली काही दशके या बालिकांच्या खांद्यावर भालूनामक एक अस्वल दिसू लागले आहे. मऊ मऊ शरीराचे, मोठय़ा डोळ्यांचे, उंचीने बसके असे हे अस्वल म्हणजेच विनी द पूह. ब्रिटिश लेखक ए ए मिल्न या लेखकाची विनी ही निर्मिती. अलीकडे घरोघर लोकप्रिय झालेल्या हॅरी पॉटर या काल्पनिक पात्राप्रमाणे विनी ही ब्रिटिश लेखकाची निर्मिती. या लेखकाच्या मुलाने अस्वल पाळलेले होते आणि त्यावर तो जिवापाड प्रेम करीत असे. त्यातून या लेखकाच्या कल्पनाशक्तीतून सर्वच बालकांना आवडेल अशा बालअस्वलाची निर्मिती झाली. आज त्याची कुंडली मांडण्याचे कारण म्हणजे चीनचे सत्ताधीश क्षी जिनिपग यांनी आपल्या देशात विनी द पूह या बालभालूच्या वापरावर पूर्ण बंदी घातली. या बालभालूचा इतका धसका त्यांनी घेतला की समाजमाध्यमातूनही त्याचे दर्शन घडवले जाणार नाही, अशीही व्यवस्था त्यांनी केली असून चीनसंदर्भात कोणाकडून काहीही उल्लेख झाला तरी त्यात विनी द पूहचा लडिवाळ, खटय़ाळ चेहरा दिसणार नाही, असा त्यांच्या सरकारचा प्रयत्न आहे. हे वाचून साहजिकच कोणालाही प्रश्न पडेल की या बिचाऱ्या बालभालूने असे केले तरी काय की जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत सत्ताप्रमुखास त्याची दहशत वाटावी?

या भीतीमागील निमित्त आहे ते गेल्या काही वर्षांतील चीनमधील प्रसंग आणि त्या प्रसंगास जन्माला घालणारी दमनशाही. काही वर्षांपूर्वी चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांची त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांची भेट झाली. या दोन देशांतील संबंध कमालीचे तणावपूर्ण आहेत. त्यामुळे मिळेल तेथे जपानचे नाक कापण्याचा चीनचा प्रयत्न असतो. तर आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचा भाग म्हणून जिनिपग यांना अ‍ॅबे यांच्याशी हस्तांदोलन करावे लागले. या हस्तांदोलनात प्राण नव्हता. म्हणजे हा शिष्टाचार केवळ पाळावयाचा म्हणून पाळला गेल्याचे ते पाहणाऱ्या कोणालाही सहज समजून येत होते. परंतु यावर टीकात्मक प्रतिक्रिया चीनमध्ये उमटण्याची शक्यताच नाही. कारण तितके माध्यमस्वातंत्र्य त्या देशात नाही. तेव्हा यावर मात करून जे कळवायचे ते कळवता यावे म्हणून समाजमाध्यमातील चतुरांनी विनी द पूह आणि एरॉय यांच्या भेटीचा प्रसंग अर्कचित्रातून रंगवला. विनी हे एक बालभालू तर एरॉय हे झोपाळलेले, सुस्त, मलूल डोळ्यांचे गाढव. हीदेखील विनीप्रमाणे मिल्न यांचीच निर्मिती. समाजमाध्यमातील त्या अर्कचित्रात जपानचे पंतप्रधान हे एरॉय दाखवले गेले तर विनी होते अध्यक्ष जिनिपग. मिटल्या डोळ्यांनी पाहुण्याशी हातमिळवणी करणारे विनी म्हणजे कोण हे सहज कळण्यासारखे होते. त्यानंतर या जिनिपग यांनी उघडय़ा जीपमधून लष्कराची मानवंदना स्वीकारली. त्या वेळी जिनिपग हे कसे दिसत होते याचे वर्णन पुन्हा एकदा विनीच्या मदतीने केले गेले. हा बालभालू खेळण्यातल्या मोटारीत बसलेला आहे आणि छताच्या वर मान काढून बाहेर पाहतो आहे, असे ते अर्कचित्र. त्या वेळी तेही जिनिपग यांच्यावरच बेतलेले असल्याचे कळून आले. गेल्या आठवडय़ात असेच एक चित्र समाजमाध्यमांत भिरकावले गेले. जिनिपग आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीवर ते आधारित आहे. ओबामा चांगलेच उंच आणि भारदस्त. तर जिनिपग तुलनेने बुटके आणि वागण्या-बोलण्यात काहीही जिवंतपणा नसलेले. या भेटीचे वर्णन करताना बुटका भालू शेजारी हसऱ्या, उत्साही वाघाच्या सोबतीने चालत असल्याचे दाखवले गेले. ही कलात्मक मांडणी इतकी खुबीने केलेली आहे की आंतरराष्ट्रीय राजकारणाचा किमान अभ्यास असलेल्यासही या भालू आणि वाघांत जिनिपग आणि ओबामा दडले असल्याचे कळून यावे. परंतु देशातील सध्याचे वातावरण लक्षात घेता या अर्कचित्राचा राजकीय प्रसारासाठी वापर होऊ शकेल अशी भीती वाटल्याने चीन सरकारने नेमकी या चित्रावरच बंदी घातली असून त्यामुळे विनी हा बालभालू अचानक चच्रेत आला. तसेच इतका समर्थ सत्ताधीश हा एका बालरम्य व्यंगचित्रालादेखील कसा घाबरतो हेदेखील या निमित्ताने जगासमोर आले. तेव्हा या संदर्भात प्रश्न असा की चिनी सत्ताधीशांचा संताप होईल असे या अर्कचित्रात आहे तरी काय? ते चीनमधील सध्याच्या वातावरणात आहे. दोनच दिवसांपूर्वी विख्यात नोबेल पारितोषिक विजेता चिनी साहित्यिक, बंडखोर लिउ शिआबो यांचे निधन झाले. स्वातंत्र्याची, लोकशाहीची गोडवे गाणारी एक कविता लिहिली म्हणून ते आयुष्यभर बंदिवासात होते. तुरुंगातच कर्करोगाने त्यांचे निधन झाले. तुरुंगात त्यांनी लिहिलेली कविता चिनी स्वातंत्र्य प्रेरणांचे प्रतीक मानली जाते. १९८९ साली गाजलेल्या तिआनान्मेन चौकातील चीन सरकारविरोधातील बंडाचे त्याने काही प्रमाणात नेतृत्व केले होते. त्याची इतकी दहशत चीन सरकारला की त्याच्या निधनानंतर शोकसंदेश पाठवायलाही सरकारने बंदी केली असून समाजमाध्यमांच्या अवकाशातही कोणी याबद्दल काहीही मत मांडणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना जारी करण्यात आले आहेत. विनी द पूह या बालभालूचा सध्याचा संदर्भ तो इतकाच.

परंतु या निमित्ताने जगभरातील लोकशाही प्रेरणावादी आणि त्यांना नियंत्रित करू पाहणारे सत्ताधीश ही चर्चा मोठय़ा जोमाने सुरू झाल्याचे दिसते. जगातील कोणत्याही एकाधिकारशाही वृत्तीच्या सत्ताधीशांना विनोदाचे वावडे असते. विनोद, प्रहसन, व्यंगचित्र अशा कोणत्याही माध्यमाने हास्यनिर्मिती करून सत्ताधीशांस वाकुल्या दाखवण्याची क्षमता असणाऱ्या कला प्रकारांवर अशा सत्ताधीशांचा नेहमीच रोष असतो. याचे कारण विनोदाच्या क्षमतेत आहे. हास्यात वातावरणातील तणाव कमी करण्याची क्षमता असते आणि तो कमी झाला की ते वातावरण व्यवस्थेविरोधात प्रश्न निर्माण करण्यासाठी पोषक बनते. म्हणून जगातील सर्व हुकूमशहांची पहिली कुऱ्हाड ही नेहमी व्यंगचित्र वा विनोदी माध्यमांवर पडते. एके काळी सर्वशक्तिमान अ‍ॅडॉल्फ हिटलर याने दोस्त राष्ट्रांच्या लष्करी क्षमतेपेक्षा चार्ली चॅप्लिन याचा धसका अधिक घेतला होता. क्रांतीच्या पडद्याखाली एकाधिकारशाही आणणाऱ्या स्टालिनपासून ते रोमँटिक क्रांतिकारक चे गव्हेरा याच्यापर्यंत अनेकांना विनोदाचे वावडे होते. म्हणूनच लोकशाहीवादी चळवळींना नेहमीच विनोदाने आधार दिला आहे. अगदी अलीकडे इजिप्तपासून सुरू झालेल्या पश्चिम आशियातील चळवळींचा सुरुवातीचा आधार विनोदच होता. विनोद माणसांना जोडतो. तसेच हसता हसता विचार करावयास लावण्याची क्षमता त्यात असते. जो संदेश पसरवण्यासाठी गंभीर आशयास अनेक सायास करावे लागतात, तोच आशय विनोद सहज सर्वत्र पसरवतो. त्यामुळे हुकूमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधीशांना तो नेहमीच नकोसा वाटत असतो. म्हणूनच मग असे सत्ताधीश एखाद्या प्रहसन खेळावर बंदी आणतात. व्यंगचित्रकारावर देशद्रोहाचा खटला भरतात. विडंबनगीते लिहिलीच जाणार नाहीत, असे प्रयत्न करतात. शार्ली एब्दोसारख्या व्यंगचित्राला वाहिलेल्या मासिकास दहशतवादी हल्ले झेलावे लागतात. यूटय़ूबवरच्या एखाद्या विनोदी कार्यक्रमावर बंदी घातली जाते.

हे असे करणारे कोणी आपल्याला आसपास आढळल्यास त्यांची आणि विनी द पूह या पात्रावर बंदी घालणाऱ्या जिनिपग यांची वैचारिक जातकुळी एकच आहे, असे खुशाल मानावयास हरकत नाही. अशा राजवटीतील नागरिकांना आरती प्रभू यांना पडलेला कसे कसे हसायाचे.. असा प्रश्न पडतो. सत्ताधीशांना हास्यास्पद ठरवू शकण्याच्या स्वातंत्र्यातच या प्रश्नाचे उत्तर आहे. आपल्या हसण्यावर र्निबध घालू पाहणाऱ्यांपासून सावध राहायला हवे हाच या विनीचा संदेश.

  • जो संदेश पसरवण्यासाठी गंभीर आशयास अनेक सायास करावे लागतात, तोच आशय विनोद सहज सर्वत्र पसरवतो. त्यामुळे हुकूमशाही प्रवृत्तीच्या सत्ताधीशांना तो नेहमीच नकोसा वाटत असतो. हे कारण चीनमधील विनी-व्यंगचित्रावरील बंदीचे, तसेच आपल्याला दिसू शकणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या आणखीही कडक कारवायांचे..