वडिलांनीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हावे, यासाठी ट्रम्पपुत्राने रशियाशी संधान बांधल्याचे प्रकरण सोपे राहिलेले नाही..

अध्यक्षपदी निवडले गेल्यावर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अनेकरंगी दिवे लावतील हा अंदाज- आणि भीतीही- पूर्णपणे खरी ठरताना दिसत असून समग्र ट्रम्प कुटुंबीयांचे दररोज उजेडात येणारे उद्योग पाहता सरता दिवस बरा होता असेच म्हणायची वेळ अमेरिकेवर आली आहे. ताजे प्रकरण आहे ते ट्रम्प यांच्या चिरंजीवांनी निवडणुकीआधी रशियाशी कसे संधान बांधले होते, त्याचे. या प्रकरणात जे काही व्हायचे ते होईलच पण त्यामुळे अमेरिकेतील रिपब्लिकन इतिहासाची पुनरावृत्तीही होणार असून हे काही भूषणास्पद म्हणता येणार नाही. या दोन्हीतील योगायोग विलक्षण समान आहेत. म्हणून ते समजून घ्यायला हवेत.

प्रथम ट्रम्पपुत्राविषयी. त्याचेही नाव डोनाल्डच. तर या कु. डोनाल्ड यांस रॉब गोल्डस्टोन नामक व्यक्तीचा ईमेल आला. त्याने कु. डोनाल्ड यास रशियन वकील नतालिया वेसेल्नित्स्काया हिच्याशी गाठ घालून देण्याचे आश्वासन दिले. हे गोल्डस्टोन महाशय एका संगीतकाराचे प्रसिद्धीप्रमुख. लौकिक आपल्याकडच्या साधारण अमरसिंग वा राजीव शुक्ला यांच्यासारखाच. सत्ताधारी कोणत्याही पक्षाचे असोत, योग्य ठिकाणी असणारे लागेबांधे वापरून कामे करून घेणे/ देणे हे त्यांचे कर्तृत्व. या कथानकातील दुसरी व्यक्ती म्हणजे नतालिया वेसेल्नित्स्काया. या नतालिया बाई क्रेमलिनशी, म्हणजे अर्थातच व्लादिमीर पुतिन यांच्याशी, संपर्क साधून असलेल्या. पुतिन आपल्या वेगवेगळ्या उद्योगांसाठी जी काही विविध क्षेत्रांतील माणसे पदरी बांधून आहेत, त्यातील एक उचापतखोर म्हणजे या वकिलीणबाई. अमेरिकेने रशियाविरोधात घातलेले र्निबध उठवले जावेत यासाठी या नतालियाबाईंनी जोरदार मोच्रेबांधणी केली होती. त्याआधी रशियातील एका बलाढय़ बिल्डराचे आíथक गोंधळाचे प्रकरण जेव्हा अमेरिकेत उघड झाले तेव्हा त्यास वाचविण्यात या वकिलीणबाईंचा मोठा वाटा होता. या बिल्डराला अमेरिकेत जो काही दंड झाला असता त्याच्या निम्मी रक्कम भरून या बाईंनी त्यास सोडवले. बाई इतक्या पोचलेल्या की हे प्रकरण ज्या कोणा रशियन हिशेब तपासनीसाने शोधून काढले त्यालाच नंतर रशियात तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि त्याच तुरुंगात अज्ञात कारणांनी त्याचे निधन झाले. अडचणीत आणणाऱ्या अनेकांना अशा तऱ्हेने गायब करण्यासाठी पुतिन यांची राजवट ओळखली जाते. त्यातील हा एक हिशेब तपासनीस. यावरून रॉब आणि नतालिया ही जोडगोळी काय चीज आहे, हे ध्यानात यावे.

गतसाली अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक ऐन भरात असताना या रॉबने कु. डोनाल्ड याच्याशी संपर्क साधला आणि त्या वेळी ‘योगायोगाने’ न्यूयॉर्क येथे येणार असलेल्या नतालिया यांच्याशी चर्चा घडवून आणण्याची तयारी दर्शवली. कु. डोनाल्ड याने नतालियाबाईंशी चर्चा का करायची? तर थोरल्या डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुकीत आव्हान देणाऱ्या हिलरी क्लिंटन यांच्याविषयी काही आक्षेपार्ह माहिती आहे म्हणून. म्हणजे आपल्या तीर्थरूपांच्या राजकीय विरोधकांस अडचणीत आणेल अशी माहिती या रशियनबाईंकडून मिळवायची असा हा कट. त्यास ईमेलद्वारे कु. डोनाल्ड याने मान्यता दिली. वास्तविक ईमेल कधीही नष्ट करता येत नाहीत. त्यातील नोंदीचा माग नंतरही काढता येतो. इतकी साधी जाणीव नसलेल्या या कु. डोनाल्ड याच्या तोंडास हिलरी यांच्याविरोधात मालमसाला हाती लागणार या कल्पनेनेच पाणी सुटले. ही माहिती कधी एकदा आपल्याला मिळते आणि त्याद्वारे आपले वडील कधी एकदा हिलरी यांना अडचणीत आणतात असे कु. डोनाल्ड यास झाले आणि त्याचा वेडपटपणा म्हणजे ते त्याने ईमेलद्वारे या रॉबला कळवले. प्रत्यक्षात ही माहिती काय होती, तिच्यामुळे हिलरी यांची खरोखरच अडचण झाली किंवा काय, हा मुद्दा अजून चच्रेला आलेलाच नाही. हे प्रकरण उघडकीस आले ते न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट यांच्या शोधपत्रकारितेमुळे. या वर्तमानपत्रांनी मॉस्कोत जाऊन सदर वकिलीणबाईंशी संधान बांधले आणि हा सारा ईमेली पत्रव्यवहार मिळविला. त्याची पहिली बातमी आल्यानंतर थोरल्या डोनाल्ड यांनी थयथयाट केला आणि हे सारे कसे फेक न्यूज आहे हे सांगावयास सुरुवात केली. पण त्याच दिवशी सायंकाळी कु. डोनाल्ड याने वृत्तवाहिन्यांशी बोलताना या भेटप्रयत्नांची कबुली दिली आणि सारा ईमेल दस्तावेजच उघड केला. हे असे करायची सबुद्धी त्यास का झाली? कारण दुसऱ्याच दिवशी हा सारा तपशील न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित होणार होता. आपल्यावर चोरीचे बालंट यायच्या आधीच आपण स्वत चोरी कबूल करून टाकण्यात चातुर्य आहे असा समज करून घेणाऱ्यांत कु. डोनाल्ड याचा समावेश असावा. कारण आपला सुपुत्र किती प्रामाणिक आहे, असा गवगवा आता थोरल्या डोनाल्डरावांनी सुरू केला आहे. परंतु आपणहून दाखवले म्हणून स्वतच्या तोंडाला लागलेल्या शेणाची दरुगधी काही कमी होत नाही. ट्रम्प यांना हे मान्य नसावे. जे काही झाले त्यामुळे व्हाइट हाउस प्रशासन स्तब्धावस्थेत गेल्यासारखे आहे. कारण आता आणखी काय प्रकाशात येणार अशी धास्ती या अध्यक्षीय प्रशासनाला आहे.

या प्रकरणामुळे रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय इतिहासातील काळ्या अध्यायाची पुनरावृत्ती होणार की काय या शंकेने सत्ताधारी पक्षातही चांगलीच अस्वस्थता आहे. सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी १९८० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे जिमी कार्टर यांचा पराभव व्हावा यासाठी रिपब्लिकन पक्षाचे रोनाल्ड  रेगन यांनी इराणचे अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांच्याशी संधान बांधले होते. ७९ सालच्या धर्मक्रांतीनंतर इराणात सत्तेवर आलेल्या खोमेनी यांनी तेहरानमधील अमेरिकी दूतावासावर कब्जा केला आणि कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. ही घटना अध्यक्ष कार्टर यांच्यासाठी अगदीच लाजिरवाणी होती. कार्टर यांनी हरतऱ्हेने प्रयत्न करून पाहिले. पण ओलिसांच्या मुक्ततेत त्यांना यश येत नव्हते. पुढे जेव्हा या ओलिसांच्या सुटकेची शक्यता निर्माण झाली त्या वेळी अध्यक्षीय निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. अशा वेळी जर हे ओलीस सुटले तर त्याचा राजकीय फायदा अध्यक्ष कार्टर यांना मिळणार हे उघड होते. तसे होऊ नये म्हणून रोनाल्ड रेगन यांनी थेट खोमेनी यांच्याशी गुप्त करार केला आणि या ओलिसांची अमेरिकी अध्यक्षीय निवडणुका होईपर्यंत सुटका होणार नाही, अशी व्यवस्था केली. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी आपल्याच देशाच्या नागरिकांना शत्रुराष्ट्रांत बंदिवान ठेवणे ही घाणेरडय़ा राजकारणाची परिसीमा होती. ज्या दिवशी रेगन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतली त्याच दिवशी त्याच वेळी तेहरानमध्ये अयातोल्ला खोमेनी यांनी अमेरिकी ओलिसांची सुटका केली. दुर्दैव हे की त्या वेळी हे राजकारण यशस्वी झाले आणि कार्टर यांचा पराभव झाला.

आताही दुर्दैव हे की ट्रम्प विजयी झाले. आपल्या राजकीय प्रतिस्पध्र्याचा काटा काढता यावा यासाठी शत्रुराष्ट्राशी संधान बांधण्याचा हीन उद्योग रेगन यांच्याप्रमाणे या वेळी ट्रम्प यांनी केला. हे दोघेही रिपब्लिकन पक्षाचे हा योगायोग नव्हे. त्या वेळी थोरल्या जॉर्ज बुश यांनी रेगन यांना मदत केली. या वेळी धाकटय़ा डोनाल्डने हा उद्योग केला. त्या वेळी पुढे या उद्योगाची आडपदास असलेल्या काँट्रा बंडखोर प्रकरणात रेगन अडकले. आताही ट्रम्प अडकणार नाहीत याची शाश्वती नाही. गेल्याच आठवडय़ात जर्मनीतील हँबर्ग येथे झालेल्या जी २० परिषदेत ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी दोन तास चर्चा केली. त्यावर संपादकीय भाष्य करताना लंडनच्या द गार्डियन या पत्राने ट्रम्प यांना पुतिन यांच्यापासून सांभाळून राहण्याचा इशारा दिला. तुमच्या पायाखालचे जाजम पुतिन कधी ओढून घेतील ते तुम्हाला कळणारही नाही, इतका पाताळयंत्री माणूस आहे हा, असा द गार्डियचा सूर होता. तो खरा ठरताना दिसतो. यानिमित्ताने गेली दोन दशके पुतिन जे काही रशियात करीत आहेत ते आता अमेरिकेतही करू शकतात हे उघड झाले. ट्रम्प यांच्या उद्योगांमुळे व्लादिमीर पुतिन हेच जणू व्हाइट हाउसचे निवासी आहेत असे चित्र निर्माण होते. हे अमेरिकेचे अशक्तीकरण आहे.