मर्दमराठे, कडवे सैनिक, वाघ वगैरे भाषा सेनेने सोडावी अािण सरळ सरळ राजकीय समीकरणे मांडावीत..

भाजपच मुंबईच्या मैदानात उतरू पाहत असून सेनेचा कडवा दावेदार म्हणून समोर येत आहे. हा धोका मोठा आहे. कारण दरम्यानच्या काळात सेनेच्या कचखाऊ धोरणांमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला असून त्याची जागा मोठय़ा प्रमाणावर अमराठींनी घेतली आहे..

वाघ, डरकाळी, पंजे, नखे आणि शिवसेनेचे राजकारण यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. वास्तविक प्राणिजगत हे काही तत्त्वावर चालणारे असते. राजकारण तसे नाही. त्यात तत्त्व सोडून वाटेल ते चालते. तेव्हा खरे तर कोणत्याच राजकीय पक्षाने कोणत्याही प्राणिप्रतीकाचा वापर करू नये. तो प्राणिजगताचा अपमान ठरतो. तेव्हा आपल्या पन्नासाव्या वाढदिवशी आपल्या मर्द वगैरे म्हणवून घेणाऱ्या कथित मावळ्यांत चैतन्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सेना आणि वाघ वगैरे भाषा करणे अगदीच हास्यास्पद होते. त्यास अनेक कारणे आहेत. पहिली बाब म्हणजे वाघांच्या दुनियेत मुलाचे नेतृत्व लादले जात नाही कारण वाघ आपल्या उत्तराधिकाऱ्याची चिंता करीत नाही. वाघाच्या मुलाला आपल्या प्रदेशात स्वामित्व गाजवावयाचे असेल तर त्यास इतर वाघांशी झुंजावे लागते. वाघाचा मुलगा आहे म्हणून त्यास काही कोणी विशेष वागणूक देत नाही. दुसरे म्हणजे वाघ स्वतची शिकार स्वत: करतो. इतरांनी आणून दिलेल्या चाऱ्यावर त्यास गुजराण करावी लागत नाही. तसेच वाघ कोणाच्याही मदतीशिवाय शेकडो मैल प्रवास करतो. त्यास कोणा उद्योगपतीच्या खासगी विमानादी वाहनाची मदत घ्यावी लागत नाही. वाघ कोणाकडेही हात पसरत नाही. त्यामुळे त्यास टक्केवारीची भाषा समजत नाही. सेनाध्यक्ष आपले वाघपुराण पुढे नेताना भाजपस सिंह ठरवून बसले आणि सिंहाप्रमाणे वाघ कळपाने राहात नाही, असा टोमणा त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. अर्थात सेना वाघ नसल्याने भाजप सिंह नाही, हे ओघाने आलेच. परंतु तरीही ठाकरे यांची उपमा पुढे न्यावयाची झाल्यास एक मुद्दा उपस्थित होतो. तो म्हणजे सिंहाप्रमाणे वाघ कळपात राहात नसेलही. परंतु वाघ युतीही करावयाच्या फंदात पडत नाही. आपले भक्ष्य स्वत: तो शोधत असल्यामुळे त्यास कोणाशी हातमिळवणी करावयाची गरज वाटत नाही. तेव्हा या अर्थानेही सेनाध्यक्षांनी वाघ वगैरे प्रतीकांचा आधार घेण्याची गरज नव्हती.

तरीही त्यांना ती वाटली कारण तो पक्ष आणू पाहात असलेले उसने अवसान. मुंबई महापालिकेच्या निवडणुका या सेनेसाठी जीव की प्राण आहेत. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेप्रमाणे सेनेच्या हातून मुंबई महापालिकादेखील गेली तर या वाघांवर गवत खाण्याची वेळ येणार हे नक्की. जवळपास ४२ हजार कोट रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेवर सेनेतील काहींचे पोटपाणी, नेत्यांना जाणारी रसद, परदेश दौरे वगैरे अवलंबून आहेत. तेव्हा भाषा जरी वाघाची केली गेली असली तरी मुंबई महापालिकेच्या मुद्दय़ावर सेना शेळीइतकी हळवी आहे, हे महाराष्ट्रातील कोणाही मावळ्यास कळून येईल. सेनेचे हेच हळवेपण पक्षाध्यक्षांच्या सुवर्णमहोत्सवी मार्गदर्शनातून समोर आले. त्याचमुळे आम्ही युती करू, पण मानाने, अशा प्रकारचे हास्यास्पद विधान त्यांनी केले. म्हणजे, आम्ही प्रसंगी कंबरेत वाकू पण वाकलो असे म्हणणार नाही असा त्याचा अर्थ. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सेनेने जे काही केले त्यावरून हाच अर्थ दिसून आला. भाजपशी जागा वाटपाच्या प्रश्नावर न पटल्यामुळे वेगळे लढण्याचा आव त्यांनी आणला खरा. पण हे वेगळे लढून, जिवाचा आटापिटा करून आमदारांची गाडी ६३ च्या वर न गेल्याने सेनेस आपल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या. रविवारच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात सेनाध्यक्ष ठाकरे पितापुत्रांच्या हाती दोन तलवारी देण्यात आल्या. त्या बहुधा महापालिका निवडणुकांनंतर म्यान करता याव्यात यासाठी असाव्यात. उद्धवजी वाघ वगैरेची भाषा करतात ती त्यांना लागू असती तर गत विधानसभा निवडणुकीनंतर सेनेचे हे कथित वाघ मोठय़ा टेचात आपल्या मिशा चाटत विरोधी कक्षांत बसले असते. पण आपल्या या वाघांना भूक आवरणार नाही याचा अंदाज ठाकरे यांना असावा. कदाचित समोरच्या सत्ताधीशांकडून दुधाची बशी समोर ठेवली गेली तर न जाणो आपले वाघ ते पिण्यासाठी जिभल्या चाटत जायचे या भीतीने ठाकरे यांनी हा समस्त वाघांचा कळपच सत्ताधीशांच्या गोठय़ात बांधला. वास्तविक त्याच वेळी सेनेचे हे वाघपण संपले. पण तरीही आपण वाघ आहोत बरे का.. याची जाणीव करून देण्यासाठी ते वा त्यांच्या वतीने कोणी कधी गुरगुरण्याचा प्रयत्न करतात. आपण डरकाळीही फोडू शकतो, असे त्यांना वाटते. पण जनतेच्या कानांवर मात्र आर्त म्याँव म्याँवच ऐकू येते. तेव्हा सेनेचे आता जे काही सुरू आहे ते आगामी महापालिका निवडणुकांसाठीच यात शंका नाही. तेव्हा मर्दमराठे, कडवे सैनिक, वाघ वगैरे भाषा सेनेने सोडावी आणि सरळ सरळ राजकीय समीकरणे मांडावीत.

तसे करावयाचे तर अभिनिवेश सोडावा लागेल अािण मराठी मराठी करीत असलो तरी आपण किती ठिकाणी मराठी माणसास वाऱ्यावर सोडले हे शिवसेनेस जाणवेल. ऐंशीच्या दशकात झालेला गिरणी संप हे याचे ढळढळीत उदाहरण. या गिरण्यांचे मालक मराठी नव्हते. पण तरीही शिवसेना त्यांच्या बाजूने उभी राहिली आणि मूळचा मराठी कामगार मुंबईतून हद्दपार झाला. तो मोह सेनेस का झाला? मुंबईतून मराठी टक्का कमी होण्याचा तो प्रारंभ. त्याचे मूळ सेनेच्या अवसानघातकी राजकारणात आहे. त्यानंतर अनेकदा सेनेच्या नावे मुकेश पटेल ते प्रीतीश नंदी अशा नामांकित व्यक्ती राज्यसभेवर पाठवल्या गेल्या. त्या सर्व मराठी होत्या काय? अन्यथा सेनेने खांद्यावर घेतलेल्या या उसन्या मावळ्यांनी दिल्लीत अटकेपार मराठीचे कोणते झेंडे फडकावले याचा हिशेब द्यावा. किंवा कशाच्या, अािण कितीच्या, बदल्यात या मंडळींना दिल्लीत धाडले गेले ते सांगावे. मध्यवर्ती मुंबईत अनेक मराठी चाळी पाडून मोठमोठय़ा इमारती उभ्या राहात आहेत अािण तेथे पैसे असूनही मराठी ग्राहकांना घरे दिली जात नाहीत. कारण काय? तर मराठीजन मांसमासे खातात म्हणून. अशा किती बिल्डरांना सेनेने जाब विचारला? तेव्हा मराठीशी यांच्या निष्ठा अभ्रष्ट अािण अव्यभिचारी नाहीत. तीच बाब हिंदुत्वाचीही. मराठीचे नाणे चालेनासे झाल्यावर सेनेस या हिंदुत्वाची आठवण आली. खरे तर भाजपचे प्रमोद महाजन आदी प्रभृतींनी सेनेला या हिंदुत्वाच्या घोडय़ावर घेतले अािण बाबरी मशीद प्रश्नावर मिरवू दिले. संघाच्या वा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ही मशीद पाडली याऐवजी आम्ही ती पाडली असे सेना नेते म्हणत असतील तर त्यांना तसे म्हणू द्यावे, आपला राजकीय सापही मरतो आणि काठीही सलामत राहते असा चतुर विचार भाजपच्या धुरिणांनी केला अािण सेनेला हिंदुत्व चिकटले. ती राजकीय सोय होती.

आता ती तितकी राहिलेली नाही. कारण मूळचा हिंदुत्ववादी, खुद्द भाजपच मुंबईच्या मैदानात उतरू पाहात असून सेनेचा कडवा दावेदार म्हणून समोर येत आहे. हा धोका मोठा आहे. कारण दरम्यानच्या काळात सेनेच्या कचखाऊ धोरणांमुळे मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला असून त्याची जागा मोठय़ा प्रमाणावर अमराठींनी घेतली आहे. आता पंचाईत ही की या अमराठींसाठी सेनेला हिंदुत्वाची भाषा करावी लागते अािण मूळच्या दुर्लक्षिल्या गेलेल्यांसाठी मराठीची. तेव्हा वाघ म्हणवून घेणाऱ्या सेनेच्या अंगावर तशा रंगाची फक्त वल्कले आहेत अािण त्या वल्गनांमागे हे राजकीय वास्तव आहे.