ट्रम्प यांनी एच-१ बी व्हिसांवर आणलेले र्निबध राजकीयदृष्टय़ा लोकप्रियता मिळवून देणारे असले तरी ते आर्थिकदृष्टय़ा शहाणपणाचे नाही..

वास्तविक जगभरातून स्थलांतरित आपल्या देशात येतात याचा त्यांना अभिमान हवा. ते राहिले बाजूलाच. ट्रम्प यांनी अत्यंत नतद्रष्टपणे स्थलांतराचा बागुलबोवा केला असून याचा फटका अमेरिकेबरोबरच जगालाही बसल्याशिवाय राहणार नाही..

अर्थव्यवस्थेचे हे नेहमीच असे असते. कोणत्याही प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक फायदा मिळणारा वर्गच या अर्थव्यवस्थेच्या विरोधात रडगाणे गाणारा असतो. हा दोष केवळ आपल्याकडेच दिसतो असे नाही. जगात सर्वत्र साधारण असेच चित्र आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसावर घातलेले ताजे र्निबध हे याच चित्रात बसतात. आपल्याकडे १९९१च्या आर्थिक सुधारणांचा फायदा एका मोठय़ा वर्गाला झाला. ज्या घरात त्याआधी एखादी दुचाकी असे त्या घरात आता दोन दोन चारचाकी मोटारी असतात. हा १९९१ च्या आर्थिक सुधारणांमुळे झालेला दृश्यबदल. या सुधारणांनी एका मोठय़ा मध्यमवर्गाला जन्म दिला. या सुधारणांच्या काळात जो मध्यमवर्ग होता तो उच्च मध्यमवर्गात ढकलला गेला आणि जो उच्चच होता तो श्रीमंत बनला. तसेच या सगळ्याच्या तळाशी असलेल्यांतून एक मोठा समूह मध्यमवर्गात समाविष्ट झाला. एका अर्थाने नवीन आर्थिक धोरणांचा सगळ्यात मोठा फायदा या वर्गाला मिळाला. परंतु हा नवमध्यमवर्गच पुढे मोठय़ा प्रमाणात आर्थिक सुधारणांचा टीकाकार बनला आणि या सुधारणांमुळे आपल्या हलाखीत वाढच झाली असे त्यास वाटू लागले. तसेच वाढत्या महागाईने हा वर्ग बेजार झाला असता ठिकठिकाणच्या विरोधकांनी त्यांच्या नाराजीस गोंजारले. परिणामी या वर्गाचा अहं सुखावला गेला. असे करणे आणि तसे होणे हे दोन्हीही धोकादायक होते. राजकीय विरोधक वर्गाने ते जाणूनबुजून केले आणि अज्ञानी जनतेने ते तसे करू दिले. परिणामी जगात ठिकठिकाणी नव्या आर्थिक धोरणांविरोधात नाराजी दाटू लागली आणि या सगळ्याचे खापर जागतिकीकरणावर फोडले गेले. जागतिकीकरणाचा सर्वात मोठा फायदा उचलणाऱ्यांनी या नाराजांना चुचकारले आणि त्यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्यांचा उदय झाला. वास्तविक जागतिकीकरणाचा फायदा घेणाऱ्यांचे मेरुमणी म्हणून हे ट्रम्प शोभावेत. पत्नींपासून ते व्यवसायापर्यंत ट्रम्प यांचे सगळेच जागतिक. तरीही राजकीय उद्दिष्टांसाठी त्यांनी जागतिकीकरणास खलनायक ठरवले. एच-१ बी व्हिसांवर त्यांनी आणलेले ताजे र्निबध त्यांच्या या विचारांचे द्योतक आहेत.

व्यावसायिक कारणांसाठी अमेरिकेत दीर्घकाळ ज्यांना वास्तव्य करावे लागते त्यांना एच-१ बी व्हिसाचा आसरा घ्यावा लागतो. भारतातून तेथे गेलेले माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुसंख्य अभियंते हे या व्हिसाच्या साह्य़ाने अमेरिकेत वास्तव्यास असतात. त्यांची भरती अमेरिकी आस्थापनांसाठी सेवा पुरवण्याचे कंत्राट असलेल्या कंपन्यांतर्फे केली जाते. वास्तविक हे सर्व अमेरिकेत जातात ते काही अमेरिकी अभियंते उपलब्ध नाहीत म्हणून नव्हे. तर अमेरिकी कंपन्यांना अमेरिकी अभियंत्यांच्या नेमणुकीपेक्षा किती तरी स्वस्तात भारतीय अभियंते उपलब्ध होतात म्हणून ही घाऊक भरती सुरू असते. खेरीज, यातील बहुसंख्य काही मूलभूत संशोधन आदींसाठी अमेरिकेत गेले असेही नाही. यातील बराच मोठा वर्ग अमेरिकेकडे धावत असतो कारण कमी श्रमांचा आणि यथातथा गुणवत्तेचा मोबदला तेथे आपल्या तुलनेत चांगला मिळतो. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे अर्थातच डॉलर आणि रुपयाच्या मूल्यातील तफावत. तेव्हा डॉलरमध्ये कमावून रुपयात खर्च करणे ही अनेकांसाठी चैनीची परिसीमा असते. आता या सगळ्यावर गदा येईल. याचे कारण अमेरिकेत अन्य देशांतून व्यावसायिक व्हिसावर येणाऱ्यांच्या संख्येवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेले र्निबध. हे सगळे बाहेरून आल्यामुळे आपल्या पोटावर गदा येते असा भ्रम ट्रम्प आणि मंडळींनी पसरवला असून आपल्याकडील शिवसेनेच्या अशाच प्रकारच्या दाव्यांप्रमाणे तेथील अनेकांना तो खराही वाटू लागला. परिणामी आपल्याकडे ज्याप्रमाणे परप्रांतीयांविरोधात आंदोलने झाली तितकी नसली तरी परकीयांच्या विरोधात अमेरिकेत नाराजी मात्र दाटू लागली होती, इतके निश्चित. वास्तविक उपलब्ध व्यवसाय/नोकरी संधी आणि काही कारणांनी त्या संधी साधण्यास असलेला स्थानिकांचा नकार वा निरुत्साह यामुळे अशा प्रदेशाकडे स्थलांतरित आकृष्ट होत असतात. अशा वेळी या स्थलांतरित श्रमिकांचा अधिकाधिक उपयोग करून घेणे हे स्थानिकांसाठी आवश्यकच असते. अमेरिकेतही तसेच होत असून तेथील स्थानिक कंपन्या भारतीयांचा जास्तीत जास्त आधार घेतात ते त्याचमुळे. अशा पद्धतीत खरे तर स्थानिक अमेरिकींना अधिक महत्त्वाच्या क्षेत्रांत स्वत:ला गुंतवता येते आणि अन्य कमी महत्त्वाची कामे स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या स्थलांतरितांकडून करवून घेता येतात. ट्रम्प यांना हे मान्य नाही. म्हणून त्यांनी अशा स्थलांतरांवर नियंत्रण आणण्याची भूमिका सातत्याने घेतली आणि आता ती ते खरी करून दाखवू इच्छितात.

हे असे करणे राजकीयदृष्टय़ा लोकप्रियता मिळवून देणारे असले तरी आर्थिकदृष्टय़ा शहाणपणाचे नाही. याचे कारण ज्याप्रमाणे भांडवलाचा प्रवाह उत्तम परतावा मिळू शकेल अशा ठिकाणी आकर्षिला जातो त्याचप्रमाणे मनुष्यबळाचेही असते. जेथे उत्तम परतावा मिळायची शक्यता असते त्याच बाजारपेठेकडे मनुष्यबळही प्राधान्याने आकर्षिले जाते. परंतु हे असे आकर्षिले जाणे हे फक्त येणाऱ्यांसाठीच अधिक फायद्याचे असते असे नव्हे. या स्थलांतरितांचा फायदा स्थानिकांनाही अनेक अंगांनी होत असतो. स्थानिकांचा श्रममूल्य रूपातील भांडवल खर्च वाचून आपले उत्पादन स्पर्धात्मक दराने विकणे स्थानिकांना शक्य होते. म्हणजे समजा अ‍ॅपल कंपनीने आपले उत्पादनकेंद्र अमेरिकेतच ठेवले आणि तेथे केवळ स्थानिकांनाच रोजगार दिले जातील, असे जाहीर केले तर अ‍ॅपलच्या फोनची किंमत ही आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी वाढेल. म्हणजेच ते उत्पादन अनेकांना परवडणारे राहणार नाही. परिणामी मागणी घटून अशी न परवडणारी उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहतात. हे असे होतेच होते. कारण स्थलांतरित मागणी आहे म्हणूनच आलेले असतात. मागणी असते कारण अशा स्थलांतरांना उत्तेजन देणाऱ्या प्रदेशातील बाजारपेठ दुहेरी मुक्त असते. ट्रम्प यांच्यासारख्यांचा यास विरोध आहे. वास्तविक इतके स्थलांतरित आपल्या देशात येतात याचा त्यांना अभिमान हवा. अमेरिकेतील विविध देशांच्या तुलनेत व्यापार वा चाकरीसाठी रशिया आदी देशांत जाणाऱ्यांचे प्रमाण किती तरी नगण्य आहे. तेव्हा याचे खरे तर त्यांनी स्वागत करावयास हवे. ते राहिले बाजूलाच. ट्रम्प यांनी अत्यंत नतद्रष्टपणे स्थलांतराचा बागुलबोवा केला असून आपल्या कोत्या मनोवृत्तीचेच दर्शन त्यातून घडवले आहे. हे असे झाले याचे कारण आपण कोणत्या देशाचे नेतृत्व करीत आहोत, आपली ताकद काय याचा पुरेसा अंदाज ट्रम्प यांना नाही.

आजमितीला अमेरिकेचा साधा संरक्षणाचा अर्थसंकल्प जरी घेतला तरी जगातील अन्य दहा बडय़ा देशांच्या एकत्रित अर्थसंकल्पापेक्षाही तो किती तरी मोठा भरेल. जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेच्या किमान चौपट अशी अमेरिकेची अर्थव्यवस्था आहे आणि आपल्यासारख्या देशाच्या तुलनेत अमेरिकेची आर्थिक ताकद किमान ९०० टक्के अधिक आहे. अमेरिकेस हे सर्व शक्य झाले ते मुक्त आर्थिक धोरणांमुळे. ट्रम्प आता इतिहासाचे हे चक्र उलटे फिरवू पाहतात आणि त्यासाठी अर्थव्यवस्था बंदिस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तो केवळ अमेरिकेच्याच नव्हे तर जगाच्याही अंगाशी येणारा ठरेल यात शंका नाही. मुक्त विचारांपेक्षा जगात बंदिस्ततेचे आकर्षण असणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक असते. देशोदेशांत सध्या असेच ट्रम्प निवडून आले असून त्यामुळे जगाची वाटचाल बंदिशाळेकडेच सुरू आहे. सुजाणांनी तरी त्यास विरोध करायला हवा.