24 September 2017

News Flash

बवानाची घोरपड

तरीही या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला.

लोकसत्ता टीम | Updated: August 30, 2017 1:37 AM

भाजपचा अश्वमेध दिल्ली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रोखला गेला, याचे गांभीर्य भाजपने ओळखायला हवे..

बवाना या मतदारसंघातील निकाल म्हणजे इशाराघंटा, असे मानणे कदाचित धाष्टर्य़ाचे ठरेल. पण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने नागरिकांच्या मनात तयार झालेली तटबंदी इतके दिवस अभेद्य अशी वाटत होती. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे तिला पहिल्यांदाच तडा जाताना दिसतो..

संपूर्ण देशातील राजकीय वातावरणाचा अंदाज एका लहानशा विधानसभा निवडणुकीतील अवघ्या एका मतदारसंघाच्या निकालावर बांधणे अत्यंत धोक्याचे आहे, हे आधी मान्य करायला हवे. तरीही दिल्ली विधानसभेच्या बवाना या एका जागेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लक्षवेधी ठरतो. या निवडणुकीत भाजपचा वा काँग्रेसचा पराभव झाला एवढेच कारण या निकालास महत्त्व देण्यामागे नाही. गतसाली झालेली दिल्ली महापालिका निवडणूक, त्यात भाजपने गाजवलेला पराक्रम, काँग्रेस आणि आपचा उडालेला धुव्वा आणि त्या पाश्र्वभूमीवर आताच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने ओतलेली शक्ती आदी कारणांमुळे ही निवडणूक महत्त्वाची होती, हे जरी खरे असले तरी इतके करूनही भाजप आणि काँग्रेस पराभूत झाले, हीच यातील एकमेव महत्त्वाची बाब नाही. सध्याच्या कार्यशैलीनुसार ही जागा आपण सहज खिशात टाकू असा दावा भाजपने केला होता. ते तसे होणार हे काही प्रमाणात गृहीतदेखील धरले गेले होते. कारण सध्या भाजपचा अश्वमेध अडवण्याची ताकद कोणत्याही राजकीय गटात नाही, असेच मानले जाते. ते रास्तही आहे.

तरीही या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तोदेखील य:कश्चित अशा आम आदमी पक्षाच्या संपूर्ण अननुभवी अशा उमेदवाराकडून. या निवडणुकीत भाजपने आपमधील विद्यमान फुटीर आमदारास उमेदवारी दिली होती. तेदेखील सध्याच्या भाजपच्या ‘येवा भाजप आपलाच आसा’ या धोरणास साजेसेच झाले. विविध पक्षांतील हौशे, गवशे आणि नवशे मोठय़ा प्रमाणावर भाजपच्या वाटेवर असून भाजपदेखील आपल्या कधी नव्हे त्या मिळालेल्या प्रसिद्धी आणि महत्त्वामुळे हरखूनच गेल्यासारखा आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षातून कोणीही येणारा असला तरी भाजपचे नेते पायघडय़ा अंथरून तयारच असतात. तसेच या निवडणुकीतही झाले. आपमधील विद्यमान आमदार भाजपमध्ये आले आणि भाजपने त्यांना आपलेच मानत पुन्हा पोटनिवडणुकीच्या रिेंगणात उतरवले. किंबहुना भाजपतर्फे आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल याची खात्री आणि विजयाची हमी असल्यानेच इतक्या साऱ्यांची रीघ त्या पक्षाकडे लागलेली आहे. तेव्हा त्याच प्रचलित रीतीनुसार भाजपने ‘आपपरभाव’ न करता या उमेदवारास मदानात उतरवले. अर्थातच भाजपची सर्व शक्ती त्यामागे उभी केली. आश्चर्य हे की तरीही भाजपचा उमेदवार या पोटनिवडणुकीत पराभूत झाला. तोदेखील जवळपास २४ हजार मतांच्या फरकाने. भाजपच्या तुलनेत या निवडणुकीत आपच्या उमेदवाराने साधी ग्रामपंचायत निवडणूकदेखील कधी लढवलेली नव्हती. तरीही तो जिंकला. यातील आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे या निवडणुकीत २०१५ च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांत दुपटीने वाढ झाली. सत्ताधारी भाजपच्या तुलनेत काँग्रेसचा प्रचार अगदीच फिका असा होता. हे त्या पक्षाच्या सध्याच्या अवस्थेला साजेसेच. तरीही काँग्रेसला या निवडणुकीत गतनिवडणुकांच्या तुलनेत १०० टक्क्यांहूनही अधिक मते पडली.

या निवडणुकीचा निकाल सूचक आहे तो या कारणांमुळे. या निवडणुकीपर्यंत आप या पक्षास भाजपने जणू तिलांजलीच दिली होती. दिल्लीत आपचे सरकार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर लगोलग झालेल्या या विधानसभा निवडणुकीत भाजपला आपकडून दारुण पराभव पत्करावा लागला. त्या वेदना भाजप विसरलेला नाही. त्यामुळे नायब राज्यपालाच्या हातून मुख्यमंत्र्याविरोधात काही ना काही कारवाया करण्यापासून ते पक्ष फोडण्यापर्यंत जमेल ते भाजपने केले. या काळात दिल्ली विधानसभा निवडणुकांतील विजयामुळे आपचे अरिवद केजरीवाल यांचाही बेडूक चांगलाच फुगलेला होता. आपण जणू नरेंद्र मोदी यांना पर्यायच आहोत, असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे तेही बेताल झाले होते. परंतु पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकांत बंबाळे वाजल्याने त्यांना वास्तवाचे भान आले असावे. म्हणून त्यांनी आपली कार्यशैली बदलली आणि बवाना मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तिचा प्रत्यय आला. ‘तळापासून वर’ ही आपची कार्यशैली होती. ती या निवडणुकीत पूर्णाशाने दिसली आणि आपल्या जुन्या परिचित शैलीत राजकारणाची बांधणी करीत आपने ही निवडणूक लढवली. तिच्या निकालामुळे आपमध्ये पुन्हा निश्चितच धुगधुगी निर्माण होईल. तसेच या निवडणुकीत काँग्रेसच्या मतांतही लक्षणीय वाढ झाली. गतसाली याच मतदारसंघात काँग्रेसच्या पदरात जेमतेम १४ हजार मते पडली होती. या निवडणुकीत ती संख्या ३१ हजारांवर गेली. काही एखादा कल यातून सूचित व्हावा इतका हा तपशील सशक्त नाही, हे मान्य केले तरीही गेल्या काही दिवसांतील घटनांच्या पाश्र्वभूमीवर हा पराभव भाजपने दखल घ्यावी इतका महत्त्वाचा ठरतो.

खासगीपणाचा हक्क मान्य करणारा नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात गेलेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, भाजपशासित हरयाणा राज्यातील प्रशासनाची निघालेली लक्तरे, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत भाजपविरोधात दाटू लागलेली अस्वस्थता आणि त्याआधी राज्यसभेच्या निवडणुकीत गुजरातमध्ये कापले गेलेले नाक यामुळे भाजपविरोधात पहिल्यांदाच जनमानसात नाराजीचा सूर कानावर येऊ लागला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने नागरिकांच्या मनात तयार झालेली तटबंदी इतके दिवस अभेद्य अशी वाटत होती. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे तिला पहिल्यांदाच तडा जाताना दिसतो. हिंदुत्ववादी आणि म्हणून भाजपप्रेमी, महिला आणि यांच्या जोडीला अर्थविकासाच्या आशेने एक मोठा वर्ग मोदींच्या मागे गेला. त्यामुळेच भाजप गत निवडणुकीत २८२ पर्यंत मुसंडी मारू शकला. अलीकडच्या काळात हा तिसरा घटक आपल्याबरोबरच आहे, असे भाजपदेखील ठामपणे सांगू शकणार नाही. िहदुत्वाचा दुराग्रह, त्यामुळे समाजात अकारण निर्माण झालेली दुही आणि ती मिटविण्याचे कोणतेही प्रयत्न होताना न दिसणे हे तीन प्रमुख मुद्दे या संदर्भात सांगता येतील. यात आणखी एका प्रकरणाची भर घालावी लागेल. महाराष्ट्रात ध्वनिप्रदूषणाच्या मुद्दय़ावर देवेंद्र फडणवीस सरकारने थेट उच्च न्यायालयातील अभय ओक यांच्यासारख्या न्यायाधीशावर केलेला पक्षपातीपणाचा आरोप. न्या. ओक यांनी ध्वनिप्रदूषण आदी मुद्दय़ांवर सातत्याने नागरिकांच्या बाजूने निकाल दिलेले आहेत. इतकेच काय, पण अनधिकृत अतिक्रमणांच्या प्रश्नावर त्यांच्या ठाम भूमिकेसमोर भाजपच्या मुंबईतील कार्यालयालाही नमते घ्यावे लागलेले आहे. या कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम उच्च न्यायालयाच्या रेटय़ाने तोडावे लागले. तेव्हा अशी प्रतिमा असलेल्या न्या. ओक यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप फडणवीस सरकारने करावा हे सामान्य जनतेला रुचलेले नाही. फडणवीस यांनाही आपली चूक लगेच लक्षात आली आणि त्यांनी ती सुधारण्याची पावले उचलली. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनीही या संदर्भात आपला निर्णय बदलला आणि ध्वनिप्रदूषणाचे प्रकरण न्या. ओक यांच्यासमोरच ऐकले जाईल, असा निवाडा दिला. त्यामुळे राज्य सरकार अधिकच अडचणीत आले. भाजपच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांत देवेंद्र फडणवीस हे निश्चितच उजवे आणि विवेकी आहेत. तरीही त्यांच्या हातून घडलेली ही चूक सामान्य नागरिकांना आवडलेली नाही.

या सगळ्या पाश्र्वभूमीवर एखादा छोटासा पराभवदेखील वातावरणातील बदलाचा निदर्शक असू शकतो. बवाना मतदारसंघातील निकाल तसा आहे किंवा काय हे तूर्त सांगणे धाष्टर्य़ाचे ठरावे. पण त्याचा अर्थ इतकाच की विरोधकांनी आशा सोडावयाचे आणि सत्ताधारी भाजपने २०१९ खिशातच टाकले असे मानावयाचे कारण नाही. राम गणेश गडकरी यांच्या राजसंन्यासातील जिवाजी कलमदाने हे पात्र म्हणते :  ‘‘बढत्या ताकदीचा असो, की चढत्या अकलेचा असो; असा म्हणून एकही सिंहगड सापडायचा नाही, की ज्यावर घोरपड लावायला द्रोणागिरीचा कडा नाही!’’ तेव्हा जे झाले त्यापासून योग्य तो धडा भाजपने घेतला नाही तर बवानाचा निकाल ही विरोधकांच्या हाती लागलेली घोरपड असू शकते.

First Published on August 30, 2017 1:36 am

Web Title: delhi by poll election bawana aap victory cm arvind kejriwal bjp defeat
 1. N
  narendra
  Aug 30, 2017 at 12:35 pm
  अखंड सावधानता हेच येथे अधोरेखित केले आहे.दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा पक्ष सोडून आपल्या पक्षात आलेनीच ल्या स्वार्थी माण लगेच पावन करून घेऊन उमेदवारी देणे हे अत्यंत नीच पातळीचे राजकारण आहे त्याला धडा शिकवणे आवश्यक आहे कारण त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावान अनुयायांना अन्याय केल्याचे प्रायश्चित्त आपोआप दिले जाते आणि मतदारांनी हे आवश्य केलेच पाहिजे म्हणजे खर्या निष्ठावान अनुयायांवर अन्याय करतांना संबंधित पक्ष धुरिणांना शंभर वेळा विचार करावा लागेल.भाजपाला हा धडा शिकवणे म्हणजे कडू औषध देणे आहे पण त्यामुळेच भाजप पुन्हा कुपथ्य करणार नाही .
  Reply
  1. S
   Sharad Joshi
   Aug 30, 2017 at 11:34 am
   खरेतर राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसची जागा 'आप' ने घ्यायला हवी.
   Reply
   1. प्रसाद
    Aug 30, 2017 at 11:21 am
    द्रोणागिरीचे कडे आणि घोरपडी खूप मिळतील, पण कड्यावर चढायला आणि मग लढायला मावळे तर हवेत ना ... स्वातंत्र्य लढा लढले वेगळेच, पण त्यानंतर ज सत्तेत जाऊन बसले भलतेच. सत्ता अशी ज मिळाली की लढायची सवयच जाते. मग घोरपडी डझनावारी मिळाल्या तरी फायदा काय?
    Reply
    1. T
     Takshak Lokhande
     Aug 30, 2017 at 11:17 am
     रामरहिमच्या बलात्कार प्रकरणावर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर हिन्दुत्वाची पताका खांद्यावर वाहणा-या संघ परिवाराने ना आनंद व्यक्त केला, ना रामरहिमचा धिक्कार केला. याचा अर्थ काय? उच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भात अजुन पर्यंत कोणतेही ठोस स्टेटमेंट आरएसएस कडून पुढे आलेले नाही. किंवा मिडियाने सुध्दा त्यांना त्यांचे मत विचारण्याचा प्रयत्न केला नाही. हिन्दुत्वाचा प्रचार प्रसार करतांना कोणत्याही प्रकारचे अनैतिक कृत्य जर होत असेल तर आम्हाला त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही असेच संघ परिवाराला सुचवायचे आहे काय? रामरहिमच्या दुष्कृत्यांचा इतिहास हा पंधरा वर्षे जुना आहे... तरी संघ परिवारातील सदस्य त्याची दखल न घेता या ढोंगी आणि अनैतिकतेने बर लेल्या बाबाच्या दर्शनासाठी जात होते... हे मिडियानेच पुढे आणले आहे. तर दुसरीकडे असे बाबा धर्माच्या नांवाने जे दृष्कृत्य करीत आहेत अशाच्यां विरोधात संघ परिवाराकडून कोणत्याही प्रकारचे आंदोलन न व्हावे हे मोठे आश्चर्यच म्हणावे लागेल. हिन्दुत्ववादी संघटना शेवटी हिन्दुत्वाचा खा पांघरुन अनैतिक कृत्य करतांना पाहुन सुध्दा या संघटना अजुनही निद्रावस्थेत आहेत
     Reply
     1. R
      Ramdas Bhamare
      Aug 30, 2017 at 10:38 am
      आधाशी हिंस्र अंधभक्त जल्पकांची उपासमार होऊ नये म्हणून लोकसत्ता त्यांच्या कळपासमोर न चुकता त्यांच्या आवडत्या मांसाचे तुकडे टाकत राहते . लोकसत्ताची ही दया वाखाणण्यासारखी आहे .
      Reply
      1. विश्वनाथ गोळपकर
       Aug 30, 2017 at 10:26 am
       छान मांडणी ! . पण लोकसत्ताने गेले अनेक महिने ठेवलेल्या विशिष्ट दृष्टिकोनाला धरूनच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील पक्षवार मतदान, तसेच महापालिका निवडणुकीतील या विधानसभा क्षेत्रापुरते पक्षवार मतदान, यांचे आकडे देखील दिले असते तर यातील विश्लेषण खूप जास्त प्रभावी ठरले असते. का ते, या अग्रलेखातील मांडणीला पूरक नाही म्हणून मुद्दामच टाळले ?
       Reply
       1. S
        Shriram Bapat
        Aug 30, 2017 at 9:49 am
        जे उमेदवार लाटेत निवडून येतात पण स्वतःला मोठे समजू लागतात त्यांच्यासाठी हा धडा आहे. शिवसेना उमेदवारांना हे माहित आहे. त्यामुळे राऊत-उद्धवनी किती गमजा केल्या तरी हातचे सोडून कुणी राजीनामा देणार नाही. बवानाची जागा आपची होती, आपला मिळाली. दिल्लीकरांचे केजरीवाल वर प्रेम आहे. पण ती प्रेमाची बेडी आहे. केजरीवाल बाहेर गेले की दिल्लीकर रुसतात. त्यामुळे केजरीवाल यांचे अखिल भारतीय मनसुबे पुढे ढकलायला लागतात. आतासुद्धा नितीशकुमार एनडीए ला सामील झाल्यावर केजरीवाल यांना पंतप्रधानपद खुणावत असणार. पण २०१९ ची ी पकडायची की २०२४ ची हे ठरत नसेल. तसेच केजरीवाल आणि कंपनीवरचे खटले मधल्या काळात निकाली निघणार आहेत त्यांचा काय परिणाम होतो ते बघायचे, सत्येंद्र जैन यांचा आंबा पिकून त्याचा घमघमाट सुटला आहे. ते आत गेले तर केजरीवाल यांना दुसरा फायनान्सर गाठावा लागणार. काल डोकलाम चे अप्रिय कारले कसेबसे खाल्ल्यावर बवानाची स्वीट डिश आज संपादक चवीने खात आहेत.
        Reply
        1. P
         Prasad
         Aug 30, 2017 at 9:27 am
         वं दे मा त र म जा ग ते र हो उर्मिलाबेन शहा
         Reply
         1. R
          Ranjeet
          Aug 30, 2017 at 8:48 am
          बाजप ने समजून घेणे आवश्यक आहे कि लोक मते देतात ते विकास कामासाठी, जर अरविंद केजरीवाल याची फालतू बडबड बंद करून आपल्या कामावर लक्ष दिले नि ते फळाला आले,तत्त्वतःच लोकसत्ताने लक्षात घेतले पाहिजे कि लोक असाच प्रत्रकाचा आदर करतात ते नि-पक्षपाती आहे.पुरोहित जर मुसलमान असता तर आता पातोर कुबेरांना मोदींना किती शिव्या घालू असे झाले असते, पण आपल्या लाडक्या काँग्रेसवर टीका करणे म्हणजे कुबेरांना व लोकसत्ताला ज्या घरचे खातो,त्याचे वासे मोज्याना सारखे झाले,असो पुरोहित प्रकरणा वरून हेच जनतेचा लक्षात आले कि काँग्रेस किती खालच्या पातळीवर राजकारण करत आहे ते हि मताच्या बेरजेसाठी,सुशील कुमार शिंदे सारखा नालायक माणूस ग्रहमंत्री झाला त्याच वेळी रंग व दहशदवाद याचे नाते जोडले गेले, विशेष मंजे तमाम भारतीय या प्रकारावर नाराज असताना काँग्रेस व सुशील शिंदे हितचिंतक हाफिस सईद या प्रकारावर संतोष जाहीर केला ते हे शिंदेचे आभार मानूंन...........
          Reply
          1. उर्मिला.अशोक.शहा
           Aug 30, 2017 at 8:24 am
           वंदे मातरम-दिल्ली आणि बिहार ची इलेक्शन हरल्या नंतर झालेल्या बहुतेक इलेक्शन भाजप ने जिंकल्या हे सत्य पोट निवडणुकांतील विजय किंवा पराजय यातून भाजप ने नेहेमीच आत्म चिंतन केले आणि भव्य यश मिळविले हे हि सत्य. २०१९ ची फिल्डिंग लावण्या ची सुरुवात भाजप ने केली आहे आणि नितीश कुमार हे स्वगृही परतले आहेत घोरपडी चा उल्लेख केला पण सिंह तानाजी मालुसरे चा विसर का झाला? विरोधकांत तानाजी मालुसरे कोण? भाजप च्या पराभव ची स्वप्ने बघणार्यांनी वास्तविकेला नजरे आड करून चालेल का?विरोधक केजरीवाल यांना नेतृत्व देतील करिता आपण वकिली करून पाहावी?नुसती घोरपड सापडून चालत नसते तेथे असावे लागतात जाती चे,गबाळ्यांच्या हातून काहीही होणे नाही, असे ऐकतो कि शिवसेना देखील या महागठ बंधन मध्ये सामील होणार आहे तसे झाले तर भाजप करिता विना औषधाने खरूज गेली सारखेच होणार आहे, नासक्यांचे महागठबंधन हे भाजप करिता उपकारकच ठरणार आहे. तानाजी मालुसरे सिंहा च्या छाती चे होते तसे मोदी छपन्न च्या छाती चे आहेत तसा कोणी विरोधकांत जन्माला आहे काय?बवाना ने बहाणे कसे उपयुक्त ठरतील ? जा ग ते र हो
           Reply
           1. S
            Santosh
            Aug 30, 2017 at 8:11 am
            वडाची साल पिंपळाला चिकटवायचा प्रयंत्न केलाय. असो. निंदकाचे घर असावे शेजारी.
            Reply
            1. उर्मिला.अशोक.शहा
             Aug 30, 2017 at 6:47 am
             वंदे मातरम- विरोधकांच्या हाती लागलेली घोरपड आनंद आहे !!!त्या मुळे कदाचित विरोधक एक होतील ,पण तानाजी मालुसरे कोठून आणणार???दिल्ली ची पोट निवडणूक जिंकल्याचा आनंद विरोधकांनी साजरा करावा पण पणजी मध्ये मनोहर पर्रीकरांनी काँग्रेस ची शीट हिसकावून घेतली हे हि विसरू नये. २०१९ लढायला सिंहाच्या छाती चा तानाजी मालुसरे हवा ज्यांनी पोट च्या मुलाचे लग्न लांबवले आणि सिंहगड ची लढाई केली अशी प्रेरणा असा उत्साह विरोधका मध्ये आहे काय? नाही म्हणायला संपादकाचे उमेदवार शरद यादव स्पेअर पार्ट जुळवित आहेत पण ??? विरोधकांना शुभेच्छा ,दिल्ली चा विजय जरी झाला असला तरी रिमोट हा केंद्र कडे च असतो त्या मुळे केजरीवाल यांना सांभाळून च जाहीर भाषणे करावी लागतील कारण अब्रू नुकसानीयूच्या एक कोटी च्या दाव्यात त्यांचा पराभव झाला आहे आणि जेटली नि लावलेले दोन दावे जे नेमके इलेक्शन च्या वेळी बोर्डावर येतील त्याच वेळी हेरॉल्ड सुद्धा बोर्डावर येईल त्या वेळी मीडिया मध्ये जो शिमगा होईल तो भाजप च्या पथ्यावर पडणार आहे. जा ग ते र हो
             Reply
             1. S
              shriniwas joshi
              Aug 30, 2017 at 4:28 am
              या लेखात व्ताक्त झालेले विचार अगदी म्हणजे १०० बरोबर आहे,
              Reply
              1. महेश
               Aug 30, 2017 at 4:12 am
               'आपपरभाव' हा शब्द आवडला.
               Reply
               1. H
                hemant
                Aug 30, 2017 at 4:08 am
                हाहाहाहाहाहा काय संपादकसाहेब किती हि जळजळ भा जा प बद्दल, एका जागेच्या आपच्या विजयावरून थेट भा जा प चा राष्ट्रीय पराभव!!! धन्य आहे आपली !!!
                Reply
                1. Load More Comments